व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आशेचे कारण आहे का?

आशेचे कारण आहे का?

आशेचे कारण आहे का?

“तणावपूर्ण विवाहांमधील एक मुख्य समस्या म्हणजे या दांपत्यांना निश्‍चितपणे असे वाटत असते, की त्यांच्या परिस्थितीमध्ये काहीच सुधार होऊ शकत नाही. असे पक्के मत बनल्यामुळे बदल घडून येणे कठीण होऊन बसते कारण सुधार करण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छाच राहिलेली नसते.”—डॉ. एरन टी. बेक.

असा विचार करा की, तुम्हाला काही त्रास होत आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाता. तुम्हाला चिंता वाटते हे साहजिक आहे. कारण तो तुमच्या आरोग्याचा—कदाचित जीवनमरणाचा प्रश्‍न असेल. पण समजा, तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणतात, तुमची समस्या क्षुल्लक नाही परंतु घाबरण्याचे काही कारण नाही कारण त्यावर उपचार होऊ शकतो. डॉक्टर तुम्हाला असेही सांगतात की, काळजीपूर्वक योग्य आहार घेतला आणि नियमित व्यायाम केला तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. हे ऐकून तुम्हाला हायसे वाटेल आणि तुम्ही लगेच त्यांचा सल्ला पाळू लागाल!

आता या उदाहरणाची तुलना सदर विषयाशी करू या. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला त्रास होत आहे का? अर्थात, प्रत्येक विवाहात समस्या आणि मतभेद असतातच. त्यामुळे काही तणावाचे क्षण आल्यास तुमचा विवाह यशस्वी ठरला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण ही समस्या काही आठवडे, महिने किंवा काही वर्षांपर्यंत तशीच राहिली तर? साहजिकच तुम्हाला चिंता वाटू लागते; आणि हे योग्य आहे कारण ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. कारण तुमच्या वैवाहिक जीवनाचा तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, नैराश्‍य, कामात लक्ष न लागणे, मुलांची शाळेतील कामगिरी खालावणे या सर्व गोष्टींमागे वैवाहिक जीवनातील ताणतणाव हे एक मोठे कारण असू शकते असे समजले जाते. एवढेच नव्हे तर, ख्रिश्‍चनांना याचीही जाणीव आहे की, आपल्या सोबत्याबरोबरील संबंधाचा परिणाम देवाबरोबरील नातेसंबंधावर होऊ शकतो.—१ पेत्र ३:७.

तुमचे सोबत्याबरोबर पटत नाही याचा अर्थ तुमच्या परिस्थितीत काही सुधार होणे शक्यच नाही असे समजू नका. वैवाहिक जीवनात समस्या असतीलच या वास्तविकतेला तोंड दिले तर पती-पत्नी आपल्या समस्यांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहू शकतील आणि या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतील. आयझक नामक एक पती म्हणतात: “विवाहात उतार चढाव येणे, विवाहातील आनंद कमी जास्त होणे अगदी सामान्य आहे हे मला माहीत नव्हते. मला वाटायचं, की आमच्यातच काहीतरी दोष आहे!”

प्रेमहीन विवाह म्हणण्याइतपत तुमच्या समस्या वाढल्या असतील तरीसुद्धा ही परिस्थिती बदलता येते. या समस्या कित्येक वर्षांपासून असतील तर साहजिकच त्यांमुळे झालेल्या जखमा खोल असतील. तरीसुद्धा परिस्थितीत सुधार होईल अशी आशा करण्याचे एक फार मोठे कारण आहे. मात्र त्यासाठी सुधार घडवून आणण्याची इच्छा असणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर पती-पत्नीला दोघांना परस्पर संबंध सुधारण्याची खरोखरच इच्छा असेल तर त्यांच्यातील समस्या कितीही गंभीर असल्या तरी हे शक्य आहे. *

म्हणून स्वतःला असा प्रश्‍न करा: ‘एक समाधानकारक नातेसंबंध स्थापित करण्याची मला किती प्रबळ इच्छा आहे?’ तुम्ही आणि तुमचा सोबती आपल्या वैवाहिक संबंधांत सुधार घडवून आणण्याकरता प्रयत्न करायला तयार आहात का? आधी उल्लेखलेले डॉ. बेक म्हणतात: “वैवाहिक जीवनात अनेक समस्या असूनही पतीपत्नी मिळून जेव्हा आपल्या विवाहातील नकारात्मक बाबी सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि सकारात्मक गोष्टींवर जास्त जोर देतात तेव्हा त्यांच्यातील नातेसंबंध कसे आपोआप सुधारू लागतात हे पाहून मला पुष्कळदा आश्‍चर्य वाटले आहे.” परंतु, या प्रयत्नांत तुमचा सोबती तुम्हाला साथ देण्यास तयार नसेल तर? किंवा तुमच्यामध्ये काही समस्या आहे याची जाणीवच नसल्यासारखे तो किंवा ती वागत असेल तर? अशा परिस्थितीत तुमच्या एकट्याचा प्रयत्न व्यर्थ ठरेल का? मुळीच नाही! डॉ. बेक म्हणतात, “तुम्ही काही बाबतीत बदल केल्यास, तुमच्या सोबत्याला आपोआप बदल करण्याची प्रेरणा मिळेल—बहुतेकदा असे घडते.”

आमच्या बाबतीत असे घडणार नाही असा लगेच निष्कर्ष काढू नका. प्रयत्न करण्याआधीच हाय खाण्याची ही नकारात्मक वृत्तीच तुमच्या विवाहाला सर्वात जास्त घातक ठरू शकते! तुम्हा दोघांपैकी एकाला पहिले पाऊल उचलणे भाग आहे. तुम्ही हे पाऊल उचलाल का? एकदा सुरवात झाली की मग, तुमच्या सोबत्यालाही दिसून येईल की सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रयत्न करण्यात तुम्हाला सहकार्य देण्यात किती फायदा आहे.

तर मग, आपल्या विवाहास कोलमडण्यापासून वाचवण्यासाठी एकट्याने किंवा दोघांनी मिळून काय करता येईल? या प्रश्‍नाचे उत्तर प्राप्त करण्यात बायबल अतिशय साहाय्यकारी आहे. कसे ते आपण पाहू या. (g०१ १/८)

[तळटीप]

^ अर्थात, काही टोकाच्या समस्या उद्‌भवल्याने, योग्य कारणांमुळे पती-पत्नी वेगळे होऊ शकतात. (१ करिंथकर ७:१०, ११) शिवाय, व्यभिचाराच्या आधारावर घटस्फोट घेण्यास बायबल परवानगी देते. (मत्तय १९:९) परंतु, अविश्‍वासू सोबत्याकडून घटस्फोट घ्यायचा की नाही हा सर्वस्वी व्यक्‍तिगत प्रश्‍न आहे आणि इतरांनी विशिष्ट निर्णय घेण्यासाठी निर्दोष सोबत्यावर दबाव आणू नये.—वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकातली पृष्ठे १५८-६१ पाहा.