व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शुद्ध चालचलन ठेवणे अशक्य नाही

शुद्ध चालचलन ठेवणे अशक्य नाही

शुद्ध चालचलन ठेवणे अशक्य नाही

“देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहान ५:३.

१. हल्ली लोकांच्या चालचलनामध्ये कोणती एक भिन्‍नता दिसून येते?

मलाखी संदेष्ट्याने कित्येक वर्षांआधी भाकीत केले होते की एक असा काळ येईल जेव्हा देवाच्या लोकांच्या आणि देवाची सेवा करत नसलेल्यांच्या वर्तनात जमीनअस्मानाचा फरक आहे हे स्पष्ट दिसून येईल. त्याने असे लिहिले होते: “मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.” (मलाखी ३:१८) या भविष्यवाणीची आज पूर्णता होत आहे. देवाच्या आज्ञांचे पालन करणे केव्हाही आपल्या फायद्याचेच असते, आणि असे करणे योग्य देखील आहे. शुद्ध नैतिक चालचलनासंबंधीच्या आज्ञांच्या बाबतीतही हे खरे आहे. अर्थात, देवाच्या आज्ञांचे पालन करणे नेहमीच सोपे नसते. म्हणूनच येशूने म्हटले की, तारण प्राप्त करण्यासाठी ख्रिश्‍चनांनी नेटाने यत्न केला पाहिजे.—लूक १३:२३, २४.

२. कोणत्या जगिक दबावांमुळे शुद्ध चालचलन ठेवणे काहींना कठीण जाते?

पण नैतिकरित्या शुद्ध राहणे कठीण का आहे? त्याचे एक कारण आहे, या जगाकडून येणारा दबाव. अनैतिक शरीरसंबंधांमुळे आनंद आणि सुख मिळते; ते प्रौढत्वाचे चिन्ह आहे असे मनोरंजनातून दाखवले जाते. पण त्यामुळे होणाऱ्‍या वाईट परिणामांकडे अक्षरशः कानाडोळा केला जातो. (इफिसकर ४:१७-१९) आणि बहुतेकदा हे संबंध अविवाहित लोकांमध्ये दाखवले जातात. चित्रपट आणि टीव्हीच्या कार्यक्रमांमधून त्या संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारची बांधिलकी दाखवली जात नाही. त्यांच्यामध्ये, प्रेम आणि एकमेकांबद्दल आदराची भावना तर मुळीच नसते. पुष्कळजणांनी हे लहानपणापासून पाहिलेले असते. शिवाय, आजकालच्या स्वैराचारी मतांनुसार चालण्यासाठी मित्रमैत्रिणींकडून दबाव येत असतो. त्याला नकार देणाऱ्‍यांची उलट थट्टामस्करी केली जाते.—१ पेत्र ४:४.

३. कोणत्या कारणांमुळे जगामधील पुष्कळजणांचे अनैतिक वर्तन आहे?

आंतरिक दबावामुळे देखील शुद्ध चालचलन ठेवणे कठीण होऊ शकते. यहोवाने मानवांना लैंगिक इच्छा दिली आहे आणि ही फार तीव्र असू शकते. या स्वाभाविक इच्छेमुळे आपल्या विचारांवर बराच प्रभाव पडतो आणि यहोवाच्या विचारांच्या विरोधात असणारे विचार आपल्याला अनैतिक कृत्ये करण्यास चालना देतात. (याकोब १:१४, १५) ब्रिटिश मेडिकल जर्नल यात अलीकडेच प्रकाशित केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, पहिल्या वेळी लैंगिक संबंध ठेवलेल्या पुष्कळांनी केवळ कुतूहलापोटी तो ठेवला होता. तर इतरांनी, त्यांच्या वयाचे बहुतेक लोक करतात म्हणून आपणही करावे या विचाराने लैंगिक संबंध ठेवले होते. आणखी काहींनी असे म्हटले की, भावना अनावर झाल्यामुळे किंवा “नशेत असल्यामुळे त्यांनी असे केले.” परंतु, आपल्याला जर देवाला संतुष्ट करायचे असेल तर असा तर्क करून चालणार नाही. तर मग कसा विचार केला पाहिजे?

