व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भीतीदायक गूज उलगडले

भीतीदायक गूज उलगडले

अध्याय ३४

भीतीदायक गूज उलगडले

१. (अ) मोठी कलावंतीण व तिची भीतीदायक स्वारी पाहून योहानाची काय प्रतिक्रिया होते व का? (ब) भविष्यवादित दृश्‍यातील घटनांची पूर्णता होत असताना आज योहान वर्ग कशी प्रतिक्रिया दाखवतो?

 मोठी कलावंतीण व तिची भीतीदायक स्वारी पाहिल्याने योहानाची प्रतिक्रिया काय आहे? तो स्वतः याचे उत्तर देतो: “तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटले.” (प्रकटीकरण १७:६ब) केवळ मानवी कल्पना करुन असे दृश्‍य समोर उभे करणे शक्य नाही. तथापि, तेथे—त्या ओसाड जागी—अमंगळ कलावंतीण एका भीतीदायक किरमिजी रंगाच्या श्‍वापदावर बसली आहे! (प्रकटीकरण १७:३) भविष्यवादित दृश्‍यातील घटनांची पूर्णता होत असताना योहान वर्गाला देखील याचे फार आश्‍चर्य वाटते. जगातील लोकांनी ते पाहिले तर, ते ‘आश्‍चर्यकारक!’ असे म्हणतील व जागतिक नेते पुनः उच्चारतील ‘अशक्य!’ परंतु हे दृश्‍य २० व्या शतकातील वास्तवतेबद्दल आश्‍चर्याचा धक्का देते. दृश्‍याच्या पूर्णतेत देवाच्या लोकांचा उल्लेखनीय भाग अगोदरच होता व यामुळे याची त्यांना खात्री पटते की, ही भविष्यवाणी तिच्या वैभवी कळसास पोहंचेल.

२. (अ) योहानाला झालेले आश्‍चर्य पाहून देवदूत त्याला काय सांगतो? (ब) योहान वर्गाने याबद्दल काय प्रकट केले व हे कसे करण्यात आले?

देवदूत योहानाला आश्‍चर्यचकित झालेला पाहतो. ‘त्यामुळे,’ योहान पुढे असे सांगतो, “देवदूताने मला म्हटले: ‘तुला आश्‍चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्‍वापद ह्‍यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो.’” (प्रकटीकरण १७:७, NW) अहा, आता देवदूत ते गूज उलगडील! तो आश्‍चर्याने टक लावून बघणाऱ्‍या योहानाला दृश्‍याचे विविध पैलू व लगेचच उलगडणाऱ्‍या नाट्यमय घटना यांचे स्पष्टीकरण देतो. अशाचप्रकारे, आज जागृत असणाऱ्‍या योहान वर्गाने देवदूतांच्या मार्गदर्शनाद्वारे भविष्यवाणीची समज दिली आहे. “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना?” विश्‍वासू योसेफाला वाटले होते त्याप्रमाणे आम्हाला देखील वाटते. (उत्पत्ती ४०:८; पडताळा दानीएल २:२९, ३०.) यहोवा त्या दृश्‍याचा अर्थ व त्याचा जीवनावर होणारा परिणाम सांगत असताना त्याचे लोक जणू मध्यभागी बसलेले आहेत. (स्तोत्र २५:१४) अगदी योग्य वेळी, त्याने स्त्री व श्‍वापदाच्या गूजाची समज त्यांना प्राप्त करुन दिली.—स्तोत्र ३२:८.

३, ४. (अ) १९४२ मध्ये संस्थेच्या अध्यक्षांनी कोणते भाषण दिले व त्यात किरमिजी रंगाच्या श्‍वापदाची कशी ओळख देण्यात आली? (ब) अध्यक्ष नॉर यांनी देवदूताने योहानाला सांगितलेल्या कोणत्या शब्दांची चर्चा केली?

