व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रभूच्या दिवसातील भूकंप

प्रभूच्या दिवसातील भूकंप

अध्याय १८

प्रभूच्या दिवसातील भूकंप

१, २. (अ) तीव्र भूकंपाच्या वेळी कोणता अनुभव येतो? (ब) सहावा शिक्का फोडल्यावर योहान काय घडल्याचे वर्णन देतो?

 तुम्हाला कधी तीव्र भूकंप जाणवला होता का? तो काही सुखावह अनुभव नाही. आधी थोडीशी धडधड सुरु होते, ती वाढत जाऊन तीव्र आवाज होतो. तुम्ही सुरक्षिततेसाठी धडपडता व एखाद्या बाकाखाली जाता, तेव्हाच झटके सुरु होतात व हे हेलकावे वाढत जातात. किंवा तो एकदम त्याच्या प्रचंड धक्क्यामुळे येतो आणि मातीची भांडी, लाकडी सामान व इमारती यांची अचानक मोडतोड होते. नुकसान भयंकर होऊ शकते आणि हे हादरे वारंवार झाल्यास अधिक नुकसान होऊन मोठी दैन्यावस्था निर्माण होते.

हे लक्षात घेऊनच, आता योहान सहावा शिक्का फोडताना जे घडल्याचे वर्णन करतो ते विचारात घ्या: “त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले तेव्हा मोठा भूमिकंप झाला.” (प्रकटीकरण ६:१२अ) हे इतर शिक्के फोडण्याच्याच कालावधीत घडले पाहिजे. तर मग, प्रभूच्या दिवसात हा भूकंप केव्हा घडतो व हा कंप कोणत्या प्रकारातील आहे?—प्रकटीकरण १:१०.

३. (अ) येशूने आपल्या उपस्थितीचे चिन्ह देताना काय घडेल असे भविष्यवादितपणे म्हटले? (ब) खऱ्‍या भूकंपांचा प्रकटीकरण ६:१२ मधील भूकंपासोबत कोणता संबंध आहे?

बायबलमध्ये खऱ्‍या व लाक्षणिक स्वरुपाच्या भूंकपाचा उल्लेख अनेकदा आला आहे. येशूने आपल्या राज्य-उपस्थितीच्या काळाच्या चिन्हाविषयी मोठा भविष्यवाद सांगताना म्हटले की, “जागोजागी . . . भूमिकंप होतील.” हा “वेदनांचा प्रारंभ” असेल. १९१४ पासून जगाची संख्या हजारो लाखोत गेली असता, भूकंपाच्या हादऱ्‍यांनी आमच्या या त्रस्त काळात त्रासाची विलक्षण भर घातली आहे. (मत्तय २४:३, ७, ८) हे भूकंप भविष्यवादाची पूर्णता करणारे असले तरी ते नैसर्गिक व नुकसान घडविणारे होते. ते, प्रकटीकरण ६:१२ मधील मोठ्या लाक्षणिक भूकंपाची प्राथमिकता आहेत. हा भूकंप, सैतानाच्या मानवी पार्थिव व्यवस्थीकरणाला मुळापासून उखडविणारा व एकामागोमाग हादरे बसवून अंतिम विनाश घडविणारा आहे. *

मानवी समाजातील कंप

४. (अ) १९१४ मध्ये भयंकर घटना घडतील हे यहोवाचे लोक केव्हापासून अपेक्षित होते? (ब) कोणत्या काळाच्या समाप्तीला १९१४ चिन्हित करणार होते?

१९१४ मध्ये भयंकर घटना घडतील व त्या विदेश्‍यांच्या काळाच्या समाप्तीला चिन्हित करतील असे १८७० रीच्या मध्यापासून यहोवाच्या लोकांनी अपेक्षिले होते. हा “सात काळ” (२,५२० वर्षांचा) इतका समय असून तो सा.यु.पू. ६०७ मध्ये यरुशलेमेतील दाविदाचे राज्य उलटविण्यापासून सुरु होतो व सा.यु. १९१४ मध्ये स्वर्गीय यरुशलेमेत येशूच्या राजासनावर बसण्याने संपतो.—दानीएल ४:२४, २५; लूक २१:२४, किंग जेम्स व्हर्शन. *

५. (अ) ऑक्टोबर २, १९१४ मध्ये सोसायटीच्या पहिल्या अध्यक्षांनी कोणती घोषणा केली? (ब) १९१४ पासून कोणत्या राजकीय क्रांत्या घडल्या?

वॉचटावर सोसायटीचे पहिले अध्यक्ष सी. टी. रसेल, ब्रुकलिन, न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर २, १९१४ मध्ये सकाळच्या उपासनेसाठी बेथेल कुटुंबात आले, तेव्हा त्यांनी नाट्यमय घोषणा केली: “विदेश्‍यांच्या काळाची समाप्ती झाली; त्यांच्या राजांची घटका भरली आहे.” खरेच, १९१४ पासून जी जागतिक क्रांती घडली तिने दीर्घकाळच्या कित्येक राज्यसत्ताक पद्धतींना नाहीसे केले. १९१७ मध्ये झालेल्या बोल्शेविक क्रांतीने झारशाही नाहीशी केली व तिने सध्याच्या मार्क्सवादी व भांडवलशाहीमध्ये झगडा लावून दिला. राजनैतिक बदलाचे कंप मानवी समाजाला जगभर सतत त्रास देत आहेत. आज, कित्येक सरकारचा एक किंवा दोन वर्षांपेक्षा अधिक निभाव लागत नाही. राजकीय जगातील अस्थैर्यतेचे उदाहरण इटलीसंबंधाने देता येईल की, ज्यामध्ये दुसरे जागतिक महायुद्ध संपल्यानंतर पुढील ४२ वर्षांत ४७ नवी सरकारे येऊन गेली. पण हे सर्व अगाऊ कंप एका भावी सरकारी कळसाच्या क्रांतीपुढे प्राथमिक स्वरुपाचे आहेत. याचा परिणाम? देवाचे राज्य पृथ्वीचे सर्व अधिपत्य आपणाकडे घेईल.—यशया ९:६, ७.

