व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मोठी बाबेल पडली!”

“मोठी बाबेल पडली!”

अध्याय ३०

“मोठी बाबेल पडली!”

१. दुसरा देवदूत कशाची घोषणा करतो आणि मोठी बाबेल कोण आहे?

 ही देवाच्या न्यायदंडाची घटिका आहे! यास्तव, हा ईश्‍वरी संदेश ऐका: त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला:पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.’” (प्रकटीकरण १४:८) अगदी पहिल्याच वेळी प्रकटीकरण आपले लक्ष मोठ्या बाबेलवर केंद्रित करते. पण हे काही अखेरचे नाही. पुढे १७ व्या अध्यायात तिचे विषयासक्‍त असणारी वेश्‍या असे वर्णन दिले आहे. पण ती कोण आहे? आपण पाहणार आहोत, त्याप्रमाणे ती जगव्याप्त साम्राज्य आहे. ती धर्म असून सैतानाची अशी बनावट व्यवस्था आहे, जिचा तो देवाच्या स्त्री संतानाविरुद्ध लढत देण्यासाठी उपयोग करतो. (प्रकटीकरण १२:१७) मोठी बाबेल खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य आहे. जे स्वतःमध्ये प्राचीन बाबेलच्या सर्व धार्मिक प्रथा व शिक्षण आचरतात व या मोठ्या बाबेलीचा आत्मा प्रदर्शित करतात अशा सर्व धर्मांना ती आपणामध्ये सामावून आहे.

२. (अ) सर्व पृथ्वीच्या भागात बाबेलोनी धर्म कसा पसरला? (ब) मोठ्या बाबेलीचा सर्वात प्रमुख भाग कोणता आहे आणि याने केव्हापासून प्रबळ संघटना या नात्याने स्वतःला सामोरे आणले?

सुमारे ४,००० वर्षांआधी बाबेल येथेच यहोवाने बाबेलचा बुरुज बांधत असलेल्या कामगारांच्या भाषेत घोटाळा केला होता. तेथे निर्माण झालेले विविध भाषीय गट पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पांगले गेले व ते आपणासोबत असे धर्मत्यागी विश्‍वास व प्रथा घेऊन गेले, जे आजतागायत बहुतेक धर्मांचा पाया राहिले आहेत. (उत्पत्ती ११:१-९) मोठी बाबेल ही सैतानाच्या संघटनेच्या धर्मव्यवस्थेचा भाग आहे. (पडताळा योहान ८:४३-४७.) यातील आज सर्वात प्रमुख भाग म्हणजे ख्रिस्ती धर्मजगत, जे ख्रिस्तानंतरच्या चवथ्या शतकापासून प्रबळ पण अधर्मी संघटना असे पुढे आले. याने बायबलमधून नव्हे, तर बाबेली धर्मांकडून शिकून घेऊन आपणामध्ये सांप्रदाय व तत्त्वप्रणाली आणली.—२ थेस्सलनीकाकर २:३-१२.

३. मोठी बाबेल पडली आहे हे कसे म्हणता येते?

तुम्ही कदाचित असे विचाराल, ‘सध्या तर पृथ्वीवर धर्म हा अद्याप वर्चस्व राखून आहे तर मग, त्या देवदूताने मोठी बाबेल पडली आहे असे का घोषित केले आहे?’ मागे, सा. यु. पूर्व. ५३९ नंतर प्राचीन बाबेल पडले तेव्हा काय घडले बरे? इस्राएलांना आपल्या स्वगृही परतण्याची व तेथे जाऊन खऱ्‍या भक्‍तीची प्रस्थापना करण्याची मोकळीक मिळाली! याचप्रकारे, १९१९ मध्ये आध्यात्मिक इस्राएलांचे झालेले पुनर्वसन व त्यानंतरही आजतागायत या तेजस्वी आध्यात्मिक समृद्धीची सतत होत राहिलेली वाढ, मोठी बाबेल त्या वर्षी पडली याचा स्पष्ट पुरावा आहे. आता तिच्यामध्ये देवाच्या लोकांना रोखून धरण्याचे सामर्थ्य राहिले नाही. याचप्रमाणे, तिच्या स्वत:च्या लोकांच्या श्रेणीतही ती खूप अडचणीत सापडली आहे. तिची भ्रष्टता, अप्रामाणिकता आणि अनैतिकता या गोष्टी १९१९ पासून जाहीरपणे उघड होत आल्या आहेत. बहुतेक युरोपातील, खूपच कमी लोक आता चर्चला जात आहेत आणि काही समाजवादी देशात धर्म हा “लोकांचा अफू” असल्याचे मानला जातो. देवाच्या सत्य वचनाच्या सर्व चाहत्यांच्या नजरेत ती आता ओंगळ झाली असल्यामुळे, यहोवाकडील नीतीमान न्यायदंड येण्याची वाट पाहात ती जणू मृत्यूच्या रांगेत उभी आहे.

बाबेलचे निंद्य पतन

४-६. मोठ्या बाबेलने “आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरुपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला” हे कसे घडले?

मोठ्या बाबेलचे जे निंद्य पतन घडले आहे त्याला अनुलक्षून असणारी परिस्थिती आपण पडताळून बघू या. येथे देवदूत आम्हाला सांगतो की, “मोठी बाबेल . . . [हिने] आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरुपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.” याचा काय अर्थ होतो? ते विजयाला अनुलक्षून आहे. उदाहरणार्थ, यहोवाने यिर्मयाला असे म्हटले: “माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवितो त्यांस तो पाज; म्हणजे ते तो पितील आणि त्यांच्यामध्ये मी तरवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील.” (यिर्मया २५:१५, १६) सा. यु. पूर्वीच्या सहाव्या व सातव्या शतकात यहोवाने तो विनाशाचा पेला पुष्कळ राष्ट्रांना पाजण्यासाठी प्राचीन बाबेलचा उपयोग केला. यामध्ये धर्मत्यागी यहूदाचा समावेश होता व त्यामुळे त्याच्या स्वतःच्या लोकांना देखील बंदिवासात जावे लागले. यानंतर, बाबेलचे देखील पतन झाले व याचे कारण म्हणजे तिच्या राजाने ‘स्वर्गीच्या प्रभू’ यहोवा याजबरोबर उद्दामपणा केला हे होते.—दानीएल ५:२३.