सप्टेंबर १८ ते २०, १९४२ पासून, दुसरे महायुद्ध त्याच्या कळसास पोहंचत असता, यहोवाच्या साक्षीदारांनी अमेरिकेत त्यांचे न्यू वर्ल्ड थिओक्रेटिक संमेलन भरविले होते. क्लीवलॅन्ड, ओहायो हे प्रमुख शहर इतर ५० पेक्षा अधिक अधिवेशन शहरांना दूरसंचारद्वारे जोडण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितीचा उच्चांक १,२९,६९९ होता. युद्धकाळात जगभरात ज्याठिकाणी शक्य होते, तेथील इतर अधिवेशनात या कार्यक्रमाची पुनरावृत्ती केली गेली. त्याप्रसंगी, यहोवाच्या अनेक लोकांनी अशी अपेक्षा केली होती की, हे युद्ध हर्मगिदोन या देवाच्या युद्धापर्यंत वाढत जाईल; यामुळेच “शांती—ती टिकणार का?,” या जाहीर भाषणाने बरेच कुतूहल निर्माण केले होते. तथापि, राष्ट्रांसाठी अगदी विरूद्ध गोष्टी राखून ठेवलेल्या असताना, वॉचटावर सोसायटीचे नवे अध्यक्ष, एन. एच. नॉर यांनी शांतीसंबंधाने भाषण देण्याचा कसा विचार केला होता? * याचे कारण असे होते की, योहान वर्ग देवाच्या भविष्यवादित शब्दाकडे ‘विशेष लक्ष देत होता.’—इब्रीयांस २:१; २ पेत्र १:१९.

“शांती—ती टिकणार का?” या भाषणाने भविष्यवादावर कोणता उजेड पाडला? अध्यक्ष नॉर यांनी प्रकटीकरण १७:३ मधील किरमिजी रंगाच्या श्‍वापदाची ओळख लिग ऑफ नेशन्स अशी करून देऊन, देवदूताने योहानाला सांगितलेल्या खालील शब्दांच्या आधारावर तुफानी उलाढालीबद्दलची चर्चा केली: “जे श्‍वापद तू पाहिले ते होते, आणि नाही; ते अथांग डोहातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे.”प्रकटीकरण १७:८अ.

५. (अ) कशारितीने ‘ते श्‍वापद . . . होते’ व नंतर “नाही”? (ब) “लिग ऑफ नेशन्स अथांग डोहातच राहील का,” या प्रश्‍नाचे उत्तर अध्यक्ष नॉर यांनी कसे दिले?

“जे श्‍वापद. . .होते.” होय, ते जानेवारी १०, १९२० पासून लिग ऑफ नेशन्स म्हणून अस्तित्वात होते, ज्यामध्ये ६३ राष्ट्रांनी अनियमित भाग घेतला होता. परंतु नंतर, जपान, जर्मनी व इटली वेगळे झाले व रशियाचे लिग ऑफ नेशन्समधून पतन झाले. सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मनीच्या नात्सी हुकूमशहाने दुसरे महायुद्ध सुरू केले. * जगामध्ये शांती टिकवण्यास लिग ऑफ नेशन्स अपयशी झाल्यामुळे, तो अक्रियाक स्थितीच्या अथांग डोहात गेला. १९४२ पर्यंत तो फक्‍त नाममात्र होता. यहोवाने त्याच्या लोकांना अगोदर किंवा नंतरही नव्हे—पण अगदी कठीण काळातच—या दृश्‍याची पूर्ण समज दिली! न्यू वर्ल्ड थिओक्रेटिक संमेलनात, अध्यक्ष नॉर यांनी भविष्यवाणीच्या अनुषंगाने ‘ते श्‍वापद—नाही’ असे घोषित केले. त्यांनी नंतर असा प्रश्‍न विचारला, “लिग ऑफ नेशन्स अथांग डोहातच राहील का?” प्रकटीकरण १७:८ ला उद्धृत करून त्यांनी उत्तर दिले: “जागतिक राष्ट्रांचे संघटन पुन्हा उदयास येईल.” यहोवाच्या भविष्यवादित वचनाच्या गौरवार्थ, ते अगदी त्याप्रमाणे पूर्ण झाले!

अथांग डोहातून वर येणे

६. (अ) किरमिजी रंगाचे श्‍वापद अथांग डोहातून वर कधी आले व कोणत्या नवीन नावाने? (ब) संयुक्‍त राष्ट्रसंघ किरमिजी रंगाच्या श्‍वापदाचे पुनरुज्जीवन का आहे?