६. (अ) एच. जी. वेल्स यांनी नव्या व महत्त्वपूर्ण युगाचे कसे वर्णन केले? (ब) एका तत्त्वज्ञाने व एका मुत्सद्याने १९१४ पासून पुढील युगाबाबत काय लिहिले आहे?

इतिहासकार, तत्त्वज्ञानी आणि राजकीय नेत्यांनी १९१४ या वर्षाला नवे व महत्त्वाचे युग म्हणून दर्शविले आहे. या युगाच्या सतराव्या वर्षात इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी हे विवेचन दिले: “एखादा संदेष्टा मनोहर गोष्टींचा भविष्यवाद आनंदाने देऊ शकेल. पण तो जे काही पाहतो ते सांगणे त्याचे कर्तव्य आहे. तो जगाला अद्याप सैनिक, देशभक्‍त, लोभी सावकार आणि आर्थिक उलाढाली करणाऱ्‍या लोकांनी भरल्याचे पाहतो; ते जग शंका, द्वेष यांनी घेरलेले आहे आणि खाजगी स्वातंत्र्य झपाट्याने लोप पावत आहे. वर्गवारीच्या झगड्यांनी व्यापलेले व नव्या युद्धाची तयारी करण्यात गढलेले आहे.” बर्ट्रान्ड रसेल या तत्त्वज्ञाने १९५३ मध्ये लिहिले: “१९१४ पासून पुढे जगाच्या कलाची कल्पना असणाऱ्‍यांना जणू दुर्दैव व आधीच निश्‍चित केलेल्या मोठ्या विनाशाकडे आपली वाटचाल होत आहे हे बघून खूपच त्रस्त वाटत आहे. . . . त्यांना ग्रीक कहाणीतील नायक जसा नशीबाने नव्हे तर, क्रोधित दैवताकडून अडचणीत अडकतो, तसेच मानवी वंशाचे होत असल्याचे दिसते.” हेरल्ड मॅकमिलन या मुत्सद्यांनी १९८० मध्ये, २० व्या शतकाच्या आरंभाला जी शांतीमय सुरवात होती तिचा आढावा घेऊन पुढे म्हटले: “आता पुढे अधिकाधिक चांगले होत राहील, असे मी जन्मलो त्या जगाबद्दल वाटत होते. . . . तथापि, एकाएकी, अनपेक्षितपणे, १९१४ मधील एके सकाळी सर्व गोष्टींचा अंत झाला.”

७-९. (अ) मानवी समाजाला १९१४ पासून कोणत्या खळबळजनक घटनांनी हादरे बसले आहेत? (ब) येशूच्या उपस्थिती दरम्यान मानवी समाजात होणाऱ्‍या घडामोडीत मानवजातीतील कोणत्या परिस्थितींचा ओघाओघाने समावेश होणार होता?

दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाने क्रांतीची आणखी लाट आणली. आणि आपण या शतकाच्या समाप्तीला येत असता लहान युद्धांनी पृथ्वीला हादरविले आहे. पण सध्याचे व्यवस्थीकरण आणखी पुढे जाणार का? आण्विक नाशाच्या भयंकर भयाचा अनेक लोक विचार करीत आहेत. आनंदाची बाब म्हणजे, याचे उत्तर मानव नव्हे तर त्याच्या निर्माणकर्त्यावर विसंबून आहे.—यिर्मया १७:५.

तथापि, युद्धांपेक्षा आणखी काही गोष्टींनी मानवी समाजाचा १९१४ पासून पाया हादरविला आहे. ऑक्टोबर २९, १९२९ रोजी अमेरिकेचा भांडवल बाजार एकाएकी कोसळला ही मोठी क्लेशकारक व अविस्मरणीय गोष्ट होती. यामुळे मोठी मंदी आली व याचा सर्व भांडवलशाही राष्ट्रांवर परिणाम झाला. ही मंदी १९३२ ते १९३४ दरम्यान संपली तरीही, तिचे परिणाम अद्यापही आपल्याला जाणवत आहेत. १९२९ पासून आर्थिक दृष्ट्या आजारी असलेल्या जगाने आपणावर तात्पुरती ठिगळे लावली आहेत. सरकारे तूट असलेल्या भांडवलात गुंतत आहेत. १९७३ मधील तेलाची आणीबाणी व १९८७ मधील भांडवल बाजाराची उलाढाल यांनी आर्थिक साम्राज्याला गडबडून टाकले आहे. मध्यंतरात, लाखो लोक उधारीवर आपली खरेदी करीत आहेत. इतर अगणित संख्येने लोक आर्थिक फसवणूक, प्रचंड विविध योजना तसेच सरकारद्वारा लोकांच्या सुरक्षिततेसाठी चालविलेली लॉटरी व इतर प्रकारातील जुगार यांना बळी पडत आहेत. ख्रिस्ती धर्मजगतातील दूरदर्शन सुवार्तिकसुद्धा, करोडो डॉलर्सचा सहभाग मिळण्यासाठी आपला हात पुढे सारीत आहेत!—पडताळा यिर्मया ५:२६-३१.

