व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९७

येशू राजाच्या रूपात येतो

येशू राजाच्या रूपात येतो

त्या दोघा आंधळ्या भिकाऱ्‍यांना बरे केल्यावर लवकरच, येशू जेरूसलेमजवळच्या एका लहान गावाला येतो. तो आपल्या दोन शिष्यांना सांगतो: ‘गावात जा. तिथं तुम्हाला एक शिंगरू दिसेल. त्याला सोडवून माझ्याकडे आणा.’

ते गाढव त्याच्याकडे आणल्यावर येशू त्यावर बसतो, आणि जवळच असलेल्या जेरूसलेमला जातो. तो शहराच्या जवळ आल्यावर, लोकांचा एक मोठा जमाव त्याला भेटायला येतो. त्यातले बहुतेक लोक आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरतात. इतर, खजुरीच्या डाहाळ्या तोडून त्याही रस्त्यात पसरतात. ते गजर करतात: ‘यहोवाच्या नावानं येणाऱ्‍या राजाला देव आशीर्वाद देवो!’

पूर्वी, लोकांना दर्शन देण्यासाठी इस्राएलातले नवे राजे गाढवाच्या शिंगरावर बसून जेरूसलेममध्ये प्रवेश करत असत. येशू तेच करत आहे. आणि येशू आपला राजा असावा, अशी इच्छा हे लोक प्रकट करताहेत. पण सर्वांनाच तो हवा आहे, असं नाही. येशू मंदिरात जातो तेव्हा घडलेल्या गोष्टीवरून आपल्याला हे कळतं.

मंदिरामध्ये येशू आंधळ्या नि पांगळ्या लोकांना बरे करतो. ते पाहून लहान मुलं मोठ्यानं येशूची स्तुती करतात. पण त्यामुळे याजकांना राग येतो. ते येशूला म्हणतात: ‘मुलं काय म्हणताहेत, ते तुला ऐकू येतं का?’

येशू उत्तरतो: ‘होय, येतं. “लहान मुलांच्या तोंडून देव स्तुती करवील,” असं बायबलमध्ये लिहिलेलं तुम्ही कधी वाचलं नाही का?’ त्यामुळे मुलं, देवानं नेमलेल्या राजाची स्तुती करत राहतात.

आपल्याला त्या लहान मुलांसारखं व्हावसं वाटतं, नाही का? काही लोक, देवाच्या राज्याबद्दल आपलं बोलणं थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण येशू लोकांसाठी करणार असलेल्या आश्‍चर्यजनक गोष्टींबद्दल आपण लोकांना सांगतच राहू.

येशू पृथ्वीवर असताना, राजा म्हणून शासन करण्याची त्याची वेळ आली नव्हती. ती वेळ कधी येईल? येशूच्या शिष्यांना माहिती करून घेण्याची इच्छा आहे. यानंतर आपण त्याबद्दल वाचू.