व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“एकमेकांचा पाहुणचार करा”

“एकमेकांचा पाहुणचार करा”

“एकमेकांचा पाहुणचार करा”

पहिल्या शतकात, फीबी नावाच्या एका ख्रिस्ती भगिनीसमोर एक समस्या होती. ती ग्रीसमधील किंख्रियाहून रोमला जात होती, पण त्या शहरातील सहविश्‍वासू बांधवांपैकी ती कोणालाही ओळखत नव्हती. (रोमकर १६:१, २) बायबल भाषांतरकार एड्‌गर गुडस्पीड म्हणतात, “त्याकाळी रोमचे सामाजिक वातावरण अतिशय दुष्ट व धोक्याचे होते. वाटेतील पथिकाश्रमे कोणत्याही चांगल्या घराण्याच्या स्त्रीने आणि विशेषतः एका ख्रिस्ती स्त्रीने राहण्याकरता योग्य नव्हती.” मग, कोठे मुक्काम करावा असा फीबीसमोर प्रश्‍न होता.

बायबल काळांत लोक बराच प्रवास करायचे. येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य सबंध यहुदिया व गालीलात सुवार्तेचा प्रचार करण्याकरता ठिकठिकाणी जात. त्यानंतर, पौलासारखे ख्रिस्ती मिशनरी भूमध्य सागराच्या आसपासच्या प्रदेशांत सुवार्तेचा प्रचार करण्याकरता जाऊ लागले; यात रोमन साम्राज्याची राजधानी रोम देखील समाविष्ट होती. पहिल्या शतकातील ख्रिस्ती, यहुदी क्षेत्रात किंवा इतरत्र प्रवास करायचे तेव्हा ते कोठे मुक्काम करत? मुक्कामाचे ठिकाण शोधताना त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागत? आतिथ्य करण्याबाबत त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो?

“आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे”

पाहुणचार या शब्दाची व्याख्या, “पाहुण्यांचे उदारतेने व प्रेमाने स्वागत करणे” अशी करण्यात आली असून, पाहुणचार करणे हे पुरातन काळापासून यहोवाच्या खऱ्‍या उपासकांचे एक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, अब्राहाम, लोट व रिबका यांनी पाहुणचार केला. (उत्पत्ति १८:१-८; १९:१-३; २४:१७-२०) अनोळखी व्यक्‍तींबद्दल आपल्या मनोवृत्तीविषयी सांगताना कुलपिता ईयोब याने म्हटले: “कोणा परदेशस्थास माझ्या दाराबाहेर बिऱ्‍हाड करून राहण्याची पाळी आली नाही; वाटसरास माझे दार खुले असे.”—ईयोब ३१:३२.

त्याकाळी एखाद्या नव्या शहरात आल्यावर परदेशी व्यक्‍ती सहसा शहराच्या चौकात बसून एखाद्याच्या निमंत्रणाची वाट पाही; कोणी न कोणी सहइस्राएली बंधू हमखास या व्यक्‍तीला आपल्या घरी घेऊन जात असे. (शास्ते १९:१५-२१) यजमान सहसा आपल्या पाहुण्यांचे पाय धूत, त्यांना खायला, प्यायला देत, तसेच त्यांच्या जनावरांसाठी चारा देखील पुरवत. (उत्पत्ति १८:४, ५; १९:२; २४:३२, ३३) ज्या प्रवाशांना आपल्या यजमानांवर ओझे बनण्याची इच्छा नसे, ते आपल्याला लागणाऱ्‍या वस्तू, भाकरी व द्राक्षारस आणि आपल्या गाढवांसाठी चारा सोबत नेत. त्यांना केवळ रात्र काढण्यासाठी सुरक्षित ठिकाणाची गरज असे.

येशू आपल्या प्रचार दौऱ्‍यांत मुक्कामाची व्यवस्था कशी काय करायचा याविषयी बायबलमध्ये फारशी सविस्तर माहिती दिलेली नाही; पण साहजिकच त्याला व त्याच्या शिष्यांना कोठे न कोठे झोपावे लागतच असेल. (लूक ९:५८) यरीहो शहरात गेल्यावर, येशूने जक्कय याला सरळ सांगितले: “आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे.” जक्कयने आपल्या पाहुण्याचे “आनंदाने” स्वागत केले. (लूक १९:५, ६) बेथानी येथे राहणाऱ्‍या मार्था, मरीया व लाजार यांच्याशी येशूची मैत्री होती व तो सहसा त्यांच्याकडे मुक्काम करी. (लूक १०:३८; योहान ११:१, ५, १८) कफर्णहूम येथे तो कदाचित शिमोन पेत्राकडे राहात असावा असे दिसते.—मार्क १:२१, २९-३५.