आधी, आर्थिक समस्यांनी मुसोलिनी व हिटलर यांना सत्ता काबीज करण्यास मार्ग मोकळा करून दिला. मोठ्या बाबेलने वेळ न दवडता त्यांची कृपा मिळवण्यासाठी प्रणयाराधना केली आणि व्हॅटिकनने इटलीसोबत १९२९ मध्ये तर जर्मनीबरोबर १९३३ मध्ये सलोखा साधला. (प्रकटीकरण १७:५) यानंतर जे अंधकाराचे दिवस आले ते येशूच्या भविष्यवादातील त्याच्या उपस्थितीच्या पूर्णतेचा भाग नक्कीच होते व शिवाय त्यामध्ये “पृथ्वीवर . . . राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील, भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील” या गोष्टींचा देखील ओघाओघाने समावेश होणार होता. (लूक २१:७-९, २५-३१) * होय, १९१४ पासून मानवी समाजाला हादरविणारे जे कंप सुरु झाले ते पुढे चालूच राहिले व मोठे धक्के देत राहिले.

यहोवा काही हादरे देतो

१०. (अ) मानवी घडामोडीत इतके कंप का होतात? (ब) यहोवा काय करीत आहे व कोणत्या तयारीसाठी?

१० माणसाला आपली पावले नीट टाकण्याची क्षमता नसल्यामुळे मानवी घडामोडीत हे कंप निर्माण झाले आहेत. (यिर्मया १०:२३) याशिवाय, तो “सर्व जगाला ठकविणारा,” जुनाट साप, दियाबल सैतान, सबंध मानवजातीला यहोवाच्या उपासनेपासून दूर न्यावे म्हणून त्यावर अनर्थ आणून आपल्या प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सबंध जगाला बाजूच्या शेजाऱ्‍याइतके आकुंचित केले आहे, जेथे राष्ट्रीयवाद व वंशद्वेष हे मानवी समाजाला मुळापासून हादरवीत असून तथाकथित संयुक्‍त राष्ट्रसंघाला कोणताही इलाजात्मक उपाय करता येत नाही. पूर्वी नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात मानव मानवावर त्याची हानी करण्यासाठी सत्ता गाजवीत आहे. (प्रकटीकरण १२:९, १२; उपदेशक ८:९) तथापि, आकाश व पृथ्वीचा निर्माता, सेनाधीश प्रभु यहोवा, पृथ्वीच्या समस्या कायमच्या काढून टाकण्याच्या तयारीत गेल्या ७० वर्षांपासून आपल्याच पसंतीचे हादरविणे करीत आहे. ते कसे काय?

११. (अ) हाग्गय २:६, ७ मध्ये कोणते हादरविणे सांगण्यात आले आहे? (ब) हाग्गयची भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे?

११ हाग्गय २:६, ७ मध्ये आपण असे वाचतो: “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, NW] असे म्हणतो, ‘आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हालवून सोडीन. मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन,’ असे सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो.” खासपणे १९१९ पासून पुढे, यहोवाने आपल्या साक्षीदारांना पृथ्वीवरील मानवी समाजाच्या सर्व घटकात आपले न्यायदंड घोषित करण्यास प्रवृत्त केले आहे. अशा या जगभरातील इशाऱ्‍यामुळे सैतानाचे जागतिक व्यवस्थीकरण हालविले व हादरविले गेले. * ही घोषणा अधिक प्रखर होत असता, “निवडक वस्तु,” म्हणजेच, देवभिरु माणसांनी स्वतःला राष्ट्रांपासून वेगळे करून घेतले आहे. सैतानाच्या संघटनेत कंपामुळे हादरुन ते बाहेर फेकले गेले असे नाही. पण त्यांनी एकंदरीत परिस्थिती न्याहाळली व आपला निर्णय घेऊन अभिषिक्‍त योहान वर्गाच्या सोबत यहोवाच्या मंदिराला वैभवाने भरविण्यात सहभाग घेतला. हे कसे साध्य करण्यात आले? देवाच्या प्रस्थापित राज्याच्या आवेशी प्रचाराच्या कामामुळे. (मत्तय २४:१४) येशू व त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांनी मिळून बनलेले हे राज्य यहोवाच्या वैभवासाठी “न हालविता येणारे राज्य” या नात्याने सतत उभे राहील.—इब्रीयांस १२:२६-२९.

१२. मत्तय २४:१४ मध्ये भाकीत करण्यात आलेल्या प्रचारास तुम्ही प्रतिसाद देण्याची सुरवात केली आहे तर, प्रकटीकरण ६:१२ मधील मोठा भूकंप होण्याआधी तुम्ही काय केले पाहिजे?

१२ या प्रचाराला प्रतिसाद देणाऱ्‍यांपैकी तुम्ही एक आहात का? येशूच्या मृत्यूच्या अलिकडच्या स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍या त्या लाखो लोकांपैकी तुम्ही आहात का? तसे आहे तर, तुम्ही तुमच्या बायबल सत्याच्या अभ्यासात प्रगती करीत राहा. (२ तीमथ्य २:१५; ३:१६, १७) सैतानाच्या नाशपात्र पार्थिव समाजाची भ्रष्ट आचारसंहिता पूर्णपणे सोडून द्या! ख्रिस्ती नव्या जगाच्या संस्थेत लगेच या व शेवटला हादरा, “भूकंप” होऊन सबंध सैतानी जगताचे तुकडेतुकडे होण्याआधी संस्थेच्या कार्यात सहभागी व्हा. पण हा मोठा भूकंप काय आहे? ते आता आपण बघू या.

मोठा भूकंप!

१३. मोठा भूकंप हा कोणत्या बाबतीत मानवाला नवा आहे?

१३ होय, हे शेवटल्या काळाचे कठीण दिवस वास्तविक व लाक्षणिक भूकंपांचे आहेत. (२ तीमथ्य ३:१) पण यापैकीचा कोणताही भूकंप सहावा शिक्का फोडल्यावर योहानाने शेवटचा मोठा भूमिकंप पाहिला त्यासारखा झाला नाही. वाढत्या कंपांची तीव्रता आता सरण्याच्या बेताला आली आहे. आता एक मोठा भूकंप होत आहे, जो मानवी अनुभवास अगदीच नवा आहे. हा इतका मोठा आहे की, त्याची तीव्रता व हादरे यांचे मोजमाप रीचर मोजपट्टी किंवा इतर कोणा मानवी प्रमाणाने करता येणार नाही. हा काही स्थानिक भूकंप नाही तर, तो सबंध “पृथ्वी” म्हणजे सर्व वंचित मानवी समाजाला उद्‌ध्वस्त करणारा आहे.

