व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्याविषयीचे पूर्वसंकेत वास्तवात उतरतात

देवाच्या राज्याविषयीचे पूर्वसंकेत वास्तवात उतरतात

देवाच्या राज्याविषयीचे पूर्वसंकेत वास्तवात उतरतात

“काळोख्या जागी प्रकाशणाऱ्‍या दिव्याप्रमाणे तुम्ही [भविष्यसूचक वचनाकडे] लक्ष द्याल तर बरे होईल.”—२ पेत्र १:१९.

१. आजच्या जगात कोणती विरोधात्मक परिस्थिती आढळते?

आजच्या जगात प्रत्येक दिवस एक नवे संकट घेऊनच उजाडतो. नैसर्गिक विपत्तींपासून जागतिक दहशतवादापर्यंत मनुष्यासमोर असलेल्या सर्व समस्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. जगातील धर्मांनीही कोणत्याच प्रकारचे साहाय्य पुरवलेले नाही. उलट मतभेद, द्वेष व राष्ट्रवाद यांद्वारे लोकांमध्ये फुटी पाडून बरेचदा ते आगीत तेल ओतण्याचे काम करतात. होय, पूर्वभाकीत करण्यात आल्याप्रमाणे, “निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे.” (यशया ६०:२) पण दुसरीकडे पाहता, लाखो लोक भविष्याकडे पूर्ण आत्मविश्‍वासाने पाहात आहेत. का? कारण “काळोख्या जागी प्रकाशणाऱ्‍या दिव्याप्रमाणे” ते देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देतात. देवाचे “वचन” किंवा संदेश जो आज बायबलमध्ये सापडतो, त्याचे मार्गदर्शन ते स्वीकारतात.—२ पेत्र १:१९.

२. ‘अंतसमयाविषयी’ दानीएलाच्या भविष्यवाणीनुसार आध्यात्मिक गोष्टींचे आकलन केवळ कोणाला होऊ शकते?

‘अंतसमयाविषयी’ संदेष्टा दानीएल याने लिहिले: “पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धि होईल. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करितील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करितील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांस तो प्राप्त होईल.” (दानीएल १२:४, १०) आध्यात्मिक गोष्टींचे आकलन केवळ अशा लोकांनाच होऊ शकते की जे प्रामाणिकपणे ‘धुंडाळीत फिरतात’, अर्थात देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून त्याच्या दर्जांनुसार आचरण करतात आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात.—मत्तय १३:११-१५; १ योहान ५:२०.

३. सुरुवातीच्या बायबल विद्यार्थ्यांना १८७० च्या दशकादरम्यान कोणत्या महत्त्वपूर्ण सत्याचे आकलन झाले?

‘शेवटला काळ’ सुरू होण्याआधीच म्हणजे १८७० च्या दशकातच यहोवा देवाने ‘स्वर्गाच्या राज्याच्या रहस्यांवर’ अधिक प्रकाश टाकण्यास सुरुवात केली. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय १३:११) त्या काळी बहुतेक लोकांचे वेगळे मत असले तरीसुद्धा बायबल विद्यार्थ्यांच्या एका गटाला हे ओळखता आले की ख्रिस्ताचे परतणे हे अदृश्‍य स्वरूपात असणार होते. स्वर्गात सिंहासनावर बसल्यावर येशू एक राजा या नात्याने पृथ्वीकडे आपले लक्ष केंद्रित करेल आणि या अर्थाने तो परतेल. त्याची अदृश्‍य उपस्थिती सुरू झाली आहे याविषयी त्याच्या शिष्यांना संकेत देण्याकरता एक दृश्‍य, बहुव्यापक चिन्ह त्यांना दिले जाईल.—मत्तय २४:३-१४.

पूर्वसंकेत दिलेली गोष्ट वस्तूस्थिती बनली

४. आधुनिक काळातील आपल्या सेवकांच्या विश्‍वासाला यहोवाने कशाप्रकारे पुष्टी दिली आहे?

