व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही पूर्ण मनाने ख्रिस्ताचे अनुसरण करत आहात का?

तुम्ही पूर्ण मनाने ख्रिस्ताचे अनुसरण करत आहात का?

तुम्ही पूर्ण मनाने ख्रिस्ताचे अनुसरण करत आहात का?

“तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी.” —१ थेस्सलनी. ४:१.

१, २. (क) येशूच्या काळातील अनेक लोकांना कोणत्या अद्‌भुत गोष्टी पाहायला मिळाल्या? (ख) सध्याचा काळही का अतिशय महत्त्वाचा काळ आहे?

 येशू पृथ्वीवर होता त्या वेळी आपणही जिवंत असतो तर किती बरे झाले असते, असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? कदाचित तुम्ही येशूकडून बरे होण्याबद्दल आणि तुम्हाला सहन कराव्या लागत असलेल्या एखाद्या वेदनादायक व्याधीपासून मुक्‍त होण्याबद्दल विचार करत असाल. किंवा येशूला पाहण्याचा आणि त्याचे शब्द ऐकण्याचा—त्याच्यापासून शिकण्याचा किंवा तो चमत्कार करत असताना स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहण्याचा अनुभव किती आनंददायक असता असा विचार कदाचित तुम्ही करत असाल. (मार्क ४:१, २; लूक ५:३-९; ९:११) खरोखर, येशूने या सर्व गोष्टी केल्या तेव्हा आपण तेथे उपस्थित असतो, तर तो आपल्याकरता किती मोठा विशेषाधिकार ठरला असता! (लूक १९:३७) तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही पिढीच्या लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळालेल्या नाहीत. आणि येशूने “आत्मयज्ञ करून” पृथ्वीवर जे साध्य केले त्याची पुनरावृत्ती देखील कधी होणार नाही.—इब्री ९:२६; योहा. १४:१९.

पण, सध्याचा काळ देखील अतिशय महत्त्वपूर्ण काळ आहे. असे का म्हणता येईल? कारण, आपण ज्या काळात जगत आहोत त्याला शास्त्रवचनांतील भविष्यवाण्यांमध्ये ‘अंतसमय’ आणि ‘शेवटला काळ’ असे म्हणण्यात आले आहे. (दानी. १२:१-४, ९; २ तीम. ३:१) या काळादरम्यान सैतानाला स्वर्गातून बाहेर हाकलून देण्यात आले. लवकरच, त्याला बांधले जाईल आणि “अथांग डोहात” टाकले जाईल. (प्रकटी. १२:७-९, १२; २०:१-३) शिवाय, याच काळादरम्यान आपल्याला जगभरात ‘राज्याची सुवार्ता’ सांगण्याचा म्हणजेच, भविष्यातील नंदनवनाच्या आशेबद्दल लोकांना सांगण्याचा सुहक्क प्राप्त झाला आहे. हे कार्य पुन्हा कधीही केले जाणार नाही.—मत्त. २४:१४.

३. स्वर्गात जाण्याच्या थोड्याच वेळाआधी येशूने आपल्या अनुयायांना काय करण्यास सांगितले आणि यात काय समाविष्ट असणार होते?

स्वर्गात जाण्याच्या थोड्याच वेळाआधी, येशूने आपल्या अनुयायांना असे सांगितले: “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) यात जगभरातील लोकांना शिकवण्याचे कार्य सामील असणार होते. आणि या कार्यामागचा उद्देश काय असणार होता? शिष्य बनवणे—अंत येण्याआधी ख्रिस्ताचे आणखी जास्त अनुयायी बनवणे. (मत्त. २८:१९, २०) ख्रिस्ताने आपल्यावर सोपवलेली ही कामगिरी यशस्वी रीत्या पार पाडण्याकरता आपण काय केले पाहिजे?

४. (क) दुसरे पेत्र ३:११ मधील पेत्राचे शब्द कोणत्या गरजेवर भर देतात? (ख) आपण सावध का राहिले पाहिजे?