१४. (अ) कोणता भविष्यवाद मोठा भूकंप व त्याच्या परिणामाबाबत भाकीत करतो? (ब) योएलचा भविष्यवाद व प्रकटीकरण ६:१२, १३ कोणत्या गोष्टीला सूचित करतात?

१४ यहोवाच्या इतर संदेष्ट्यांनी देखील अशा भूकंप व त्याच्या भयंकर परिणामाबद्दलचे भाकीत केले होते. उदाहरणार्थ, जवळजवळ सा.यु.पू. ८२० मध्ये योएलने “परमेश्‍वराचा [यहोवा, NW] महान व भयंकर दिवस” याबद्दल सांगितले व म्हटले की, तेव्हा “सूर्य अंधकारमय व चंद्र रक्‍तमय होईल.” पुढे त्याने आणखी या शब्दांची भर घातली: “लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्‍यात लोकांच्या झुंडी आहेत, कारण निर्णयाच्या खोऱ्‍यात परमेश्‍वराचा [यहोवा, NW] दिवस येऊन ठेपला आहे. सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशावयाचे थांबतात. परमेश्‍वर [यहोवा, NW] सीयोनातून गर्जना करितो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्‍वर [यहोवा, NW] आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.” (योएल २:३१; ३:१४-१६) हे हादरणे, यहोवा मोठ्या संकटात जो न्यायदंड बजावणार आहे त्याला केवळ अनुलक्षून आहे. (मत्तय २४:२१) या कारणामुळे याजशी समांतरीत असणारा प्रकटीकरण ६:१२, १३ मधील अहवाल याचाही वस्तुतः तोच अवलंब आहे.—तसेच यिर्मया १०:१०; सफन्या १:१४, १५ पाहा.

१५. हबक्कूक संदेष्ट्याने कोणते मोठे हादरविणे भाकीत केले?

१५ योएलनंतर साधारण २०० वर्षानंतर, हबक्कूक या संदेष्ट्याने देवाला प्रार्थना करताना असे म्हटले: “हे परमेश्‍वरा, [यहोवा, NW] मी तुझी कीर्ति ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्‍वरा [यहोवा, NW] वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर, क्रोधातहि दया स्मर.” हा “क्रोध” काय असावा? हबक्कूक पुढे मोठ्या संकटाचे हुबेहुब वर्णन देऊन यहोवाबद्दल म्हणतो: “तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते. तो नजर टाकून राष्ट्रांस उधळवून लावितो. . . . तू संतापून पृथ्वीवर चालतोस. तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांस तुडवून टाकितोस. तरी मी परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्‍या देवाविषयी मी उल्लास करीन.” (हबक्कूक ३:१, २, ६, १२, १८, NW) यहोवा जेव्हा सर्व पृथ्वीवर राष्ट्रांना उधळवून लावील तेव्हा केवढे मोठे हादरविणे घडेल!

१६. (अ) सैतान देवाच्या लोकांवर शेवटला हल्ला करील तेव्हा काय घडेल असे यहेज्केल संदेष्ट्याने भाकीत केले आहे? (ब) प्रकटीकरण ६:१२ मधील मोठ्या भूकंपाचा काय परिणाम होतो?

१६ यहेज्केलने देखील हे भाकीत केले की, जेव्हा मागोगचा गोग (हिणकस सैतान) देवाच्या लोकांवर शेवटला हल्ला करील तेव्हा, “इस्राएल देशात” यहोवा “मोठा भूकंप” घडवून आणील. (यहेज्केल ३८:१८, १९) कदाचित खरोखरीचा भूकंप समाविष्ट असला तरी, प्रकटीकरण चिन्हांनी सादर करण्यात आले आहे हे आम्ही ध्यानात ठेवावे. हा भविष्यवाद तसेच अवतरीत करण्यात आलेले इतर भविष्यवाद हे मुख्यत्वे लाक्षणिक आहेत. या कारणास्तव, सहाव्या शिक्क्याचे फोडणे या पृथ्वीवरील सर्व व्यवस्थेचे अंतिम हादरविणे सूचित करणारे आहे—तो मोठा भूकंप, ज्यामध्ये यहोवा देवाच्या सार्वभौमत्वाला विरोध करणाऱ्‍या सर्वांचा नाश करण्यात येईल.

अंधाराचा काळ

१७. मोठ्या भूकंपाचा सूर्य, चंद्र व तारे यावर कसला परिणाम झाल्याचे दाखविण्यात आले?

१७ योहान पुढे दाखवितो त्याप्रमाणे, मोठ्या भूकंपासोबत आणखी अशा भयानक घटना घडतात ज्यामध्ये स्वर्गही समाविष्ट आहे. तो म्हणतो: “सूर्य केसांच्या बनविलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्‍तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्‍याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले.” (प्रकटीकरण ६:१२ब, १३) केवढा हा अभूतपूर्व देखावा! हा भविष्यवाद शब्दशः पूर्ण झाला तर केवढा भयानक अंधकार सर्वत्र पसरेल याची तुम्हाला कल्पना करता येईल का? दिवसा उबदार व सुखावह सूर्यप्रकाश राहणार नाही! रात्रीला चंदेरी चंद्रप्रकाश नसणार! आणि आकाशाच्या मखमली पडद्यावर चांदण्यांचे लुकलुकणे दिसणार नाही. उलटपक्षी, सर्वत्र थंड, काळाकुट्ट अंधार असेल.—पडताळा मत्तय २४:२९.