दृढ असा

४. शुद्ध चालचलन ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

नैतिकरित्या शुद्ध राहण्यासाठी आपले वर्तन शुद्ध राखण्याची गरज आपण ओळखली पाहिजे. प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना हेच लिहिले होते: “देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे.” (रोमकर १२:२) देवाच्या वचनात अनैतिकतेचा धिक्कार केला आहे हे ठाऊक असणे पुरेसे नाही. तर त्याचा धिक्कार का केला आहे आणि त्याच्यापासून दूर राहिल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे देखील समजून घेतले पाहिजे. आधीच्या लेखात आपण काही कारणे पाहिली होती.

५. ख्रिश्‍चनांनी शुद्ध वर्तन राखण्यामागचे मुख्य कारण कोणते आहे?

ख्रिश्‍चनांकरता मात्र देवासोबतचा नातेसंबंध हे सर्वात मुख्य कारण आहे आणि म्हणून ते लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहतात. आपली भलाई कशात आहे हे देवाला ठाऊक आहे असे आपण शिकलो आहोत. त्यामुळे त्याच्यावरचे प्रेम आपल्याला वाईटाचा द्वेष करायला मदत करील. (स्तोत्र ९७:१०) “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” याचा देव दाता आहे. (याकोब १:१७) आपल्यावर त्याचे प्रेम आहे. त्याला आज्ञाकारी राहून आपण दाखवू शकतो की, आपलेही त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींची आपल्याला कदर आहे. (१ योहान ५:३) यहोवाच्या नीतिमान आज्ञांचे उल्लंघन करून आपण त्याची निराशा करू इच्छित नाही किंवा त्याचे मन दुखवू इच्छित नाही. (स्तोत्र ७८:४१) त्याच्या पवित्र आणि नीतिमान उपासनेची अवहेलना होईल असे वागण्याची आपली इच्छा नाही. (तीत २:५; २ पेत्र २:२) शुद्ध चालचलन राखून आपण सर्वोच्च देवाचे मन आनंदित करतो.—नीतिसूत्रे २७:११.

६. नैतिकतेविषयी आपले मत इतरांना सांगितल्याने कसा फायदा होऊ शकतो?

नैतिकरित्या शुद्ध राहण्याचा निश्‍चय केल्यानंतर आपला निर्णय इतरांना सांगितल्याने आणखी संरक्षण मिळते. तुम्ही यहोवा देवाचे सेवक आहात आणि त्याच्या उच्च दर्जांनुसार जगण्याची तुम्हाला इच्छा आहे हे लोकांना सांगा. कारण जीवन तुमचे आहे, शरीर तुमचे आहे, निवडही तुमचीच आहे. पण वाईट चालचलनाचा काय परिणाम होऊ शकतो? आपल्या स्वर्गीय पित्यासोबतचा बहुमूल्य नातेसंबंध गमावून बसण्याचा धोका आहे. म्हणून स्पष्टपणे इतरांना सांगा की, नैतिकतेच्या बाबतीत तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. देवाच्या तत्त्वांनुसार तंतोतंत वागून त्याचे प्रतिनिधी असल्याबद्दल अभिमान बाळगा. (स्तोत्र ६४:१०) नैतिक वर्तनासंबंधी आपल्याला काय वाटते याविषयी इतरांना सांगायला कधीच लाजू नका. आपल्याला जे वाटते ते इतरांना सांगितल्याने तुमचा निश्‍चय आणखी पक्का होईल. बऱ्‍याच वाईट गोष्टींपासून तुम्हाला संरक्षण मिळेल आणि तुमच्या उदाहरणाचे अनुकरण करायला इतरांना उत्तेजन मिळेल.—१ तीमथ्य ४:१२.

७. शुद्ध चालचलन ठेवण्याचा आपला निर्धार आपण कसा कायम राखू शकतो?

शुद्ध चालचलन राखण्याचा निश्‍चय केल्यावर आणि आपल्या निर्णयाविषयी इतरांना सांगितल्यावर त्यानुसार जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे कसे करता येईल? आपल्या मित्रमैत्रिणींची योग्य निवड करणे हा एक मार्ग आहे. बायबल म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.” नैतिकतेच्या बाबतीत तुमच्यासारखेच ज्यांचे विचार आहेत त्यांच्यासोबत मैत्री ठेवा कारण ते तुम्हाला उत्तेजन देतील. पुढे त्या शास्त्रवचनात असेही म्हटले आहे की: “मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) जे लोक तुमचा निर्धार मोडू पाहतील अशांपासून होता होईल तितके दूर राहा.—१ करिंथकर १५:३३.

