व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या विवाहास तुम्ही वाचवू शकता!

तुमच्या विवाहास तुम्ही वाचवू शकता!

तुमच्या विवाहास तुम्ही वाचवू शकता!

बायबलमध्ये विपुल प्रमाणात व्यावहारिक सल्ला दिला आहे जो पती-पत्नींच्या फायद्याचा आहे. यात नवल करण्यासारखे काही नाही कारण बायबल ज्याने प्रेरित केले तोच विवाह संस्थेचा संस्थापक देखील आहे.

बायबलमध्ये विवाहाचे वास्तविक चित्र रेखाटले आहे. बायबल कबूल करते की पती-पत्नीला “हालअपेष्टा” भोगाव्या लागतील किंवा द न्यू इंग्लिश बायबल अनुवादानुसार त्यांना, “यातना व दुःख” होईल. (१ करिंथकर ७:२८) पण बायबल असेही म्हणते की, विवाहामुळे सुख, इतकेच काय तर अत्यानंद मिळू शकतो व मिळाला पाहिजे. (नीतिसूत्रे ५:१८, १९) हे दोन विचार विरोधात्मक नाहीत. त्यांच्यावरून एवढेच दिसून येते की, पती-पत्नीत कितीही गंभीर समस्या असल्या तरीही ते पुन्हा एकदा एकमेकांसोबत जवळचे, प्रेमपूर्ण नाते निर्माण करू शकतात.

तुमच्या विवाहात याचीच कमी आहे का? तुमच्या दोघांमध्ये पूर्वीप्रमाणे जवळीक आणि आनंद असण्याऐवजी आता दुःखाचे आणि असमाधानाचे नाते आहे का? बरीच वर्षे तुम्ही अशा प्रेमहीन स्थितीत घालवली असली तरी पूर्वीसारखा आनंद तुम्ही पुन्हा प्राप्त करू शकता. अर्थात, वास्तविक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. अपरिपूर्ण असलेल्या कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचा विवाह परिपूर्ण असू शकत नाही. परंतु, तुमच्या विवाहातील नकारात्मक गोष्टींवर मात करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.

पुढील माहिती वाचताना, तुमच्या विवाहाला कोणते मुद्दे लागू होतात ते शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या सोबत्याच्या उणिवांवर जोर देण्याऐवजी स्वतःला लागू करता येतील अशा सूचना किंवा शास्त्रवचनातील सल्ले निवडा. मग तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या वैवाहिक संबंधांत सुधारणा करणे तुम्हाला वाटते तितके कठीण नाही.

सर्वात आधी आपण मनोवृत्तीची चर्चा करू या कारण आपल्या पती अथवा पत्नीला वचनबद्ध असण्याबद्दल तुमचे काय मत आहे आणि तुमच्या सोबत्याप्रती तुमच्या काय भावना आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वचनबद्धतेबद्दल तुम्हाला काय वाटते

आपल्या विवाहात तुम्हाला सुधार घडवून आणायचा असेल तर दीर्घकाळाचा विचार करणे आवश्‍यक आहे. शेवटी, दोन व्यक्‍तींना कायमच्या बंधनात बांधण्याकरताच देवाने विवाहाची व्यवस्था केली. (उत्पत्ति २:२४; मत्तय १९:४, ५) तुमच्या सोबत्याबरोबरचा तुमचा नातेसंबंध कधीही सोडता येणाऱ्‍या नोकरीसारखा नाही; किंवा भाड्याच्या घराच्या करारासारखा नाही जो कधीही रद्द करून दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जाता येते. उलट, विवाहाच्या वेळी तुम्ही आपल्या सोबत्याला, जिवात जीव असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याची शपथ घेतली होती. येशू ख्रिस्ताने २,००० वर्षांआधी उद्‌गारलेल्या शब्दांवरून वैवाहिक वचनबद्धतेचे गांभीर्य दिसून येते; तो म्हणाला होता: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:६.

