व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हालाही यहोवाने प्रश्‍न विचारावेत असे तुम्हाला वाटते का?

तुम्हालाही यहोवाने प्रश्‍न विचारावेत असे तुम्हाला वाटते का?

तुम्हालाही यहोवाने प्रश्‍न विचारावेत असे तुम्हाला वाटते का?

बायबलमध्ये, शेकडो हृदयस्पर्शी प्रश्‍न सापडतात. खरेतर, स्वतः यहोवा देवाने महत्त्वपूर्ण सत्ये शिकवण्यासाठी अनेकदा प्रश्‍नांचा उपयोग केला. उदाहरणार्थ, काइनाला आपल्या आत्मघाती मार्गापासून मागे फिरण्याची ताकीद देण्यासाठी यहोवाने अनेक प्रश्‍नांचा उपयोग केला. (उत्प. ४:६, ७) त्याचप्रमाणे, यहोवाने यशयाला विचारलेल्या प्रश्‍नांमुळे त्याला सकारात्मक पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली. उदाहरणार्थ, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” असे यहोवाने विचारले, तेव्हा यशयाने म्हटले: “हा मी आहे, मला पाठीव.”—यश. ६:८.

महान शिक्षक असलेल्या येशूने देखील प्रश्‍नांचा परिणामकारक रीत्या उपयोग केला. येशूने विचारलेले २८० पेक्षा जास्त प्रश्‍न शुभवर्तमानाच्या पुस्तकांत आढळतात. काही वेळा, त्याने आपली टीका करणाऱ्‍यांना निरुत्तर करण्यासाठी प्रश्‍नांचा उपयोग केला. तरी बहुतेक वेळा, प्रश्‍न विचारण्यामागचा त्याचा हेतू आपल्या श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचून त्यांच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल विचार करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा होता. (मत्त. २२:४१-४६; योहा. १४:९, १०) त्याचप्रमाणे, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील १४ पुस्तके लिहिलेल्या प्रेषित पौलाने देखील आपल्या वाचकांचे मन वळवण्यासाठी प्रश्‍नांचा उपयोग केला. (रोम. १०:१३-१५) उदाहरणार्थ, रोमकरांना लिहिलेल्या त्याच्या पत्रात अनेक प्रश्‍न आढळतात. पौलाचे प्रश्‍न वाचकांना “देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे” हे समजून घेण्यास व त्याची कदर करण्यास प्रेरित करतात.—रोम. ११:३३.

काही प्रश्‍न तोंडी उत्तर मिळवण्याच्या अपेक्षेने, तर काही प्रश्‍न ऐकणाऱ्‍यांना विचार करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने विचारले जातात. यांपैकी दुसऱ्‍या प्रकारच्या प्रश्‍नांचा येशूने मोठ्या प्रमाणात वापर केला असल्याचे शुभवर्तमानाच्या पुस्तकांतून दिसून येते. एके प्रसंगी येशूने आपल्या शिष्यांना “परूश्‍यांचे खमीर व हेरोदाचे खमीर,” म्हणजे त्यांचा ढोंगीपणा आणि खोट्या शिकवणी “ह्‍यांविषयी जपून राहा” अशी ताकीद दिली. (मार्क ८:१५; मत्त. १६:१२) येशूच्या शिष्यांना त्याच्या शब्दांचा अर्थ समजला नाही आणि आपण भाकरी आणण्यास विसरलो यावरून ते आपसात वाद करू लागले. तेव्हा, येशू व त्याच्या शिष्यांमध्ये झालेल्या छोट्याशा संभाषणात त्याने कशा प्रकारे प्रश्‍नांचा उपयोग केला याकडे लक्ष द्या. “येशू त्यांना म्हणाला, ‘तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्‍याविषयी चर्चा का करिता? तुम्ही अजून ध्यानात आणीत नाही व समजतहि नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? “डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय?” . . . अजून तुम्हाला समजत नाही काय?’” येशूने आपल्या शिष्यांना विचार करायला लावण्यासाठी आणि त्याच्या शब्दांचा खरा अर्थ समजून घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी या प्रश्‍नांचा उपयोग केला.—मार्क ८:१६-२१.

“मी तुला हे विचारितो”

यहोवा देवाने आपला सेवक ईयोब याचा चुकीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रश्‍नांचा उपयोग केला. यहोवाने अनेक प्रश्‍नांचा वापर करून, ईयोब आपल्या निर्माणकर्त्याच्या तुलनेत किती लहान आहे हे त्याला शिकवले. (ईयोब, अध्या. ३८-४१) ईयोबाला विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचे त्याने तोंडी उत्तर द्यावे अशी यहोवाची अपेक्षा होती का? असे वाटत नाही. उदाहरणार्थ, “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास?” यांसारखे प्रश्‍न साहजिकच ईयोबाच्या विचारांवर व भावनांवर गहिरा प्रभाव पाडण्यासाठी विचारण्यात आले होते. यहोवाने ईयोबाला एकापाठोपाठ एक विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा ईयोब काहीच उत्तर देऊ शकला नाही. त्याने केवळ एवढेच म्हटले: “मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवितो.” (ईयो. ३८:४; ४०:४) यहोवा आपल्याला काय शिकवू इच्छित आहे हे ईयोबाला समजले आणि त्याने स्वतःला नम्र केले. पण, यहोवा ईयोबाला केवळ नम्र होण्यास शिकवत नव्हता. तर, त्याने ईयोबाचा चुकीचा दृष्टिकोन देखील सुधारला. तो कसा?