किरमिजी-रंगाचे श्‍वापद खरोखर अथांग डोहातून वर आले. जून २६, १९४५ रोजी अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे मोठ्या धामधुमीत ५० राष्ट्रांनी आपले मत देऊन संयुक्‍त राष्ट्रसंघांच्या सनदेस मान्यता दिली. या संघाचे काम “आंतरराष्ट्रीय शांती व निर्भयता राखणे” हे होते. लिग ऑफ नेशन्स व संयुक्‍त राष्ट्रसंघात बरीच साम्यता होती. वर्ल्ड बुक ऑफ एन्सायक्लोपिडीया कळवतो: “काही बाबतीत संयुक्‍त राष्ट्रसंघ, पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या लिग ऑफ नेशन्ससारखाच होता . . . संयुक्‍त राष्ट्रसंघाची प्रस्थापना करणाऱ्‍या अनेक राष्ट्रांनीच लिग ऑफ नेशन्सची देखील स्थापना केली होती. लिग ऑफ नेशन्सप्रमाणेच संयुक्‍त राष्ट्रसंघ राष्ट्रांमध्ये शांती राखण्यास मदत करण्यासाठी प्रस्थापित झाला होता. संयुक्‍त राष्ट्रसंघाचे मुख्य घटक लिग ऑफ नेशन्सप्रमाणेच आहेत.” तर मग, संयुक्‍त राष्ट्रसंघ हे खरोखर किरमिजी रंगाच्या श्‍वापदाचे पुनरुज्जीवन आहे. १७५ पेक्षा अधिक राष्ट्रातील त्याचे सभासदत्व, लिग ऑफ नेशन्सच्या ६३ राष्ट्रांपेक्षा अधिक विस्तारीत आहे व त्याने आधीच्या संस्थेपेक्षा अधिक जबाबदारींना उचलले आहे.

७. (अ) किरमिजी रंगाच्या श्‍वापदाच्या पुनरुज्जीवनामुळे पृथ्वीवरील निवासी कसे आश्‍चर्यचकीत झाले? (ब) कोणते ध्येय संयुक्‍त राष्ट्रसंघाने युक्‍तीने टाळले व यासंबंधी त्याच्या सचिव-सेनापतींनी काय म्हटले?

सुरवातीला, संयुक्‍त राष्ट्रसंघाबद्दल अधिक आशा बाळगल्या गेल्या. ही देवदूताच्या शब्दांची पूर्णता होती: “जगाच्या स्थापनेपासून ज्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले नाही अशा पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांना, ते श्‍वापद होते, नाही, तरी हजर आहे [व येणार, NW] असे पाहून आश्‍चर्य वाटेल.” (प्रकटीकरण १७:८ब) न्यूयॉर्कमध्ये पूर्व नदीतीरी असणाऱ्‍या व मनात भरणाऱ्‍या तिच्या मुख्यालयातून अधिकार गाजविणाऱ्‍या या नवीन भव्य आकाराच्या मूर्तीचे पृथ्वीच्या रहिवाशांनी कौतुक केले. परंतु खऱ्‍या शांती व निर्भयतेने संयुक्‍त राष्ट्रसंघाला चकविले आहे. अशा ह्‍या सैतानी अण्वस्त्राच्या युगात, जागतिक शांती केवळ “परस्परांचा निश्‍चित नाश”—(“म्युचुअल ॲशुअर्ड डिस्ट्रक्शन,” MAD) होईल या भीतीने राखलेली आहे, शस्त्र स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या जवळजवळ ४० वर्षांच्या प्रयत्नानंतर, त्याचे सचिव सेनापती झेवियर पेरेझ डी क्यूलर यांनी १९८५ मध्ये शोक व्यक्‍त केला: “आम्ही वेडेपणाच्या विचित्र जगात जगत आहोत व याविषयी काय करावे ते आम्हाला सुचत नाही.”

८, ९. (अ) जगाच्या समस्यांसाठी संयुक्‍त राष्ट्रसंघाकडे उत्तर का नाही व देवाच्या आदेशानुसार लवकरच याचे काय होईल? (ब) संयुक्‍त राष्ट्रसंघाचे संस्थापक व आश्‍चर्य करणाऱ्‍यांची नावे देवाच्या “जीवनाच्या पुस्तकात” का नमूद केलेली नाहीत? (क) यहोवाचे राज्य यशस्वीपणे काय साध्य करील?