काहीजण कदाचित म्हणतील: ‘आम्ही तर एकत्रच राहतो. मग हा वचनबद्धतेचा पुरावा नाही का?’ कदाचित असेलही. परंतु, या लेखमालेच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे काही जोडपी केवळ नाईलाजास्तव एकमेकांसोबत राहतात; त्यांच्या विवाहातील प्रेम केव्हाच नाहीसे झाले आहे. पण आपला विवाह फक्‍त सुसह्‍य नव्हे तर आनंददायक बनवण्याचे ध्येय तुम्ही ठेवले पाहिजे. फक्‍त विवाह संस्थेला निष्ठावान असण्याला वचनबद्धता म्हणत नाहीत; तर ज्या व्यक्‍तीला प्रेम करण्याची आणि सांभाळण्याची शपथ तुम्ही घेतली आहे तिला निष्ठावान असणे देखील वचनबद्धता होय.—इफिसकर ५:३३.

तुम्ही आपल्या सोबत्याशी ज्या तऱ्‍हेने बोलता त्यावरूनही तुम्हाला वैवाहिक वचनबद्धतेचे किती गांभीर्य आहे हे दिसून येते. उदाहरणार्थ, रागाच्या भरात काही पती-पत्नी अविचारीपणाने असे म्हणतात: “मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये!” किंवा “तुझ्यापेक्षा, माझी किंमत असेल अशा व्यक्‍तीसोबत राहणे मला आवडेल!” खरे तर, पती-पत्नी असे फक्‍त धमकावण्यासाठी बोलतात, परंतु तरीही वचनबद्धतेला ते हानीकारक ठरते कारण त्यावरून असे सुचवले जाते की, वेगळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही; आणि असे बोलून दाखवणारी व्यक्‍ती वेळ आली तर सोडून जायला मागेपुढे पाहणार नाही.

तुमच्या विवाहात जर पुन्हा एकदा प्रेम फुलत जावे असे खरंच वाटत असेल तर अशा धमक्या कधीच देऊ नका. विचार करा, जर एखादे घर तुम्ही कोणत्याही दिवशी सोडणार असाल तर तुम्ही त्या घराची सजावट कराल का? मग, विवाह टिकण्याची खात्री नसल्यास तुमचा सोबती त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? तेव्हा अशा धमक्या देण्याऐवजी, समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करा.

एका स्त्रीने असेच केले. तिचे व तिच्या पतीचे संबंध देखील टोकाला गेले होते. ती सांगते, “मला कधीकधी त्यांचा खूप राग यायचा, पण संबंध तोडण्याचा मी कधीच विचार केला नाही. उलट आम्ही आमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. दोन वर्षं अतिशय अशांततेत काढल्यावर आज मी खरंच म्हणू शकते की आम्ही दोघंही पुन्हा एकदा सुखी आहोत.”

होय, फक्‍त एका छताखाली राहणे म्हणजे वचनबद्धता नाही. तर एकमेकांना साहाय्य करत, समान ध्येय गाठण्याकरता एकत्र मिळून काम करणे ही वचनबद्धता आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की सध्या तरी तुम्ही पती-पत्नी फक्‍त कर्तव्य म्हणून एकत्र आहात. तुम्हाला असे वाटत असल्यास, निराश होऊ नका. हरवलेले प्रेम पुन्हा एकदा मिळवणे अशक्य नाही. पण ते कसे मिळवता येईल?

सोबत्याचा आदर करणे

बायबल म्हणते: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे.” (इब्री लोकांस १३:४; रोमकर १२:१०) येथे “आदरणीय” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाची विविध रूपे बायबलमध्ये इतर ठिकाणी “प्रिय,” “बहुमानित,” आणि “मौल्यवान” म्हणून देण्यात आली आहेत. जी वस्तू आपल्याला अतिशय बहुमोल वाटते तिला आपण खूप जपतो; कधीकधी यासाठी त्रासही सहन करतो. उदाहरणार्थ, एखादी नवीन महागडी गाडी असलेल्या व्यक्‍तीच्या बाबतीत तुम्ही हे पाहिले असेल. गाडी नेहमी स्वच्छ, चकाचक दिसावी याची ते नेहमी काळजी घेतात. जरासा कोठे ओरखडा पडला तरी त्यांना वाटते जणू गाडीचे खूप मोठे नुकसान झाले! इतरजण आपल्या प्रकृतीलाही असेच जपतात. का? कारण चांगले आरोग्य त्यांना प्रिय असते आणि म्हणून ते त्याचे रक्षण करतात.