मोठ्या बाबेलने देखील विजय संपादले आहेत, पण ते बहुतेक सर्वच अधिक कावेबाज आहेत. तिने वेश्‍याचरणाचा उपयोग करून, त्यांच्याबरोबर धार्मिक स्वरुपाचा व्यभिचार आचरून ‘सर्व राष्ट्रांना पाजले.’ तिने राजकीय सत्ताधीशांना आपणासोबत मैत्री व संगनमत करण्याची भुरळ पाडली. धार्मिक मोहकता सामोरी ठेवून तिने राजकीय, व्यापारी व आर्थिक दबाव आणविला. तिने धार्मिक छळ, धार्मिक युद्धे तसेच राष्ट्रीय युद्धांना खतपाणी घालून ती राजकीय व व्यापारी कारणांवर लढविली. या युद्धांना तिने पवित्र केले व म्हटले की, ही युद्धे देवाची इच्छा अशी आहेत.

या २० व्या शतकातील युद्धे व राजकारण यात धर्माची लुडबूड हे सर्वसाधारण परिचयाचे आहे—जसे की, जपानचे शिंतो, भारतातील हिंदू, व्हिएतनाममधील बुद्ध, उत्तर आयर्लंड व लॅटिन अमेरिकेतील “ख्रिस्ती,” तसेच इतर—शिवाय दोन जागतिक महायुद्धात दोन्ही बाजूच्या लष्करातील धर्मोपदेशकांनी तरुणांना एकमेकांची कत्तल घडवून आणण्यासाठी चेतविले तेही यात समाविष्ट आहे. मोठ्या बाबेलने जी भुलवणूक घडवून आणली तिचे अप्रतिम उदाहरण, तिने १९३६-३९ दरम्यान स्पॅनिशमधील मुलकी युद्धात आपला सहभाग देऊन ६,००,००० लोकांची जी हत्या घडविली ते होय. हा रक्‍तपात कॅथलिक धर्मपुढाऱ्‍यांना व त्यांच्या मित्रांना पाठबळ देणाऱ्‍यांकडून स्पेनच्या कायदेशीर सरकारकडून चर्चची मालमत्ता व दर्जा धोक्यात आणली जाण्याची भीती होती म्हणून काही अंशी घडवला गेला.

७. मोठ्या बाबेलचे प्रमुख लक्ष्य कोण होते आणि या लक्ष्याच्या विरुद्ध तिने कोणत्या पद्धती वापरल्या?

मोठी बाबेल ही सैतानाच्या संतानाच्या धर्माचा भाग असल्यामुळे तिने यहोवाची “स्त्री,” “वर असलेली यरुशलेम” हिला नेहमीच आपले प्रमुख लक्ष्य बनवले आहे. पहिल्या शतकात, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीला स्त्रीचे संतान या अर्थी स्पष्टपणे ओळखण्यात आले होते. (उत्पत्ती ३:१५; गलतीकर ३:२९; ४:२६) या शुद्ध मंडळीला धार्मिक व्यभिचारात पाडून तिजवर विजय मिळवण्याचा मोठ्या बाबेलने खूप प्रयत्न केला. प्रेषित पौल व पेत्र यांनी इशारा दिला की, पुष्कळजण पडतील आणि मोठा धर्मत्याग उद्‌भवेल. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ पेत्र २:१-३) येशूने सात मंडळ्यांना दिलेले संदेश दाखवतात की, योहानाच्या जीवनाच्या अंताला ही मोठी बाबेल इतरांना भ्रष्ट करण्याच्या आपल्या प्रयत्नात गढून गेली होती. (प्रकटीकरण २:६, १४, १५, २०-२३) पण हिला कोठवर जाता येईल हे येशूने आधीच दाखवले होते.

गहू व निदण

८, ९. (अ) येशूच्या गहू व निदणाच्या दाखल्याने काय सूचित केले? (ब) “लोक झोपेत असताना” काय घडले?

गहू व निदणाच्या दाखल्यात बोलताना येशूने म्हटले की, पेरणाऱ्‍याने चांगले बी शेतात पेरले. परंतु “लोक झोपेत असताना,” कोणी शत्रू आला व तेथे तो निदण पेरुन गेला. अशाप्रकारे गव्हाची वाढ होण्यास निदणामुळे अडथळा झाला. येशूने हा दाखला याप्रकारे विवेचित केला: “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा वैरी हा सैतान आहे.” मग, त्याने दाखवले की, गहू व निदण यांना ‘युगाच्या समाप्तीपर्यंत’ वाढू दिले गेले; मग देवदूत येऊन लाक्षणिक निदण ‘जमा करणार’ होते.—मत्तय १३:२४-३०; ३६-४३.

येशू, प्रेषित पौल व पेत्र यांनी ज्याबद्दल इशारा दिला होता, तेच घडले. “लोक झोपेत असताना,” मग, ते प्रेषित मरणात निद्रावश झाल्यानंतर असो की, ख्रिस्ती देखरेखे देवाच्या कळपाचे रक्षण करण्याच्या बाबतीत मंद झाले तेव्हा मंडळीतच बाबेलोनी धर्मत्यागाचा अंकुर उद्‌भवला. (प्रेषितांची कृत्ये २०:३१) गव्हापेक्षा निदणाची लवकरच झपाट्याने वाढ होत गेली व त्यांनी गव्हाला झाकून टाकले. कित्येक शतके तर असे भासले की, स्त्री संतान हे पूर्णपणे मोठ्या बाबेलीच्या विस्तृत झग्याखाली झाकाळले गेले आहे.