संयुक्‍त राष्ट्रसंघाजवळ याचे उत्तर नाही. का बरे? कारण सर्व मानवजातीचा जीवनदाता संयुक्‍त राष्ट्रसंघाचा निर्माता नव्हे. त्याचा जीवनकाळ कमी असेल, कारण देवाच्या हुकूमनाम्याप्रमाणे तो “नाशाप्रत जाणार आहे.” संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या संस्थापकांचे व त्याच्याविषयी आश्‍चर्य करणाऱ्‍यांची नावे देवाच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली नाहीत. तर मग पापी, मर्त्य मानव, ज्यापैकी अनेक जन देवाच्या नावाची थट्टा करतात, ते यहोवा देवाने उद्देशिलेल्या गोष्टी संयुक्‍त राष्ट्रसंघाद्वारे कशा साध्य करू शकतील? यहोवा देवाने घोषित केलेल्या व लवकरच पूर्ण करणाऱ्‍या गोष्टी तो मानवांद्वारे नव्हे, तर त्याच्या ख्रिस्ताच्या राज्यामार्फत तडीस नेणार आहे.—दानीएल ७:२७; प्रकटीकरण ११:१५.

ज्याच्या शांतीला अंत नाही तो शांतीचा राजकुमार, येशू ख्रिस्त याच्याद्वारे येणाऱ्‍या देवाच्या मसीही राज्याची संयुक्‍त राष्ट्रसंघ निंदात्मक बनावट आहे. (यशया ९:६, ७) जरी संयुक्‍त राष्ट्रसंघाने तात्कालिक स्वरुपाची शांती आणली तरी, युद्धे पुन्हा उद्‌भवू शकतात. हा पापी मानव स्वभावच आहे. “जगाच्या स्थापनेपासून [त्यांचे] नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले नाही.” ख्रिस्ताद्वारे यहोवाचे राज्य पृथ्वीवर केवळ शांतीच प्रस्थापित करणार असे नाही, तर येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर, देवाच्या स्मरणात असणाऱ्‍या धार्मिक व अधार्मिक मृतांचे ते पुनरुत्थान करील. (योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये. २४:१५) यामध्ये सैतान व त्याच्या संततीकडून येणाऱ्‍या हल्ल्यात टिकून राहिलेला, तसेच अजूनही आज्ञाधारक आहोत असे स्वतःस सिद्ध करणारा प्रत्येकजण आहे. स्पष्टपणे, देवाच्या जीवनाच्या पुस्तकात मोठ्या बाबेलला जखडून राहिलेले कट्टर पुरस्कर्ते व जे श्‍वापदाची भक्‍ती करत आहेत अशांची नावे त्यात नसणार.—निर्गम ३२:३३; स्तोत्र ८६:८-१०; योहान १७:३; प्रकटीकरण १६:२, १७:५.

शांती व निर्भयता—एक व्यर्थ आशा

१०, ११. (अ) १९८६ मध्ये संयुक्‍त राष्ट्रसंघाने काय घोषित केले होते व याचा काय प्रतिसाद मिळाला होता? (ब) इटलीतील असीसी येथे शांतीसाठी प्रार्थना करण्यास किती “धार्मिक कुटुंबे” जमली होती व देव अशा प्रकारच्या प्रार्थना ऐकतो का? स्पष्ट करा.