१८. सा.यु.पू. ६०७ मध्ये यरुशलेमेसाठी कोणत्या अर्थाने ‘आकाश काळे झाले होते’?

१८ प्राचीन इस्राएलांसाठी असा हा अंधकार आध्यात्मिक अर्थाने भाकीत करण्यात आला होता. यिर्मयाने इशारा दिला: “सर्व देश उजाड होईल, पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही. यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल.” (यिर्मया ४:२७, २८) सा.यु.पू. ६०७ मध्ये जेव्हा हा भविष्यवाद पूर्ण झाला तेव्हा यहोवाच्या लोकांसाठी सर्वकाही अंधकारासारखे आशाहीन बनले. त्यांचे राजधानीचे शहर यरुशलेम बाबेलोन्यांपुढे पडले. त्यांच्या मंदिराचा नाश झाला व त्यांचा देश उजाड बनला. त्यांच्यासाठी आकाशातून कसलाही सांत्वनदायी प्रकाश नव्हता. उलट, जसे यिर्मयाने दु:खाने यहोवाला म्हटले, तसेच होते: “तू वधिले, दया केली नाही. तू आपणा स्वतःस अभ्राने आच्छादिले; प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही.” (विलापगीत ३:४३, ४४) तो स्वर्गीय अंधकार यरुशलेमेसाठी मृत्यू व विनाशाचे चिन्ह होता.

१९. (अ) देवाचा संदेष्टा यशया याने प्राचीन बाबेलसाठी आकाश काळे होण्याविषयीचे कसे वर्णन दिले? (ब) यशयाचा भविष्यवाद केव्हा व कसा पूर्ण झाला?

१९ नंतर, आकाशातील अशाच प्रकारच्या काळोखाने प्राचीन बाबेलसाठी विनाश सूचित केला. याबद्दल, देवाच्या संदेष्ट्याला हे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले: “पाहा, रोष व तीव्र क्रोध यांनी दुखकर झालेला असा परमेश्‍वराचा [यहोवा, NW] दिवस येत आहे. तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील. आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत, सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन.” (यशया १३:९-११) हा भविष्यवाद, सा.यु.पू. ५३९ मध्ये बाबेल मेद-पारसापुढे पडले तेव्हा पूर्ण झाला. बाबेल आपल्या जागतिक साम्राज्याच्या पदावरुन सदासर्वकाळासाठी खाली कोसळले ते काळोखासोबत, आशाहीनतेसोबत व कोणताही सांत्वनपर प्रकाश नसणाऱ्‍या स्थितीसोबत योग्यपणे चित्रित करण्यात आले आहे.

२०. मोठा भूकंप होईल तेव्हा या व्यवस्थीकरणावर कोणते भीतीयुक्‍त परिणाम घडतील?

२० याचप्रमाणे, जेव्हा मोठा भूकंप होईल तेव्हा या सबंध जागतिक व्यवस्थेला एकंदर काळोखाच्या आशाहीनतेमध्ये लपेटण्यात येईल. सैतानाच्या पृथ्वीवरील व्यवस्थीकरणातील तेजोमय व झगमगीत दिवे पुढे आशेची किरणे देऊ शकणार नाहीत. आधीच, पृथ्वीतील राजकारणी पुढारी, खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील पुढारी भ्रष्टाचार, लबाड्या आणि अनैतिक जीवनाक्रमण याबद्दल विख्यात झाले आहेत. (यशया २८:१४-१९) ते विश्‍वासयोग्य राहिले नाहीत. यहोवा त्यांच्यावर न्यायदंड बजावेल तेव्हा त्यांचा मिणमिणता प्रकाश ग्रहणात विलीन होईल. त्यांचा पृथ्वीवरील घडामोडीतील चंद्रप्रकाशासारखा प्रभाव रक्‍तरंजित, मरणप्राय असल्याचे उघड होईल. त्यांचे जागतिक झळकणारे तारे, जोराने खाली पडणाऱ्‍या उल्कांसारखे नष्ट होतील व ते मोठ्या वादळाने इतरत्र विखुरल्या जाणाऱ्‍या कच्च्या अंजिरांसारखे विखुरले जातील. आमचा सबंध ग्रह “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट” धडकल्यामुळे कंपायमान होईल. (मत्तय २४:२१) केवढे हे भयजनक भवितव्य!

“आकाश” निघून जाते

२१. योहान आपल्या दृष्टांतात “आकाश,” “सर्व डोंगर व बेटे” याबद्दल काय बघतो?

२१ योहानाचा दृष्टांत पुढे चालू आहे: “एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले, आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरुन ढळली.” (प्रकटीकरण ६:१४) अर्थातच, हे खरे आकाश, खरे डोंगर व बेटे नाहीत, हे स्पष्टच आहे. मग, ते कशाचे सूचक आहेत?

२२. अदोमामध्ये कोणते “आकाश” “गुंडाळीप्रमाणे गुंडाळले” गेले?

२२ “आकाश” हे काय आहे याची समज आपल्याला, यहोवाने राष्ट्रांविरुद्ध आपला क्रोध व्यक्‍त करण्याबद्दल आणखी एका भविष्यवादात जे सांगितले त्याद्वारे कळते: “आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल.” (यशया ३४:४) खासपणे अदोमाला त्रास होणार. ते कसे? बाबेलोन्यांनी सा.यु.पू. ६०७ मध्ये यरुशलेमेचा नाश केल्यानंतर लवकरच त्याने याला तुडविले. त्या वेळी, खऱ्‍या आकाशात काही उल्लेखनीय घटना घडल्याची नोंद नाही. पण अदोमाच्या ‘आकाशाला’ मात्र अरिष्टकारक गोष्टी सहन कराव्या लागल्या. * त्याचे मानवी सरकारी सामर्थ्य त्याच्या आकाशासारख्या उच्च पातळीवरुन खाली रसातळाला गेले. (यशया ३४:५) ज्याचा आता काहीही उपयोग नाही, त्या जुन्या गुंडाळीप्रमाणे ते ‘गुंडाळले गेले’ व बाजूला टाकून देण्यात आले.

