करिंथकर यांना पहिलं पत्र ७:१-४०

  • अविवाहित आणि विवाहित असलेल्यांना सल्ला (१-१६)

  • तुम्हाला बोलावण्यात आलं त्या स्थितीतच राहा (१७-२४)

  • विधवा आणि अविवाहित असलेले (२५-४०)

    • अविवाहित राहण्याचे फायदे (३२-३५)

    • “फक्‍त प्रभूमध्ये” लग्न (३९)

 आता, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही मला लिहिलं होतं, त्यांबद्दल मी असं म्हणीन की पुरुषाने स्त्रीला स्पर्श* न करणंच बरं आहे. २  पण अनैतिक लैंगिक कृत्यं* करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे, प्रत्येक पुरुषाला स्वतःची बायको+ आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा नवरा असावा.+ ३  नवऱ्‍याने आपल्या बायकोला तिचा हक्क द्यावा आणि त्याचप्रमाणे बायकोनेही आपल्या नवऱ्‍याला त्याचा हक्क द्यावा.+ ४  बायकोला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर तिच्या नवऱ्‍याला आहे. त्याचप्रमाणे नवऱ्‍यालाही आपल्या शरीरावर अधिकार नाही, तर त्याच्या बायकोला आहे. ५  एकमेकांचा हा हक्क नाकारू नका. पण प्रार्थनेसाठी वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळासाठी असं केलं, तरी पुन्हा एकत्र या. म्हणजे, तुमच्या असंयमामुळे सैतान तुम्हाला सतत मोहात पाडणार नाही. ६  पण मी फक्‍त ही परवानगी देत आहे, आज्ञा नाही. ७  माझी तर अशी इच्छा आहे की सगळ्यांनी माझ्यासारखं असावं. तरीपण, प्रत्येकाला देवाकडून एक खास देणगी मिळालेली आहे,+ कोणाला या प्रकारची, तर कोणाला दुसऱ्‍या प्रकारची. ८  आता, विधवांना आणि अविवाहित असलेल्यांना मी असं म्हणतो, की ते माझ्यासारखेच राहिले तर बरं होईल.+ ९  पण जर त्यांना संयम ठेवता येत नसेल तर त्यांनी लग्न करावं. कारण वासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न केलेलं बरं.+ १०  जे विवाहित आहेत, त्यांना मी असं सांगतो, खरंतर मी नाही, तर प्रभू असं सांगतो की बायकोने आपल्या नवऱ्‍यापासून वेगळं होऊ नये.+ ११  पण जर ती वेगळी झालीच तर तिने एकतर अविवाहित राहावं, किंवा मग आपल्या नवऱ्‍यासोबत समेट करावा; आणि नवऱ्‍यानेही आपल्या बायकोला सोडू नये.+ १२  पण इतरांना मी म्हणतो, आणि हे प्रभू नाही, तर मी म्हणतो:+ एखाद्या बांधवाची बायको विश्‍वासात नसेल, पण त्याच्यासोबत राहायला तयार असेल, तर त्याने तिला सोडू नये. १३  आणि जर एखाद्या स्त्रीचा नवरा विश्‍वासात नसेल, पण तिच्यासोबत राहायला तयार असेल, तर तिने आपल्या नवऱ्‍याला सोडू नये. १४  कारण विश्‍वासात नसलेला नवरा, आपल्या बायकोशी झालेल्या विवाहामुळे पवित्र ठरतो आणि विश्‍वासात नसलेली बायको, आपल्या नवऱ्‍याशी झालेल्या विवाहामुळे पवित्र ठरते; नाहीतर तुमची मुलं अशुद्ध ठरली असती, पण आता ती पवित्र आहेत. १५  पण विश्‍वासात नसलेल्या सोबत्याने स्वतःहून सोडून जायचं* ठरवलं, तर त्याला जाऊ द्या; अशा परिस्थितीत, ख्रिस्ती भावावर किंवा बहिणीवर कोणतंही बंधन नाही. देवाने तुम्हाला शांतीसाठी बोलावलं आहे.+ १६  विवाहित स्त्रीला मी विचारतो, तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्‍याचं तारण होणार नाही हे तुला कसं माहीत?*+ आणि विवाहित पुरुषाला मी विचारतो, तुझ्यामुळे तुझ्या बायकोचं तारण होणार नाही हे तुला कसं माहीत?* १७  तरीसुद्धा, जसं प्रत्येकाला यहोवाने* वाटून दिलं आहे आणि जसं प्रत्येकाला बोलावलं आहे, तसं त्याने चालावं.+ सगळ्या मंडळ्यांना मी हाच आदेश देतो. १८  एखाद्याची आधीच सुंता* झालेली असताना त्याला बोलावण्यात आलं होतं का?+ त्याने तसंच राहावं. किंवा एखाद्याची सुंता झालेली नसताना त्याला बोलावण्यात आलं होतं का? तर त्याने सुंता करू नये.+ १९  कारण सुंता झालेली असणं महत्त्वाचं नाही आणि सुंता झालेली नसणं हेही महत्त्वाचं नाही;+ जर काही महत्त्वाचं आहे, तर ते म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणं.+ २०  प्रत्येकाला ज्या स्थितीत बोलावण्यात आलं होतं, त्याने त्याच स्थितीत राहावं.+ २१  तू दास असताना तुला बोलावण्यात आलं होतं का? त्याची चिंता करू नकोस.