आपले वैवाहिक नाते देखील असेच जपा, त्याचे रक्षण करा. बायबल म्हणते की प्रेम “सर्वांची आशा धरते.” (१ करिंथकर १३:७) तेव्हा नकारात्मक विचार करू नका. “खरं तर आमचं एकमेकांवर प्रेमच नव्हतं,” किंवा “आमचं लग्न फार लवकर झालं,” किंवा “आपण काय करतोय हे तेव्हा कळत नव्हतं” असे म्हणून आपला नातेसंबंध कधीच सुधारू शकत नाही असा निष्कर्ष काढण्याऐवजी सकारात्मक विचार करून सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे व सबुरीने चांगल्या परिणामांची वाट पाहणे अधिक चांगले नाही का? एक विवाह सल्लागार म्हणतात: “माझ्याकडे येणारे पुष्कळजण म्हणतात, ‘आता मला हे असह्‍य झालंय!’ आपल्या नातेसंबंधात कुठे बिघाड आहे हे तपासून पाहण्याऐवजी ते सगळं काही वाऱ्‍यावर टाकून मोकळे होण्याच्या घाईत असतात. दोघांत अद्याप असलेल्या समान गोष्टी, साठवलेल्या आठवणी व अनुभव, आणि भविष्याची आशा यांपैकी कशाचाच ते विचार करत नाहीत.”

तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत काही आठवणी, अनुभव साठवले असतील, नाही का? आज तुमच्या विवाहात समस्या असल्या तरीसुद्धा त्या सुखद क्षणांचा, सोबत मिळून साध्य केलेल्या ध्येयांचा आणि एकमेकांच्या आधाराने पेललेल्या आव्हानांचा तुम्ही निश्‍चितच विचार करू शकता. या आठवणींना उजाळा द्या आणि आपला नातेसंबंध सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करण्याद्वारे तुम्ही आपल्या विवाहाचा आणि वैवाहिक सोबत्याचा आदर करता हे दाखवून द्या. वैवाहिक सोबती एकमेकांशी कसे वागतात याबाबतीत यहोवाला काळजी आहे, असे बायबल दाखवते. उदाहरणार्थ, मलाखी संदेष्ट्याच्या दिवसांत, आपल्या पत्नींशी विश्‍वासघात करणाऱ्‍या इस्राएली पतींची यहोवाने निर्भर्त्सना केली होती. (मलाखी २:१३-१६) आपल्या विवाहामुळे यहोवा देवाचा सन्मान व्हावा, अशी ख्रिश्‍चनांची इच्छा असते.

मतभेद—किती गंभीर?

प्रेमहीन विवाहांमध्ये एक मुख्य गोष्ट अशी दिसून येते की, पती-पत्नीला मतभेद नीट हाताळता येत नाहीत. कोणत्याही दोन व्यक्‍ती हुबेहूब सारख्या नसल्यामुळे सर्व विवाहांमध्ये मतभेद हे ठरलेलेच आहेत. पण उठता बसता ज्यांचे मतभेद होतात, अशा दांपत्यांमधील प्रेम काही वर्षांनी थंडावते. ते कदाचित असाही निष्कर्ष काढतील की, “आमची जोडीच योग्य नव्हती. म्हणूनच आमच्यात सतत भांडणं होत असतात.”

परंतु, मतभेद होतात म्हणजे वैवाहिक संबंध सुधारण्याची काही आशाच नाही असे नाही. मतभेद कसे हाताळले जातात हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. यशस्वी विवाहात पती-पत्नी, एका तज्ज्ञाच्या शब्दांत “जिवलग शत्रू” बनण्याऐवजी आपल्या समस्यांविषयी एकमेकांशी चर्चा करायला शिकले असतात.