२३. जे “गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल” असे “आकाश” कोणते आहे आणि पेत्राचे शब्द या गोष्टीला कशी पुष्टी देतात?

२३ अशाप्रकारे, जे “आकाश” आता ‘गुंडाळले जाणार आहे’ ते या पृथ्वीवरील अधिपत्य करणाऱ्‍या देव-विरोधी सरकारांना सूचित करते. त्यांना पांढऱ्‍या घोड्यावरील स्वाराद्वारे कायमचे दूर केले जाईल. (प्रकटीकरण १९:११-१६, १९-२१) हे, सहावा शिक्का फोडण्यामुळे ज्या घटना घडण्याचे सूचित करण्यात आले, त्याच्या पुष्ट्यर्थ आधी प्रेषित पेत्राने जे काही म्हटले, त्याला दुजोरा देणारे आहे. तो म्हणतो: “आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.” (२ पेत्र ३:७) पण, आता, “सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरुन ढळली,” या विधानाचा काय अर्थ होतो?

२४. (अ) बायबलच्या भविष्यवादात केव्हा डोंगर व बेटे ही हलविली किंवा अस्थिर झाल्याचे म्हणण्यात आले आहे? (ब) निनवे पडले तेव्हा “पर्वत कंपायमान” कसे झाले?

२४ बायबलच्या भविष्यवादामध्ये मोठ्या राजकीय क्रांतीमध्ये डोंगर व बेटे ही हलविली किंवा अस्थिर केली जातात असे म्हणण्यात आले आहे. उदाहरणार्थ, निनवेविरुद्ध यहोवाचा न्यायदंड घोषित करताना नहूम संदेष्ट्याने असे म्हटले: “त्याच्यापुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात; त्याच्यापुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्यावरील सर्व रहिवासी थडथड उडतात.” (नहूम १:५) निनवे सा.यु.पू. ६३२ मध्ये खरोखरी पडले तेव्हा, प्रत्यक्षपणे कोणता डोंगर दुभंगल्याचा अहवाल नमूद नाही. पण जे साम्राज्य पूर्वी डोंगरासमान बळकट असल्याचे दिसत होते ते मात्र एकाएकी कोसळले.—पडताळा यिर्मया ४:२४.

२५. या सद्य व्यवस्थीकरणाच्या येणाऱ्‍या नाशात “सर्व डोंगर व बेटे” ही आपापल्या ठिकाणावरुन कशी काढून टाकण्यात येतील?

२५ या कारणास्तव, सहावा शिक्का फोडण्याच्या वेळी दाखविण्यात आलेले “सर्व डोंगर व बेटे” ही जगाच्या राजकीय सत्ता व त्यावर अवलंबित असणाऱ्‍या संघटना यांना सूचित आहेत; या सर्व मानवजातीला खूपच स्थिर वाटतात. यांना त्यांच्या स्थानावरुन काढून भ्रष्ट करण्यात येईल; त्यामुळे त्यांच्यावर आधी भिस्त ठेवणारे खूपच आश्‍चर्यचकित व भयभीत होतील. भविष्यवाद पुढे दाखवितो त्याप्रमाणे, सैतानाच्या सर्व संघटनांचे उच्चाटन करणारा शेवटचा कंप, यहोवा व त्याचा पुत्र यांच्या क्रोधाचा महान दिवस सूड घेण्यासाठी आलाच आहे, यात कसलाच प्रश्‍न नाही!

“आम्हावर पडून . . . आम्हास लपवा”

२६. देवाच्या सार्वभौमत्वास विरोध करणारे भयाने कशी हालचाल करतील व ते भीतीने कोणते शब्द उच्चारतील?

२६ योहानाचे शब्द पुढे सांगतात: “पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, गुहात व डोंगरातील खडकातून लपली आणि ते डोंगरास व खडकांस म्हणाले: ‘आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टीपुढून व कोकऱ्‍याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?’”—प्रकटीकरण ६:१५-१७.

२७. शोमरोनातील अविश्‍वासू इस्राएलांनी कोणता आक्रोश केला आणि त्या शब्दांची कशी पूर्णता झाली?

२७ इस्राएलाचे उत्तरेकडील राज्य शोमरोन याच्याविरुद्ध यहोवाकडील न्यायदंडाची घोषणा करताना होशेयाने म्हटले: “इस्राएलाचे पाप म्हणजे आवेनची उच्च स्थाने नाश पावतील; त्यांच्या वेद्यांवर काटेकुसळे व काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांस म्हणतील: ‘आम्हास झाकून टाका,’ टेकड्यांस म्हणतील: ‘आम्हावर पडा.’” (होशेय १०:८) या शब्दांची कशी पूर्णता झाली? जेव्हा शोमरोन क्रूर अश्‍शुरपुढे सा.यु.पू. ७४० मध्ये पडले तेव्हा इस्राएलांना पळून जाण्यासाठी कोठेच आश्रय नव्हता. होशेयच्या शब्दांनी असहाय्यता, जिंकल्या गेलेल्या लोकांची भीतीग्रस्तता व धिक्कार व्यक्‍त केला. शोमरोनातील वास्तविक पर्वत व टेकड्यासमान संस्था, पूर्वी जरी स्थिर अशा वाटल्या तरी आता संरक्षण देऊ शकत नव्हत्या.

२८. (अ) येशूने यरुशलेमकर स्त्रियांना कोणता इशारा दिला? (ब) येशूचा इशारा कसा पूर्ण झाला?

