व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वृद्धपण “शोभेचा मुकुट”

वृद्धपण “शोभेचा मुकुट”

‘यहोवापासून माझे साहाय्य येते’

वृद्धपण “शोभेचा मुकुट”

एकशे एक वर्षांच्या म्युरिअल यांनी म्हटले: “मी आपल्या जीवनाबद्दल पूर्णपणे समाधानी आहे.” सत्तर वर्षांचे थिओडोरस म्हणाले, “यासारखा मोठा बहुमान दुसरा कोणता असू शकतो?” त्र्याहत्तर वर्षांच्या वयात मारीया म्हणाल्या, “माझ्या जीवनाचा यापेक्षा चांगल्या मार्गाने मी उपयोग करूच शकले नसते.” या सर्वांनी आपले सबंध आयुष्य यहोवा देवाच्या सेवेत घालवले.

सबंध जगातील यहोवाच्या सक्रिय उपासकांत अशा वृद्ध जनांची अनेक उदाहरणे आहेत. उतारवय, आरोग्याच्या समस्या, आणि इतर अडचणींना तोंड देऊनही ते देवाची पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने सेवा करतात. ख्रिस्ती मंडळीत अशा या विश्‍वासू जनांचा त्यांच्या अनुकरणीय सुभक्‍तीशील मनोवृत्तीमुळे आदर केला जातो. परिस्थितीमुळे त्यांची सेवा मर्यादित असली तरीसुद्धा यहोवा त्यांच्या सेवेची मनापासून कदर करतो. *२ करिंथकर ८:१२.

स्तोत्रसंहितेत विश्‍वासू वृद्ध जनांच्या समृद्ध जीवनाविषयी एक अतिशय समर्पक विचार मांडला आहे. त्यांची तुलना एका जुन्या व डौलदार वृक्षाशी करण्यात आली आहे. विश्‍वासू वृद्धांच्या संदर्भात स्तोत्रकर्त्याने असे गाईले: “वृद्धपणातहि ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील.”—स्तोत्र ९२:१४.

म्हातारपणात आपली सगळी शक्‍ती गेल्यावर कोणीही आपल्याला विचारणार नाही अशी काहीजणांना भीती वाटते. दाविदानेही देवाला अशी याचना केली की “उतारवयात माझा त्याग करू नको; माझी शक्‍ति क्षीण होत चालली असता मला सोडू नको.” (स्तोत्र ७१:९) एक वृद्ध व्यक्‍ती क्षीण आहे की फलदायी आहे हे कशावर अवलंबून आहे? त्या व्यक्‍तीच्या नीतिमत्तेवर. स्तोत्रकर्त्याने गाईले: “नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.”—स्तोत्र ९२:१२.

ज्यांनी आपल्या सबंध जीवनभर विश्‍वासूपणे देवाची सेवा केली आहे ते सहसा उतारवयातही उत्तम फळ देत राहतात. कारण स्वतःच्या व इतरांच्या जीवनात त्यांनी पेरलेले अनेक बी अंकुरित होऊन उत्तम फळ उत्पन्‍न करतात. (गलतीकर ६:७-१०; कलस्सैकर १:१०) अर्थात, ज्यांनी जीवनभर स्वार्थी ध्येयांच्या पाठीस लागून देवाच्या मार्गांकडे दुर्लक्ष केले त्यांच्याजवळ उतारवयात मोलवान असे काहीच नसते.

वृद्धांची नीतिमत्ता किती शोभिवंत असते यावर नीतिसूत्रांच्या पुस्तकातही भर देण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे १६:३१) होय नीतिमत्त्व हे आंतरिक सौंदर्याचे दर्पण आहे. आयुष्यभर नीतिमत्तेने चालणाऱ्‍यांचा आदर केला जातो. (लेवीय १९:३२) पिकलेल्या केसांना सुबुद्धी व सात्त्विकतेची जोड मिळाल्यास ही एक सन्मानाची गोष्ट ठरते.—ईयोब १२:१२.

यहोवाच्या सेवेत खर्च केलेले सात्त्विक जीवन त्याच्या नजरेत अतिशय संतोषदायक आहे. शास्त्रवचनांत असे म्हटले आहे: “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतहि मीच [यहोवा] तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे, मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन.” (यशया ४६:४) आपला प्रेमळ स्वर्गीय पिता त्याच्या एकनिष्ठ सेवकांना, त्यांच्या जीवनाच्या संधिकाली सांभाळण्याचे व साहाय्य करण्याचे आश्‍वासन देतो, हे जाणून खरोखर किती सांत्वन मिळते!—स्तोत्र ४८:१४.