‘जिभेचे सामर्थ्य’

तुम्हाला आणि तुमच्या सोबत्याला समस्यांविषयी चर्चा कशी करावी हे माहीत आहे का? दोघांनी त्यावर बोलायला तयार असले पाहिजे. खरे तर, ही एक कला आहे. आणि ती अवगत करणे इतके सोपे नाही. का? एक कारण असे आहे की, अपरिपूर्णतेमुळे आपण सर्वजण ‘बोलण्यात चुकतो.’ (याकोब ३:२) शिवाय, काहींचे लहानपण अशा घरांत गेले असेल जेथे आई किंवा वडील नेहमीच रागाच्या भरात बोलत असतील. त्यामुळे, संतप्त होऊन आरडाओरड करण्यात आणि शिवीगाळ करण्यात काही गैर नाही असे लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबले गेले असेल. अशा वातावरणात राहिलेला मुलगा “रागीट मनुष्य” बनतो व तो “क्रोधाविष्ट” असतो. (नीतिसूत्रे २९:२२) त्याचप्रमाणे, अशा वातावरणात राहिलेली मुलगी देखील ‘भांडखोर व रागीट बायको’ बनू शकते. (नीतिसूत्रे २१:१९, पं.र.भा.) लहानपणापासून अंगवळणी पडलेल्या वागण्याबोलण्याचा सवयी व मनात बसलेली विचारसरणी सहजासहजी बदलता येत नाही. *

त्याअर्थी, मतभेद यशस्वीरित्या हाताळण्याकरता आपले विचार वेगळ्या पद्धतीने मांडायला तुम्हाला शिकावे लागेल. ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. बायबलमधील एक नीतिसूत्र म्हणते: “जिभेच्या ठायी तारण्याचे व मारण्याचे सामर्थ्य आहे.” (नीतिसूत्रे १८:२१, कॉमन लँग्वेज) होय, कदाचित तुम्हाला ही बाब इतकी गंभीर वाटत नसेल, पण तुम्ही तुमच्या सोबत्याशी ज्या पद्धतीने बोलता त्यामुळे तुमचा नातेसंबंध एकतर नष्ट होऊ शकतो नाहीतर पुन्हा बहरू शकतो. बायबलमधील आणखी एक नीतिसूत्र म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.”—नीतिसूत्रे १२:१८.

याबाबतीत तुमच्यापेक्षा तुमचा जोडीदारच जास्त दोषी आहे असे वाटत असले तरीसुद्धा, वादविवाद होतात तेव्हा तुम्ही काय बोलता याचा विचार करा. तुमचे शब्द बोचणारे असतात, की जखमेवर फुंकर घालणारे असतात? त्यांमुळे राग आणखी भडकतो की उलट तो शांत होतो? बायबल म्हणते, “कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” पण त्या उलट, “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते.” (नीतिसूत्रे १५:१) कठोर शब्द म्हणजे आगीत तेलासारखे असतात—मग हे शब्द अगदी शांतपणे उद्‌गारले तरीही.

अर्थात, एखादी गोष्ट तुम्हाला खटकत असेल तर त्याविषयी तुमचे मत व्यक्‍त करण्याचा तुम्हाला हक्क आहे. (उत्पत्ति २१:९-१२) पण, हे तुम्ही खोचक, अपमानास्पद किंवा तुच्छ लेखणाऱ्‍या शब्दांचा उपयोग न करताही करू शकता. स्वतःवर ताबा ठेवा; “मला तुझा वीट आलाय” किंवा “आपलं लग्नच नसतं झालं तर बरं झालं असतं” अशी काही वाक्ये बोलायचीच नाहीत असे ठामपणे ठरवा. ख्रिस्ती प्रेषित पौल येथे जरी विवाहाबद्दल बोलत नव्हता तरी त्याने उल्लेख केल्याप्रमाणे “शब्दयुद्ध” आणि “[क्षुल्लक गोष्टींवरून, NW] एकसारखी भांडणे” यांच्यात अडकण्याचे आवर्जून टाळणे शहाणपणाचे आहे. * (१ तीमथ्य ६:४, ५, पं.र.भा.) जर तुमचा सोबती अशाप्रकारे बोलत असेल तरी तुम्हाला जशास तसे करण्याची गरज नाही. जोवर तुमच्यावर अवलंबून आहे तोवर शांतीने राहा.—रोमकर १२:१७, १८; फिलिप्पैकर २:१४.