१०. १८७० च्या दशकात काय घडले व मोठ्या बाबेलने याबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली?

१० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी १८७० च्या दशकाच्या काळात मोठ्या बाबेलीच्या वेश्‍या पद्धतीच्या मार्गातून स्वतःला दूर करण्याच्या निर्धाराचा प्रयत्न आरंभिला. ख्रिस्ती धर्मजगताने मूर्तिपूजकांतून जी खोटी तत्त्वे आपणात सामावून घेतली होती त्यांना त्यागिले व बायबलचा आपल्या प्रचारकार्यात वापर करून हे धैर्याने प्रकटविले की, विदेश्‍यांचे काळ १९१४ मध्ये संपतील. खऱ्‍या भक्‍तीच्या या चेतनादायक पुनर्वसनाला मोठ्या बाबेलच्या प्रमुख साधनाने, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी विरोध केला. पहिल्या जागतिक युद्धकाळामध्ये त्यांनी लढाईच्या परिस्थितीचा फायदा उचलून विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या छोट्या गटाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला. १९१८ मध्ये जेव्हा त्यांचे कार्य पूर्णतयः बंद पाडण्यात आले तेव्हा, मोठी बाबेल विजयी झाली आहे असे दिसले. तिने त्यांच्यावर विजय मिळवला आहे असे वाटले.

११. प्राचीन बाबेलच्या पतनामुळे काय घडले?

११ आम्ही आधीच पाहिले आहे त्यानुसार गर्विष्ठ बाबेल शहराला सा. यु. पूर्व ५३९ मध्ये सत्तेपासून भयंकर पतन अनुभवावे लागले. तेव्हा ही मोठी वाणी ऐकण्यात आली: “बाबेल पडला हो पडला!” जागतिक साम्राज्याचे प्रधान आसन हे थोर कोरेशाच्या नेतृत्वाखालील मेदय-पारस सैन्यांपुढे पडले. ते शहर जरी या विजयातून वाचले गेले तरी, त्याचे पतन खरे होते व यामुळेच त्याने आपणात बंदिस्त करून ठेवलेल्या यहूदी बंदिवासांना मुक्‍ती मिळाली. हे यहूदी यरुशलेमेस खऱ्‍या भक्‍तीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तेथे परतले.—यशया २१:९; २ इतिहास ३६:२२, २३; यिर्मया ५१:७, ८.

१२. (अ) मोठी बाबेल पडली आहे हे आमच्या शतकात कसे म्हटले जाऊ शकते? (ब) यहोवाने ख्रिस्ती धर्मजगताचा पूर्णपणे त्याग केला आहे हे कशावरुन सिद्ध होते?

१२ आमच्या शतकात, मोठी बाबेल पडली आहे ही गर्जनाही ऐकण्यात आली आहे! बाबेलोनी ख्रिस्ती धर्मजगताला १९१८ मध्ये जे तात्कालिक यश मिळाले होते ते १९१९ मध्ये उलटले; कारण यावेळी अभिषिक्‍त जनातील उरलेले, योहान वर्गातील लोकांचे आध्यात्मिक पुनरुत्थान घडून पुनर्वसन घडले. मोठी बाबेल पडली हे तिला आता देवाच्या लोकांना आपल्या कह्‌यात ठेवता येणे जमले नाही यामुळेही दिसले. ख्रिस्ताचे अभिषिक्‍त बांधव टोळाप्रमाणे अगाधकूपातून धुरासारखे बाहेर पडून कार्याला सिद्ध झाले. (प्रकटीकरण ९:१-३; ११:११, १२) हेच आधुनिक काळचे “विश्‍वासू व बुद्धिमान दास” होते व यांना धन्याने पृथ्वीवरील आपल्या सर्वस्वावर नेमले. (मत्तय २४:४५-४७) अशा पद्धतीने त्यांचा करण्यात आलेला वापर दाखवतो की, यहोवाने ख्रिस्ती धर्मजगताला, जरी ते त्याचे पृथ्वीवरील प्रतिनिधी आहेत असा त्याचा दावा आहे तरी, सर्वतोपरी धिक्कारले आहे. शुद्ध भक्‍तीची पुनर्स्थापना झाली आणि १,४४,००० जणांच्या शेषांवर, मोठ्या बाबेलची सदाची शत्रू असणाऱ्‍या स्त्रीच्या संतानापैकीच्या बाकीच्या लोकांवर, शिक्का मारण्याचे काम पूर्ण होण्याला मार्ग उघडा झाला. हे सर्व काही, सैतानाच्या धार्मिक संस्थेचे केवढे चिरडण्याजोगे पतन घडले आहे याची ग्वाही होती.

पवित्र जनांचा धीर

१३. (अ) तिसरा देवदूत कशाची घोषणा करतो? (ब) श्‍वापदाची खूण धारण करणाऱ्‍यांना यहोवा कोणता न्यायदंड सुनावतो?

१३ आता तिसरा देवदूत बोलू लागतो. ऐका! त्यांच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला:जो कोणी श्‍वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करितो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करुन घेतो, तोहि देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला त्याचा कोधरूपी द्राक्षारस पिईल.’” (प्रकटीकरण १४:९, १०अ) प्रकटीकरण १३:१६, १७ मध्ये सांगण्यात आले आहे की, प्रभूच्या दिवसात जे श्‍वापदाच्या मूर्तीची उपासना करणार नाहीत त्यांना छळ सहन करावा लागेल—त्यांची हत्याही होईल. आता आपण हे शिकतो की, “ती खूण म्हणजे त्या श्‍वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या” जे धारण करून आहेत अशांवर यहोवाने न्यायदंड आणण्याचे निश्‍चित ठरवले आहे. अशांना यहोवाच्या क्रोधाचा निरा घातलेला ‘कोधाचा प्याला’ प्यावा लागेल. याचा त्यांच्यासाठी काय अर्थ होणार होता? मागे, सा. यु. पूर्व ६०७ मध्ये यहोवाने यरुशलेमेला त्याच्या “क्रोधाचा प्याला” पिण्यास भाग पाडले तेव्हा, त्या शहराला बाबेलोन्यांच्या हातून “उजाडी व नाश, दुष्काळ व तरवार” या गोष्टी अनुभवण्यास मिळाल्या. (यशया ५१:१७, १९) याचप्रमाणे, या पृथ्वीतील राजकीय सत्ता व त्याची मूर्ती संयुक्‍त राष्ट्रसंघ यांना भजणाऱ्‍यांना यहोवाच्या क्रोधाचा प्याला प्यावा लागेल तेव्हा त्याची निष्पत्ती त्यांच्यासाठी विनाश हीच असेल. (यिर्मया २५:१७, ३२, ३३) त्यांचा सर्वतोपरी नाश होणार.