+ पण स्वतःची सुटका करून घ्यायची संधी मिळालीच, तर ती सोडू नकोस. २२  कारण ज्याला दास असताना प्रभूमध्ये बोलावण्यात आलं होतं, तो एक स्वतंत्र माणूस आहे आणि तो प्रभूचा आहे;+ त्याच प्रकारे ज्याला स्वतंत्र असताना बोलावण्यात आलं होतं, तो ख्रिस्ताचा दास आहे. २३  तुम्हाला किंमत देऊन विकत घेण्यात आलं आहे.+ म्हणून माणसांचे दास व्हायचं सोडून द्या. २४  बांधवांनो, प्रत्येकाला ज्या स्थितीत बोलावण्यात आलं होतं, त्याने देवासमोर त्याच स्थितीत राहावं. २५  आता, जे अविवाहित* आहेत त्यांच्याबद्दल माझ्याकडे प्रभूकडून कोणतीही आज्ञा नाही. पण विश्‍वासू राहण्यासाठी प्रभूने ज्याच्यावर दया दाखवली, तो मी आपलं मत सांगतो.+ २६  मला तरी असं वाटतं, की सध्याची कठीण परिस्थिती लक्षात घेतली, तर एखाद्या माणसाने तो आहे त्या स्थितीतच राहणं सगळ्यात चांगलं ठरेल. २७  तू बायकोशी बांधलेला आहेस का? मग, मुक्‍त व्हायचा प्रयत्न करू नकोस.+ तू बायकोपासून मुक्‍त झाला आहेस का? मग लग्न करायचा प्रयत्न करू नकोस. २८  पण तू लग्न केलंस, तरी ते पाप ठरणार नाही. आणि जर कौमार्यात असलेल्या एखाद्याने लग्न केलं, तर अशी व्यक्‍ती कोणतंही पाप करत नाही. पण जे लग्न करतील त्यांना शारीरिक दुःखं सहन करावी लागतील आणि मी तुम्हाला त्यांपासून वाचवायचा प्रयत्न करत आहे. २९  शिवाय बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की उरलेला वेळ कमी करण्यात आला आहे.+ म्हणून यापुढे, ज्याला बायको आहे त्याने बायको नसल्यासारखं असावं, ३०  आणि जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखं, जे आनंदात आहेत त्यांनी आनंदात नसल्यासारखं आणि जे विकत घेतात त्यांनी विकत घेतलेल्या गोष्टींवर मालकी नसल्यासारखं असावं. ३१  तसंच, जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा पूर्णपणे उपयोग करत नसल्यासारखं असावं. कारण या जगाचं दृश्‍य बदलत आहे. ३२  खरंतर, तुम्ही चिंतांपासून मुक्‍त असावं अशी माझी इच्छा आहे. अविवाहित माणूस प्रभूच्या गोष्टींबद्दल, म्हणजे प्रभूचं मन कसं आनंदित करता येईल याबद्दल चिंता करतो. ३३  पण विवाहित माणूस जगातल्या गोष्टींबद्दल, म्हणजे आपल्या बायकोला कसं खूश करता येईल याबद्दल चिंता करतो.+ ३४  त्याचं मन विभागलेलं आहे. तसंच, अविवाहित स्त्री आणि कुमारीही, शरीराने आणि मनाने शुद्ध राहता यावं म्हणून प्रभूच्या गोष्टींबद्दल चिंता करते.+ पण विवाहित स्त्री ही जगाच्या गोष्टींबद्दल, म्हणजे आपल्या नवऱ्‍याला कसं खूश करता येईल याबद्दल चिंता करते. ३५  पण मी तुमच्यावर बंधनं घालण्यासाठी* नाही, तर तुमच्याच फायद्यासाठी हे सांगत आहे. यामुळे, तुम्हाला योग्य ते करायचं आणि लक्ष विचलित न होता प्रभूची सेवा करत राहायचं प्रोत्साहन मिळेल. ३६  पण अविवाहित राहिल्यामुळे* आपण चुकीचं वागत आहोत असं जर कोणाला वाटत असेल आणि त्याच्या ऐन तारुण्याचा काळ ओसरला असेल, तर त्याने लग्न केलेलं बरं. तो पाप करत नाही.+ ३७  पण जर एखाद्याचं मन स्थिर असेल आणि त्याला लग्न करायची गरज वाटत नसेल, आणि त्याचं स्वतःवर नियंत्रण असून त्याने अविवाहित राहायचं* मनात ठरवलं असेल, तर तो योग्यच करतो.+ ३८  त्याच प्रकारे, जो लग्न करतो* तो चांगलं करतो, पण जो लग्न करत नाही तो आणखी चांगलं करतो.+ ३९  नवरा जिवंत असेपर्यंत बायको त्याच्याशी बांधलेली आहे.+ पण जर तिच्या नवऱ्‍याचा मृत्यू झाला, तर तिची इच्छा असेल त्या पुरुषाशी लग्न करायला ती मोकळी आहे, पण फक्‍त प्रभूमध्ये.+ ४०  खरंतर, माझ्या मते ती आहे तशीच राहिली, तर जास्त सुखी होईल; आणि नक्कीच माझ्यावरही देवाची पवित्र शक्‍ती* आहे असं मला वाटतं.

तळटीपा

म्हणजे, लैंगिक संबंध.
ग्रीक, पोर्निया अनेकवचन. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “वेगळं व्हायचं.”
किंवा “नवऱ्‍याला वाचवलं जाणार नाही हे तुला कसं माहीत?”
किंवा “बायकोला वाचवलं जाणार नाही हे तुला कसं माहीत?”
अति. क५ पाहा.
किंवा “कौमार्यात.”
शब्दशः “फास घालण्यासाठी.”
किंवा “आपल्या कौमार्याच्या बाबतीत.”
किंवा “आपलं कौमार्य टिकवून ठेवायचं.”
किंवा “लग्न करून आपलं कौमार्य देतो.”