रूपांतरणाचा दृष्टान्त हा ख्रिस्ताच्या शाही वैभवाचा एक तेजस्वी पूर्वसंकेत होता. (मत्तय १७:१-९) बऱ्‍याच लोकांनी, त्यांच्या गैरशास्त्रवचनीय अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे निराश होऊन येशूचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते अशा एका काळात या दृष्टान्ताने पेत्र, याकोब व योहान यांच्या विश्‍वासाला पुष्टी दिली. त्याच प्रकारे, या अंतसमयात यहोवाने त्या अद्‌भूत दृष्टान्तावर व अनेक संबंधित भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवर अधिक प्रकाश टाकून आधुनिक काळातील आपल्या सेवकांच्या विश्‍वासाला पुष्टी दिली आहे. अशाच काही विश्‍वासास मजबूत करणाऱ्‍या आध्यात्मिक वस्तुस्थितींना आता आपण विचारात घेऊ या.

५. पहाटचा तारा कोण होता आणि तो केव्हा व कसा ‘उगवला?’

रूपांतरणाच्या संदर्भात प्रेषित पेत्राने लिहिले: “अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हांजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणांत दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.” (२ पेत्र १:१९) तो लाक्षणिक पहाटचा तारा किंवा “पहाटचा तेजस्वी तारा” म्हणजे गौरव प्राप्त झालेला येशू ख्रिस्त. (प्रकटीकरण २२:१६) देवाचे राज्य स्वर्गात जन्मास आले तेव्हा, अर्थात १९१४ साली हा पहाटचा तारा ‘उगवला.’ ही घटना एका नव्या युगाची पहाट होती. (प्रकटीकरण ११:१५) रूपांतरणाच्या दृष्टान्तात मोशे व एलीया शिष्यांना येशूच्या शेजारी उभे असलेले, त्याच्याशी बोलताना दिसले. ते कोणाकडे पूर्वसंकेत करतात?

६, ७. रूपांतरणात मोशे व एलीया हे कोणाचे प्रतिनिधीत्व करतात आणि त्या गटाविषयी शास्त्रवचनांत कोणती महत्त्वाची माहिती प्रकट करण्यात आली आहे?

मोशे व एलीया ख्रिस्ताच्या गौरवात सहभागी झाले, त्याअर्थी हे दोघे विश्‍वासू साक्षीदार येशूबरोबर त्याच्या राज्यात राज्य करणाऱ्‍यांचे प्रतिनिधीत्व करतात. येशूसोबत सहशासक राज्य करतात ही शिकवण, संदेष्टा दानीएल याला दृष्टान्तात सिंहासनारूढ मशीहाची जी पूर्वझलक देण्यात आली होती त्याच्याशी सुसंगत आहे. दानीएलाला “मानवपुत्रासारखा कोणी” दिसला, ज्याला ‘पुराणपुरुष’ यहोवा देव याच्याकडून ‘अक्षय प्रभुत्व’ दिले जाते. पण यानंतर लगेच दानीएलाला दृष्टान्तात काय दाखवले जाते ते पाहा. दानीएल लिहितो, “राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन यांस देण्यात, येतील.” (दानीएल ७:१३, १४, २७) होय, रूपांतरणाच्या पाच शतकांपेक्षाही अधिक काळाआधी देवाने प्रकट केले की काही “पवित्रजन” ख्रिस्ताच्या शाही वैभवात सहभागी होतील.

दानीएलाच्या दृष्टान्तातील पवित्र जन कोण आहेत? याच व्यक्‍तींच्या संदर्भात प्रेषित पौल लिहितो: “तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसहि आहो; म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच.” (रोमकर ८:१६, १७) पवित्र जन हे आत्म्याने अभिषिक्‍त असलेले येशूचे शिष्यच आहेत. प्रकटीकरणात येशू म्हणतो: “मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.” ‘विजय मिळवणाऱ्‍या’ या पुनरुत्थित जनांची संख्या १,४४,००० असून, ते येशूसोबत सबंध पृथ्वीवर राज्य करतील.—प्रकटीकरण ३:२१; ५:९, १०; १४:१, ३, ४; १ करिंथकर १५:५३.

