व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३३

तांबडा समुद्र ओलांडणं

तांबडा समुद्र ओलांडणं

काय होत आहे, पाहा! तांबड्या समुद्रावर काठी उगारणारा, मोशे आहे. त्याच्या बरोबर पैलतीरावर सुखरुप असलेले, इस्राएली आहेत. परंतु फारो आणि त्याचं सैन्य समुद्रात बुडतं आहे. हे कसं झालं, पाहू या.

आपण मागे पाहिल्याप्रमाणे, देवानं ईजिप्शियन लोकांवर १० पीडा आणल्यावर, फारोनं इस्राएलांना इजिप्त सोडून जायला सांगितलं. सुमारे ६,००,००० पुरुष तसंच स्त्रिया आणि मुलं निघून गेली. त्याचप्रमाणे, यहोवावर विश्‍वास ठेवू लागलेले मोठ्या संख्येचे इतर लोकही, इस्राएलांबरोबर निघून गेले. त्या सर्वांनी त्यांची शेरडं, मेंढरं आणि गुरं आपल्यासोबत नेली.

जाण्यापूर्वी, इस्राएलांनी ईजिप्शियन लोकांना कपडे आणि सोन्याचांदीच्या वस्तू मागितल्या. त्यांच्यावरच्या शेवटच्या पीडेमुळे ईजिप्शियन लोक खूप घाबरले होते. त्या कारणानं इस्राएलांनी मागितलेल्या सर्व गोष्टी त्यांनी त्यांना दिल्या.

थोड्या दिवसांनी इस्राएल लोक तांबड्या समुद्रापाशी आले. तिथे त्यांनी विश्रांती घेतली. दरम्यान, फारो आणि त्याच्या लोकांना, इस्राएलांना जाऊ दिल्याबद्दल पश्‍चात्ताप होऊ लागला. ते म्हणाले: ‘आपण तर आपल्या गुलामांना जाऊ दिलं!’

त्यामुळे फारोनं पुन्हा एकदा आपलं मन बदललं. त्यानं तातडीनं आपले रथ आणि आपली सेना यांना सज्ज केलं. मग ६०० खास रथ तसंच इजिप्तच्या इतर सर्व रथांनिशी तो इस्राएलांचा पाठलाग करायला लागला.

फारो आणि त्याचं सैन्य येत आहे, असं पाहून इस्राएल लोक खूप घाबरले. पळायला मार्गच नव्हता. त्यांच्या एका बाजूला तांबडा समुद्र होता. आणि इकडे दुसऱ्‍या बाजूनं ईजिप्शियन सेना येत होती. परंतु यहोवानं, त्याचे लोक व ईजिप्शियन यांच्यामध्ये एक ढग ठेवला. त्यामुळे हल्ला करण्यासाठी ईजिप्शियन लोकांना इस्राएली दिसेनात.

मग, तांबड्या समुद्रावर आपली काठी उगारायला यहोवानं मोशेला सांगितलं. मोशेनं तसं केल्यावर, यहोवानं पूर्वेकडून सोसाट्याचा वारा वाहायला लावला. तेव्हा समुद्राचं पाणी दुभागलं, आणि दोन्ही बाजूंना भिंतीप्रमाणे उभं राहिलं.

मग भर समुद्रातून कोरड्या जमिनीवरून इस्राएल लोक चालू लागले. त्या लाखो लोकांना, आपल्या जनावरांसकट समुद्रातून सुखरूप पलीकडल्या तीरावर जायला अनेक तास लागले. अखेरीस ईजिप्शियन लोकांना पुन्हा इस्राएली दिसू लागले. त्यांचे गुलाम निसटून चालले होते! त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ ते समुद्रात धावले.

तेव्हा, देवानं त्यांच्या रथाची चाकं निखळतील असं केलं. ईजिप्शियन लोकांचं धाबं दणाणलं नि ते ओरडायला लागले: ‘यहोवा इस्राएलांच्या वतीनं आपल्या विरुद्ध लढत आहे. आपण इथून पळ काढू या!’ पण फार उशीर झाला होता.

तुम्ही चित्रात पाहिल्याप्रमाणे, त्याचवेळी यहोवानं मोशेला त्याची काठी तांबड्या समुद्रावर उगारायला सांगितली. मोशेनं तसं केल्याबरोबर, पाण्याच्या भिंती परतून ईजिप्शियन लोक आणि त्यांच्या रथांवर लोटू लागल्या. संपूर्ण सेना इस्राएलांच्या मागे समुद्रात गेली होती. त्यामुळे त्या ईजिप्शियन लोकांच्यातला एकही जिवंत सुटला नाही!

वाचल्याबद्दल देवाच्या लोकांना किती आनंद झाला! त्या माणसांनी यहोवाला उपकारस्तुतीचं गीत गायलं. ते म्हणाले: ‘यहोवानं उज्ज्वल विजय प्राप्त केला आहे. त्यानं घोडे आणि त्यांचे स्वार समुद्रात टाकले आहेत.’ मोशेची बहीण मिर्याम हिनं तिचा डफ घेतला, व इतर सर्व स्त्रिया आपापले डफ घेऊन तिच्या मागे गेल्या. आनंदानं नाचताना, पुरुष मंडळी गात असलेलंच गीत त्यांनी गायलं: ‘यहोवानं उज्ज्वल विजय प्राप्त केला आहे. त्यानं घोडे आणि त्यांचे स्वार समुद्रात टाकले आहेत.’