८. (अ) हितकर गोष्टी आपल्या मनात भरणे का आवश्‍यक आहे? (ब) आपण कशापासून दूर राहावे?

शिवाय सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, श्रवणीय, सद्‌गुण आणि स्तुती या गोष्टींनी आपण आपले मन भरले पाहिजे. (फिलिप्पैकर ४:८) जे काही आपण पाहतो, वाचतो किंवा जे संगीत ऐकतो त्याबाबतीत चोखंदळ असलो तर हे शक्य आहे. अनैतिक मासिकांचा व पुस्तकांचा वाईट परिणाम होत नाही असे म्हणणे म्हणजे नैतिक किंवा शुद्ध गोष्टींचा चांगला परिणाम होत नाही असे म्हणण्यासारखे आहे. अपरिपूर्ण मानव अगदी सहजासहजी अनैतिकतेच्या पाशात अडकू शकतात, हे नेहमी आठवणीत असू द्या. त्यामुळे, लैंगिक भावनांना चाळवणारी पुस्तके, मासिके, चित्रपट आणि संगीत यांमुळे वाईट वासना निर्माण होऊन शेवटी पाप घडू शकते याची जाणीव आपण ठेवावी. शुद्ध चालचलन ठेवण्यासाठी आपण आपल्या मनात ईश्‍वरी बुद्धीच्या गोष्टी भरल्या पाहिजेत.—याकोब ३:१७.

अनैतिकतेकडची वाटचाल

९-११. शलमोनाने वर्णन केल्यानुसार, एक तरुण पुरुष कशाप्रकारे अनैतिकतेच्या पाशात अडकतो?

बहुधा अनैतिकतेकडची वाटचाल ओळखता येते. त्या मार्गावरील प्रत्येक पावलाने आपले मागे फिरणे फार कठीण होऊन बसते. नीतिसूत्रे ७:६-२३ येथे त्याचे वर्णन कसे केले आहे ते पाहा. शलमोनाला एक “बुद्धीहीन तरुण पुरुष” किंवा चांगला हेतू नसलेला तरुण पुरुष दिसतो. तो तरुण “तिच्या [वेश्‍येच्या] घराच्या कोनाजवळून जाणाऱ्‍या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने, संध्याकाळी दिवस मावळता, रात्रीच्या काळोखात, निबिड अंधकारात गेला.” ही त्याची पहिली चूक होती. संध्याकाळच्या वेळी तो उगाच कोणत्याही आळीत फिरत नव्हता तर जेथे सहसा वेश्‍या असते त्या आळीत तो फिरत होता.

१० नंतर त्या वचनात म्हटले आहे: “तेव्हा वेश्‍येचा पोषाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली.” साहजिकच त्याने तिला पाहिले असेल. तो पटकन तिथून निघून घरी जाऊ शकत होता. पण त्याला ते जमले नाही कारण आता काढता पाय घेणे पहिल्यापेक्षा अधिकच कठीण होते. त्यात तो मनाचा दुर्बळ. ती त्याला धरून त्याचे चुंबन घेते. तो प्रतिकार करत नाही. मग तो तिचे मोहक बोलणेही ऐकतो: “मला शांत्यर्पणे करावयाची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले.” त्या काळी शांत्यर्पणांमध्ये मांस, पीठ, तेल आणि द्राक्षारस असायचे. (लेवीय १९:५, ६; २२:२१; गणना १५:८-१०) ती जणू असे सांगत असावी की तिला आध्यात्मिक गोष्टींची कदर आहे आणि तिच्या घरात खाण्यापिण्याच्या उत्तमोत्तम गोष्टी देखील आहेत. मग ती त्याला गळ घालते: “ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू.”