प्रेषित पेत्राने २ पेत्र ३:११ यात जे म्हटले त्याकडे लक्ष द्या: “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” पेत्राचे शब्द, या शेवटल्या काळात आपले जीवन देवाच्या उपासनेशी संबंधित कार्यांवरच केंद्रित राहावे म्हणून अत्यंत जागृत राहण्याच्या गरजेवर भर देतात. या कार्यांत सुवार्तेचा प्रचार करणे सामील आहे. म्हणून, जगभरातील आपले बांधव ख्रिस्ताने सोपवलेली प्रचाराची कामगिरी आवेशाने पार पाडत आहेत हे पाहणे किती आनंददायक आहे! त्याच वेळी, दररोज सामना कराव्या लागणाऱ्‍या सैतानाच्या जगातील दबावांमुळे आणि वारशाने मिळालेल्या पापपूर्ण प्रवृत्तींमुळे देवाच्या सेवेतील आपला आवेश कमी होणार नाही म्हणून आपण सावध राहिले पाहिजे याचीही आपल्याला जाणीव आहे. तेव्हा, आपण कशा प्रकारे ख्रिस्ताचे अनुसरण करू शकतो हे आपण आता पाहू या.

देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍यांचा तत्परतेने स्वीकार करा

५, ६. (क) पौलाने जेरूसलेममधील सहविश्‍वासू बांधवांची कोणत्या गोष्टीसाठी प्रशंसा केली आणि कशाविषयी त्याने त्यांना ताकीद दिली? (ख) देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍यांना आपण कमी का लेखू नये?

जेरूसलेममधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात, प्रेषित पौलाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांनी गतकाळात छळ होत असतानाही विश्‍वासूपणे धीर धरल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. त्याने म्हटले: “पूर्वकाळचे दिवस आठवा; त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली.” होय, त्या बांधवांचा विश्‍वासू जीवनक्रम यहोवाने आठवणीत ठेवला. (इब्री ६:१०; १०:३२-३४) पौलाच्या प्रेमळ प्रशंसेमुळे त्या इब्री ख्रिश्‍चनांचे मनोबल नक्कीच खूप वाढले असेल. पण, त्याच पत्रात, पौलाने एका मानवी प्रवृत्तीबद्दलही ताकीद दिली. या प्रवृत्तीवर नियंत्रण न ठेवल्यास, एका व्यक्‍तीचा देवाच्या सेवेतील आवेश कमी होऊ शकतो. पौलाने म्हटले की ख्रिश्‍चनांनी देवाच्या आज्ञांचे पालन करण्यापासून कधीही अंग चोरू नये किंवा ते टाळण्यासाठी कोणतीही निमित्ते सांगू नयेत.—इब्री १२:२५.

देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍यांपासून अंग चोरण्याविषयीची ताकीद आजच्या ख्रिश्‍चनांना देखील लागू होते. आपल्याला मिळालेल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍यांना आपण कधीही कमी लेखू नये तसेच, देवाच्या सेवेतील आपला आवेश कमी होऊ नये म्हणून आपण पक्का निर्धार केला पाहिजे याची आपल्याला जाणीव आहे. (इब्री १०:३९) कारण, देवाची पवित्र सेवा करणे हा जीवनमरणाचा प्रश्‍न आहे.—१ तीम. ४:१६.

७, ८. (क) देवाच्या सेवेतील आपला आवेश टिकवून ठेवण्यास आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल? (ख) देवाच्या सेवेतील आपला सुरुवातीचा आवेश कमी झाला असल्यास, यहोवा व येशूबद्दल आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?

देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यापासून अंग चोरण्याची प्रवृत्ती आपल्याला कशी टाळता येईल? या प्रवृत्तीविरुद्ध लढण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपण देवाला केलेल्या समर्पणाच्या वचनाचा काय अर्थ होतो यावर नियमितपणे मनन करणे. आपण यहोवाला वचन दिले होते की आपण त्याची इच्छा पूर्ण करण्याला जीवनात सर्वात वरचे स्थान देऊ, आणि त्या वचनाचे पालन करण्याची आपली इच्छा आहे. (मत्तय १६:२४ वाचा.) तेव्हा, वेळोवेळी आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘देवाला केलेल्या समर्पणानुसार जगण्याचा जो निर्धार मी माझ्या बाप्तिस्म्याच्या वेळी केला होता, तो आजही तितकाच दृढ आहे का? की नंतरच्या वर्षांत तो सुरुवातीचा आवेश काहीसा मंदावला आहे?’