हे कबूल आहे की, पारा चढतो तेव्हा तोंडावर ताबा ठेवणे कठीण जाते. बायबलचा लेखक याकोब म्हणतो, “जीभ ही आग आहे. . . . मनुष्यांपैकी कोणीहि जिभेला वश करावयास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे.” (याकोब ३:६, ८) मग, वातावरण संतप्त होत असल्याचे दिसताच तुम्ही काय करू शकता? क्रोध भडकण्याऐवजी थंड व्हावा यासाठी तुम्ही आपल्या सोबत्याशी कसे बोलू शकता?

संतप्त वातावरण थंड करणे

काहींना असे दिसून आले आहे की, आपल्या सोबत्याने काय केले यावर जोर देण्याऐवजी आपल्याला काय वाटते यावर जोर दिला तर राग शांत करून समस्या सोडवणे जास्त सोपे जाते. उदाहरणार्थ, “तू माझं मन दुखावलंस” किंवा “तुला असलं बोलणं शोभत नाही” असे काही म्हणण्याऐवजी “तुझ्या अशा बोलण्यानं मला खूप वाईट वाटलं” असे म्हणणे जास्त परिणामकारक ठरेल. अर्थात, आपल्या भावना व्यक्‍त करताना मात्र कटुतेच्या किंवा तिरस्काराच्या स्वरात काहीही बोलू नका. तुमचा मुख्य हेतू समोरच्या व्यक्‍तीवर हल्ला चढवण्याचा नव्हे तर समस्येवर हल्ला करण्याचा असला पाहिजे.—उत्पत्ति २७:४६–२८:१.

शिवाय, हेसुद्धा लक्षात असू द्या की, “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:७) दोन व्यक्‍ती एकाच वेळी बोलत असतात तेव्हा कोणीही कोणाचे ऐकत नसते आणि यातून काहीही साध्य होत नाही. म्हणून, तुमच्यावर ऐकण्याची पाळी येते तेव्हा ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे’ असा. त्याचप्रमाणे, “रागास मंद” असा. (याकोब १:१९) आपल्या सोबत्याच्या प्रत्येक कठोर शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नका किंवा ‘मन उतावळे होऊ देऊन रागावू नका.’ (उपदेशक ७:९) उलट, आपल्या सोबत्याच्या शब्दांमागील भावना समजण्याचा प्रयत्न करा. बायबल म्हणते, “विवेकाने [सुज्ञतेने] मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” (नीतिसूत्रे १९:११) सुज्ञता एखाद्या पतीला किंवा पत्नीला मतभेदामागील कारण पाहायला मदत करील.

उदाहरणार्थ, आपला पती आपल्याकरता पुरेसा वेळ काढत नाही अशी तक्रार एखादी पत्नी करते तेव्हा फक्‍त तासांचा किंवा मिनिटांचा प्रश्‍न नसतो. कदाचित तिला असे वाटत असेल की कोणी तिच्याकडे लक्ष देत नाही, कोणाला तिची कदर नाही. त्याचप्रमाणे, एखाद्या पत्नीने अविचारीपणाने केलेल्या खरेदीबद्दल पती रागावतो तेव्हा त्याला फक्‍त पैशांची काळजी नसते. तर पत्नीने निर्णय घेताना आपल्याला काही सांगितले नाही हे कदाचित त्याला आवडले नसेल. सुज्ञ पती किंवा पत्नी समस्येचा खोलवर विचार करून मूळ कारण शोधायचा प्रयत्न करतील.—नीतिसूत्रे १६:२३.

हे फक्‍त बोलायला सोपे आहे, करणे निश्‍चितच तितके सोपे नाही. काही वेळा, कितीही प्रयत्न केला तरीही एकमेकांना खोचक बोलले जाते आणि वातावरण संतप्त होतेच. पण याची चुणूक लागताच, तुम्ही नीतिसूत्रे १७:१४ मधील सल्ला उपयोगात आणू शकता: “भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.” राग शांत होईपर्यंत तो विषय काढू नका. पण, जोरदार भांडणे झाल्याशिवाय बोलणे कठीण असल्यास, कोणा जवळच्या प्रौढ व्यक्‍तीला सोबत घेऊन मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करणे अधिक योग्य असेल. *

वास्तविक दृष्टिकोन ठेवा

लग्नाआधी तुम्ही कल्पना केली होती तसा तुमचा विवाह नसला तरी निरुत्साहित होऊ नका. तज्ज्ञांचा एक गट म्हणतो: “बहुतेकांचा विवाह परमसुखाचा अनुभव नसतो. काही वेळा तो आनंददायक ठरतो तर इतर वेळा अत्यंत क्लेशमय असतो.”