१० मानवजातीच्या आशांना आधार देण्याच्या प्रयत्नात, “शांती व मानवजातीच्या भवितव्याचे रक्षण करणे” ह्‍या शीर्षकावर संयुक्‍त राष्ट्रसंघाने १९८६ हे “आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष” घोषित केले. युद्ध करणाऱ्‍या राष्ट्रांनी कमीतकमी एक वर्ष तरी युद्धाची शस्त्रे खाली ठेवावी असे सांगितले गेले. त्यांची प्रतिक्रिया काय होती? आंतरराष्ट्रीय शांती संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, केवळ १९८६ मध्ये झालेल्या युद्धांच्या परिणामामुळे जवळपास ५० लक्ष लोक ठार झाले! जरी काही खास नाणी व स्मृती तिकीटे काढण्यात आली, तरी अनेक राष्ट्रांनी त्या वर्षी शांती राखण्यासाठी फार कमी प्रयत्न केले. तथापि, संयुक्‍त राष्ट्रसंघाबरोबर चांगला संबंध असण्याची काळजी वाटणाऱ्‍या जगातील धर्मांनी त्या वर्षाचा विविध मार्गांनी प्रसार केला. जानेवारी १, १९८६ या वर्षी पोप जॉन पॉल दुसरे यांनी संयुक्‍त राष्ट्रसंघाची स्तुती केली व नवे वर्ष शांतीला समर्पित केले. तसेच ऑक्टोबर २७ रोजी त्यांनी इटलीतील असीसी येथे जगातील अनेक धार्मिक गुरूंना शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी एकत्र आणले.

११ शांतीसाठी केलेल्या अशा प्रार्थनांचे उत्तर देव देतो का? ते धार्मिक गुरू कोणत्या देवाला प्रार्थना करीत होते? तुम्ही त्यांना विचारले तर प्रत्येक गट त्याचे वेगवेगळे उत्तर देईल. लक्षावधी दैवतांचे असे एखादे मंदिर आहे का, की जेथे विविध मार्गांनी केलेल्या विनंत्या ऐकून मान्य होऊ शकतील? त्यातील बहुतेक ख्रिस्ती धर्मजगताच्या त्रैक्याची भक्‍ती करीत होते. * बुद्ध, हिंदू व इतरांनी त्यांच्या दैवतांना अनेक वेळा प्रार्थना केल्या. यामध्ये, १२ “धार्मिक कुटुंबे” एकत्र आली होती व ते, ज्यात अँग्लीकन आर्चबिशप ऑफ कॅन्टरबरी, बुद्धाचे दलाईलामा, व रशियाचे सनातन रहिवासी, टोकियोतील शिंतो मंदिर संघटनेचे अध्यक्ष, आफ्रिकेतील ॲनिमिस्ट व केसांची सजावट केलेले दोन अमेरिकन इंडियन प्रतिनिधीत्व करीत होते. हा खरोखर रंगीत समुदाय होता ज्याचे दूरदर्शनवर भव्य प्रदर्शन करण्यात आले असे म्हणता येईल. एका समुदायाने एका वेळी १२ तास अखंड प्रार्थना केली. (पडताळा लूक २०:४५-४७.) परंतु यापैकीच्या कोणत्याही प्रार्थना त्यावेळी आकाशात जमलेल्या मेघाच्या वर गेल्या का? नाही, खालील कारणांमुळे:

१२. जगातील धार्मिक नेत्यांनी शांतीसाठी केलेल्या प्रार्थनांचे उत्तर कोणत्या कारणामुळे देवाने दिले नाही?

१२ जे ‘यहोवाच्या नावाने चालतात,’ त्यांच्या उलट, तेथे जमलेल्यापैकी कोणीही जिवंत देव यहोवा, ज्याचे नाव मूळ बायबलच्या प्रतीमध्ये ७,००० वेळा दिलेले आहे, त्याला प्रार्थना करीत नव्हता. (मीखा ४:५; यशया ४२:८, १२) * सामुदायिकरित्या ते येशूच्या नावाने देवाकडे गेले नाहीत; त्यातील पुष्कळ तर येशू ख्रिस्तावर विश्‍वास देखील ठेवत नाहीत. (योहान १४:१३; १५:१६) मानवजातीची खरी आशा—संयुक्‍त राष्ट्रसंघ नव्हे—तर देवाचे राज्य आहे हे जगभर घोषित करणे ही देवाची इच्छा आमच्या दिवसात यापैकीचे एकही जन पूर्ण करीत नाही. (मत्तय ७:२१-२३; २४:१४; मार्क १३:१०) बहुतेक भागातील त्यांच्या धार्मिक संस्था इतिहासातील रक्‍तपाताच्या युद्धात सामील होत्या, ज्यामध्ये या शतकातील दोन महायुद्धाचा देखील समावेश आहे. अशांविषयी देव म्हणतो: “तुम्ही कितीहि विनवण्या [“प्रार्थना,” NW] केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्‍ताने भरले आहेत.”—यशया १:१५; ५९:१-३.