१४. श्‍वापद व त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्‍यांचा नाश होण्याआधी यांना कशाचा अनुभव येणार व योहान याचे कसे वर्णन देतो?

१४ तथापि, हे घडण्याआधी श्‍वापदाची खूण धारण करणाऱ्‍यांना यहोवाच्या नापसंतीचे पीडादायक परिणाम अनुभवावे लागतील. श्‍वापद व त्याच्या मूर्तीच्या उपासकाबद्दल बोलताना देवदूत योहानास कळवतो: आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्‍यासमक्ष त्याला अग्नि व गंधक ह्‍यापासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो आणि जे श्‍वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करितात त्यांस, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्यांस रात्रंदिवस विश्रांति मिळत नाही.प्रकटीकरण १४:१०ब, ११.

१५, १६. प्रकटीकरण १४:१० मधील “अग्नी व गंधक” या शब्दांमागील अर्थ काय आहे?

१५ येथे जो अग्नी व गंधक यांचा उल्लेख आला आहे त्यावरुन काहींनी हा अग्निनरकाच्या अस्तित्वाचा पुरावा असल्याचे गृहीत धरले आहे. तथापि, याच्या सदृश्‍य असणाऱ्‍या आणखी एका भविष्यवादाकडे थोडासा दृष्टिक्षेप टाकल्यास या शब्दांमागील खरा अर्थ काय आहे ते समजते. यशयाच्या काळी, यहोवाने एदोम राष्ट्राला, त्याने इस्राएलाशी वैर केल्यामुळे त्याला शिक्षा मिळणार असा इशारा दिला. त्याने म्हटले: “त्याचे ओढे राळ बनतील, त्याची धूळ गंधक होईल व त्याचा देश राळेसारखा जळेल. तो रात्रंदिवस विझणार नाही; त्याचा धूर सदा चढत राहील; पिढ्यानपिढ्या तो ओसाड पडेल; त्यात कोणी कधीहि संचार करणार नाही.”—यशया ३४:९, १०.

१६ तेव्हा एदोमाला एखाद्या दंतकथेतील अग्निनरकात कायमचे जळत राहण्यासाठी टाकून देण्यात आले का? अर्थातच नाही. उलटपक्षी, ते राष्ट्र जणू आग व गंधकाने पूर्णपणे भस्मसात होऊन या जगाच्या दृश्‍यातून कायमचे नाहीसे झाले. त्या शिक्षेचा अंतिम परिणाम सार्वकालिक यातना नव्हे तर ‘अव्यवस्था, . . . शून्यता’ हा होता. (यशया ३४:११, १२) ‘युगानुयुग वर जाणारा धूर’ याचे हुबेहुब चित्र देतो. एखादे घर आगीत जळाले म्हणजे, आग विझल्यावर राखेतून धूर काही काळासाठी वर येत राहतो व बघणाऱ्‍यांना विनाशकारी प्रचंड आग लागल्याचे पुराव्यासहित दिसते. आजही देवाच्या लोकांना एदोमच्या नाशापासून धडा घेता येण्याजोगा आहे. अशाप्रकारे ‘त्याच्या आगीचा धूर’ लाक्षणिकपणे अद्याप वर जात आहे असे म्हणता येते.

१७, १८. (अ) श्‍वापदाची खूण करून घेणाऱ्‍यांना शेवटी कोणता परिणाम मिळणार? (ब) त्या श्‍वापदाच्या उपासकांना कशी पीडा मिळते? (क) “त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो” हे कसे होते?

१७ श्‍वापदाचे चिन्ह असणाऱ्‍यांना देखील जणू आगीप्रमाणे, पूर्णपणे नाश मिळेल. भविष्यवाद नंतर दाखवतो त्याप्रमाणे त्यांची शवे न पुरता तशीच जमिनीवर जनावरे व पक्षी यांना खाद्य मिळण्यासाठी पडून राहतील. (प्रकटीकरण १९:१७, १८) अशाप्रकारे, यांना सार्वकालिक यातना मिळत नाही, हे स्पष्ट आहे. मग, त्यांना “अग्नी व गंधक ह्‍यापासून पीडा होईल,” याचा काय अर्थ होतो? त्या पीडा, त्यांचे खोटेपण उघड झाल्यामुळे व त्यांच्यावर देवाचा न्यायदंड येत आहे ही घोषणा करण्यात आल्यामुळे मिळते. या कारणामुळे ते देवाच्या लोकांची बदनामी करतात व जेथे शक्य आहे तेथे राजकीय श्‍वापदाला ते मोठ्या कावेबाजपणे यहोवाच्या साक्षीदारांवर छळ आणण्यास व त्यांना ठारही मारण्यास उद्युक्‍त करतात. अशा विरोधकांना सरतेशवेटी, जणू अग्नी व गंधक यांजद्वारे नष्ट करण्यात येईल. मग, “त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर” जात राहील ते या अर्थी की, देवाचा न्यायदंड या साक्षीरुपाने राहील की, पुन्हा कधी कोणी यहोवाच्या वाजवी सार्वभौमत्वाला आव्हान दिले तर त्यांचेही असेच घडेल. तो वादविषय तर सर्वकाळासाठी संपुष्टात आलेला असणार.

