नीतिवचनं १६:१-३३

  • “यहोवा हेतूंचं परीक्षण करतो” ()

  • “आपली सगळी कामं यहोवावर सोपव” ()

  • अचूक काटे यहोवाकडून असतात (११)

  • “गर्व झाला की नाश ठरलेला” (१८)

  • पिकलेले केस मानाच्या मुकुटासारखे असतात (३१)

१६  माणूस मनात योजना करतो,पण योग्य उत्तर* यहोवाकडून असतं.+  २  माणसाला आपले सगळे मार्ग योग्यच* वाटतात,+पण यहोवा हेतूंचं परीक्षण करतो.+  ३  आपली सगळी कामं यहोवावर सोपव,+म्हणजे तुझ्या योजना सफल होतील.  ४  यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वकाही घडवून आणतो,त्याने दुष्टांनाही संकटाच्या दिवसासाठी राखून ठेवलंय.+  ५  गर्विष्ठ माणसाची यहोवाला घृणा वाटते.+ अशा माणसाला शिक्षा मिळेल हे निश्‍चित.  ६  एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्‍वासूपणाने अपराधाचं प्रायश्‍चित्त होतं+आणि यहोवाची भीती बाळगल्यामुळे माणूस वाईट गोष्टींपासून दूर राहतो.+  ७  माणसाच्या वागणुकीने जेव्हा यहोवा संतुष्ट होतो,तेव्हा तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्यासोबत शांतीने राहायला लावतो.+  ८  अन्यायाने मिळवलेल्या भरपूर संपत्तीपेक्षा,+नीतिमत्त्वाची थोडीशी कमाई बरी!+  ९  माणूस मनात आपला मार्ग ठरवतो,पण यहोवा त्याच्या पावलांना दिशा दाखवतो.+ १०  राजाच्या ओठांवर देवाचा* निर्णय असला पाहिजे;+त्याने कधीही न्यायाला सोडून वागू नये.+ ११  अचूक काटे आणि तराजू यहोवाकडून असतात;पिशवीतली सगळी वजनं तोच पुरवतो.+ १२  राजांना दुष्ट व्यवहारांची घृणा वाटते,+कारण नीतिमत्त्वामुळे राजासन स्थिर राहतं.+ १३  नीतीचे बोल ऐकून राजांना आनंद होतो. प्रामाणिकपणे बोलणारे त्यांना आवडतात.+ १४  राजाचा क्रोध मृत्यूच्या दूतासारखा असतो,+पण बुद्धिमान माणूस तो शांत करतो.*+ १५  राजाच्या कृपेमुळे आयुष्य सुखी होतं;त्याची कृपा वसंत ऋतूत बरसणाऱ्‍या मेघांसारखी असते.+ १६  चांदीपेक्षा समजशक्‍ती मिळवणं,+आणि सोन्यापेक्षा बुद्धी मिळवणं कधीही चांगलं.+ १७  सरळ मनाचे लोक वाईट मार्ग टाळतात. जो आपल्या मार्गाचं रक्षण करतो, तो आपल्या जिवाचं रक्षण करतो.+ १८  गर्व झाला की नाश ठरलेला;घमेंडी वृत्ती आली, की माणूस अडखळतो.+ १९  गर्विष्ठ लोकांसोबत लूट वाटून घेण्यापेक्षा,दीन लोकांमध्ये नम्रपणे राहिलेलं बरं!+ २०  सखोल समज दाखवणाऱ्‍याला यश* मिळेल;यहोवावर भरवसा ठेवणारा सुखी असतो. २१  बुद्धिमान माणसाला लोक समजूतदार म्हणतील,+जो प्रेमळपणे बोलतो,* त्याचं बोलणं इतरांना सहज पटतं.+ २२  सखोल समज असलेल्यांसाठी ती जीवनाच्या झऱ्‍यासारखी असते. पण मूर्खांना आपल्याच मूर्खपणामुळे शिक्षा मिळते. २३  बुद्धिमानाचं मन त्याला सखोल समज देतं;+इतरांना त्याचं बोलणं सहज पटतं. २४  प्रेमळ शब्द मधाच्या पोळ्यासारखे असतात,ते जिवाला* गोड लागतात आणि हाडांना आरोग्य देतात.+ २५  माणसाला एक मार्ग योग्य वाटतो,पण तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो.+ २६  मजुराची भूक* त्याला मेहनत करायला लावते;पोटाची खळगी* भरण्यासाठी त्याला कष्ट करणं भाग असतं.+ २७  दुष्ट माणूस वाईट गोष्टी उकरून काढतो;+त्याचं बोलणं धगधगत्या आगीसारखं असतं.+ २८  कारस्थानं करणारा भांडणं लावतो,+बदनामी करणारा जिवलग मित्रांची मैत्री तोडतो.+ २९  हिंसा करणारा आपल्या शेजाऱ्‍याला फसवतोआणि त्याला वाईट मार्गाला लावतो. ३०  तो डोळे मिचकावत दुष्ट योजना करतो,ओठ घट्ट मिटून तो दुसऱ्‍यांचं नुकसान करतो. ३१  नीतीने चालणाऱ्‍यांचे पिकलेले केस+मानाच्या* मुकुटासारखे असतात.+ ३२  जो लगेच रागावत नाही,+ तो शूरवीरापेक्षा शक्‍तिशाली असतो;रागावर नियंत्रण करणारा, शहर जिंकणाऱ्‍यापेक्षा ताकदवान असतो.+ ३३  लोक चिठ्ठ्या टाकतात,*+पण त्यांच्या मदतीने घेतलेला निर्णय यहोवाकडून असतो.+

तळटीपा

किंवा “त्याचं उत्तर.” शब्दशः “जिभेचं उत्तर.”
शब्दशः “शुद्धच.”
किंवा “देवाने प्रेरित केलेला.”
किंवा “चुकवतो.”
शब्दशः “चांगलं.”
किंवा “इतरांना आवडेल असं बोलतो.” शब्दशः “ओठांचा गोडवा.”
किंवा “चवीला.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जीव.”
शब्दशः “तोंड.”
किंवा “सौंदर्याच्या.”
शब्दशः “मांडीवर चिठ्ठ्या टाकतात.”