व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचे नीतिनियम सर्वोत्तम?

बायबलचे नीतिनियम सर्वोत्तम?

बायबलचे नीतिनियम सर्वोत्तम?

“समाजातील लोकांना सुरक्षा आणि मार्गदर्शन देणारे मूलभूत नीतिनियम हवे आहेत.” असे एका अनुभवी जर्मन लेखकाने व टीव्ही प्रसारकाने म्हटले. त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. मानवी समाजात स्थैर्य आणि समृद्धी येण्यासाठी समाजातील लोकांनी अशा नीतिनियमांचे पालन केले पाहिजे जे, केवळ नावापुरते नाहीत तर ठोस अर्थात प्रभावशाली आहेत; आणि जे बरोबर व चूक, चांगले व वाईट यांतील फरक त्यांना दाखवू शकतात. परंतु मग प्रश्‍न असा येतो, की असे कोणते नियम आहेत जे समाजासाठी आणि समाजातील लोकांसाठी सर्वोत्तम आहेत?

बायबलमधील नीतिनियमांनुसार चालण्याची लोकांनी निवड केल्यास त्यांचे जीवन स्थिर व आनंदी होऊ शकते. आणि कालांतराने समाजही स्थिर व आनंदी होऊ शकतो. हे कितपत खरे आहे? याबाबतीत बायबलचे काय मत आहे त्यासाठी आपण दोन मुद्द्‌यांचा विचार करून पाहू या. ते दोन मुद्दे म्हणजे वैवाहिक जीवनातील विश्‍वासूपणा आणि दररोजच्या जीवनात ईमानदारी.

एकच वैवाहिक सोबती

आपल्या निर्माणकर्त्याने आधी आदामाला बनवले आणि मग त्याच्यासाठी एक सहचारिणी, म्हणजे हव्वेला बनवले. हा पहिला विवाह होता. त्यांचे हे बंधन कायमचे, सदासर्वकाळचे बंधन होते. म्हणूनच तर देवाने म्हटले: “पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील.” या गोष्टीला ४,००० वर्ष पूर्ण झाल्यावर, येशू ख्रिस्तानेही आपल्या अनुयायांना विवाहाबद्दलचा हाच नियम पुन्हा दिला. शिवाय, विवाहबाह्‍य अनैतिक संबंधांचाही त्याने धिक्कार केला.—उत्पत्ति १:२७, २८; २:२४; मत्तय ५:२७-३०; १९:५.

बायबलनुसार, वैवाहिक जीवनातला आनंद दोन महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे. एक गोष्ट आहे प्रेम आणि दुसरी आदर. पती आणि पत्नी, दोघांनी एकमेकांना प्रेम दाखवले पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे. कुटुंबाचा मस्तक पती आहे आणि त्याने नेहमी आपल्या पत्नीच्या हिताचा विचार करून तिला निःस्वार्थ प्रेम दाखवले पाहिजे. त्याने तिच्याबरोबर “सुज्ञतेने सहवास” ठेवावा; “निष्ठुरतेने” कधीही वागू नये. आणि पत्नीने “आपल्या पतीची भीड [गाढ आदर] राखावी.” पतीपत्नीने या तत्त्वांचे पालन केल्यास विवाहात येणाऱ्‍या बहुतेक समस्या टाळता येऊ शकतात किंवा त्यांच्यावर मात करता येऊ शकते. अशाप्रकारे पतीपत्नी एकमेकांना विश्‍वासू राहतील.—१ पेत्र ३:१-७; कलस्सैकर ३:१८, १९; इफिसकर ५:२२-३३.

वैवाहिक सोबत्यांशी विश्‍वासूपणे जडून राहण्याविषयी बायबलमधील या नियमामुळे विवाह आनंदी होतो का? जर्मनीत घेतलेल्या एका सर्व्हेचा परिणाम विचारात घ्या. चांगल्या विवाहासाठी कोणती कारणे महत्त्वाची आहेत असे लोकांना विचारण्यात आले. बहुतेकांनी पहिल्यांदा विश्‍वासूपणा असे उत्तर दिले. आपला सोबती आपल्याला विश्‍वासू आहे, हे जाणल्यावर कोणता पती अथवा कोणती पत्नी आनंदी होणार नाही?

समस्या येतात तेव्हा?

