व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

शमशोनाने ठार मारलेल्या लोकांच्या मृत शरीरांना स्पर्श करून देखील तो नाजीर कसा राहिला?

प्राचीन इस्राएलात, एक व्यक्‍ती स्वेच्छेने विशिष्ट कालावधीसाठी देवाला नाजीराचा नवस करू शकत होती. * हा नवस करणाऱ्‍या व्यक्‍तीवर ज्या गोष्टी बंधनकारक होत्या त्यांपैकी एक अशी होती: “जितके दिवस त्याने परमेश्‍वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये. त्याचा बाप, आई, भाऊ, बहिण ह्‍यापैकी कोणी मेले तरी त्याने सुतक धरू नये.” पण “कोणी त्याच्यापाशी अकस्मात मरण पावले,” तर काय? अशाप्रकारे आकस्मिक रीत्या प्रेताला स्पर्श केल्यास त्याचे नाजीरपण भ्रष्ट झाले असे समजत. “त्याचे पूर्वीचे दिवस रद्द समजावे,” असे सांगण्यात आले होते. त्याला पुन्हा एकदा शुद्धीकरणाचा विधी करावा लागत आणि यानंतर सुरुवातीपासून नाजीरपणाचा सबंध अवधी पुन्हा पाळावा लागत.—गणना ६:६-१२.

पण शमशोन हा एका वेगळ्या अर्थाने नाजीर होता. शमशोनाच्या जन्माआधी यहोवाच्या दूताने त्याच्या आईला असे सांगितले: “तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल. आणि इस्राएलास पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.” (शास्ते १३:५) शमशोनाने स्वतः नाजीरपणाचा नवस केला नव्हता. त्याला देवानेच नाजीर नेमले होते आणि त्याचे नाजीरपण आजीवन असणार होते. तेव्हा, त्याच्या बाबतीत प्रेताला स्पर्श करण्याची अट बंधनकारक नव्हती. जर असती, तर मग आकस्मिक रीत्या प्रेताला स्पर्श केल्यावर तो पुन्हा एकदा आजीवन नाजीरपणाचा नवस कसा सुरू करू शकत होता? कारण त्याचा नवस तर त्याच्या जन्माच्या वेळी सुरू झाला होता. त्याअर्थी, आजीवन नाजीर असणाऱ्‍यांकरता असलेल्या अटी स्वेच्छेने नाजीराचा नवस करणाऱ्‍यांकरता असलेल्या अटींपेक्षा वेगळ्या असाव्यात.

आजीवन नाजीर राहिलेल्या तीन व्यक्‍तींना, अर्थात, शमशोन, शमुवेल व बाप्तिस्मा देणारा योहान यांना यहोवाने दिलेल्या आज्ञा विचारात घ्या. याआधी सांगितल्यानुसार, शमशोनाला आपल्या डोक्याला वस्तरा न लावण्याची आज्ञा देण्यात आली होती. हान्‍नाने तर शमुवेल या तिच्या मुलाचा गर्भ तिच्या पोटात राहण्याआधीच देवाला असा नवस केला: “तो आयुष्यभर परमेश्‍वराचा व्हावा एतदर्थ मी त्यास समर्पण करीन त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरविणार नाही.” (१ शमुवेल १:११) बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाच्या बाबतीत, यहोवाच्या दूताने असे म्हटले: “तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही.” (लूक १:१५) शिवाय, “योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.” (मत्तय ३:४) या तिन्ही व्यक्‍तींपैकी कोणालाही प्रेताला स्पर्श न करण्याविषयीची आज्ञा देण्यात आली नाही.

शमशोन हा नाजीर तर होताच, पण इस्राएलांना लुटणाऱ्‍यांच्या हातून सोडवण्याकरता यहोवाने ज्या शास्त्यांना उभे केले होते त्यांच्यापैकीही तो एक होता. (शास्ते २:१६) देवाने नेमलेले हे कार्य पार पाडताना त्याला मृतदेहांना स्पर्श करावा लागे. एकदा शमशोनाने ३० पलिष्ट्यांचा वध करून त्यांचे पोषाख काढून त्यांस लुटले. कालांतराने, त्याने शत्रूंची “मोठी कत्तल उडवून जांघांवर पायांचे ढीग रचले.” तसेच त्याने गाढवाचा एक नवा जबडा घेऊन एक हजार माणसांना ठार केले. (शास्ते १४:१९; १५:८, NW; १५) हे सर्व शमशोनाने यहोवाच्या संमतीने व साहाय्यानेच केले. बायबलमध्ये त्याची अनुकरणीय विश्‍वासू पुरुषांमध्ये गणती केली आहे.—इब्री लोकांस ११:३२; १२:१.

शमशोनाने “करडू फाडावे तसे” एका सिंहाला फाडून टाकले असे म्हटले आहे; त्याअर्थी, बकऱ्‍यांच्या पिलांना फाडण्याची त्याकाळी सर्वसामान्य प्रथा होती असे समजावे का?

इस्राएलातील शास्त्यांच्या काळात बकऱ्‍यांच्या पिलांना फाडण्याची प्रथा होती असे म्हणण्याकरता कोणताही पुरावा सापडत नाही. शास्ते १४:६ यात असे म्हटले आहे: “परमेश्‍वराच्या आत्म्याने एकाएकी [शमशोनावर] झडप घातली, आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले.” या विधानात हे रूपक म्हणून वापरले असावे.

“फाडून टाकले” याचे दोन अर्थ असू शकतात. शमशोनाने एकतर सिंहाचा जबडा फाडला असावा किंवा पायांना एकमेकांपासून वेगळे करून सिंहाला फाडले असावे. जर जबडा फाडला असा अर्थ असेल, तर बकरीच्या पिलाच्या बाबतीच हेच करणे मनुष्याला अशक्य नाही. यावरून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, की शमशोनाने निव्वळ आपल्या हातांनी सिंहाला इतक्या सहजपणे मारले जणू काय ते एखाद्या बकरीचे पिलू होते. पण जर शमशोनाने सिंहाचे पाय एकमेकांपासून वेगळे करून त्याला फाडले असा अर्थ असेल तर? मग तर निश्‍चितच हे केवळ एक रूपक म्हणून समजले जाऊ शकते. आणि या रूपकावरून हेच सांगायचा प्रयत्न केला असेल की यहोवाच्या आत्म्याने शमशोनाला असे एक कार्य करण्याचे सामर्थ दिले की ज्यासाठी असामान्य शारीरिक बळाची आवश्‍यकता होती. दोन्ही प्रकारे पाहिल्यास, शास्ते १४:६ यातील तुलनेवरून हेच दिसून येते, यहोवाच्या मदतीने शमशोनाला एका शक्‍तिशाली सिंहाला मारणे तितकेच सोपे वाटले जितके एखाद्या सर्वसाधारण व्यक्‍तीला बकरीचे पिलू मारणे वाटावे.

[तळटीप]

^ परि. 3 नाजीरपणाचा नवस किती दिवसांकरता करायचा हे नवस करणाऱ्‍या व्यक्‍तीवर अवलंबून होते. पण यहुदी परंपरेनुसार मात्र कमीतकमी ३० दिवसांकरता हा नवस करावा लागत. यापेक्षा कमी दिवसांचा नवस केल्यास त्याला फारसे महत्त्व नाही असे समजले जात.