प्रामाणिकपणे स्वतःचे परीक्षण केल्यावर, यहोवाच्या सेवेतील आपला आवेश काहीसा कमी झाल्याचे दिसून आल्यास, सफन्या संदेष्ट्याचे प्रोत्साहनदायक शब्द आठवणे आपल्या हिताचे ठरेल. त्याने म्हटले: “तुझे हात गळू देऊ नको, परमेश्‍वर तुझा देव, साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुजविषयी आनंदोत्सव करील.” (सफ. ३:१६, १७) हे आश्‍वासनदायक शब्द, पहिल्यांदा बॅबिलोनच्या बंदिवासातून जेरूसलेमला परतलेल्या प्राचीन काळच्या इस्राएल लोकांबद्दल खरे ठरले. पण, हे आश्‍वासन आज देवाच्या लोकांकरता देखील तेवढेच खरे आहे. आपण करत असलेले कार्य मुळात यहोवाचे असल्यामुळे, आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की आपल्याला देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी यहोवा आणि त्याचा पुत्र हे दोघेही आपल्याला पाठिंबा आणि बळ देतात. (मत्त. २८:२०; फिलिप्पै. ४:१३) आपण देवाचे कार्य आवेशाने करण्याचा प्रयत्न करत राहिल्यास, तो आपल्याला आशीर्वाद देईल आणि आध्यात्मिक रीत्या उन्‍नती करण्यास मदत करेल.

आवेशाने ‘राज्य मिळविण्यास झटणे’

९, १०. मोठ्या मेजवानीबद्दल येशूने दिलेल्या दृष्टान्तातील मुद्दा काय आहे, आणि त्यातून आपण कोणता धडा शिकू शकतो?

परूश्‍यांच्या एका अधिकाऱ्‍याच्या घरी भोजन करत असताना, येशूने एका मोठ्या मेजवानीबद्दल दृष्टान्त सांगितला. त्या दृष्टान्तात, त्याने स्वर्गाच्या राज्याचे भाग होण्याकरता वेगवेगळ्या लोकांना संधी देण्यात आल्याचे वर्णन केले. तसेच, काही लोकांनी हे आमंत्रण टाळण्यासाठी कशा प्रकारे निमित्ते सांगितली हे देखील त्याने या दृष्टान्तात सांगितले. (लूक १४:१६-२१ वाचा.) दृष्टान्तातील आमंत्रितांनी मेजवानीला न येण्याबद्दल दिलेली निमित्ते वेगवेगळी होती. एकाने म्हटले की आपण नुकतेच शेत विकत घेतले असल्यामुळे आपल्याला त्याची पाहणी करण्यासाठी जायचे आहे. आणखी एकाने, आपण विकत घेतलेल्या गुराढोरांची पाहणी करण्यासाठी आपल्याला जायचे आहे असे म्हटले. तर आणखी एकाने असे म्हटले: ‘माझं नुकतंच लग्न झालंय. तेव्हा मला जमणार नाही.’ ही अतिशय क्षुल्लक निमित्ते होती. सहसा शेत किंवा जनावरे निरीक्षण करूनच विकत घेतली जातात. त्यामुळे, विकत घेतल्यानंतर लगेच त्यांची पाहणी करण्याची तशी काही गरज नसते. आणि लग्न झाल्यामुळे एखाद्याने इतके महत्त्वपूर्ण आमंत्रण का म्हणून नाकारावे? साहजिकच, दृष्टान्तातील मेजवानीचे आमंत्रण देणारा अत्यंत क्रोधित होतो!