पण समजा पती-पत्नीत गंभीर मतभेद असतील तर? त्यांना एकमेकांबद्दल पूर्वीप्रमाणे प्रेम वाटत नसेल तर? अशा परिस्थितीत घटस्फोट घेऊन एकमेकांपासून दूर होणेच बरे नाही का? की, अशा परिस्थितीतही एकमेकांबरोबर विश्‍वासूपणे जडून राहण्याविषयीचा बायबलचा सल्ला अनुसरणे फायद्याचे ठरेल?

बायबलच्या लेखकांना हे माहीत होते, की सर्वच पती-पत्नी अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यात समस्या ह्‍या येणारच. (१ करिंथकर ७:२८) पण बायबलच्या नीतिनियमांनुसार चालणारे पतीपत्नी एकमेकांना क्षमा करण्याचा आणि एकत्र मिळून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात काही परिस्थितीत, जसे की सोबत्याने व्यभिचार केल्यास किंवा शारीरिक अत्याचार केल्यास ख्रिस्ती व्यक्‍ती विभक्‍त होण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा विचार करू शकते. (मत्तय ५:३२; १९:९) परंतु, कोणत्याही गंभीर कारणाविना किंवा दुसऱ्‍या व्यक्‍तीशी संबंध जोडण्यासाठी आपला विवाह संपुष्टात आणणे, स्वार्थीपणाचे व अनादराचे चिन्ह आहे. असे केल्याने, कोणीही स्थिर किंवा आनंदी होऊ शकणार नाही. पुढील उदाहरणावरून हे पाहायला मिळेल.

पीटर नावाच्या एका गृहस्थाला आपल्या विवाहात पहिल्यासारखा उत्साह राहिलेला नाही असे वाटू लागले. * म्हणून त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले आणि तो मोनिका नावाच्या एका स्त्रीबरोबर राहू लागला. मोनिकानेही तिच्या पतीला सोडून दिले होते. पण पीटरचे आणि मोनिकाचे जमले का? काही महिन्यातच पीटरने कबूल केले, की मोनिकाबरोबर राहणे त्याने विचार केला होता तितके सोपे नव्हते. का नव्हते? त्याच्या पहिल्या बायकोत त्याला ज्या ज्या चुका दिसत होत्या त्या मोनिकातही त्याला दिसू लागल्या. त्याच्या समस्येत आणखी भर पडली. त्याच्या उतावीळ व स्वार्थी निर्णयामुळे त्याला जबरदस्त आर्थिक फटका बसला. शिवाय मोनिकाची बिचारी मुले, त्यांच्या कौटुंबिक जीवनात झालेल्या या आकस्मिक बदलांमुळे भावनात्मकरीत्या चेंगरून गेली.

या उदाहरणावरून आपण हे समजू शकतो, की विवाहात वादळासमान समस्या येतात तेव्हा जहाज सोडून जाणे हे त्या समस्यांचे उत्तर नाही. त्याऐवजी, पती-पत्नीने अशा वादळातही देवाच्या वचनातील अर्थात बायबलमधील नीतिनियमांचे पालन केल्यास त्यांचा विवाह तग धरून राहील आणि कालांतराने त्यांचा विवाह आनंदी ठरेल. थॉमस आणि डोरीसच्या बाबतीत असेच झाले.

थॉमस आणि डोरीसचे लग्न होऊन ३० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानंतर थॉमसला दारूचे व्यसन लागले. डोरीसला नैराश्‍येने ग्रासले. थॉमस आणि डोरीसने घटस्फोट घ्यायचे ठरवले. डोरीसने यहोवाची साक्षीदार असलेल्या एका बहिणीला ही गोष्ट सांगितली. या बहिणीने तिला, विवाहाबद्दल बायबल काय म्हणते ते दाखवले व विभक्‍त होण्याची घाई न करता थॉमसबरोबर आधी बसून समस्येवर काही उपाय निघतो का, हे पाहायला सांगितले. डोरीसने तसेच केले. काही महिन्यातच त्यांची परिस्थिती सुधारली. घटस्फोट घ्यायचा विचार त्या दोघांनीही मनातून काढून टाकला. थॉमस आणि डोरीस या दोघांनी मिळून आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. बायबलच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे त्यांचा विवाह मोडता मोडता वाचला.