११ पुढे काय झाले असावे हे कोणालाही सांगता येईल. तिने “आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले” आणि तो लागलीच तिच्या मागे चालला, “जसा बैल कापला जाण्यास जातो” व ‘जसा पक्षी पाशाकडे धाव घेतो.’ अखेरीस शलमोन म्हणतो: ‘पाश त्याचा जीव घेण्याकरिता आहे हे तो जाणत नाही.’ त्याचा जीव किंवा त्याचा प्राण धोक्यात आहे कारण “जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” (इब्री लोकांस १३:४) आज सर्वांकरता, मग स्त्रिया असोत किंवा पुरूष हा किती जोरदार धडा आहे! देवाला असंतुष्ट करणाऱ्‍या मार्गावर आपण पाऊलसुद्धा ठेवू नये.

१२. (अ) “बुद्धीहीन” यासाठी वापरलेल्या मूळ इब्री शब्दाचा काय अर्थ होतो? (ब) नैतिक विषयांच्या बाबतीत आपण आपले मन दृढ कसे करू शकतो?

१२ लक्षात घ्या की, त्या अहवालातला तरुण पुरुष “बुद्धीहीन” होता. याकरता वापरलेल्या मूळ इब्री शब्दाचा अर्थ असा होतो की, त्याच्या जीवनातले विचार, वासना, जिव्हाळा, भावना आणि ध्येये देवाला संतुष्ट करणारी नव्हती. त्याच्या दुर्बळ मनामुळे त्याचे भारी नुकसान झाले. या ‘शेवटल्या काळच्या’ कठीण दिवसांमध्ये नैतिक विषयांच्या बाबतीत मन दृढ करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. (२ तीमथ्य ३:१) पण आपली मदत करण्यासाठी देवाने व्यवस्था केली आहे. योग्य मार्गाने जाण्याचे उत्तेजन देण्यासाठी आणि आपल्यासारखी ध्येये असलेल्या इतरांची सोबत लाभावी म्हणून त्याने ख्रिस्ती मंडळीतल्या सभांची व्यवस्था केली आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५) तसेच मंडळीतले वडील आपली काळजी घेतात आणि धार्मिकतेचे मार्ग आपल्याला शिकवतात. (इफिसकर ४:११, १२) शिवाय, देवाचे वचन, बायबल देखील आपल्या मार्गदर्शनाकरता दिले आहे. (२ तीमथ्य ३:१६) आणि पवित्र आत्म्याची मदत मिळण्यासाठी आपण केव्हाही प्रार्थना करू शकतो.—मत्तय २६:४१.

दावीदाच्या पापांपासून धडा

१३, १४. राजा दावीदाच्या हातून गंभीर पाप कसे घडले?

१३ खेदाची गोष्ट अशी आहे की, देवाच्या सेवेत मोलाची कामगिरी बजावणारे सेवकही लैंगिक अनैतिकतेच्या पाशात गुरफटले गेले आहेत. असाच एक सेवक होता राजा दावीद. त्याने कित्येक दशकांपर्यंत देवाची विश्‍वासूपणे सेवा केली होती. त्याचे देवावर खूप प्रेम होते यात काहीच शंका नाही. तरीही, त्याने पाप केले. शलमोनाने वर्णन केलेल्या तरुण पुरुषाप्रमाणे दावीदानेही अशाच मार्गावर चालून पाप केले आणि आपले एक पाप लपवण्यासाठी आणखी कितीतरी पापे केली.

१४ त्या वेळी दावीद कदाचित पन्‍नाशीत असावा. एकदा त्याने आपल्या गच्चीवरून बथशेबाला आंघोळ करताना पाहिले. ती दिसायला फार सुंदर होती. त्याने तिच्याविषयी चौकशी केली. तिचा पती, उरीया अम्मोन्यांच्या राब्बा नगराला वेढा घातलेल्या सैन्यात होता असे त्याला कळाल्यावर दावीदाने तिला आपल्या महालात बोलावून घेतले आणि तिच्याशी संग केला. पण समस्या आणखीनच गुंतागुंतीची झाली—तिला गर्भ राहिला. दावीदाने मग उरीयाला युद्धातून बोलावून घेतले; त्याला वाटले की उरीया एक रात्र आपल्या पत्नीबरोबर राहील. आणि मग सगळ्यांना वाटेल की उरीयामुळेच ती गरोदर राहिली. पण उरीया आपल्या घरी गेलाच नाही. आता काय करावे हे दावीदाला कळत नव्हते. आपले पाप झाकण्यासाठी त्याने उरीयाला पुन्हा राब्बाला पाठवले आणि सेनापतीसाठी त्याच्या हातून एक चिठ्ठी पाठवली. त्या चिठ्ठीत म्हटले होते की, उरीयाला युद्धाच्या तोंडी ठेवावे म्हणजे तो ठार होईल. अशाप्रकारे उरीया ठार मारला गेला. आणि सर्वांना बथशेबाच्या गरोदरपणाविषयी कळण्याआधीच दावीदाने तिच्याशी लग्न केले.—२ शमुवेल ११:१-२७.