२८ याचप्रकारे, येशूला रोमी सैनिक ठार मारण्यासाठी नेत असता वाटेत यरुशलेमेच्या स्त्रियांना तो म्हणाला: “पाहा, असे दिवस येतील की, ज्यांत ‘वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजिलेले स्तन ही धन्य आहेत,’ असे म्हणतील. त्या समयी ते पर्वतांस म्हणू लागतील, ‘आम्हावर पडा,’ व टेकड्यांस म्हणतील, ‘आम्हास झाका.’” (लूक २३:२९, ३०) रोमी लोकांनी सा.यु. ७० मध्ये यरुशलेमेच्या केलेल्या नाशाचा दस्तऐवज आहे. तेव्हा येशूने उद्‌गारलेल्या शब्दांचा, होशेयाप्रमाणेच अर्थ होता हे दिसले. यहूदीयात अडकून राहिलेल्या यहूद्यांसाठी कोठेही आश्रयस्थान नव्हते. यरुशलेमेत जेथे जेथे त्यांनी लपून राहण्याचा प्रयत्न केला व त्यांनी मसादा डोंगराच्या किल्ल्याकडेही पलायन केले तरी, यहोवाच्या न्यायदंडाच्या उग्र परिणामांपासून ते स्वतःला वाचवू शकले नाहीत.

२९. (अ) यहोवाच्या क्रोधाचा दिवस येईल, तेव्हा जे या व्यवस्थीकरणावर आपली भिस्त ठेवून असतील अशांची कोणती दयनीय स्थिती होणार? (ब) यहोवा आपला क्रोध व्यक्‍त करील तेव्हा येशूचा कोणता भविष्यवाद पूर्ण होईल?

२९ आता सहाव्या शिक्क्याच्या उघडण्यानेही, यहोवाच्या क्रोधाच्या भावी दिवशी असेच काही घडेल हे दाखविले. पृथ्वीवरील ऐहिक व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या हादऱ्‍यात जे त्याजवर विसंबून होते ते सुरक्षित स्थान कोठे मिळते का याचा शोध घेऊ लागतील; पण त्यांना ते कोठेही आढळणार नाही. मोठी बाबेल, खोटा धर्म याने तर आधीच त्यांची शोचनीय निराशा केलेली आहे. तसेच खरोखरीच्या डोंगरातील गुहा आणि पर्वतासमान राजकीय व व्यापारी संघटना कोणतीही आर्थिक सुरक्षितता व इतर मदत देऊ शकणार नाहीत. यहोवाच्या क्रोधापासून काहीही त्यांना वाचवू शकणार नाही. त्यांना वाटणारी दहशत ही येशूने अगदी चांगल्या शब्दात वर्णिली आहे: “तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल; मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करितील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.”—मत्तय २४:३०.

३०. (अ) “कोणाच्याने टिकाव धरवेल?” या प्रश्‍नाद्वारे काय सुचविले जाते? (ब) यहोवाच्या न्यायाच्या दिवशी कोणी त्याच्यापुढे टिकू शकेल का?

३० होय, जे पांढऱ्‍या घोड्यावरील विजेत्या स्वाराच्या अधिकाराचा अवमान करतील अशांना त्यांची चूक कबूल करण्यास भाग पाडले जाईल. ज्यांनी स्वेच्छेने स्वतःला सर्पाच्या संतानाचे भाग बनविले त्या मानवांना, सैतानी जग लयास जाताना स्वतःचा नाश सामोरा दिसेल. (उत्पत्ती ३:१५; १ योहान २:१७) त्या वेळी जगाची परिस्थिती ही अशी असेल की जेव्हा पुष्कळ जणांना हे म्हणणे भाग पडेल की, “कोणाच्याने टिकाव धरवेल?” त्यांना समजून चुकेल की, यहोवाच्या न्यायाच्या दिवशी त्याच्यापुढे कोणीही संमतीकारक दशेत टिकू शकणार नाही. पण प्रकटीकरणाचे पुस्तक आपल्याला पुढे दाखवते त्याप्रमाणे, त्यांची ही धारणा चुकीची आहे.

[तळटीपा]

^ अक्षरशः भूकंप सुरु होण्याआधी त्याच्या संवेदना सुरु होतात ज्यामुळे कुत्री भुंकू लागतात, किंवा वेडसरपणे वागू लागतात आणि इतर जनावरे व मासे प्रक्षुब्ध बनतात. तथापि, भूकंपाचा खरा हादरा बसेपर्यंत मानवाला तो कळत नाही.—पहा अवेक! जुलै ८, १९८२, पृष्ठ १४.

^ सविस्तर स्पष्टीकरणासाठी पृष्ठे २२, २४ बघा.

^ लूक २१:२५, २८, ३१ मधील शब्द, ३५ पेक्षा अधिक वर्षे, १८९५ ते १९३१ पर्यंत वॉचटावर नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरील चित्रात, उसळलेला समुद्र व वादळी वातावरण यांच्यामध्ये प्रज्वलित असणाऱ्‍या एका प्रकाशघराच्या पार्श्‍वभूमीत अवतरीत करण्यात आले होते.

^ उदाहरणार्थ, १९३१ मधील खास मोहिमेत यहोवाच्या साक्षीदारांनी देवाचे राज्य, जगाची आशा (इंग्रजी) या पुस्तिकेच्या हजारो प्रतींचे वितरण जगभरात पाळकवर्ग, राजकीय नेते व व्यापाऱ्‍यांना केले.