८. येशूच्या अभिषिक्‍त शिष्यांनी कशाप्रकारे मोशे व एलीया यांच्यासारखे कार्य केले आहे व याचा काय परिणाम झाला आहे?

पण मोशे व एलीया अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे प्रतिनिधीत्व करतात असे का म्हटले जाऊ शकते? यामागचे कारण असे आहे की मोशे व एलीयाने ज्याप्रकारचे कार्य केले होते, त्याचप्रकारचे कार्य हे ख्रिस्ती पृथ्वीवर असताना करतात. उदाहरणार्थ, छळ झाला तरीसुद्धा ते यहोवाचे साक्षीदार या नात्याने सेवा करतात. (यशया ४३:१०; प्रेषितांची कृत्ये ८:१-८; प्रकटीकरण ११:२-१२) मोशे व एलीया यांच्याप्रमाणे ते खोट्या धर्माचा निर्भयपणे पर्दाफाश करतात व प्रांजळ मनाच्या लोकांना देवाची अनन्य भक्‍ती करण्याचे प्रोत्साहन देतात. (निर्गम ३२:१९, २०; अनुवाद ४:२२-२४; १ राजे १८:१८-४०) त्यांचे कार्य सफल ठरले आहे का? निश्‍चितच ठरले आहे! अभिषिक्‍त जनांच्या एकूण संख्येतील सर्व सदस्यांना एकत्र करण्याव्यतिरिक्‍त त्यांनी ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ लाखो व्यक्‍तींना येशू ख्रिस्ताला मनापासून अधीनता दाखवण्यास मदत केली आहे.—योहान १०:१६; प्रकटीकरण ७:४.

ख्रिस्त विजयावर विजय मिळवतो

९. प्रकटीकरण ६:२ यात येशूला आज कोणत्या भूमिकेत चित्रित केले आहे?

येशू हा आता शिंगरावर बसलेला साधा मनुष्य नसून एक सामर्थ्यशाली राजा आहे. बायबलमध्ये त्याला लढाईचे प्रतीक असलेल्या घोड्यावर बसलेला असे चित्रित केले आहे. (नीतिसूत्रे २१:३१) प्रकटीकरण ६:२ म्हणते: “एक पांढरा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुगूट देण्यात आला; तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला.” शिवाय, येशूच्या संदर्भात स्तोत्रकर्ता दावीद याने लिहिले: “परमेश्‍वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”—स्तोत्र ११०:२.

१०. (क) येशूच्या विजयशाली घोडदौडीची वैभवी सुरुवात केव्हा झाली? (ख) ख्रिस्ताच्या पहिल्या विजयामुळे सर्वसामान्य जगावर कोणता परिणाम झाला?

१० येशूने सर्वप्रथम आपले सर्वात शक्‍तिशाली शत्रू, अर्थात, सैतान व त्याचे दुरात्मे यांच्यावर विजय मिळवला. त्याने त्यांना स्वर्गातून बाहेर काढले व खाली पृथ्वीवर फेकले. आपला काळ थोडा राहिला आहे हे ओळखून या दुष्टात्म्यांनी मानवजातीवर आपला संतप्त क्रोध व्यक्‍त केल्यामुळे, अर्थातच पृथ्वीवर अनर्थ माजला आहे. या अनर्थाचे चित्रण प्रकटीकरणात आणखी तीन घोडेस्वारांच्या स्वारीने केले आहे. (प्रकटीकरण ६:३-८; १२:७-१२) “आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह” देताना येशूने केलेल्या भविष्यवाणीनुसार, या तीन घोडेस्वारांच्या स्वारीमुळे युद्धे, दुष्काळ व घातक रोगराई पसरली आहे. (मत्तय २४:३, ७; लूक २१:७-११) स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी होणाऱ्‍या वेदना जशा वाढत जातात त्याचप्रमाणे या ‘वेदना’ देखील सैतानाच्या दृश्‍य संस्थेचे सर्व नामोनिशाण ख्रिस्त जोपर्यंत नष्ट करत नाही तोपर्यंत वाढतच जातील. *मत्तय २४:८.