ईयोब “सात्विक, सरळ” असला, तरी त्याचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे काही वेळा त्याच्या शब्दांवरून दिसून आले. या चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल ईयोबाला फटकारून अलीहूने त्याच्या हे लक्षात आणून दिले की तो ‘देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवू पाहत’ होता. (ईयो. १:८; ३२:२; ३३:८-१२) पण, यहोवाने विचारलेल्या प्रश्‍नांमुळे ईयोबाला या चुकीच्या दृष्टिकोनात सुधारणा करायला देखील मदत मिळाली. सोसाट्याच्या वाऱ्‍यातून ईयोबाशी बोलताना देवाने त्याला म्हटले: “अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणार हा कोण? आता मर्दाप्रमाणे आपली कमर बांध; मी तुला हे विचारितो; मला सांग.” (ईयो. ३८:१-३) मग, अनेक प्रश्‍नांच्या साहाय्याने यहोवाने आपल्या अद्‌भुत कार्यांतून प्रदर्शित होणाऱ्‍या अमर्याद बुद्धीकडे आणि शक्‍तीकडे ईयोबाचे लक्ष वेधले. या ज्ञानामुळे यहोवाचा न्याय आणि तो ज्या प्रकारे कार्य करतो यावरील ईयोबाचा भरवसा कित्येक पटीने वाढण्यास मदत झाली. कल्पना करा, खुद्द सर्वसमर्थ देवाने ईयोबाला प्रश्‍न विचारले. ईयोबाकरता हा किती विस्मयकारक अनुभव ठरला असावा!

यहोवाने आपल्याला प्रश्‍न विचारावेत म्हणून आपण काय करू शकतो?

आपल्याबद्दल काय? बायबलमध्ये असलेल्या प्रश्‍नांतून आपल्याला देखील फायदा होऊ शकतो का? होय, नक्कीच! हे प्रश्‍न वाचताना जरा थांबून त्यांच्यावर मनन केल्याने आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने अनेक फायदे होऊ शकतात. देवाच्या वचनातील मर्मभेदक प्रश्‍नांमुळेच ते आणखी प्रभावकारक बनते. होय, “देवाचे वचन . . . सक्रिय, . . . आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री ४:१२) पण, जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी, खुद्द यहोवाच आपल्याला प्रश्‍न विचारत आहे या दृष्टिकोनातून आपण या प्रश्‍नांकडे पाहिले पाहिजे. (रोम. १५:४) आता आपण काही उदाहरणे पाहू या.

“सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” (उत्प. १८:२५) यहोवाने सदोम व गमोरा या शहरांवर न्यायदंड सुनावला तेव्हा अब्राहामाने त्याला हा प्रश्‍न विचारला, ज्याचे उत्तर अभिप्रेत होते. यहोवा दुष्टाबरोबर नीतिमानाला मारून टाकण्यासारखे अन्यायी कृत्य करू शकतो असा विचार देखील अब्राहाम करू शकत नव्हता. अब्राहामाने विचारलेल्या प्रश्‍नातून यहोवाच्या न्यायीपणावर त्याचा भक्कम विश्‍वास असल्याचे दिसून येते.

यहोवाच्या भावी न्यायदंडांबद्दल, जसे की, हर्मगिद्दोनातून नेमके कोण बचावतील किंवा कोणाचे पुनरुत्थान होईल यांबद्दल अंदाज बांधण्याची आज काही जणांची प्रवृत्ती असू शकते. अशा प्रकारच्या विचारांनी अस्वस्थ होण्याऐवजी, आपण अब्राहामाचा प्रश्‍न आठवू शकतो. अब्राहामाप्रमाणे आपणही, यहोवा प्रेमळ स्वर्गीय पिता आहे हे लक्षात ठेवतो आणि त्याच्या न्यायीपणावर व दयाळूपणावर पूर्ण भरवसा दाखवतो. यामुळे, आपण अनावश्‍यक चिंता, विश्‍वास कमकुवत करणाऱ्‍या शंका आणि निरर्थक वादविवाद यांसारख्या वेळ व शक्‍ती वाया घालवणाऱ्‍या गोष्टींपासून दूर राहू शकतो.

“चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?” (मत्त. ६:२७) स्वतःला यहोवाच्या प्रेमळ हातांत सोपवून देण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी, येशूने एका मोठ्या लोकसमुदायाशी बोलताना, ज्यात त्याचे शिष्यही होते, हा प्रश्‍न विचारला. या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळात आपल्याला अनेक चिंता-विवंचनांना तोंड द्यावे लागते. पण, केवळ त्या चिंतांबद्दल विचार करत राहिल्याने आपले आयुष्य लांबणार नाही किंवा आपल्या जीवनाचा दर्जा सुधारणार नाही.

