व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६५

एस्तेर आपल्या लोकांचा जीव वाचवते

एस्तेर आपल्या लोकांचा जीव वाचवते

एस्तेर एक यहुदी मुलगी होती. ती पारसमधल्या शूशन नावाच्या शहरात राहत होती. खूप वर्षांआधी, नबुखद्‌नेस्सर तिच्या कुटुंबातल्या लोकांना यरुशलेममधून बंदी बनवून घेऊन आला होता. मर्दखय नावाच्या तिच्या चुलत भावाने तिला लहानाचं मोठं केलं होतं. मर्दखय हा पारसचा राजा अहश्‍वेरोश याच्या महालात काम करायचा.

अहश्‍वेरोश राजाला एक नवीन राणी हवी होती. त्यामुळे त्याच्या सेवकांनी राज्यातल्या सर्वात सुंदर स्त्रियांना त्याच्यापुढे आणलं. त्या स्त्रियांमध्ये एस्तेरसुद्धा होती. राजाने सर्व स्त्रियांमधून राणी होण्यासाठी, एस्तेरला निवडलं. पण मर्दखयने एस्तेरला सांगितलं, की ती एक यहुदी आहे हे तिने कोणालाही सांगू नये.

महालात हामान नावाचा एक गर्विष्ठ पुरुषही होता. त्याला सर्व सरदारांवर मुख्य म्हणून नेमण्यात आलं होतं. सर्वांनी त्याच्यापुढे झुकावं अशी त्याची इच्छा होती. पण मर्दखय त्याच्यापुढे झुकला नाही. यामुळे हामानला खूप राग आला आणि त्याला मर्दखयला मारून टाकायचं होतं. जेव्हा त्याला समजलं की मर्दखय एक यहुदी आहे, तेव्हा त्याने राज्यातल्या सगळ्या यहुद्यांना मारून टाकण्याचा कट रचला. त्याने राजाला म्हटलं: ‘यहुदी लोकांपासून आपल्याला धोका आहे. तुम्ही त्यांना मारून टाकलं पाहिजे.’ अहश्‍वेरोश हामानला म्हणाला: ‘तुला जे योग्य वाटतं, ते कर.’ असं म्हटल्यानंतर, राजाने हामानला याबद्दल एक कायदा बनवण्याचा अधिकार दिला. मग हामानने एक कायदा बनवला. त्यात अदार महिन्याच्या १३ व्या दिवशी, यहुदी लोकांना मारून टाकण्याचा हुकूम होता. जे काही घडत होतं, ते यहोवा पाहत होता.

एस्तेरला या कायद्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे मर्दखयने तिला या कायद्याची एक प्रत पाठवली. तसंच त्याने तिला असं सांगितलं: ‘राजाकडे जाऊन याबद्दल बोल.’ एस्तेरने म्हटलं: ‘खरंतर राजाने मला गेल्या ३० दिवसांपासून बोलवलेलं नाही. आणि जी व्यक्‍ती राजाने बोलवल्याशिवाय त्याच्याकडे जाते, तिला मारून टाकण्यात येतं. राजाने जर त्याचा राजदंड पुढे केला, तरच ती व्यक्‍ती वाचते. माझा जीव वाचेल की नाही हे तर मला माहीत नाही. पण तरीही मी जाईन.’

मग एस्तेर राजाला भेटायला गेली. राजाने जेव्हा तिला दुरून पाहिलं, तेव्हा त्याने त्याचा राजदंड पुढे केला. ती राजाकडे गेली आणि राजाने तिला विचारलं: ‘एस्तेर, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?’ तिने राजाला म्हटलं: ‘तुम्ही आणि हामान आज माझ्या इथे जेवायला यावं, अशी माझी इच्छा आहे.’ मग ते जेवत असताना तिने त्यांना दुसऱ्‍या दिवशीही येण्याचं आमंत्रण दिलं. दुसऱ्‍या दिवशी राजाने एस्तेरला पुन्हा एकदा विचारलं: ‘एस्तेर काय हवं तुला?’ तिने म्हटलं: ‘कृपा करून आम्हाला वाचवा. एक माणूस मला आणि माझ्या लोकांना मारून टाकणार आहे.’ राजाने तिला विचारलं: ‘सांग मला, कोण आहे तो दुष्ट माणूस?’ तिने त्याला म्हटलं: ‘हा हामानच आहे तो!’ हे ऐकून अहश्‍वेरोशला खूप राग आला. त्याने लगेच हामानला मारून टाकण्याची आज्ञा दिली.

पण हामानने जो कायदा बनवला होता, तो कोणीही बदलू शकत नव्हतं. स्वतः अहश्‍वेरोश राजासुद्धा नाही! त्यामुळे राजाने मर्दखयला सरदारांवर मुख्य म्हणून नेमलं. त्याने त्याला एक नवीन कायदा बनवण्याचा अधिकारही दिला. मर्दखयने बनवलेल्या कायद्यामुळे, यहुदी लोकांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली. ते हल्ला करणाऱ्‍यांविरुद्ध लढू शकत होते. मग, अदार महिन्याच्या १३ व्या दिवशी यहुदी लोकांनी त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवला. तेव्हापासून, यहुदी लोक दरवर्षी या विजयाचा उत्सव साजरा करू लागले.

“त्यांना व विदेश्‍यांना साक्ष मिळावी म्हणून माझ्यामुळे तुम्हाला राज्यपालांच्या व राजांच्या समोर आणलं जाईल.”—मत्तय १०:१८