११. ख्रिस्ती मंडळीचा इतिहास ख्रिस्ताच्या राज्याधिकाराचा पुरावा कशाप्रकारे पुरवतो?

११ येशूच्या राज्य शासनाचा आणखी एक पुरावा म्हणजे ख्रिस्ती मंडळीला जागतिक राज्य प्रचाराचे त्यांच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करता यावे म्हणून त्याने तिचे रक्षण केले आहे. मोठ्या बाबेलकडून अर्थात, खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याकडून व दुराग्रही सरकारांकडून क्रूरपणे छळ होत असूनही प्रचार कार्य अखंड चालू राहिले आहे; किंबहुना, जगाच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर ते केले जात आहे. (प्रकटीकरण १७:५, ६) ख्रिस्ताच्या राज्यशासनाचा किती जोरदार पुरावा!—स्तोत्र ११०:३.

१२. बहुतेक लोकांना ख्रिस्ताच्या अदृश्‍य उपस्थितीचे आकलन का होत नाही?

१२ पण दुःखाची गोष्ट म्हणजे पृथ्वीवर घडत असलेल्या या अर्थसूचक घटनांमागच्या अदृश्‍य वस्तूस्थितींचा अर्थ बहुतेक लोक, ज्यांत तथाकथित ख्रिस्ती लोकांचाही समावेश आहे, समजून घेत नाहीत. उलट देवाच्या राज्याची जे घोषणा करत आहेत त्यांची ते थट्टा करतात. (२ पेत्र ३:३, ४) का? कारण सैतानाने त्यांची मने अंधळी केली आहेत. (२ करिंथकर ४:३, ४) त्याने तर कित्येक शतकांआधीपासूनच तथाकथित ख्रिश्‍चनांच्या डोळ्यांवर आध्यात्मिक अंधकाराचा पडदा टाकण्यास सुरुवात केली होती; एक वेळ अशीही आली जेव्हा त्याने त्यांना राज्याच्या अनमोल आशेचा त्याग करण्यास प्रवृत्त केले.

राज्याच्या आशेचा त्याग करण्यात येतो

१३. नाममात्र ख्रिश्‍चनांच्या डोळ्यांवर आध्यात्मिक अंधकाराचा पडदा पडल्यामुळे काय घडले?

१३ येशूने भाकीत केले होते की गव्हाच्या शेतात पेरलेल्या निदणाप्रमाणे धर्मत्यागी लोक ख्रिस्ती मंडळीत शिरून बऱ्‍याच लोकांना बहकवतील. (मत्तय १३:२४-३०, ३६-४३; प्रेषितांची कृत्ये २०:२९-३१; यहुदा ४) कालांतराने, या तथाकथित ख्रिश्‍चनांनी मूर्तिपूजक धर्मांचे सण, चालीरिती व शिकवणुकी आत्मसात केल्या व त्यांना “ख्रिस्ती” असे नाव देखील दिले. उदाहरणार्थ, नाताळ या सणाचा उगम मीथ्रा व शनी, या मूर्तिपूजक धर्मांतील देवतांच्या उपासनेशी संबंधित असलेल्या रूढीपरंपरांमधून झाला. पण हे गैर-ख्रिस्ती सण स्वीकारण्यास तथाकथित ख्रिस्ती कशामुळे प्रवृत्त झाले? द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका (१९७४) यात म्हटले आहे: “ख्रिस्ताच्या परतण्याची आशा हळूहळू मंदावल्यामुळे, नाताळ अर्थात, येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सण साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली.”

१४. ओरिजेन व ऑगस्टीन यांच्या शिकवणुकींनी राज्याच्या सत्याचा कशाप्रकारे विपर्यास केला?

