व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १०२

योहानने पाहिलेले दृष्टान्त

योहानने पाहिलेले दृष्टान्त

प्रेषित योहान पात्म बेटावर कैदेत होता, तेव्हा येशूने त्याला भविष्याबद्दल एका नंतर एक १६ दृष्टान्त किंवा चित्रं दाखवली. यहोवाचं नाव पवित्र कसं मानलं जाईल, त्याचं राज्य कसं येईल आणि जशी स्वर्गात होते तशी या पृथ्वीवरही त्याची इच्छा कशी पूर्ण होईल या गोष्टी त्याला दृष्टान्तांतून समजल्या.

यहोवा स्वर्गात एका वैभवशाली सिंहासनावर बसलेला आहे, असं योहानने एका दृष्टान्तात पाहिलं. यहोवाच्या आजूबाजूला २४ वडील होते. त्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि त्यांच्या डोक्यावर सोन्याचे मुकुट होते. सिंहासनातून वीजा चमकत होत्या आणि ढगांचा गडगडण्याचा आवाज ऐकू येत होता. ते २४ वडील यहोवासमोर खाली वाकून त्याची उपासना करत होते. दुसऱ्‍या एका दृष्टान्तात योहानने लोकांचा एक मोठा समूह पाहिला. हा समूह सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषांनी बनलेला होता. ते सर्व यहोवाची उपासना करत होते. कोकरा म्हणजे येशू सर्वांची काळजी घेत होता आणि त्यांना जीवनाच्या पाण्याकडे नेत होता. नंतर, येशू स्वर्गात राजा बनला आहे हे त्याने आणखी एका दृष्टान्तात पाहिलं. त्या वेळी येशूसोबत २४ वडीलही होते. मग त्यानंतरच्या दृष्टान्तात योहानने पाहिलं की येशूची अजगरासोबत, म्हणजे सैतानासोबत आणि त्याच्या दुरात्म्यांसोबत लढाई झाली. आणि येशूने त्या सर्वांना स्वर्गातून खाली पृथ्वीवर फेकून दिलं.

नंतर योहानने एक खूप सुंदर चित्र पाहिलं. त्या चित्रात कोकरा १,४४,००० (एक लाख चव्वेचाळीस हजार) जणांसोबत सीयोन डोंगरावर उभा होता. यासोबतच, त्याने एका देवदूताला पृथ्वीच्या अवती-भोवती फिरत असल्याचंही पाहिलं. तो देवदूत लोकांना देवाचं भय बाळगायला आणि त्याचा आदर करायला सांगत होता.

पुढच्या दृष्टान्तात त्याने हर्मगिदोनाचं युद्ध होत असल्याचं पाहिलं. या युद्धात येशूने त्याच्या सैन्यासोबत सैतानाच्या दुष्ट जगावर विजय मिळवला. शेवटल्या दृष्टान्तात योहानने पाहिलं, की स्वर्गात आणि पृथ्वीवर शांती होती. सैतान आणि त्याला साथ देणाऱ्‍यांचा नाश झाला होता. शेवटी, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व जण यहोवाचं नाव पवित्र मानत होते आणि फक्‍त त्याचीच उपासना करत होते.

“तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडेल, व तू तिची टाच फोडशील.”—उत्पत्ति ३:१५