होय, विवाह हा पुस्तकातल्या प्रेम कहाणीसारखा नसेल पण याचा अर्थ तो शोकान्तिका ठरला पाहिजे असेही नाही. काही वेळा, तुमच्या दोघांमध्ये तणावाचे वातावरण असेल पण काही असेही क्षण येतील जेव्हा तुम्ही आपले मतभेद बाजूला सारून एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटू शकता, मौज करू शकता आणि मित्रमैत्रिणींप्रमाणे एकमेकांशी गप्पा मारू शकता. (इफिसकर ४:२; कलस्सैकर ३:१३) अशा आनंदाच्या क्षणांत तुम्ही तुमचे थंडावलेले प्रेम पुन्हा प्रज्वलित करू शकता.

लक्षात असू द्या की, दोन अपरिपूर्ण मानवांचा परिपूर्ण विवाह असू शकत नाही. पण त्यांना काही प्रमाणात आनंद प्राप्त होऊ शकतो. समस्या असतानाही, तुमच्या दोघांमधील नातेसंबंध अत्यंत समाधानकारक ठरू शकतो. एक गोष्ट निश्‍चित आहे: तुम्ही आणि तुमचा सोबती दोघे प्रयत्न करायला, तडजोड करायला व स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवायला तयार असाल तर तुमचा विवाह वाचू शकेल असे खात्रीने म्हणता येईल.—१ करिंथकर १०:२४.

(g०१ १/८)

[तळटीपा]

^ अर्थात, विवाह सोबत्याशी कठोरपणे वागणाऱ्‍यांनी पालकांच्या वाईट आदर्शाची सबब सांगू नये. पण यावरून एखाद्या व्यक्‍तीची अशी प्रवृत्ती का बनते आणि ती बदलणे किती कठीण असू शकते हे समजण्यास मदत होते.

^ येथे “[क्षुल्लक गोष्टींवरून] एकसारखी भांडणे” असे भाषांतरित केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचे “आपसांतील तक्रारी” असेही भाषांतर केले जाऊ शकते.

^ यहोवाच्या साक्षीदारांना मंडळीतील वडील जन मोलाची मदत देतात. विवाहित जोडप्यांच्या खाजगी बाबींमध्ये लुडबुड करणे हे त्यांचे काम नसले तरी ते दांपत्यांना समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतात.—याकोब ५:१४, १५.

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

तुमचे शब्द बोचणारे असतात, की जखमेवर फुंकर घालणारे असतात?

[१० पानांवरील चौकट/चित्रे]

चेंडू जरा दमाने फेका

बायबल म्हणते: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:६) विवाहात तर हे तत्त्व निश्‍चितच लागू होते! उदाहरणार्थ: चेंडू खेळताना दुसऱ्‍या व्यक्‍तीला सहजपणे पकडता येईल अशाच तऱ्‍हेने तुम्ही तो फेकता. समोरच्या व्यक्‍तीला लागेल इतक्या जोराने तुम्ही तो फेकत नाही. आपल्या सोबत्याशी बोलताना हेच तत्त्व लागू करा. एकमेकांवर कटू शब्दांचा वर्षाव केल्याने इजा होईल हे निश्‍चित. त्या उलट, सौम्यतेने—रूचकर अशा तऱ्‍हेने बोला म्हणजे तुमच्या सोबत्याला तुमचा मुद्दा लगेच कळेल.

[११ पानांवरील चौकट/चित्र]

जुन्या आठवणींत रमा!