१४ “राज्य” या शब्दाचा अर्थही कशाप्रकारे बदलून टाकण्यात आला याकडे लक्ष द्या. किंगडम ऑफ गॉड इन ट्‌वेन्टिएथ सेंच्यूरी इंटरप्रिटेशन या ग्रंथानुसार: “ओरिजेनच्या [तिसऱ्‍या शतकातील तत्त्ववेत्ता] काळापासूनच ख्रिस्ती धर्मात ‘राज्य’ या संज्ञेचा अर्थ बदलण्यात आला आणि राज्य म्हणजे व्यक्‍तीच्या अंतःकरणावर देव राज्य करतो असा अर्थ असल्याचे तेव्हापासून सांगितले जाऊ लागले.” ओरिजेनची ही शिकवणूक कशावर आधारित होती? शास्त्रवचनांवर नाही, तर “येशूच्या व सुरुवातीच्या चर्चच्या विचारसरणीपासून अगदी वेगळ्या असलेल्या तत्त्वज्ञानावर व जगिक दृष्टिकोनावर ती आधारित होती.” दे कीविताते देई (देवाचे नगर) या ग्रंथात, ऑगस्टीन ऑफ हिप्पो (सा.यु. ३५४-४३०) याने म्हटले की चर्च हेच देवाचे राज्य आहे. शास्त्रवचनांवर आधारित नसलेल्या अशाप्रकारच्या विचारसरणीमुळे, ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसना राजकीय सत्ता हाती घेण्याकरता तत्त्ववेत्त्यांच्या शिकवणुकींच्या आधारावर मुभा मिळाली. त्यांनी अनेक शतके, कधीकधी अतिशय क्रूरतेने ही सत्ता चालवली.—प्रकटीकरण १७:५, १८.

१५. ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसच्या संबंधाने गलतीकर ६:७ कशाप्रकारे पूर्ण झाले आहे?

१५ पण, चर्चेसनी ज्याची पेरणी केली त्याचे फळ आज त्यांना मिळत आहे. (गलतीकर ६:७) त्यांची सत्ता डळमळू लागली आहे आणि त्यांच्या सदस्यांची संख्या देखील कमी होऊ लागली आहे. युरोपमध्ये तर हे अगदी स्पष्टपणे पाहायला मिळते. ख्रिस्टिॲनिटी टुडे या नियतकालिकानुसार “युरोपातील मोठमोठे कॅथेड्रल (देवळे) आता उपासनामंदिर म्हणून नव्हेत तर वस्तूसंग्रहालये म्हणून वापरली जातात आणि त्यांत केवळ पर्यटक येतात.” हेच जगाच्या इतर भागातही घडताना दिसते. यावरून खोट्या धर्माच्या भवितव्याविषयी काय दिसून येते? पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे तो नामशेष होईल का? आणि खऱ्‍या उपासनेवर याचा कसा परिणाम होईल?

देवाच्या महान दिवसाकरता तयार असा

१६. मोठ्या बाबेलबद्दल वाढत असलेले प्रतिकूल मत लक्षवेधक का आहे?

१६ पूर्वी सुप्तावस्थेत असलेल्या ज्वालामुखीतून धूर व राख निघू लागते तेव्हा ज्वालामुखीचा लवकरच उद्रेक होणार असे म्हणता येते; त्याचप्रकारे जगाच्या बऱ्‍याच भागात धर्माप्रती बळावत चाललेले प्रतिकूल मत, या गोष्टीचा संकेत आहे की खोट्या धर्माचा काळ थोडा उरला आहे. लवकरच यहोवा जगातील राजकीय शक्‍तींना एकत्र येऊन आध्यात्मिक कलावंतीण, मोठी बाबेल हिचा पर्दाफाश करून तिला नष्ट करण्यास प्रवृत्त करेल. (प्रकटीकरण १७:१५-१७; १८:२१) या घटनेची व यानंतर ‘मोठ्या संकटाशी’ संबंधित इतर घटनांची खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी भीती बाळगावी का? (मत्तय २४:२१) मुळीच नाही! उलट देव दुष्टांविरुद्ध कारवाई करेल तेव्हा त्यांच्याकडे आनंदी होण्याची कारणे असतील. (प्रकटीकरण १८:२०; १९:१, २) पहिल्या शतकातील जेरूसलेमचे व तेथे राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांचे उदाहरण विचारात घ्या.