१० येशूच्या दृष्टान्तातून देवाचे सर्वच सेवक एक धडा शिकू शकतात. कोणता? येशूने या दृष्टान्तात ज्या वैयक्‍तिक बाबींचा उल्लेख केला, त्यांसारख्या गोष्टींना आपण आपल्या जीवनात देवाच्या सेवेपेक्षा कधीही जास्त महत्त्व देऊ नये. जर एक ख्रिश्‍चन व्यक्‍ती आपल्या वैयक्‍तिक बाबींना उचित स्थानी ठेवत नसेल, तर हळूहळू तिचा सेवेतील आवेश कमी होईल. (लूक ८:१४ वाचा.) हे टाळण्यासाठी, आपण येशूच्या पुढील सल्ल्याचे पालन केले पाहिजे: “पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्त. ६:३३) आज देवाचे लहानमोठे सर्वच सेवक या सल्ल्याचे पालन करत आहेत हे पाहणे खरोखर किती प्रोत्साहनदायक आहे! खरेतर, सेवाकार्यात आणखी जास्त वेळ घालवता यावा म्हणून अनेक जणांनी आपली जीवनशैली साधी ठेवण्याकरता योग्य पावले उचलली आहेत. राज्याच्या कार्यांकरता आवेशाने झटल्यामुळे जीवनात खरा आनंद व मोठे समाधान मिळते हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे.

११. देवाची सेवा पूर्ण मनाने व आवेशाने करणे महत्त्वाचे आहे हे बायबलमधील कोणत्या अहवालातून दिसून येते?

११ देवाच्या सेवेत आवेशी असणे किती महत्त्वाचे आहे हे इस्राएलचा राजा यहोआश याच्या जीवनातील एका घटनेवरून स्पष्टपणे दिसून येते. अरामकडून इस्राएलचा पराभव निश्‍चित आहे या चिंतेने यहोआश अलीशाकडे आला आणि रडू लागला. यहोवाद्वारे अरामवर विजय मिळेल हे सूचित करण्यासाठी अलीशा संदेष्ट्याने त्याला खिडकीतून अरामच्या दिशेने बाण सोडण्यास सांगितला. यामुळे राजाला नक्कीच प्रोत्साहन मिळायला हवे होते. नंतर, अलीशाने यहोआशला जमिनीवर बाण मारण्यास सांगितले. यहोआशने तीनदा जमिनीवर ते मारले. याचा अलीशाला अत्यंत राग आला. कारण, यहोआशने पाचसहा वेळा जमिनीवर बाण मारले असते, तर यावरून ‘अरामाला क्षय होईपर्यंत मार देणे’ सूचित झाले असते. आता, यहोआशला केवळ तीन वेळा आणि काही प्रमाणातच विजय मिळणार होता. यहोआशने पुरेसा आवेश न दाखवल्यामुळे त्याला मर्यादित यश मिळाले. (२ राजे १३:१४-१९) या अहवालावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? आपण पूर्ण मनाने आणि आवेशाने कार्य केले तरच यहोवा आपल्याला भरपूर प्रमाणात आशीर्वाद देईल.

१२. (क) समस्यांना तोंड देत असताना देवाच्या सेवेतील आपला आवेश टिकवून ठेवण्यास कशामुळे आपल्याला मदत होईल? (ख) सेवाकार्यात सतत व्यस्त राहिल्याने तुम्हाला कशा प्रकारे फायदा होत आहे ते सांगा.

१२ जीवनातील समस्यांमुळे आपल्या आवेशाची आणि देवाच्या सेवेप्रती आपल्या समर्पणाची परीक्षा होते. अनेक बंधुभगिनी कठीण आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. काही जण गंभीर आजारपणामुळे यहोवाच्या सेवेत जास्त करता येत नसल्यामुळे निराश झाले आहेत. तरीसुद्धा, आपल्यापैकी प्रत्येक जण, आपला आवेश टिकवून ठेवण्यासाठी आणि पूर्णपणे ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी योग्य पावले उचलू शकतो. “ख्रिस्ताचे अनुसरण करत राहण्यासाठी तुम्हाला कशामुळे साहाय्य मिळेल?” असे शीर्षक असलेल्या चौकटीत दिलेल्या काही सूचनांकडे आणि शास्त्रवचनांकडे कृपया लक्ष द्या. ते तुम्ही पूर्णपणे कसे लागू करू शकता याचा विचार करा. असे केल्याने, तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. सेवाकार्यात सतत व्यस्त असल्याने आपण खंबीर बनतो, आपले जीवन आणखी अर्थपूर्ण बनते आणि आपण अधिक प्रमाणात मनःशांती व आनंद अनुभवतो. (१ करिंथ. १५:५८) शिवाय, स्वतःला देवाच्या सेवेत पूर्णपणे झोकून दिल्याने “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत” राहण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.—२ पेत्र ३:११.

