व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क५

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत देवाचं नाव

बायबलचे विद्वान मान्य करतात, की मूळ हिब्रू शास्त्रवचनांत देवाचं वैयक्‍तिक नाव ७,००० वेळा येतं. आणि ते टेट्राग्रमॅटननी, म्हणजे יהוה या चार हिब्रू अक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. पण, अनेकांना असं वाटतं, की ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या मूळ लिखाणांमध्ये देवाचं नाव दिलं नव्हतं. त्यामुळे, आज बायबलच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचं, म्हणजे नवा करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या भागाचं भाषांतर करताना देवाचं नाव वापरलं जात नाही. तसंच, हिब्रू शास्त्रवचनांत जिथे जिथे देवाच्या नावाची चार हिब्रू अक्षरं (टेट्राग्रमॅटन) येतात, तो भाग ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत अनेक भाषांतरकार जसाच्या तसा उतरवतानाही देवाच्या नावाऐवजी “प्रभू” हा शब्द वापरतात.

पण, पवित्र शास्त्र​—नवे जग भाषांतर  यात मात्र असं केलेलं नाही. या भाषांतराच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत देवाचं नाव “यहोवा” हे २३७ वेळा वापरण्यात आलं आहे. असं करण्याआधी भाषांतरकारांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या. (१) आज आपल्याकडे असलेल्या हजारो ग्रीक हस्तलिखितांच्या प्रती या मूळ लिखाणांच्या प्रती नाहीत; यांपैकी बहुतेक प्रती या मूळ लिखाणांच्या कमीतकमी दोन शतकांनंतर तयार करण्यात आल्या आहेत. (२) आणि या काळापर्यंत हस्तलिखितांच्या प्रती तयार करणाऱ्‍यांनी देवाच्या नावाच्या चार अक्षरांच्या जागी किरियॉस  (याचा अर्थ “प्रभू” असा होतो) हा ग्रीक शब्द घातला; किंवा मग त्यांनी अशा हस्तलिखितांमधून प्रती तयार केल्या ज्यांमध्ये आधीपासूनच देवाच्या नावाच्या जागी किरियॉस  हा शब्द होता.

मूळ ग्रीक हस्तलिखितांमध्ये देवाच्या नावाची चार हिब्रू अक्षरं असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे नवे जग बायबल भाषांतर समितीने आपल्या भाषांतरात देवाचं नाव वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय पुढील पुराव्यांवर आधारित होता:

  • येशू आणि त्याचे प्रेषित यांच्या काळात वापरल्या जाणाऱ्‍या हिब्रू शास्त्रवचनांच्या हस्तलिखितांमध्ये सगळीकडे देवाच्या नावाची चार अक्षरं वापरली गेली होती. पूर्वीच्या काळात बहुतेक लोक या गोष्टीशी सहमत होते. आणि आज कुमरान या ठिकाणी हिब्रू शास्त्रवचनांच्या पहिल्या शतकातल्या प्रती सापडल्या आहेत. त्यामुळे आता याबद्दल कोणतीही शंका राहत नाही.

  • येशू आणि त्याचे प्रेषित यांच्या काळात, हिब्रू शास्त्रवचनांच्या ग्रीक भाषांतरांमध्येही देवाच्या नावाची चार अक्षरं होती. अनेक शतकांपर्यंत विद्वानांना असं वाटत होतं, की सेप्टुअजिंटच्या हस्तलिखितांमध्ये, म्हणजे हिब्रू शास्त्रवचनांच्या ग्रीक भाषांतरामध्ये देवाच्या नावाची चार अक्षरं नाहीत. मग १९५० च्या आसपास, येशूच्या काळातल्या ग्रीक सेप्टुअजिंटच्या अतिशय जुन्या अशा काही तुकड्यांकडे विद्वानांचं लक्ष वेधण्यात आलं. त्या तुकड्यांवर हिब्रू अक्षरांत देवाचं नाव लिहिलेलं होतं. यावरून हे दिसून येतं, की येशूच्या काळात शास्त्रवचनांच्या ग्रीक प्रतींमध्ये देवाचं नाव होतं. पण चौथ्या शतकापर्यंत ग्रीक सेप्टुअजिंटच्या  महत्त्वाच्या हस्तलिखितांमध्ये, जसं की कोडेक्स वॅटिकनस आणि कोडेक्स साइनाइटिकस यांमध्ये उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांत देवाचं नाव नव्हतं (आधीच्या हस्तलिखितांमध्ये मात्र ते होतं). त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं आश्‍चर्य वाटत नाही, की तेव्हापासून सुरक्षित असलेल्या लिखाणांमध्ये, म्हणजे नवा करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या प्रतींमध्ये किंवा बायबलच्या ग्रीक शास्त्रवचनांमध्ये देवाचं नाव दिसून येत नाही.

    येशू अगदी स्पष्टपणे म्हणाला: “मी माझ्या पित्याच्या नावाने आलोय.” शिवाय, त्याने या गोष्टीवरही जोर दिला, की त्याने जी कामं केली ती त्याने “पित्याच्या नावाने” केली.