आपल्या १२ प्रेषितांना येशूने सेवाकार्याविषयी ज्या सूचना दिल्या होत्या त्यांवरून इस्राएलमध्ये ते लोकांकडून कशाप्रकारे स्वागत केले जाण्याची अपेक्षा करू शकत होते हे आपण समजू शकतो. येशूने त्यांना सांगितले: “सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका; वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्‍याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा.” (मत्तय १०:९-११) येशूला माहीत होते की चांगल्या मनोवृत्तीचे लोक आपल्या शिष्यांचे स्वागत करतील व त्यांना जेवण, आश्रय व इतर गरजेच्या वस्तू पुरवतील.

पण अशी वेळ येणार होती की जेव्हा प्रवासी सुवार्तिकांना आपल्या गरजा स्वखर्चाने भागवाव्या लागणार होत्या. आपल्या शिष्यांचा भविष्यात द्वेष केला जाईल, तसेच प्रचार कार्याचा इस्राएलाच्या बाहेरच्या क्षेत्रांतही प्रसार होईल हे माहीत असल्यामुळेच येशूने म्हटले: “ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी; तसेच झोळीहि [शिदोरी] घ्यावी.” (लूक २२:३६) प्रवास व मुक्काम हे सुवार्तेच्या प्रसारातील अविभाज्य अंग होते.

“आतिथ्य करण्यात तत्पर असा”

पहिल्या शतकात फारशी युद्धे होत नसल्यामुळे व सबंध रोमी साम्राज्यातील ठिकाणांना एकमेकांशी जोडणारे पक्के रस्ते बांधण्यात आल्यामुळे लोक वरचेवर प्रवास करत. * प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच मुक्कामाच्या ठिकाणांची मागणीही खूप वाढली. ही मागणी पूर्ण करण्याकरता प्रमुख महामार्गांवर एकेका दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावर पथिकाश्रमे बांधण्यात आली. पण द बुक ऑफ ॲक्ट्‌स इन इट्‌स ग्रेको-रोमन सेटिंग या पुस्तकात असे म्हटले आहे: “निरनिराळ्या ग्रंथांतून या धर्मशाळांबद्दल जे वाचायला मिळते ते अतिशय निराशाजनक आहे. उपलब्ध असलेल्या लिखाणांवरून व पुरातत्त्वीय सूत्रांकडून हेच कळून येते की ही पथिकाश्रमे सहसा पडकी, अस्वच्छ असत; त्यात सामानसुमान काहीच नसे, ढेकणं मात्र भरपूर होती; जेवणाचा दर्जा अगदीच सुमार असे; मालक व कर्मचारी भरवशालायक नव्हते; येथे येणारे लोकही चांगल्या चालीचे लोक नसून सहसा अनैतिक कामे करणारे असत.” साहजिकच सरळमार्गी लोक शक्यतो या पथिकाश्रमांत राहण्याचे टाळत.

तेव्हा, ख्रिश्‍चनांनी एकमेकांचा पाहुणचार करावा असे शास्त्रवचनांत वारंवार का सांगण्यात आले होते हे आपण समजू शकतो. पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना आग्रहपूर्वक सांगितले: “पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.” (रोमकर १२:१३) त्याने यहुदी ख्रिश्‍चनांना आठवण करून दिली: “अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.” (इब्री लोकांस १३:२) पेत्रानेही आपल्या सहउपासकांना “कुरकुर न करितां एकमेकांचा पाहुणचार करा” असा सल्ला दिला.—१ पेत्र ४:९.

पण विशिष्ट परिस्थितीत पाहुणचार दाखवणे योग्य नव्हते. प्रेषित योहानाने म्हटले: “ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला . . . घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारु नका; कारण जो त्याचे स्वागत करितो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.” (२ योहान ९-११) अपश्‍चात्तापी पापी व्यक्‍तींबद्दल पौलाने लिहिले: “बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्‍तीसहि बसू नये.”—१ करिंथकर ५:११.

फसवणूक करणाऱ्‍यांनी व इतर व्यक्‍तींनी कदाचित खऱ्‍या ख्रिस्ती लोकांच्या सुस्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. सा.यु. दुसऱ्‍या शतकात ख्रिस्ती धर्माविषयी असलेल्या द दीदाही, किंवा बारा प्रेषितांची शिकवण या बायबलेतर लिखाणात असे सुचवण्यात आले आहे की प्रवासी प्रचारकाला “एक दिवस, किंवा गरज पडल्यास आणखी एक दिवसही” आपल्या घरात मुक्काम करू द्यावा. तो जायला निघाल्यावर “त्याने शिदोरीव्यतिरिक्‍त [यजमानाकडून] आणखी काहीही घेऊ नये. . . . जर त्याने पैसे मागितले तर याचा अर्थ तो खोटा संदेष्टा आहे.” याच लिखाणात पुढे म्हटले आहे: “जर त्याला तुमच्या घरातच राहण्याची इच्छा असेल, आणि जर त्याला एखादे कौशल्य अवगत असेल तर त्याने काम करून आपले पोट भरावे. पण जर त्याला कोणतेच कौशल्य अवगत नसेल तर त्याची कशी काळजी घ्यायची हे तुम्ही ठरवावे; कोणत्याही मनुष्याने तुमच्या घरात बसून आयते खाऊ नये कारण तो ख्रिस्ती आहे. पण जर तो याला तयार होत नसेल तर तो ख्रिस्ताचा गैरफायदा घेत आहे; अशा माणसापासून सांभाळून राहावे.”