१७. यहोवाचे विश्‍वासू सेवक या व्यवस्थीकरणाच्या अंताला आत्मविश्‍वासाने तोंड का देऊ शकतात?

१७ सा.यु. ६६ साली रोमी सैन्यांनी जेरूसलेमला वेढले तेव्हा आध्यात्मिकरित्या जागरूक असलेल्या ख्रिश्‍चनांना धक्का बसला नाही किंवा ते भयभीत झाले नाहीत. देवाच्या वचनाचा लक्षपूर्वक अभ्यास केल्यामुळे त्यांना कळले की “ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे.” (लूक २१:२०) तसेच देव आपल्याला सुरक्षित स्थानी पळून जाण्याकरता मार्ग मोकळा करेल हे देखील त्यांना माहीत होते. जेव्हा असे घडले तेव्हा त्यांनी पळ काढला. (दानीएल ९:२६; मत्तय २४:१५-१९; लूक २१:२१) त्याचप्रकारे आजदेखील जे देवाला ओळखतात आणि जे त्याच्या पुत्राच्या आज्ञांचे पालन करतात ते या व्यवस्थीकरणाच्या अंताला आत्मविश्‍वासाने तोंड देऊ शकतात. (२ थेस्सलनीकाकर १:६-९) किंबहुना, मोठे संकट अचानक सुरू होईल तेव्हा ‘आपला मुक्‍तिसमय जवळ आला आहे’ हे ओळखून ते आनंदाने ‘सरळ उभे राहतील आणि आपली डोकी वर करतील.’—लूक २१:२८.

१८. गोगने यहोवाच्या सेवकांविरुद्ध केलेल्या शेवटल्या हल्ल्याचा काय परिणाम होईल?

१८ मोठ्या बाबेलच्या नाशानंतर, मागोगचा गोग, म्हणजेच सैतान, यहोवाच्या शांतीप्रिय साक्षीदारांविरुद्ध शेवटला हल्ला करेल. “अभ्राने देश झाकावा तसा” गोग आपल्या सैन्यासोबत येईल आणि देवाच्या लोकांवर आपण सहज विजय मिळवू असा त्यांचा ग्रह असेल. पण त्यांच्या ध्यानीमनीही नसेल असे काहीतरी तेव्हा घडेल! (यहेज्केल ३८:१४-१६, १८-२३) प्रेषित योहान लिहितो: “नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्‍वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. . . . त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते.” हा अजिंक्य “राजांचा राजा” यहोवाच्या एकनिष्ठ उपासकांचा बचाव करून त्यांच्या सर्व शत्रूंचा नाश करेल. (प्रकटीकरण १९:११-२१) रूपांतरणाच्या दृष्टान्ताचा हा किती रोमांचक शेवट असेल!

१९. ख्रिस्ताचा संपूर्ण विजय त्याच्या एकनिष्ठ शिष्यांना कशाप्रकारे प्रभावित करेल आणि आता त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

१९ येशू “त्या दिवशी विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांच्या ठायी आश्‍चर्यपात्र” ठरेल. (२ थेस्सलनीकाकर १:१०) देवाच्या विजयशाली पुत्राविषयी आदरयुक्‍त अचंबा व्यक्‍त करणाऱ्‍या त्या लोकांपैकी एक असण्याची तुमची इच्छा आहे का? मग आपला विश्‍वास सुदृढ राखण्याचा प्रयत्न करत राहा आणि सतत “सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—मत्तय २४:४३, ४४.

सावध राहा!

२०. (क) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाची’ तरतूद केल्याबद्दल आपण देवाला आपली कृतज्ञता कशी दाखवू शकतो? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारावेत?

२० ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ नियमितपणे देवाच्या लोकांना आध्यात्मिकरित्या जागरूक व सावध राहण्याचे प्रोत्साहन देतो. (मत्तय २४:४५, ४६; १ थेस्सलनीकाकर ५:६) या समयोचित सूचनांबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात का? जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे हे ठरवण्याकरता तुम्ही या सल्ल्याचे पालन करता का? स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘देवाचा पुत्र स्वर्गात राज्य करत आहे हे मी पाहू शकतो इतकी माझी आध्यात्मिक दृष्टी स्पष्ट आहे का? मोठी बाबेल व सैतानाच्या सबंध व्यवस्थीकरणाचा नाश करण्याकरता तो अगदी सुसज्ज असलेला मला दिसतो का?’

२१. काहींनी कोणत्या कारणांमुळे आपली आध्यात्मिक दृष्टी मंदावू दिली असेल आणि त्यांनी लवकरात लवकर काय करावे?

२१ यहोवाच्या लोकांसोबत सहवास राखणाऱ्‍यांपैकी काहींनी आपली आध्यात्मिक दृष्टी मंदावू दिली आहे. येशूच्या सुरुवातीच्या काही शिष्यांप्रमाणे त्यांच्यातही सहनशीलतेचा व धीराचा अभाव असावा का? जीवनाच्या चिंता, भौतिकवाद किंवा छळ या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम झाला असावा का? (मत्तय १३:३-८, १८-२३; लूक २१:३४-३६) कदाचित काहींना ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ प्रकाशित केलेली विशिष्ट माहिती समजून घेण्यास जड गेले असेल. तुमच्याबाबतीत यांपैकी काहीही घडले असेल तर आम्ही तुम्हाला आवर्जून असे सांगू इच्छितो की तुम्ही देवाच्या वचनाचा नव्या उत्साहाने अभ्यास करावा, आणि यहोवाकडे याचना करावी जेणेकरून तुम्हाला त्याच्यासोबत सुदृढ व घनिष्ठ नातेसंबंध राखता येईल.—२ पेत्र ३:११-१५.

२२. रूपांतरणाचा दृष्टान्त व त्याच्याशी संबंधित असलेल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास केल्यामुळे तुम्ही कशाप्रकारे प्रभावित झाला आहात?

२२ येशूच्या शिष्यांना प्रोत्साहनाची गरज होती तेव्हा त्यांना रूपांतरणाचा दृष्टान्त देण्यात आला. आज आपला विश्‍वास मजबूत करणारे त्याहीपेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी आपल्याजवळ आहे. अर्थात, ती अद्‌भूत पूर्वझलक व इतर अनेक संबंधित भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण झाल्या आहे. या अद्‌भूत वस्तूस्थितींचा व भविष्यातील त्यांच्या अर्थसूचकतेचा विचार करताना आपणही आपल्या संपूर्ण मनाने प्रेषित योहानाच्या भावना व्यक्‍त करून म्हणावे: “आमेन! ये प्रभू येशू, ये.”—प्रकटीकरण २२:२०.

[तळटीप]

^ परि. 10 मूळ ग्रीक भाषेत ‘वेदना’ असे भाषांतर केलेल्या शब्दाचा अर्थ खरे तर “प्रसूतिवेदना” असा होतो. (मत्तय २४:८, किंगडम इंटरलिनियर) यावरून असे सूचित होते की प्रसूतिवेदनांप्रमाणे जगातील समस्यांची संख्या, जोर, व अवधी वाढत जाईल व याची समाप्ती शेवटी महासंकटात होईल.

तुम्हाला आठवते का?

• बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहानशा गटाला १८७० च्या दशकात ख्रिस्ताच्या परतण्याविषयी काय समजले?

• रूपांतरणाच्या दृष्टान्ताची कशाप्रकारे पूर्णता झाली आहे?

• येशूच्या विजयशाली घोडदौडीचा जगावर व ख्रिस्ती मंडळीवर कोणता प्रभाव पडतो?

• येशू आपली विजयशाली घोडदौड पूर्ण करेल तेव्हा जे जिवंत बचावलेले असतील त्यांच्यापैकी असण्याकरता आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चित्रे]

ज्याची पूर्वझलक दाखवण्यात आली ते वास्तवात उतरले

[१८ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ताने आपली विजयशाली घोडदौड सुरू केली तेव्हा काय घडले हे तुम्हाला माहीत आहे का?