  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनं दाखवून देतात, की येशूने अनेकदा देवाच्या नावाचा उपयोग केला आणि इतरांनाही ते नाव सांगितलं. (योहान १७:६, ११, १२, २६) येशू अगदी स्पष्टपणे म्हणाला: “मी माझ्या पित्याच्या नावाने आलोय.” शिवाय, त्याने या गोष्टीवरही जोर दिला, की त्याने जी कामं केली ती त्याने “पित्याच्या नावाने” केली.​—योहान ५:४३; १०:२५.

  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनं देवाच्या प्रेरणेने लिहिलेली असून, बायबलमध्ये ती पवित्र हिब्रू शास्त्रवचनांनंतर लगेच येतात. त्यामुळे त्यांतून एकाएकी देवाचं नाव गायब होणं हे तर्काला पटत नाही. इ.स. ५० च्या आसपास, शिष्य याकोब यरुशलेममधल्या वडिलांना म्हणाला: “देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे कशा प्रकारे आपलं लक्ष वळवलं, याबद्दल शिमोनने अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंय.” (प्रेषितांची कार्यं १५:१४) पहिल्या शतकात जर कोणालाही देवाचं नाव माहीत नव्हतं किंवा ते जर देवाचं नाव वापरत नव्हते, तर “देवाने आपल्या नावाकरता” असे शब्द याकोबने वापरलेच नसते.

  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत देवाचं नाव छोट्या रूपात सापडतं. प्रकटीकरण १९:१, ३, ४, ६, या वचनांमध्ये “हालेलूयाह!” या शब्दातच देवाचं नाव आहे. यासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा शब्दशः अर्थ “याहची स्तुती करा” असा होतो. “याह” हे यहोवा या नावाचं छोटं रूप आहे. तसंच, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमधली अनेक नावं देवाच्या नावावरून आली आहेत. खरंतर, अनेक संदर्भ-पुस्तकं दाखवून देतात, की येशूच्या नावाचा अर्थ “यहोवा तारण करतो” असा होतो.

  • पहिल्या शतकातल्या यहुदी लिखाणांवरून दिसून येतं, की यहुदी ख्रिश्‍चनांनी त्यांच्या लिखाणांमध्ये देवाच्या नावाचा वापर केला. ‘तोसेफ्ता’ हा तोंडी नियम असलेला लेखी संग्रह जवळपास इ.स ३०० मध्ये लिहून तयार झाला. त्या संग्रहात, शब्बाथाच्या दिवशी ख्रिस्ती लिखाणं जाळण्याच्या बाबतीत असं म्हटलं आहे: “ते प्रचारकांची पुस्तकं आणि मिनीमची  [कदाचित यहुदी ख्रिश्‍चनांची] पुस्तकं जाळून टाकतात. अशी पुस्तकं आणि त्यांत असलेला देवाच्या नावाचा भाग जाळून टाकण्याचा त्यांना अधिकार आहे.” तोसेफ्तामध्ये, दुसऱ्‍या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या आणि गालीलमध्ये राहणाऱ्‍या योसे रब्बी यांच्या शब्दांचाही पुढे उल्लेख करण्यात आला आहे. ते म्हणतात, की आठवड्याच्या इतर दिवशी “त्यांतला [ही कदाचित ख्रिस्ती लिखाणं असल्याचं मानलं जातं] देवाच्या नावाचा उल्लेख असलेला भाग कापून तो जपून ठेवला जायचा आणि बाकीचा भाग जाळून टाकला जायचा.”

  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत जशाच्या तशा उतरवलेल्या हिब्रू शास्त्रवचनांच्या उताऱ्‍यांमध्ये देवाचं नाव असण्याची शक्यता आहे, असं बायबलचे काही विद्वान मान्य करतात. द अँकर बायबल डिक्शनरी  मध्ये “टेट्राग्रमॅटन इन द न्यू टेस्टमेंट” या शीर्षकाखाली असं म्हटलं आहे: “नव्या कराराचं पहिल्यांदा लिखाण करण्यात आलं, तेव्हा जुन्या करारातली अनेक वचनं जशीच्या तशी त्यात उतरवण्यात आली. यांपैकी काही वचनांमध्ये किंवा सगळ्या वचनांमध्ये टेट्राग्रमॅटन, म्हणजे याव्हे हे देवाचं नाव असल्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत.” जॉर्ज हॉवर्ड नावाचे एक विद्वान म्हणतात: “सुरुवातीचे ख्रिस्ती, ज्या ग्रीक बायबलच्या [सेप्टुअजिंटच्या ] प्रतींचा उपयोग करायचे त्यांत देवाच्या नावाची चार हिब्रू अक्षरं होती. त्यामुळे, सेप्टुअजिंटमधली  वचनं जशीच्या तशी उतरवताना नव्या कराराच्या लेखकांनी देवाच्या नावाची चार हिब्रू अक्षरं तशीच ठेवली असतील असं मानणं चुकीचं ठरणार नाही.”