१८ आज हा पीडादायक संदेश कोण घोषित करतात? ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही अशांना पीडा देण्याचा अधिकार लाक्षणिक टोळांना दिला होता हे आपण पाहिल्याचे आठवणीत आणा. (प्रकटीकरण ९:५) उघडपणे, देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली हेच पीडा देतात. या लाक्षणिक टोळांच्या या पीडेची इतकी पराकाष्ठा आहे की, त्यामुळे “जे श्‍वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करितात त्यांस आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्यांस रात्रंदिवस विश्रांति मिळत नाही.” मग, शेवटी, त्यांचा नाश झाल्यावर, यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या विजयी प्रतीकाच्या पुराव्याच्या रुपात “त्यांच्या पीडेचा धूर” सदासर्वदा वर जात राहील. तो विजय पूर्ण होईपर्यंत योहान वर्गाची सहनशीलता टिकून राहो! देवदूत देखील तोच समारोप करतो: देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्‍वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्‍यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्‍यांतच आहे.प्रकटीकरण १४:१२.

१९. पवित्र जनांठायी धीर असणे का जरुरीचे आहे आणि योहान असे काय कळवतो की, ज्यामुळे त्यांना बळकटी मिळते?

१९ होय, ‘पवित्र जनांचा धीर’ याचा अर्थ ते यहोवा देवाची येशू ख्रिस्ताद्वारे संपूर्ण निष्ठेने भक्‍ती करीत आहेत, असा आहे. त्यांचा संदेश लोकप्रिय नाही. त्यामुळे विरोध, छळ आणि हुतात्मिकता या गोष्टी प्रत निरवले जाते. पण योहान पुढे जे म्हणतो त्यामुळे त्यांना बळकटी येते: तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली:लिही: प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच, आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.’”प्रकटीकरण १४:१३.

२०. (अ) योहानाने कळविलेले अभिवचन, पौलाने येशूच्या उपस्थितीबद्दल केलेल्या भविष्यवादासोबत कसे जुळणारे आहे? (ब) सैतानाला स्वर्गातून खाली टाकून दिल्यानंतर ज्या अभिषिक्‍तांचा मृत्यू घडतो अशांना कोणत्या खास हक्काचे अभिवचन आहे?

२० हे अभिवचन, पौलाने ख्रिस्ताच्या उपस्थितीसंबंधाने जो भविष्यवाद केला त्याच्याशी चांगले जुळणारे आहे: “ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील; नंतर जिवंत उरलेले आपण [प्रभूच्या दिवशी बचावून राहिलेले अभिषिक्‍त जन] त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ.” (१ थेस्सलनीकाकर ४:१५-१७) सैतानाची स्वर्गातून हाकलपट्टी घडल्यावर ख्रिस्तामध्ये मेलेल्यांना पहिल्याने उठवण्यात आले. (पडताळा प्रकटीकरण ६:९-११.) यानंतर, प्रभूच्या दिवसात मरणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांना एका खास हक्काचे अभिवचन आहे. त्यांचे आत्मिक जीवनासाठी होणारे पुनरुत्थान लगेच, “क्षणात, निमिषांत” होते. (१ करिंथकर १५:५२) हे केवढे अद्‌भुत आहे! मग, त्यांची नीतीमत्तेची कामे त्यांच्यासह स्वर्गीय आसमंतात पुढे चालू राहतात.

पृथ्वीची कापणी

२१. ‘पृथ्वीच्या कापणीबद्दल’ योहान आपणास काय सांगतो?

२१ या न्यायाच्या दिवसात इतरांनाही लाभ प्राप्त होऊ शकेल, हे योहान आम्हास पुढे सांगतो: नंतर मी पाहिले, तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीएक दृष्टीस पडला; त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुगूट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत [चवथा] मंदिरातून [पवित्र स्थान] निघून, जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला,तू आपला विळा चालवून कापणी कर; कारण कापणीची वेळ आली आहे; पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.प्रकटीकरण १४:१४-१६.

२२. (अ) सोन्याचा मुकुट घातलेला व मेघावर बसलेला कोण आहे? (ब) कापणीचा कळस केव्हा गाठण्यात येतो व कसा?

२२ मेघावर बसलेला कोण आहे त्याची ओळख आपल्याला शंकास्पद नाही. पांढऱ्‍या मेघावर बसलेला, मनुष्याच्या पुत्रासारखा दिसणारा आणि सोन्याचा मुकुट घातलेला या गोष्टी अगदी स्पष्टपणे दाखवतात की तो, दानीएलाने आपल्या दृष्टांतात पाहिलेला येशू, मसीही राजा आहे. (दानीएल ७:१३, १४; मार्क १४:६१, ६२) पण येथे भाकीत करण्यात आलेली कापणी कोणती आहे? पृथ्वीवर असताना येशूने शिष्य बनविण्याच्या कामाची तुलना मानवजातीच्या जगव्याप्त शेतातील कापणीला सूचित केली. (मत्तय ९:३७, ३८; योहान ४:३५, ३६) या कापणीचा कळस, येशू राजा या नात्याने मुकुट परिधान करतो व आपल्या पित्याच्या वतीने न्यायाची अंमलबजावणी करतो तेव्हा घडतो. या कारणामुळेच, त्याच्या १९१४ पासून राज्य करण्याचा काळ हा कापणी मिळवण्याचा आनंदी काळ आहे.—पडताळा अनुवाद १६:१३-१५.

२३. (अ) कापणी करण्याची आज्ञा कोणाकडून येते? (ब) १९१९ पासून कोणती कापणी सुरु झाली व अद्याप चालू आहे?