१५. (अ) दावीदाचे पाप कसे उघड करण्यात आले? (ब) नाथानाने दावीदाची चूक त्याच्या ध्यानात आणून दिली तेव्हा दावीदाची काय प्रतिक्रिया होती?

१५ दावीदाचे पाप फार सफाईने झाकले गेले, कोणाला काहीच कळाले नाही असे त्या वेळी वाटले. कित्येक महिने असेच उलटले. नंतर बथशेबाला एक पुत्र जन्मला. ३२ वे स्तोत्र जर हीच घटना लक्षात ठेवून दावीदाने लिहिली असेल तर त्याचा विवेक त्याला नक्कीच बोचत होता असे आपण म्हणू शकतो. (स्तोत्र ३२:३-५) देवाच्या नजरेतून मात्र त्याचे हे पाप लपले नाही. बायबल म्हणते: “दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्‍वराची त्याजवर इतराजी झाली.” (२ शमुवेल ११:२७) मग यहोवाने नाथानाला दावीदाकडे पाठवले आणि नाथानाने दावीदाशी समजदारीने त्या घटनेविषयी बातचीत केली. दावीदाने लागलीच आपली चूक कबूल केली आणि यहोवाला क्षमेची याचना केली. त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवासोबत त्याचा पुन्हा एकदा चांगला नातेसंबंध बनला. (२ शमुवेल १२:१-१३) यहोवाकडून मिळालेली सुधारणूक दावीदाने झिडकारली नाही. परंतु, स्तोत्र १४१:१५ येथे सांगितल्याप्रमाणे, “नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही” अशी मनोवृत्ती त्याने दाखवली.

१६. पातकांच्या बाबतीत शलमोनाने कोणती ताकीद आणि सूचना दिली?

१६ दावीद आणि बथशेबाचा दुसरा पुत्र शलमोन याने देखील आपल्या पित्याच्या जीवनातील या घटनेचा विचार केला असावा. त्याने नंतर असे लिहिले: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीतिसूत्रे २८:१३) आपल्या हातून गंभीर पाप घडले असेल तर या प्रेरित सूचनेकडे आपण कान दिला पाहिजे. कारण ही सूचना ताकीदही आहे आणि सल्लाही. आपण यहोवापुढे आपले पाप कबूल केले पाहिजे आणि मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली पाहिजे. पाप करत असलेल्या लोकांना सुधारणे ही वडिलांची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.—याकोब ५:१४, १५.

पापाचे परिणाम भोगणे

१७. यहोवा पापांची क्षमा करत असला तरी कशापासून आपले संरक्षण करत नाही?

१७ परंतु यहोवाने दावीदाला क्षमा केली. का? कारण दावीद मुळात निष्ठावान पुरुष होता, त्याने इतरांना दया दाखवली होती आणि त्याचा पश्‍चात्ताप खरा होता. मात्र त्याने केलेल्या पापाचे वाईट परिणाम त्याला भोगावेच लागले. (२ शमुवेल १२:९-१४) आजही हीच गोष्ट खरी आहे. यहोवा पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांचे वाईट करत नाही; पण त्यांच्या चुकांमुळे होणाऱ्‍या वाईट परिणामांपासून तो त्यांचे रक्षणही करत नाही. (गलतीकर ६:७) जसे की, घटस्फोट, नको असलेले गरोदरपण, लैंगिकरित्या संक्रमित होणारे रोग आणि विश्‍वास व आदर गमावणे हे लैंगिक अनैतिकतेचे काही परिणाम पाप करणाऱ्‍याला भोगावेच लागतात.

१८. (अ) गंभीर प्रकारच्या लैंगिक दुर्वर्तनाविषयी काय करावे असा सल्ला पौलाने करिंथकराच्या मंडळीला दिला? (ब) पापी लोकांबद्दल यहोवा प्रीती आणि दया कशी दाखवतो?