यहोवाच्या विश्‍वासू सेवेत खर्च केलेले आयुष्य जर त्याच्या नजरेत संतोषदायक आहे तर मग ते इतरांच्याही आदरास पात्र नव्हे का? वयस्क सहविश्‍वासू बांधवांची आपण मनापासून कदर करतो, तेव्हा आपण देवाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहात आहोत हे दिसून येते. (१ तीमथ्य ५:१, २) तेव्हा दैनंदिन जीवनात, अशा बंधूभगिनींच्या गरजा पूर्ण करण्याद्वारे त्यांच्याबद्दल आपल्याला ख्रिस्ती प्रीती कशी व्यक्‍त करता येईल याविषयी आपण जागरूक राहू या.

जीवनाच्या उत्तरार्धात नीतिमत्त्वाचा मार्ग पत्करणे

शलमोन खात्रीने सांगतो, “न्याय्यत्वाच्या मार्गांत जीवन आहे.” (नीतिसूत्रे १२:२८) वाढते वय, हा मार्ग स्वीकारण्यापासून एका व्यक्‍तीला रोखू शकत नाही. उदाहरणार्थ, मोलडोव्हा येथे राहणाऱ्‍या एका ९९ वर्षांच्या मनुष्याने आपल्या तारुण्याची वर्षे साम्यवादी तत्त्वांचे समर्थन करण्यात खर्च केली होती. साम्यवादी वर्तुळातील व्ही. आय. लेनीन यांच्यासारख्या जगप्रसिद्ध नेत्यांसोबत आपण व्यक्‍तिशः संभाषण केल्याचा त्यांना फार अभिमान वाटे. पण साम्यवादाचे उच्चाटन झाल्यानंतर या वृद्ध मनुष्याला जीवनातला उद्देश हरवल्यासारखे वाटू लागले. पण जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांना दाखवले की देवाचे राज्य हे मानवजातीच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे, तेव्हा त्यांनी बायबलमधील या सत्याचा स्वीकार केला आणि ते शास्त्रवचनांचा उत्सुकतेने अभ्यास करू लागले. दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवाचा सेवक या नात्याने बाप्तिस्मा घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

देवाच्या नैतिक नियमांविषयी शिकताना, हंगेरी येथे राहणाऱ्‍या एका ८१ वर्षांच्या वृद्ध स्त्रीला समजले की कित्येक वर्षांपासून ती ज्या मनुष्याबरोबर राहात होती त्याच्याशी विवाहित होणे आवश्‍यक आहे. या स्त्रीने धैर्य एकवटून आपल्या साथीदाराला बायबलवर आधारित असलेला आपला दृष्टिकोन समजावून सांगितला. आश्‍चर्य म्हणजे तो तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला. त्यांचा कायदेशीर विवाह झाल्यानंतर तिने अतिशय जलद आध्यात्मिक प्रगती केली. तिचा बायबल अभ्यास सुरू झाल्यावर केवळ आठ महिन्यांत ती बाप्तिस्मा न झालेली प्रचारक बनली आणि त्यानंतर काही काळातच तिचा बाप्तिस्माही झाला. नीतिमत्त्व एका वृद्ध व्यक्‍तीच्या डोक्यावर खऱ्‍या सौंदर्याच्या शोभिवंत मुकुटासारखे असते हेच यावरून सिद्ध होत नाही का?

होय, विश्‍वासू वृद्ध ख्रिस्ती याची पूर्ण खात्री बाळगू शकतात की देवाला त्यांच्याविषयी कळकळ आहे. जे यहोवाला एकनिष्ठ राहतात त्यांचा तो कधीही त्याग करणार नाही. उलट, वृद्धकाळीही तो त्यांचे मार्गदर्शन, साहाय्य व संभाळ करण्याचे त्यांना आश्‍वासन देतो. आणि ते स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांना दुजोरा देतात, की “[यहोवापासूनच] माझे साहाय्य येते.”—स्तोत्र १२१:२, पं.र.भा.

[तळटीप]

^ परि. 4 यहोवाच्या साक्षीदारांचे २००५ चे कॅलेंडर जानेवारी/फेब्रुवारी पाहा.

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.”नीतिसूत्रे १६:३१

[८ पानांवरील चौकट]

यहोवा आपल्या वृद्ध सेवकांची काळजी घेतो

“पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृध्दाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्‍वर आहे.”—लेवीय १९:३२.

“तुमच्या वृद्धापकाळापर्यंतहि मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन.” —यशया ४६:४.