२३ येशू स्वतः राजा व न्यायाधीश असला तरी तो आपला देव यहोवा याच्यापासून आज्ञा मिळेपर्यंत कापणी सुरु करीत नाही. ती आज्ञा “मंदिरातून [पवित्र स्थानातून]” एका देवदूतामार्फत येते. तेव्हा लगेच येशू आज्ञेचे पालन करतो. सुरवातीला १९१९ पासून तो आपल्या देवदूतांद्वारे १,४४,००० ची कापणी पूर्ण करतो. (मत्तय १३:३९, ४३; योहान १५:१, ५, १६) यानंतर, दुसरी मेंढरे यांच्या मोठ्या लोकसमुदायाची कापणी होते. (मत्तय २५:३१-३३; योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९) या दुसरी मेंढरे वर्गातील मोठ्या संख्येच्या लोकांचे पदार्पण १९३१ पासून १९३५ च्या काळात होऊ लागले असे इतिहास दाखवतो. यहोवाने योहान वर्गाच्या विचारास १९३५ मध्ये प्रकटीकरण ७:९-१७ च्या मोठ्या लोकसमुदायाची खरी ओळख पुरवली. त्यानंतर पुढे, या लोकसमुदायाच्या एकत्रीकरणावर अधिक भर देण्यात आला. यांची संख्या १९९३ पर्यंत चाळीस लाखांपेक्षाही अधिक गेली होती व ती आजही वाढतच आहे. खरेच, मनुष्याच्या पुत्रासारख्या दिसणाऱ्‍या व्यक्‍तीने या शेवटल्या काळात फारच मोठी हर्षाची कापणी केली.—पडताळा निर्गम २३:१६; ३४:२२.

पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तुडविणे

२४. पाचव्या देवदूताच्या हातात काय आहे आणि सहावा देवदूत काय म्हणतो?

२४ तारणाची कापणी पूर्ण झाल्यावर, आणखी एका कापणीची वेळ येते. योहान कळवतो: मग आणखी एक देवदूत [पाचवा] स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळहि तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत [सहावा] वेदीतून निघाला; त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले,तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्षे पिकली आहेत.’” (प्रकटीकरण १४:१७, १८) प्रभूच्या दिवसात वाईटापासून चांगले ते वेगळे करण्याच्या कापणीचे पुष्कळ काम देवदूतांवर सोपवण्यात आले आहे!

२५. (अ) पाचवा देवदूत मंदिराच्या पवित्र स्थानातून बाहेर पडला याद्वारे काय सूचित होते? (ब) कापणी सुरु करण्याची आज्ञा ही ‘वेदीतून निघणाऱ्‍या’ एका देवदूताकडून येते हे का योग्य आहे?

२५ मंदिराच्या पवित्र स्थानातील यहोवाच्या सान्‍निध्यापुढून पाचवा देवदूत बाहेर येतो; यामुळे यहोवाच्या इच्छेनेच शेवटली कापणी देखील पूर्ण केली जाते. या दूताला आपले काम सुरु करण्याची आज्ञा, ‘वेदीतून निघणाऱ्‍या’ आणखी एका देवदूताकडून मिळालेल्या निरोपाद्वारे मिळते. ही गोष्ट अत्यंत अभूतपूर्व आहे, कारण वेदीखालील विश्‍वासू जीवांनी हे आधीच विचारले होते: “हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस. तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांपासून आमच्या रक्‍ताचा सूड घेणार नाहीस?” (प्रकटीकरण ६:९, १०) पृथ्वीच्या द्राक्षांची कापणी केल्यावर सूड घेण्याबद्दलची ती ओरड थांबू शकेल.

२६. ‘पृथ्वीच्या द्राक्षी’ काय आहेत?

२६ पण ‘पृथ्वीच्या द्राक्षी’ काय आहेत? इब्री शास्त्रवचनात यहूदी राष्ट्राला यहोवाचा द्राक्षमळा असे संबोधण्यात आले आहे. (यशया ५:७; यिर्मया २:२१) याचप्रमाणे, येशू ख्रिस्त तसेच देवाच्या राज्यात त्याच्यासोबत सेवा करणाऱ्‍यांना देखील द्राक्षवेल म्हटलेले आहे. (योहान १५:१-८) या रचनेत, द्राक्षवेलीचे अपूर्व लक्षण म्हणजे त्याचे फळ होय आणि खऱ्‍या ख्रिस्ती द्राक्षवेलाने यहोवाच्या स्तुतीसाठी मुबलक फळांची निर्मिती केली आहे. (मत्तय २१:४३) तेव्हा ‘पृथ्वीच्या द्राक्षी’ ह्‍या खरी द्राक्षवेल नक्कीच नाहीत, तर सैतानाची बनावट निर्मिती, मानवजातीवरील त्याची भ्रष्ट अशी दृश्‍य राजकीय व्यवस्था आहे आणि विविध “घड” म्हणजे शतकानुशतके निर्मिण्यात आलेली दुरात्मिक फलप्राप्ती ही आहे. मोठ्या बाबेलीत अग्रगण्य भाग असणाऱ्‍या धर्मत्यागी ख्रिस्ती धर्माने या विषारी द्राक्षीवर आपले मोठे प्रभुत्व राखले आहे.—पडताळा अनुवाद ३२:३२-३५.

२७. (अ) हाती विळा असलेला देवदूत पृथ्वीची द्राक्षे एकत्र करतो तेव्हा काय घडते? (ब) इब्री शास्त्रवचनातील कोणते भविष्यवाद या कापणीचे क्षेत्र किती व्याप्त असेल असे सूचित करतात?