सर्व बाबतीत ईमानदार

आपल्या विवाह सोबत्याशी विश्‍वासूपणे जडून राहण्याकरता मनोधैर्याची आणि तत्त्वनिष्ठतेची आवश्‍यकता आहे. या बेईमान जगात ईमानदार राहण्याकरताही याच गुणांची आवश्‍यकता आहे. बायबलमध्ये ईमानदारीविषयी वारंवार सांगितले आहे. प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील यहुदियातील ख्रिश्‍चनांना लिहिले: “सर्व बाबतीत [ईमानदारीने] वागण्याची आमची इच्छा” आहे. (इब्री लोकांस १३:१८) या वचनाचा काय अर्थ होतो?

ईमानदार व्यक्‍ती सत्यवादी असते. ती लबाडी करत नाही. इतरांबरोबर व्यवहार करताना ती निपक्ष असते. जे काही असेल ते तोंडावर सांगणारी व इतरांचा आदर करणारी असते. ती फसवेगिरी किंवा इतरांची दिशाभूल करत नाही. ईमानदार व्यक्‍ती एकनिष्ठ असते. ती कोणाला फसवत नाही. समाजात सर्वच लोक ईमानदार असल्यास, समाजातील लोकांमध्ये भरवशाचे आणि विश्‍वासाचे वातावरण राहील; लोकांची मनोवृत्ती चांगली असेल आणि मानवी संबंधही मजबूत होतील.

पण ईमानदार लोक आनंदी असतात का? निश्‍चितच! जगात इतका भ्रष्टाचार आणि फसवेगिरी चालत असताना देखील एक व्यक्‍ती ईमानदारपणे वागते तेव्हा बहुतेकवेळा लोक तिची प्रशंसा करतात. तरुण लोकांचा एक सर्व्हे घेण्यात आला तेव्हा, ७० टक्के तरुणांनी ईमानदारपणा हा एक सद्‌गुण असल्याचे सांगितले. शिवाय आपले वय कितीही असो, आपण ज्यांना मित्र समजतो त्यांनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईमानदार असावे, अशी आपण अपेक्षा करतो.

क्रिस्टीन बारा वर्षांची होती तेव्हापासूनच तिला चोरी करायला शिकवण्यात आले. कालांतराने ती एक सराईत पाकीटमार बनली. ती म्हणते: “कधी कधी तर मी ५,००० डॉइच मार्क [एक लाख रुपये] रोख घरी आणायचे.” क्रिस्टीनला अनेक वेळा अटक करण्यात आली; आज ना उद्या तुरुंगात टाकले जाईल याचीही तिला सतत भीती वाटायची. पण यहोवाच्या साक्षीदारांबरोबर भेट झाल्यावर त्यांनी तिला, बायबल ईमानदारीविषयी काय म्हणते ते समजावून सांगितले. क्रिस्टीनला बायबलमधील नीतिनियम आवडू लागले. “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करू नये,” या बायबलमधील नियमाचे पालन करायला ती शिकली.—इफिसकर ४:२८.

क्रिस्टीनने बायबलचा अभ्यास केला व यहोवाची साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. आता ती पाकीटमार राहिली नाही. ती सर्व बाबतीत ईमानदार असण्याचा प्रयत्न करू लागली. कारण यहोवाचे साक्षीदार ईमानदार असण्याचा आणि इतर ख्रिस्ती गुण विकसित करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करतात. लाऊसिटझर रुण्डशाऊ नामक एक बातमीपत्रक त्यांच्याविषयी म्हणते की: “ईमानदारी, सभ्यपणा आणि शेजाऱ्‍याबद्दल प्रेम यांसारख्या नैतिक गुणांना साक्षीदारांच्या विश्‍वासात पहिले स्थान आहे.” क्रिस्टीनने आपल्या जीवनात केलेल्या परिवर्तनाबद्दल तिला कसे वाटते? “मी चोरी करायची थांबवल्यापासून मला खूप आनंद वाटतो. आता मी समाजात मान वर करून वावरू शकते.”

सर्व समाजाचा फायदा

आपल्या विवाह सोबत्याशी विश्‍वासू राहणारे व ईमानदार असलेले लोक आनंदी असतात शिवाय अशा लोकांमुळे समाजालाही फायदा होतो. कंपन्यांच्या किंवा कारखान्यांच्या मालकांना ईमानदार नोकरवर्ग हवा असतो. आपले शेजारी भरवसालायक असावेत असे आपल्या सर्वांना वाटते. प्रामाणिक दुकानदारांच्या दुकानात खरेदी करायला आपल्याला आवडते. भ्रष्टाचाराचा विरोध करणारे नेते, पोलीस आणि न्यायाधीश यांचा आपण आदर करत नाही का? कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणे वागणाऱ्‍या ईमानदार व्यक्‍तींमुळे समाजाला नेहमी फायदा होतो.