गतकाळातील पत्रे आणि कार्ड वाचा. फोटो पाहा. स्वतःला विचारा, ‘मी तिच्याकडे/त्याच्याकडे आकर्षित का झाले/झालो? त्याचे किंवा तिचे कोणते गुण मला सर्वात जास्त आवडत होते? आम्ही दोघे मिळून काय काय करत होतो? कोणत्या गमतीजमती करायचो?’ मग या सर्व आठवणींविषयी तुमच्या सोबत्याशी बोला. “आठवतं तुला/तुम्हाला . . . ” असे म्हणून संभाषण सुरू केले की, तुम्हाला व तुमच्या सोबत्याला एकमेकांबद्दल एकेकाळी असलेले प्रेम पुन्हा जागृत करण्यास मदत मिळेल.

[१२ पानांवरील चौकट]

नवीन सोबती पण समस्या त्याच

प्रेमहीन विवाहात आपण अडकलो आहोत असा विचार करणाऱ्‍या काही पती-पत्नीला दुसऱ्‍या सोबत्याशी नव्याने सुरवात करावीशी वाटते. परंतु, बायबलमध्ये व्यभिचाराचे खंडन करून म्हटले आहे की, व्यभिचार करणारी व्यक्‍ती, “अक्कलशून्य आहे” आणि ती स्वतःच ‘आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहते.’ (नीतिसूत्रे ६:३२) शेवटी, व्यभिचार करून पश्‍चात्ताप न करणारी व्यक्‍ती देवाच्या नजरेतून उतरते. आणि हे तर सर्वकाही गमवण्यासारखे आहे.—इब्री लोकांस १३:४.

व्यभिचारी व्यक्‍तीचा अक्कलशून्यपणा इतर गोष्टींतूनही दिसून येतो. एक गोष्ट म्हणजे, नवीन सोबत्यासोबत राहू लागल्यावरही त्या व्यभिचारी व्यक्‍तीला दिसून येईल की, त्याच्या किंवा तिच्या पूर्वीच्या विवाहात होत्या तशाच समस्या आताही आहेत. डॉ. डायना मेडवेड आणखी एक विचार करण्याजोगे कारण देतात; त्या म्हणतात, “तुमच्या नवीन सोबत्याला तुमच्याविषयी समजलेली पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही वेळ आल्यास अविश्‍वासू होऊ शकता. ज्या व्यक्‍तीला तुम्ही आदर दाखवण्याचे वचन दिले आहे तिला तुम्ही फसवू शकता, तुम्ही खोट्या सबबी देण्यात एकदम पटाईत आहात, दिलेले वचन सहजासहजी तोडू शकता, शारीरिक सुख किंवा इच्छा तृप्त करण्यासाठी तुम्ही सहजपणे मोहात पडू शकता हे त्याला किंवा तिला ठाऊक असते. . . . तुम्ही पुन्हा फसणार नाहीत असा विश्‍वास तुमचा नवीन सोबती कसा करणार?”

[१३ पानांवरील चौकट]

बायबलच्या नीतिसूत्रांमधील बुद्धीचे बोल

नीतिसूत्रे १०:१९: “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.”

रागाच्या भरात तुम्ही कदाचित उलटसुलट काहीही बोलाल आणि नंतर तुम्हाला त्याचा पस्तावा होईल.

नीतिसूत्रे १५:१८: “तापट मनुष्य तंटा उपस्थित करितो; मंदक्रोध झगडा शमवितो.”

आपल्या सोबत्याच्या मनाला लागेल असे आरोप केल्याने तुमचा सोबती आणखी चिडेल परंतु शांतपणे त्याचे किंवा तिचे ऐकून घेतल्याने तुम्ही दोघेही काहीतरी उपाय काढू शकाल.

नीतिसूत्रे १७:२७: “जो मितभाषण करितो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ति शांत तो समंजस असतो.”

आपला पारा चढत आहे असे वाटताच शांत राहणे बरे म्हणजे कडाक्याचे भांडण टळेल.

नीतिसूत्रे २९:११: “मूर्ख आपल्या मनांतील सर्व क्रोध व्यक्‍त करितो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवितो.”

आत्म-संयम फार आवश्‍यक आहे. रागाच्या भरात निर्दयपणे बोलल्यामुळे तुमचा सोबती तुमच्यापासून दुरावत जाईल.