१३. (अ) शांतीसाठी प्रार्थना करण्यात जगातील धार्मिक नेत्यांनी संयुक्‍त राष्ट्रसंघासोबत हात मिळवून काम करणे हे अभूतपूर्व का आहे? (ब) शांतीची ही ओरड कोणत्या ईश्‍वरी भाकीत केलेल्या कळसास पोहंचेल?

१३ याशिवाय, या काळात जगातील धार्मिक नेते संयुक्‍त राष्ट्रसंघासोबत एकत्र मिळून शांतीसाठी ओरडतात हे अभूतपूर्व आहे. खासपणे या आधुनिक दिवसात, अनेक लोक धर्माचा त्याग करीत असताना या धार्मिक नेत्यांना संयुक्‍त राष्ट्रसंघावर स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाव टाकण्याची इच्छा वाटते. पुरातन इस्राएलातील अविश्‍वासू नेत्यांप्रमाणे ते शांतीचे नाव नसता “शांति शांति” असे ओरडतात. (यिर्मया ६:१४) यामध्ये कोणतीही शंका नाही की, त्यांची ही ओरड प्रेषित पौलाने केलेल्या भविष्यवाणीला पुष्टी देत तिचा कळस गाठूपर्यंत वाढत राहील: “जसा रात्री चोर, तसा प्रभूचा [यहोवा, NW] दिवस येतो. ‘शांति आहे, निर्भय आहे,’ असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात्‌ वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३.

१४. “शांति व निर्भयता!” ही ओरड कोणते रुप धारण करील व यात फसण्यापासून एखादा स्वतःला कसे टाळू शकतो?

१४ “शांति व निर्भयता!” ही अभूतपूर्व ओरड कोणते रुप धारण करील? ही, ओरड करणाऱ्‍यांच्या अचानक विनाशाआधीची उल्लेखणीय ओरड असे येथे सांगितले आहे. यास्तव, जागतिक नेत्यांनी पूर्वी केलेल्या घोषणेपेक्षा ही अधिक निश्‍चयपूर्वक सांगितली जाण्यास हवी. ही पृथ्वीभर विस्तृतपणे केली जाईल यामध्ये कोणतीही शंका नाही. तथापि, हे बाह्‍य देखाव्याव्यतिरिक्‍त काहीही नसेल. अंतर्गतपणे खरोखरच काहीही बदललेले नसेल. स्वार्थीपणा, द्वेष, गुन्हे, कौटुंबिक अव्यवस्था, अनैतिकता, आजार, दुःख, व मृत्यू तेव्हा देखील असेल. या कारणास्तव, बायबलच्या भविष्यवाणीच्या बाबतीत जागृत नसणाऱ्‍यांना ही ओरड फसवील. परंतु, जर तुम्ही जागतिक घटनांच्या अर्थाबाबत जागृत राहिला व देवाच्या वचनातील भविष्यदर्शक सूचना ऐकल्या तर ती ओरड तुम्हास फसवू शकणार नाही.—मार्क १३:३२-३७; लूक २१:३४-३६.

[तळटीपा]

^ जानेवारी ८, १९४२ मध्ये जे. एफ. रदरफोर्ड मृत्यू पावले व यानंतर एन. एच. नॉर अध्यक्ष झाले.

^ नोव्हेंबर २०, १९४० रोजी जर्मनी, इटली, जपान व हंगेरी यांनी ‘नव्या लिग ऑफ नेशन्ससाठी’ सह्‍या केल्या. त्यानंतर लगेच चार दिवसांनी धार्मिक शांतीसाठी व एका नव्या व्यवस्थेसाठी व्हॅटिकनने प्रार्थना व धार्मिक विधी योजिल्या. तो “नवा लिग ऑफ नेशन्स” साकार झाला नाही.