प्रामाणिकपणे आपल्या परिस्थितीचा आढावा घ्या

१३. पूर्ण मनाने सेवा करण्याचा आपल्या स्वतःकरता काय अर्थ होतो हे आपण कसे ठरवू शकतो?

१३ पण, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पूर्ण मनाने देवाची सेवा करणे हे आपण सेवाकार्यात किती वेळ घालवतो यावर अवलंबून नाही. प्रत्येकाची वैयक्‍तिक परिस्थिती वेगवेगळी असते. एखादी व्यक्‍ती क्षेत्र सेवेत दर महिन्याला कदाचित एक किंवा दोनच तास घालवत असेल. पण, तिच्या स्वास्थ्यानुसार जर तिला एवढेच शक्य असेल, तर अशी व्यक्‍ती देखील यहोवाला अतिशय प्रिय आहे. (मार्क १२:४१-४४ पडताळून पाहा.) तेव्हा, पूर्ण मनाने देवाची सेवा करण्याचा आपल्या स्वतःकरता काय अर्थ होतो हे जाणून घेण्यासाठी, आपण आपल्या क्षमतांचा व परिस्थितीचा प्रामाणिकपणे आढावा घेतला पाहिजे. तसेच, ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, आपलाही दृष्टिकोन त्याच्यासारखाच असला पाहिजे. (रोमकर १५:५ वाचा; १ करिंथ. २:१६) येशूने आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले होते? कफर्णहूम येथून आलेल्या लोकसमुदायाला त्याने असे सांगितले: “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३; योहा. १८:३७) तेव्हा, सेवाकार्यासाठी येशूचा आवेश डोळ्यांपुढे ठेवून, तुम्हाला आपले सेवाकार्य आणखी वाढवता येईल का हे पाहण्यासाठी स्वतःच्या परिस्थितीचा आढावा घ्या.—१ करिंथ. ११:१.

१४. कोणकोणत्या मार्गांनी आपण आपले सेवाकार्य वाढवू शकतो?

१४ काळजीपूर्वक आपल्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आपण कदाचित या निष्कर्षावर पोहचू, की सेवाकार्यात आपण घालवत असलेला वेळ आपल्याला वाढवता येईल. (मत्त. ९:३७, ३८) उदाहरणार्थ, नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या आपल्या अनेक तरुणांनी त्यांचे सेवाकार्य वाढवले आहे. आणि ते आता आवेशाने पायनियर सेवेचा आनंद अनुभवत आहेत. तुम्ही देखील या आनंदाचा आस्वाद घेऊ इच्छिता का? काही बंधुभगिनींनी आपल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्याच देशात किंवा परदेशात, जेथे राज्य प्रचारकांची जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन सेवा करण्याचे ठरवले आहे. तर, आणखी काहींनी दुसरी भाषा बोलणाऱ्‍यांना साहाय्य करण्यासाठी नवीन भाषा शिकून घेतली आहे. सेवाकार्य वाढवणे सोपे नसले तरी तसे केल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद लाभतील आणि ‘सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचण्यास’ आपण कदाचित इतरांनाही मदत करू शकू.—१ तीम. २:३, ४; २ करिंथ. ९:६.

अनुसरण करण्याजोगी बायबलमधील उदाहरणे

१५, १६. ख्रिस्ताचे आवेशी अनुयायी होण्याकरता आपण कोणाच्या उदाहरणांचे अनुकरण करू शकतो?

१५ जे प्रेषित बनले त्यांना ख्रिस्ताने आपले अनुयायी होण्यास बोलावले होते तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी कशी प्रतिक्रिया दाखवली? मत्तयाबद्दल वृत्तांतात असे म्हटले आहे: “तो सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला.” (लूक ५:२७, २८) मासे पकडत असलेल्या पेत्र व अंद्रिया यांच्याबद्दल आपण असे वाचतो: “लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.” येशूने नंतर याकोब आणि योहान यांना त्यांच्या बापासोबत जाळी नीट करत असताना पाहिले. येशूने त्यांना आपले अनुयायी होण्याचे आमंत्रण दिले तेव्हा त्यांनी कसा प्रतिसाद दिला? “लागलेच ते तारू व आपला बाप ह्‍यांना मागे सोडून त्याला अनुसरले.”—मत्त. ४:१८-२२.