शिवाय, जे विवाह सोबती एकमेकांशी विश्‍वासू राहतात ते भक्कम कुटुंबाचा पाया बनतात. पुष्कळ लोकांना, एका युरोपियन नेत्याने जे म्हटले ते पटेल. ते म्हणाले: “[पारंपरिक] कुटुंब आजपर्यंत एक असे आश्रयस्थान आहे जेथे मानव सुरक्षितपणे राहू शकतो आणि त्याच्या जीवनाला काही अर्थ मिळतो.” ज्या कुटुंबात शांती असते त्या कुटुंबातील प्रौढांना व मुलांना भावनात्मकरीत्या सुरक्षित वाटते. आणि एकमेकांना विश्‍वासू राहणारे सोबती स्थिर समाज निर्माण करायला हातभार लावत असतात.

पण समजा जर असे विश्‍वासू व ईमानदार लोक फक्‍त समाजातच नव्हे तर संपूर्ण जगात असले तर सर्वांना त्याचा किती तरी फायदा होईल. अशा जगाची कल्पना करा जेथे कोणीही आपल्या विवाह सोबत्याचा विश्‍वासघात करत नाही, जेथे घटस्फोटांची न्यायालयेच नाहीत, जेथे मुलांचा ताबा कोणाला द्यायचा यावरून वाद होत नाही. जेथे कोणी पाकीटमार, भुरटे, अफरातफर करणारे, भ्रष्ट अधिकारी किंवा लबाड वैज्ञानिक नाहीत. अशा परिस्थितीची तुम्ही कल्पना करू शकता का? हे फक्‍त स्वप्नातच शक्य आहे असे कदाचित तुम्ही म्हणाल. पण बायबलमध्ये सांगितले आहे, की फार लवकर अशी परिस्थिती खरोखरच येणार आहे. म्हणून जे बायबलचा अभ्यास करतात त्यांना हे स्वप्नासारखे वाटत नाही. देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये अभिवचन दिले आहे, की यहोवाचे मशिही राज्य फार लवकर पृथ्वीवरील सर्व मानवी समाजाचे कारभार आपल्या हाती घेणार आहे. आणि या राज्याच्या सर्व प्रजेला बायबलच्या नीतिनियमांनुसार चालण्यास शिकवले जाईल. तेव्हा, “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२९.

बायबलमधील नीतिनियम सर्वोत्तम

पवित्र शास्त्रवचनांचे अगदी बारकाईने परीक्षण करणाऱ्‍या लाखो लोकांना हे समजले आहे, की बायबलमधील सल्ला हा देवाकडून आलेला सल्ला आहे. तो मानवी विचारसरणीच्या तुलनेत कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. या लोकांना याची खात्री पटली आहे, की बायबलमधील सल्ला भरवसालायक आणि आपल्या आजच्या जगातही लागू होणारा आहे. म्हणून देवाच्या वचनातील या सल्ल्यानुसार चालण्यातच आपले हित आहे, हेही त्यांना माहीत आहे.

हे लोक बायबलमधील या सल्ल्याकडे कान देतात: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) या वचनाप्रमाणे वागल्यामुळे त्यांचे जीवन सुधारले आहे; शिवाय, इतर लोकांनाही त्यांच्यामुळे फायदा होतो. ‘पुढच्या जीवनावर’ त्यांचा पक्का विश्‍वास आहे. पुढचे जीवन म्हणजे देवाच्या राज्यातील जीवन जेव्हा सर्व मानवजात बायबलच्या नीतिनियमांनुसार वागेल.—१ तीमथ्य ४:८.

[तळटीप]

^ परि. 11 या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

विवाहात समस्यारूपी वादळ येते तेव्हा, बायबलमधील नीतिनियमांचे पालन केल्यामुळे या वादळातही तुमचा विवाह तग धरून राहील आणि कालांतराने आनंदी ठरेल

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

सगळीकडेच भ्रष्टाचार असल्यामुळे—ईमानदार लोकांची सहसा प्रशंसा केली जाते