  • बायबलच्या नामवंत भाषांतरकारांनी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये देवाच्या नावाचा उपयोग केला. यांपैकी काही भाषांतरकारांनी तर, नवे जग भाषांतर  प्रकाशित करण्यात आलं त्याच्या कितीतरी काळाआधी आपल्या भाषांतरात देवाच्या नावाचा उपयोग केला. या भाषांतरकारांची नावं आणि त्यांच्या भाषांतराची माहिती पुढे दिली आहे: हर्मन हाईनफेटर यांचं अ लिटरल ट्रान्स्‌लेशन ऑफ द न्यू टेस्टमेंट . . . फ्रॉम द टेक्स्ट ऑफ द व्हॅटिकन मॅन्यूस्क्रिप्ट  (१८६३); बेंजमिन विल्सन यांचं द एम्फॅटिक डायग्लॉट  (१८६४); जॉर्ज बार्कर स्टिवन्स यांचं द एपिसल्स ऑफ पॉल इन मॉर्डन इंग्लिश  (१८९८); डब्ल्यू. जी. रदरफोर्ड यांचं सेंट पॉल्स एपिसल टू द रोमन्स  (१९००); जे. डब्ल्यू. सी. वॅण्ड, बिशप ऑफ लंडन यांचं द न्यू टेस्टमेंट लेटर्स  (१९४६). याशिवाय, २० व्या शतकाच्या सुरुवातीला स्पॅनिश भाषांतरकार पाब्लो बेस्सोन यांनी आपल्या भाषांतरात लूक २:१५ आणि यहूदा १४ या वचनांमध्ये “येहोबा” हे देवाचं नाव वापरलं. तसंच, त्यांनी आपल्या भाषांतरात १०० पेक्षा जास्त तळटिपांमध्येही ते वापरलं. त्यांचं म्हणणं आहे, की देवाचं नाव या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. या भाषांतरांच्या बऱ्‍याच काळाआधी, म्हणजे १६ व्या शतकापासून पुढे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या हिब्रू भाषांतरांमध्येही अनेक ठिकाणी देवाच्या नावाची चार हिब्रू अक्षरं वापरली गेली आहेत. जर्मन भाषेतल्या कमीत कमी ११ बायबल आवृत्त्यांच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत “यहोवा” (किंवा जर्मन लिपीत लिहिलेलं हिब्रू भाषेतलं “याव्हे”) हे नाव वापरण्यात आलं आहे. आणि चार भाषांतरकारांनी आपल्या भाषांतरात “प्रभू” या पदवीनंतर कंसात देवाच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसंच, जर्मन भाषेतली ७० पेक्षा जास्त बायबल भाषांतरं तळटिपांमध्ये किंवा भाष्यग्रंथांमध्ये देवाच्या नावाचा उल्लेख करतात.

    बेंजमिन विल्सन यांच्या द एम्फॅटिक डायग्लॉट  (१८६४) यात प्रेषितांची कार्यं २:३४ मध्ये दिलेलं देवाचं नाव

  • शंभरपेक्षा जास्त भाषांमध्ये जी बायबलची भाषांतरं आहेत, त्यांच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये देवाचं नाव दिलेलं आहे. अमेरिकेतल्या आदिवासी भागांत, आफ्रिकेत, आशियात, आणि युरोपमध्ये बोलल्या जाणाऱ्‍या अनेक भाषांमध्ये आणि पॅसिफिक महासागरातल्या बेटांवर बोलल्या जाणाऱ्‍या भाषांमध्ये देवाच्या नावाचा सर्रासपणे उपयोग केला जातो. ( पान क्र. २५७४ आणि २५७५ वर असलेली सूची पाहा.) या भाषांमध्ये बायबलचं भाषांतर करणाऱ्‍यांनी वर दिलेल्या कारणांमुळेच आपल्या भाषांतरांत देवाचं नाव वापरण्याचा निर्णय घेतला. यांपैकी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची काही भाषांतरं तर अलीकडेच प्रकाशित करण्यात आली आहेत; जसं की, रोटुमन बायबलच्या (१९९९) ४८ वचनांमध्ये ५१ वेळा “जिहोवा,” तर इंडोनेशियाच्या बटाक (टोबा) भाषांतरात (१९८९) ११० वेळा “जाहोवा” हे देवाचं नाव वापरण्यात आलं आहे.

    हवाई बेटांवरच्या एका भाषेतल्या बायबल भाषांतरात मार्क १२:२९, ३० या वचनांत दिलेलं देवाचं नाव

या सगळ्या गोष्टींवरून हे स्पष्टच आहे, की ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत जिथे जिथे यहोवा हे देवाचं नाव होतं, तिथे तिथे ते पुन्हा वापरण्याची सबळ कारणं आहेत. आणि नवे जग भाषांतर  या बायबलचं भाषांतर करणाऱ्‍यांनी नेमकं हेच केलं आहे. देवाच्या नावाबद्दल त्यांना गाढ आदर आहे आणि देवाबद्दल त्यांना आदरयुक्‍त भय आहे. त्यामुळे, मूळ लिखाणांमध्ये जे काही आहे ते आपल्या भाषांतरातून काढून टाकायची त्यांची मुळीच इच्छा नाही.​—प्रकटीकरण २२:१८, १९.