काही शहरांत जेव्हा प्रेषित पौलाला बराच काळ मुक्काम करावा लागे, तेव्हा आपण आपल्या यजमानांवर ओझे बनणार नाही याची तो काळजी घेत असे. आपले पोट भरण्याकरता तो तंबू बनवण्याचे काम करी. (प्रेषितांची कृत्ये १८:१-३; २ थेस्सलनीकाकर ३:७-१२) प्रवाशी व्यक्‍ती पाहुणचारास योग्य आहे हे समजण्यासाठी त्या व्यक्‍तीची ओळख करून देणारे पत्र लिहिण्याची सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांमध्ये प्रथा होती असे दिसते. असेच पत्र लिहून पौलाने फीबी हिची ओळख करून दिली होती. पौलाने लिहिले: “आमची बहीण फीबी हिची मी तुम्हाला शिफारस करितो; अशासाठी की, तुम्ही . . . तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा. आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला साहाय्य करावे.”—रोमकर १६:१, २.

पाहुणचार दाखवल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मिशनऱ्‍यांना भरवसा होता की यहोवा त्यांच्या सर्व गरजा भागवील. पण सहविश्‍वासू बांधवांकडून पाहुणचार केला जाण्याची ते अपेक्षा करू शकत होते का? लुदिया हिने पौलाचे व इतर बांधवांचे आपल्या घरात स्वागत केले. करिंथ शहरात अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांच्याही घरी प्रेषित पौल राहिला. फिलिप्पै येथील एका बंदिशाळेच्या नायकाने पौल व सीला यांना जेवू घातले. थेस्सलनीकात यासोनाने, कैसरियात फिलिप्पाने व कैसरिया ते जेरूसलेमच्या मार्गावर म्नासोन याने पौलाचे आदरातिथ्य केले. रोमच्या वाटेवर असताना पुत्युला येथे बांधवांनी पौलाचा पाहुणचार केला. प्रेषित पौलाचे स्वागत व आदरातिथ्य करणाऱ्‍या या सर्वांकरता ते प्रसंग आध्यात्मिकरित्या किती उभारणीकारक ठरले असतील, नाही का?—प्रेषितांची कृत्ये १६:३३, ३४; १७:७; १८:१-३; २१:८, १६; २८:१३, १४.

फ्रेडरिक एफ. ब्रूस हे विद्वान म्हणतात: “या स्नेह्‍यांचे व सहकाऱ्‍यांचे, यजमानांचे व यजमानीणिंचे पौलावर व ज्याची तो सेवा करत होता त्या प्रभूवर प्रेम होते म्हणूनच त्यांनी त्याला मदत केली; यापरत्वे त्यांचा इतर कोणताही हेतू नव्हता. त्यांना माहीत होते की पौलाची सेवा करणे हे ख्रिस्ताची सेवा करण्यासारखे होते.” आदरातिथ्य करण्यामागचा हा एक उत्तम हेतू आहे.

पाहुणचार करण्याची गरज आजच्या काळातही आहे. यहोवाच्या साक्षीदारांमधील हजारो प्रवासी सेवकांचा सहविश्‍वासू बांधवांकडून पाहुणचार केला जातो. काही राज्य प्रचारक स्वखर्चाने अशा ठिकाणी प्रचार करण्याकरता जातात की जेथे पूर्वी कधीही सुवार्तेची घोषणा झालेली नाही. आपले घर लहानसे व साधेसुधेच का असेना, पण आपण अशा राज्य प्रचारकांचे स्वागत केल्यास आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. साध्याशा जेवणाकरता बोलावून जरी आपण प्रेमळ पाहुणचार केला, तरी ‘परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने उत्तेजन’ मिळण्याकरता व आपल्या बांधवांबद्दल व देवाबद्दल आपले प्रेम व्यक्‍त करण्याकरता एक उत्तम संधी आपल्याला मिळते. (रोमकर १:११, १२) हे प्रसंग खासकरून पाहुणचार करणाऱ्‍यांकरता समाधानदायक ठरतात कारण “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

[तळटीप]

^ परि. 11 सा.यु. १०० सालापर्यंत रोमी साम्राज्यात अंदाजे ८०,००० किलोमीटरचे पक्के रस्ते बांधण्यात आले होते.

[२३ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती “आतिथ्य करण्यात तत्पर” असतात