^ “आकाश” या शब्दाचा याच प्रकारातील आणखी एक वापर यशया ६५:१७, १८ मधील “नवे आकाश” या भविष्यवादाच्या संदर्भात दिसतो. त्याची पूर्णता नव्या राजकीय व्यवस्थेत दिसली, जी प्रांताधिकारी यरुब्बाबेल व प्रमुख याजक यहोशवा यांच्याद्वारे प्रस्थापित झाली. ती प्रस्थापना बाबेलच्या दास्यातून यहूदी परत वचनयुक्‍त देशात परतल्यावर झाली.—२ इतिहास ३६:२३; एज्रा ५:१, २; यशया ४४:२८.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१०५ पानांवरील चौकट/चित्र]

१९१४ चे अवलोकन केले गेले

“सा.यु.पू. ६०६ मध्ये देवाचे राज्य संपुष्टात आले, राजमुकुट काढून टाकण्यात आला आणि पृथ्वी विदेश्‍यांना बहाल करण्यात आली. सा.यु.पू. ६०६ पासून २,५२० वर्षे इ.स. १९१४ मध्ये संपतील.” *तीन जग (इंग्रजी) १८७७ मध्ये प्रकाशित, पृ. ८३.

“बायबलचा पुरावा स्पष्ट व जोरदार आहे की, ‘विदेश्‍यांचे काळ’ २,५२० वर्षांचा कालावधी असून तो सा.यु.पू. ६०६ पासून इ.स. १९१४ पर्यंत आहे.”—शास्त्रवचनांमधील अभ्यास, (इंग्रजी) खंड २, लेखक सी. टी. रसेल, १८८९ मध्ये प्रकाशित, पृष्ठ ७९.

चार्ल्स टेझ रसेल व त्यांच्या सहकाऱ्‍यांनी दशकांआधी हे जाणले होते की, १९१४ हे विदेश्‍यांच्या काळाची किंवा राष्ट्रांच्या नेमस्त काळाची समाप्ती करणारे वर्ष ठरेल. (लूक २१:२४) याचा काय अर्थ होईल हे त्यांना त्या आरंभीच्या दिवसात पूर्ण कळले नसले तरी, १९१४ हे वर्ष इतिहासातील एक महत्त्वपूर्ण तारीख ठरणार याची त्यांना खात्री होती, आणि त्यांची खात्री बरोबर ठरली. वर्तमानपत्रातील पुढील अवतरणे बघा:

“युरोपातील भयंकर युद्धाच्या भडक्याने, अपूर्व भविष्यवादाची पूर्णता घडवून आणली. गेली पंचवीस वर्षे प्रचाराच्या व छापखान्याच्या माध्यमाने ‘मिलेनिअल डॉनर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या ‘आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी’ यांनी जगाला ही घोषणा केली की, बायबलमध्ये भाकीत करण्यात आलेला देवाच्या क्रोधाचा दिवस १९१४ मध्ये उगवेल. ‘१९१४ कडे पाहात राहा!’ ही शेकडो फिरत्या सुवार्तिकांची घोषणा होती.”—जग (इंग्रजी), न्यूयॉर्कमधील वृत्तपत्र, ऑगस्ट ३०, १९१४.

[तळटीपा]

^ बायबल विद्यार्थ्यांना, ईश्‍वरीकरणामुळे, “सा.यु.पू.” व “इ.स.” मध्ये शून्य वर्ष नाही हे कळू शकले नव्हते. नंतर, जेव्हा संशोधनामुळे सा.यु.पू. ६०६ हे सा.यु.पू. ६०७ मध्ये सुधारण्यात आले तेव्हा शून्य वर्ष काढून टाकले गेले, त्यामुळे “इ.स. १९१४” हे भाकीत खरे राहिले.—पाहा “सत्य तुम्हास स्वतंत्र करील” (इंग्रजी) वॉचटावर सोसायटीने १९४३ मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक, पृ. २३९.

[१०६ पानांवरील चौकट]

१९१४—कलाटणी देणारा केंद्रबिंदू

कोपनहेगन येथे १९८७ मध्ये प्रकाशित झालेले पॉलिटिकेन्स वेरदेन्शीस्टोरी—हिस्टोरिन्स मॅग्‌ट ओग मेनिंग (पोलिटिकेन्सचा जागतिक इतिहास—त्याची शक्‍ती व अर्थ) हे पुस्तक त्याच्या ४० व्या पृष्ठावर हे निरीक्षण देते:

“एकोणीसाव्या शतकाच्या वाढत्या विश्‍वासाला १९१४ मध्ये जबर तडाखा बसला. ते युद्ध होण्याच्या एका वर्षाआधी पीटर मंच या, डॅनिश इतिहासकार व राजकीय मुत्सद्याने अगदी आशावादीपणे हे लिहिले: ‘मोठ्या युरोपियन सत्तांमधील युद्ध होण्याच्या संभाव्यतेबद्दल प्रतिकूल पुरावा आहे. १८७१ पासून पुढे जसे झाले तसेच “युद्धाचा धोका” भावी काळात नाहीसा होईल.’

“पण याऊलट, नंतर आम्ही त्यांच्या लिखाणात असे वाचतो: ‘१९१४ मधील युद्धाचा भडका मानवी इतिहासात कलाटणी देणारा केंद्रबिंदू ठरला. जेथे आम्हाला व्यवहार्य सुरक्षिततेमध्ये आपली ध्येये साधता येऊ शकतील त्या प्रगतीच्या तेजोमय पर्वापासून आपण विनाश, भय व द्वेष यांच्या युगात शिरलो जेथे सर्वत्र असुरक्षितताच आहे. आम्हावर त्या काळी जो घोर अंधकार पडला तो, मानवाने कित्येक शतके उभारलेल्या सबंध सांस्कृतिक घडणीस कायमचे नष्ट करू शकेल की काय याबद्दल कोणालाही सांगता आले नाही व आताही सांगता येऊ शकत नाही.’”

[११० पानांवरील चित्रे]

‘प्रत्येक डोंगर आपापल्या ठिकाणावरुन सरुन गेला’

[१११ पानांवरील चित्रे]

त्यांनी स्वतःला गुहेत लपविले