^ त्रैक्याच्या शिकवणीचा मुळारंभ पुरातन बाबेलपासून आहे, जेथे सूर्य-दैवत शामेश, चंद्र-दैवत सीन व नक्षत्र-दैवत इश्‍तार यांची त्रैक्य म्हणून उपासना केली जात होती. इजिप्तने सुद्धा ओसिरीस, आयसिस व होरसची उपासना करून ती प्रथा आचरली. अश्‍शूऱ्‍यांचे दैवत अश्‍शूर, याला तीन डोकी आहेत असे चित्र काढले जाते. ह्‍याच नमुन्याच्या अनुकरणार्थ कॅथलिक चर्चेसमध्ये तीन डोकी असलेल्या देवाच्या मूर्त्या आढळून येतात.

^ १९८१ ची वेबस्टर्स्‌ थर्ड न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी यहोवा देवाबद्दलची व्याख्या याप्रकारे देते: “सर्वश्रेष्ठ परमेश्‍वर म्हणून ओळखलेला व फक्‍त यहोवाचे साक्षीदार उपासना करीत असलेला परमेश्‍वर.”

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५० पानांवरील चौकट]

‘शांतीचा’ विरोधाभास

जरी १९८६ हे वर्ष जागतिक शांतीचे वर्ष म्हणून संयुक्‍त राष्ट्रसंघाने घोषित केले तरी आत्मघाती शस्त्रस्पर्धा वाढतच राहिली. वर्ल्ड मिलिट्री ॲण्ड सोशल एक्स्पेंडिचर्स १९८६ या वस्तुस्थितीची माहिती पुरविते:

१९८६ मध्ये जगव्याप्त सैन्याचा खर्च ९० अब्ज डॉलर्स इतका झाला.

एका तासाला जगव्याप्त सैन्याला जो खर्च केला जातो तो दर वर्षी टाळता येणाऱ्‍या सांसर्गिक आजारांना बळी पडणाऱ्‍या ३० लाख ५० हजार लोकांच्या उपचारासाठी खर्च केला जाऊ शकतो.

जगभरात, पाच व्यक्‍तींमधील एक व्यक्‍ती अतिशय गरीबीत जीवन जगते. जग अणुशस्त्रासाठी दोन दिवसांचा जितका खर्च करते त्यामध्ये, सर्व उपाशी लोकांना एक वर्षभरासाठी खाऊ घालता येईल.

सध्या जगातील अणुशस्त्राच्या साठ्यात ही अतिस्फोटक शक्‍ती चर्नोबिलच्या स्फोटकापेक्षा १६,००,००,००० पटीने जास्त आहे.

आज एक न्युक्लियर बाँब १९४५ मध्ये हिरोशिमावर टाकलेल्या बाँबपेक्षा ५०० पटीने अधिक शक्‍तिशाली असा तयार केला जाऊ शकतो.

आजच्या शस्त्र कारखान्यात हिरोशिमाच्या एक लाखापेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे. ते सर्व दुसऱ्‍या महायुद्धात वापरलेल्या व ज्यात ३ कोटी ८० लाख लोक मरण पावले होते त्यापेक्षा २,७०० पटीने अधिक शक्‍तिशाली स्फोटकांचे प्रतिनिधीत्व करते.

युध्दे ही वारंवार घडत आहेत व ती अधिक प्राणघातक बनली आहेत. १८ व्या शतकात युद्धात मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४० लक्ष ४० हजार होती, १९ व्या शतकात ८० लक्ष ३० हजार, २० व्या शतकातील ८६ वर्षात ९ कोटी ८० लक्ष ८० हजार इतकी आहे. १८ व्या शतकापासून, युद्धात मेलेल्यांची संख्या जगाच्या सहा पटीने वाढली आहे. २० व्या शतकातील प्रत्येक युद्धात १९ व्या शतकाप्रमाणेच दहा पटीने अधिक मृत्यू घडले आहेत.

[२४७ पानांवरील चित्रे]

आधी भविष्यवादित केल्याप्रमाणे किरमिजी रंगाचे श्‍वापद, लिग ऑफ नेशन्स अथांग डोहात गेले; पण दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात संयुक्‍त राष्ट्रसंघ म्हणून पुनरुज्जीवित झाले

[२४९ पानांवरील चित्रे]

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या “शांतीचे वर्ष” याला पाठबळ देण्यासाठी जगाच्या सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी असीसी, इटली येथे गोंगाटाने प्रार्थना केल्या, पण त्यातील एकानेही जिवंत देव, यहोवा याला प्रार्थना केली नाही