१६ आणखी एक उत्तम उदाहरण शौलाचे आहे, जो नंतर प्रेषित पौल बनला. त्याने ख्रिस्ताच्या अनुयायांचा अतिशय त्वेषाने छळ केला असला, तरी त्याने आपला मार्ग बदलला आणि ख्रिस्ताचे नाव धारण करण्याकरता तो “निवडलेले पात्र” बनला. “[पौलाने] लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की, तो देवाचा पुत्र आहे.” (प्रे. कृत्ये ९:३-२२) पौलाला अनेक कठीण समस्यांचा व छळाचा सामना करावा लागला, तरी त्याने कधीही आपला आवेश कमी होऊ दिला नाही.—२ करिंथ. ११:२३-२९; १२:१५.

१७. (क) ख्रिस्ताचे अनुसरण करण्याबद्दल तुमची इच्छा काय आहे? (ख) पूर्ण मनाने व शक्‍तीने यहोवाची इच्छा पूर्ण केल्यास आपल्याला कोणकोणते आशीर्वाद अनुभवता येतील?

१७ आपण नक्कीच त्या शिष्यांच्या उत्तम उदाहरणांचे अनुकरण करू इच्छितो आणि ख्रिस्ताच्या आमंत्रणाला तत्परतेने व अगदी पूर्णपणे प्रतिसाद देऊ इच्छितो. (इब्री ६:११, १२) आपण आवेशाने व पूर्ण मनाने ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत राहिल्यास आपल्याला कोणत्या आशीर्वादांचा अनुभव घेता येईल? देवाच्या इच्छेप्रमाणे केल्याबद्दल आपल्याला खरा आनंद प्राप्त होईल आणि मंडळीत सेवेचे अतिरिक्‍त विशेषाधिकार व जबाबदाऱ्‍या स्वीकारल्याने प्राप्त होणारे समाधान अनुभवता येईल. (स्तो. ४०:८; १ थेस्सलनीकाकर ४:१ वाचा.) होय, आपण पूर्ण शक्‍तीने ख्रिस्ताचे अनुसरण केल्यास, आपल्याला मनःशांती, समाधान, देवाचा अनुग्रह आणि सार्वकालिक जीवनाची आशा असे अनेक व कायमस्वरूपी आशीर्वाद अनुभवता येतील.—१ तीम. ४:१०.

तुम्हाला आठवते का?

• आपल्यावर कोणते महत्त्वाचे काम सोपवण्यात आले आहे आणि आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहिले पाहिजे?

• कोणत्या मानवी प्रवृत्तीपासून आपण स्वतःचे संरक्षण केले पाहिजे, आणि का?

• आपण प्रामाणिकपणे कशाचा आढावा घेतला पाहिजे?

• ख्रिस्ताचे अनुसरण करत राहण्यास कशामुळे आपल्याला साहाय्य मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

ख्रिस्ताचे अनुसरण करत राहण्यासाठी तुम्हाला कशामुळे साहाय्य मिळेल?

▪ देवाचे वचन नियमितपणे वाचा, आणि जे वाचता त्यावर मनन करा.—स्तो. १:१-३; १ तीम. ४:१५.

▪ देवाच्या आत्म्याच्या मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी वारंवार प्रार्थना करा.—जख. ४:६; लूक ११:९, १३.

▪ ज्यांना सेवाकार्यासाठी मनापासून आवेश आहे अशांसोबत सहवास करा.—नीति. १३:२०; इब्री १०:२४, २५.

▪ सध्याच्या काळाची निकड ओळखा.—इफिस. ५:१५, १६.

▪ देवाच्या सेवेपासून अंग चोरल्यामुळे होणाऱ्‍या गंभीर परिणामांची जाणीव असू द्या.—लूक ९:५९-६२.

▪ आपल्या समर्पणाच्या वचनावर आणि यहोवाची सेवा केल्यामुळे व पूर्ण मनाने ख्रिस्ताचे अनुसरण केल्यामुळे मिळणाऱ्‍या अनेक आशीर्वादांवर नियमितपणे मनन करा.—स्तो. ११६:१२-१४; १३३:३; नीति. १०:२२.