२७ न्यायाची अंमलबजावणी झालीच पाहिजे! तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले; त्यातून रक्‍त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला.” (प्रकटीकरण १४:१९, २०) या द्राक्षीविरुद्ध यहोवाने आपला क्रोध आधीच वदविला आहे. (सफन्या ३:८) यशयाच्या पुस्तकातील भविष्यवाद हे निर्विवादपणे प्रकटवितो की, द्राक्षकुंड तुडविण्यात येईल तेव्हा सर्व राष्ट्रांचा नाश घडेल. (यशया ६३:३-६) योएलने देखील भाकीत केले की, सबंध राष्ट्रांच्या “झुंडी,” “निर्णयाच्या खोऱ्‍यात” “द्राक्षांचा घाणा” तुडवला जाईल तेव्हा नष्ट होतील. (योएल ३:१२-१४) खरेच, एवढी मोठी भयंकर कापणी जी पुढे कधी काळी होणारच नाही! योहानाच्या दृष्टांतानुसार, केवळ द्राक्षांचीच कापणी केली जाणार नसून सबंध द्राक्षीचे घड द्राक्षकुंडात टाकून ते तुडविले जाणार आहे. अशाप्रकारे पृथ्वीची द्राक्षे तुडविली जातील व ती पुन्हा कधीही वाढणार नाहीत.

२८. पृथ्वीच्या द्राक्षीचे घड कोण तुडवितात आणि द्राक्षीचे कुंड “नगराबाहेर तुडविले गेले” याचा काय अर्थ होतो?

२८ दृष्टांतात हे तुडविणे घोड्यांच्या पायाखाली होते असे दाखवले आहे, कारण तुडवल्यामुळे रक्‍त “घोड्यांच्या लगामास” पोहंचले असे सांगण्यात आले आहे. वास्तविकपणे ‘घोडे’ हे बहुधा युद्धाच्या हालचालींना सूचित करीत असल्यामुळे, तो युद्धाचा काळ असला पाहिजे. सैतानी व्यवस्थीकरणाविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या शेवटल्या युद्धात येशूसोबत जाणारे स्वर्गातील सैन्य यांना “सर्वसमर्थ देव ह्‍याच्या तीव्र क्रोधरुपी द्राक्षारसाचे कुंड” तुडवीत असल्याचे म्हटले आहे. (प्रकटीकरण १९:११-१६) पृथ्वीच्या द्राक्षीला तुडविणारे ते हेच होत असे स्पष्ट दिसून येते. ते कुंड “नगराबाहेर तुडविले गेले,” म्हणजे, स्वर्गीय सीयोनाबाहेर तुडविण्यात आले. पृथ्वीच्या द्राक्षीचे कुंड येथे पृथ्वीवरच तुडविले गेले पाहिजे हे अगदीच योग्य आहे. ते “नगराबाहेर तुडविले गेले,” हे फायद्याचे आहे, कारण त्यामुळे पृथ्वीवर स्वर्गीय सीयोनाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या स्त्रीच्या संतानापैकीच्या बाकीच्यांना कोणतीही इजा घडत नाही. यांना तसेच त्यांच्यासोबत मोठ्या लोकसमुदायाला यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनात्मक व्यवस्थेत लपवून सुरक्षित ठेवण्यात येईल.—यशया २६:२०, २१.

२९. द्राक्षकुंडातून वाहणारे रक्‍ताचे पाट किती खोल आहेत, ते कोठवर वाहतात आणि हे सर्व काय सूचित करते?

२९ या विस्तारीत दृष्टांताची समांतरता, दानीएल २:३४, ४४ मध्ये राज्याच्या पाषाणाद्वारे पृथ्वीवरील राज्यांचे जे चूर्ण करण्यात येते त्याच्याशी आहे. ते सर्वतोपरीचे उच्चाटन घडेल. द्राक्षकुंडातून वाहणारे रक्‍ताचे पाट खूप खोल आहेत, कारण त्याचे पात्र घोड्याच्या लगामापर्यंत पोहंचते व ते १,६०० फर्लांग वाहत जाते. * चाराचा वर्ग व दहाचा वर्ग यांच्या गुणाकाराने (४ x ४ x १० x १०) येणारी ही प्रचंड संख्या अगदी जोरदारपणे याचे समर्थन करते की, हा नाश संपूर्ण पृथ्वीवर घडेल. (यशया ६६:१५, १६) हा नाश संपूर्ण व बदलता येणार नाही असा असणार. सैतानाच्या पृथ्वीच्या द्राक्षी पुन्हा कधीच मूळ धरणार नाहीत, केव्हाच नाही!—स्तोत्र ८३:१७, १८.

३०. सैतानाच्या द्राक्षवेलीची कोणती फळे आहेत आणि आमचा काय निर्धार असण्यास हवा?

३० आपण अंतसमयात अगदी खोलवर आलो असता, कापणीचे हे दोन दृष्टांत मोठे अर्थभरीत आहेत. सैतानाच्या द्राक्षवेलीची कोणती फळे निपजली आहेत ते आपल्याला सभोवार पाहून कळू शकेल. गर्भपात व इतर प्रकारचे खून; पुरुषगामीपणा, व्यभिचार व इतर प्रकारातील अनैतिकता; अप्रामाणिकपणा व स्वाभाविक कळवळ्‌याची उणीव—या सर्व गोष्टी या जगाला यहोवाच्या नजरेत अत्यंत वाईट बनवतात. सैतानाच्या द्राक्षवेलीने “विष व कडूदवणा” निपजविली आहेत. तिचे विनाशकारी व मूर्तिपूजक मार्गाक्रमण मानवजातीचा भव्य निर्माता यहोवा याचा अपमान करते. (अनुवाद २९:१८; ३२:५; यशया ४२:५, ८) तर मग, योहान वर्ग करीत असलेल्या आणि येशू यहोवाच्या स्तुतीस्तव पुढे आणीत असलेल्या हितकारी फळांच्या कापणीत क्रियाशीलपणे सहभागी होणे हा किती सुहक्क आहे! (लूक १०:२) या कारणामुळे, आम्हाला या जगाच्या द्राक्षवेलीचा कसलाही डाग लागू देणार नाही असा आमचा निर्धार असू द्यावा आणि याद्वारे आपण, यहोवाच्या प्रतिकूल न्यायदंडाची अंमलबजावणी होईल तेव्हा पृथ्वीच्या द्राक्षीसोबत तुडविले जाण्याचे टाळू शकू.