१८ आपण स्वतः एखादे गंभीर पाप केले असले, तर त्याचे परिणाम भोगताना आपण खूप निराश होऊ शकतो. परंतु, आपण पश्‍चात्ताप करून देवाशी पुन्हा एकदा समेट घडवण्यासाठी मागेपुढे पाहू नये. पहिल्या शतकातील करिंथच्या मंडळीत आप्तसंभोग करणाऱ्‍या एका व्यक्‍तीला मंडळीतून काढून टाकावे असे पौलाने मंडळीतल्या लोकांना लिहिले होते. (१ करिंथकर ५:१, १३) मात्र त्या व्यक्‍तीने खरा पश्‍चात्ताप दाखवल्यावर पौलाने करिंथ मंडळीला म्हटले: “तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. [आणि] त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी [तुम्ही] त्याची खातरी करून द्या.” (२ करिंथकर २:५-८) या प्रेरित सल्ल्यातून यहोवाला पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पापी लोकांबद्दल किती प्रेम आणि दया वाटते हे दिसून येते. स्वर्गातील स्वर्गदूतांना देखील पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पापी माणसाबद्दल आनंद होतो.—लूक १५:१०.

१९. चूक केल्याचा पस्तावा झाल्यामुळे कोणता फायदा होऊ शकतो?

१९ चूक केल्यामुळे दुःख तर होतेच परंतु त्याचा पस्तावा झाल्यामुळे स्वतःला ‘सांभाळण्यास आणि दुष्टतेकडे न वळण्यास’ आपल्याला मदत मिळू शकते. (ईयोब ३६:२१) पापाच्या कटू अनुभवांवरून धडा शिकून आपण पुन्हा एकदा चूक करू नये. दावीदाने देखील इतरांना सल्ला देताना आपल्याच पापमय वर्तनाचे उदाहरण दिले. तो म्हणाला: “म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील.”—स्तोत्र ५१:१३.

यहोवाची सेवा करण्यात आनंद

२०. देवाच्या धार्मिक गरजा पूर्ण केल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

२० येशू म्हणाला: “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.” (लूक ११:२८) देवाच्या धार्मिक गरजा पूर्ण केल्याने आपल्याला आता आणि भवितव्यात अनंतकाळापर्यंत आनंद मिळेल. आपण आपले चालचलन शुद्ध राखले असल्यास यहोवाने दिलेल्या तरतूदींचा फायदा घेऊन आपण हेच चालचलन टिकवून ठेवू या. पण आपल्या हातून अनैतिकता घडली असली तरी आपल्याला हा दिलासा मिळू शकतो की मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना यहोवा क्षमा करतो. तसेच आपण असा निर्धार करावा की आपण पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही.—यशया ५५:७.

२१. प्रेषित पेत्राच्या कोणत्या सल्ल्यामुळे आपल्याला शुद्ध चालचलन राखायला मदत मिळेल?

२१ लवकरच या अधार्मिक जगाचे, त्याच्या अनैतिक चालीरीती आणि प्रथांसहित नामोनिशाण मिटवले जाईल. शुद्ध चालचलन ठेवल्याने आपल्याला आता तसेच अनंतकाळापर्यंत फायदा होईल. प्रेषित पेत्राने लिहिले: “म्हणून प्रियजनहो, ह्‍या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. . . . ह्‍या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहांत सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्‍यासाठी जपून राहा.”—२ पेत्र ३:१४, १७.

तुम्हाला स्पष्टीकरण देता येईल का?

• नैतिकरित्या शुद्ध राहणे कठीण का असू शकते?

• उच्च नैतिक दर्जांनुसार जगण्यासाठी आपण केलेला दृढनिश्‍चय कोणकोणत्या मार्गांनी आपण आणखी पक्का करू शकतो?

• शलमोनाने उल्लेखलेल्या तरुण पुरुषाच्या पातकांपासून आपण कोणते धडे शिकू शकतो?

• पश्‍चात्तापाविषयी दावीदाचे उदाहरण आपल्याला काय शिकवते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

नैतिकतेबद्दल आपले मत इतरांना सांगितल्यामुळे बऱ्‍याच वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो

[१६, १७ पानांवरील चित्रे]

दावीदाने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला क्षमा केली