व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नैतिक मूल्ये घसरत चालली आहेत

नैतिक मूल्ये घसरत चालली आहेत

नैतिक मूल्ये घसरत चालली आहेत

“पूर्वी असं कधीच होत नव्हतं, लोभामुळे लोक नैतिकता विसरून गेले आहेत,” असे जर्मनीचे भूतपूर्व चान्सलर हेलमूट श्‍मित म्हणाले. तेव्हा ते, अलिकडेच सरकारी अधिकाऱ्‍यांच्या भ्रष्टाचाराविषयी बातमीपत्रात आलेल्या ठळक बातम्यांबद्दल बोलत होते.

पुष्कळ लोकांना हेलमूट यांचे बोलणे पटेल. आज लोकांमध्ये नीतीच राहिली नाही. पण देवाचे वचन बायबल यात नीतिविषयक नियम आहेत; बरोबर काय आणि चूक काय याबद्दलचे मार्गदर्शन त्यात आहे. एक काळ असा होता जेव्हा लोक हे नियम पाळत असत. पण आज बायबलमधील या नियमांना धाब्यावर बसवण्यात आले आहे. स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणाऱ्‍या राष्ट्रांचीही हीच गत आहे.

बायबलमधील नीतिनियम आजही लागू होतात का?

आपण ईमानदार व एकनिष्ठ असले पाहिजे अशी शिकवण बायबल देते. पण आज जगात फसवेगिरी, भ्रष्टाचार आणि लबाडी सर्रास चालते. लंडनच्या द टाईम्सने अशी बातमी दिली, की काही गुप्त पोलिसांनी “जप्त केलेले अंमली पदार्थ पुन्हा विकण्यासाठी किंवा अंडरवर्ल्डच्या मोठमोठ्या डॉनविरुद्धचा पुरावा नष्ट करण्याकरता प्रत्येक वेळेस सत्तर लाख रुपये लाच घेतल्याचे म्हटले जाते.” ऑस्ट्रियात तर विमा मिळवण्याकरता फसवेगिरी करणे अगदी सामान्य झाले आहे. आणि जर्मनीतील वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधकांना, “जर्मन विज्ञान क्षेत्रातील घोटाळ्याच्या सर्वात धक्कादायक प्रकरणाबद्दल कळाले तेव्हा बरीच खळबळ माजली.” जर्मन जनुक वैज्ञानिकांपैकी ‘सर्वोत्कृष्ट’ समजल्या जाणाऱ्‍या एका प्राध्यापकावर मोठ्या प्रमाणात खोटे रिपोर्ट आणि बनावट आकडेवारी सादर केल्याचा आरोप करण्यात आला.

बायबलमध्ये, वैवाहिक सोबत्यांना आमरण एकमेकांना विश्‍वासू राहण्यास सांगण्यात आले आहे कारण बायबलच्या नीतीनियमांनुसार विवाह हे कायमचे बंधन आहे. पण आज, कोर्टात जाऊन घटस्फोट घेणाऱ्‍या वैवाहिक जोडप्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ख्राईस्ट इन डर गेगेनवॉर्ट (समकालीन ख्रिश्‍चन) नावाच्या एका कॅथलिक बातमीपत्रकात अशी बातमी आली होती, की “‘रूढिप्रिय’ म्हटल्या जाणाऱ्‍या स्वीत्झरलँडमध्येही घटस्फोटांची संख्या वाढत चालली आहे.” नेदरलँड्‌समध्ये, एकूण विवाहांपैकी ३३ टक्के विवाहांचा घटस्फोटाद्वारे अंत होतो. गेल्या काही वर्षांत जर्मनीत होणारे सामाजिक बदल पाहणारी एक स्त्री चिंतेच्या स्वरात म्हणाली: “आजकाल लग्न करणं हे जुनाट विचारसरणीचं लक्षण समजलं जातं. मरेपर्यंत सोबत राहण्याच्या इराद्याने आजकाल कोणी लग्न करत नाही.”

परंतु, याचा अर्थ असा होत नाही, की बायबलमधील नीतिनियम सर्वच लोकांनी धुडकावले आहेत. आज जगात लाखो लोक आहेत जे बायबलमधील नीतिनियमांना भरवसालायक आणि आधुनिक दिवसांतही लागू होणारे असे मानतात. स्विस-जर्मन सीमेवर राहणाऱ्‍या एका विवाहित जोडप्याला दिसून आले, की बायबलच्या नीतिनियमांनुसार जगल्याने त्यांचे वैवाहिक जीवन सुखी झाले. त्यांचे म्हणणे आहे, की त्यांच्या “जीवनातील हरएक पैलूसाठी एकच मार्गदर्शक आहे. व ते मार्गदर्शक म्हणजे बायबल.”

तुम्हालाही या जोडप्याप्रमाणेच वाटते का? बायबल हे खरोखरच आपले मार्गदर्शन करू शकते का? बायबलमधील नीतीनियम आजच्या जगातही उपयुक्‍त आहेत का?