[तळटीपा]

^ १,६०० फर्लांग म्हणजे साधारण ३०० किलोमीटर किंवा १८० मैल.—प्रकटीकरण १४:२०, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२०८ पानांवरील चौकट]

‘तिच्या जारकर्माचा द्राक्षारस’

मोठी बाबेल हिचा प्रमुख भाग रोमन कॅथलिक चर्च आहे. या चर्चवर रोमच्या पोपचे वर्चस्व आहे आणि प्रत्येक पोप हा प्रेषित पेत्राचा वारस आहे असे मानले जाते. अशा या तथाकथित वारसांबद्दल प्रकाशित झालेली वस्तुस्थिती काही प्रमाणात पुढे दिली आहे:

फोर्मोसस (८९१-९६): “फोर्मोसस यांचा मृत्यू झाल्यावर नऊ महिन्यांनी त्यांचे शव चर्चखालील दफनाच्या भुयारी खोलीतून काढण्यात आले व ते ‘कॅडवेरीक्‌’ सभेपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले. या सभेचे अध्यक्षपद स्तेफन [नव्या पोपनी] यांनी केले. मृत पोपवर, चर्चमध्ये अधिकारपदी जाण्याची अवास्तव इच्छा बाळगणारा असा आरोप ठेवण्यात आला आणि त्याची सर्व कृत्ये निकामी अशी घोषित केली गेली. . . . मग, शवावरुन सर्व धार्मिक वस्त्रे काढून टाकण्यात आली आणि उजव्या हाताची बोटे तोडण्यात आली.”—न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ.

सहावे स्तेफन (८९६-९७): “[फोर्मोससच्या शवाची चौकशी झाल्याच्या] काही महिन्यातच हिंसाचारी घटना घडून पोप स्तेफन यांचे अधिकारपद नष्ट झाले; त्यांना पोपच्या कर्तव्यापासून दूर केले गेले, कैद करण्यात आले व शेवटी फाशी दिली गेली.”—न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ.

तिसरे सर्जियस (९०४-११): “याच्या आधीच्या दोन अधिकाऱ्‍यांना . . . तुरुंगात फाशी देण्यात आली. . . . रोममध्ये यांना थिओफिलॅक्टस कुटुंबाचा आश्रय मिळाला आणि या कुटुंबातील एक मुलगी, मेरोझिया हिजकडून यांना एक मुलगा (नंतरचे अकरावे पोप जॉन) झाल्याचे मानण्यात येते.”—न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ.

सातवे स्तेफन (९२८-३१): “पोपच्या पदावरील शेवटल्या वर्षांत दहाव्या पोप जॉनवर . . . रोमच्या डोना सेनाट्रीक्सचा, मेरोझियाचा कोप भडकला, त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले व येथे त्यांची हत्या झाली. यानंतर मेरोझियांनी सहावे पोप लिओ यांना पोपचे पद बहाल केले. ते पदावर असताना ६ / महिन्यातच त्यांचा मृत्यू घडला. यांच्यानंतर सातवे स्तेफन पदावर आले ते बहुधा मेरोझियाच्या वर्चस्वामुळेच. . . . त्यांच्या पोपच्या दोन वर्षांच्या काळात ते मेरोझियाच्या प्रभुत्वाखाली बलहीन होते.”—न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ.

अकरावे जॉन (९३१-३५): “सातवे स्तेफन यांचा मृत्यू झाल्यावर थिओफिलॅक्टस कुटुंबाच्या मेरोझिया यांनी जॉन या आपल्या मुलासाठी पोपचे पद मिळवले. यावेळी जॉनचे वय २० च्या आरंभीचे होते. . . . पोप असताना त्यांजवर त्यांच्या आईचे प्रभुत्व होते.”—न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ.

बारावे जॉन (९५५-६४): “हे तर नुकतेच अठराव्या वर्षात आले होते आणि समकालीन अहवाल दाखवतात की, यांना आध्यात्मिक गोष्टीत रस नव्हता; उलट रानटी विलास आणि सामाजिक व नैतिक बंधनाचा पगडा नसलेले नीतीभ्रष्ट जीवनाची लालसा होती.”—द ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ पोप्स्‌.

नववे बेनिडिक्ट (१०३२-४४; १०४५; १०४७-४८): “आपले पद आपले धर्मबाप यांना विकल्याचा आरोप यांच्यावर होता व नंतर पुन्हा दोनदा त्यांनी त्या पदाचा दावा केला.”—द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका.

अशाप्रकारे, विश्‍वासू पेत्राचे उदाहरण अनुसरण्याऐवजी, या तसेच इतर पोप्स्‌वर दुष्ट प्रभाव होता. त्यांनी ज्या चर्चवर आपले प्रभुत्व केले तेथे रक्‍तपात घडवला, आध्यात्मिक व शारीरिक जारकर्म केले आणि इजबेलीचा प्रभाव आणला व याद्वारे चर्चला भ्रष्ट केले. (याकोब ४:४) वॉचटावर सोसायटीने १९१७ मध्ये प्रकाशित केलेल्या संपलेले गूज (इंग्रजी) या पुस्तकात याबद्दलची बरीच वस्तुस्थिती सविस्तर वर्णिण्यात आली आहे. अशाप्रकारे, त्या काळातील बायबल विद्यार्थ्यांनी ‘पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित केले’ होते.—प्रकटीकरण ११:६; १४:८; १७:१, २, ५.

[२०६ पानांवरील चित्रे]

सिंहासनावर बसलेला ख्रिस्त देवदूताच्या पाठबळाने न्यायाची अंमलबजावणी करतो

[२०७ पानांवरील चित्रे]

सा. यु. पूर्व ५३९ मध्ये बाबेल पडले तेव्हा त्याच्या बंदिवानांना मोकळीक मिळाली