जेव्हा कधी आपल्याला स्वतःबद्दल किंवा आपल्या प्रिय जनांबद्दल चिंता वाटते, तेव्हा आपण येशूचा हा प्रश्‍न आठवल्यास, चिंता-विवंचनांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला मदत होऊ शकते. मानसिक, भावनिक व शारीरिक रीत्या आपल्याला थकवून टाकणाऱ्‍या चिंतांना आणि नकारात्मक विचारांना पूर्णविराम देण्यास त्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते. येशूने आपल्याला आश्‍वासन दिले, की आपला स्वर्गीय पिता, जो पक्ष्यांना खायला देतो व पानाफुलांना पोषाख घालतो त्याला आपल्या गरजांची पूर्ण जाणीव आहे.—मत्त. ६:२६-३४.

“मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय?” (नीति. ६:२७) नीतिसूत्रे पुस्तकातील पहिल्या नऊ अध्यायांत, एक पिता आपल्या मुलाला व्यावहारिक बुद्धीबद्दल लहानलहान भाषणांतून उपदेश करत असल्याचे आपल्याला आढळते. व्यभिचारामुळे वाईट परिणाम होऊ शकतात हे वर उल्लेख केलेल्या प्रश्‍नातून सूचित होते. (नीति. ६:२९) आपला विवाह साथीदार नसलेल्या एखाद्या व्यक्‍तीशी आपण अनुचित वर्तन करत आहोत किंवा अनैतिक लैंगिक इच्छांना आपण आपल्या मनात घर करू दिले आहे असे आपल्या लक्षात आल्यास, वरील प्रश्‍न आपल्याला धोक्याची सूचना देणाऱ्‍या घंटेप्रमाणे आठवला पाहिजे. खरे पाहता, कोणत्याही प्रकारच्या वाईट मार्गावर जाण्याचा एका व्यक्‍तीला मोह होतो तेव्हा हा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. ‘तुम्ही जे काही पेरता त्याचेच तुम्हाला पीक मिळेल,’ या बायबलमधील व्यावहारिक तत्त्वावर या प्रश्‍नातून किती स्पष्टपणे जोर देण्यात आला आहे!—गलती. ६:७.

“दुसऱ्‍याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस?” (रोम. १४:४) रोमकरांना लिहिलेल्या पत्रात, पौलाने पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत उद्‌भवलेल्या समस्यांबद्दल चर्चा केली. वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्‍वभूमींतून आलेले असल्यामुळे, काही ख्रिश्‍चनांची आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या निर्णयांबद्दल व कृतींबद्दल त्यांना दोषी ठरवण्याची प्रवृत्ती होती. पौलाने विचारलेल्या या प्रश्‍नामुळे त्यांना एकमेकांचे स्वागत करण्याची आणि दोषी ठरवण्याचे काम यहोवावर सोडून देण्याची आठवण करून देण्यात आली.

त्याचप्रमाणे, आज देखील यहोवाचे लोक वेगवेगळ्या पार्श्‍वभूमींतून आलेले आहेत. तरीसुद्धा, यहोवाने आपल्याला एकत्र आणल्यामुळे आपल्यामध्ये अनमोल ऐक्य पाहायला मिळते. आपण या ऐक्याला हातभार लावतो का? आपल्या एखाद्या बांधवाने त्याच्या विवेकानुसार केलेल्या एखाद्या कार्याबद्दल लगेच अस्वीकृती दर्शवण्याची आपली प्रवृत्ती असल्यास, वर उल्लेख केलेला पौलाचा प्रश्‍न आपण स्वतःला विचारणे किती सुज्ञपणाचे ठरेल!

प्रश्‍नांमुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ येतो

देवाच्या वचनात असलेले प्रश्‍न किती प्रभावशाली आहेत हे वरील काही उदाहरणांवरून दिसून येते. प्रत्येक प्रश्‍नाच्या संदर्भाकडे लक्ष दिल्यास, व्यावहारिक रीत्या हे प्रश्‍न स्वतःवर लागू करण्यास आपल्याला मदत होईल. आणि आपण बायबलचे वाचन करतो तेव्हा आपल्याला आणखीही उपयुक्‍त प्रश्‍न आढळतील.—पृष्ठ १४ वरील चौकट पाहा.

देवाच्या वचनात असलेल्या प्रश्‍नांना आपल्या मनावर गहिरा परिणाम करू दिल्यास, आपल्या भावनांना व विचारांना यहोवाच्या नीतिमान मार्गांनुसार आकार देण्यास आपल्याला मदत होईल. यहोवाने ईयोबाला प्रश्‍न विचारल्यावर त्याने असे म्हटले: “मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.” (ईयो. ४२:५) होय, आता यहोवा ईयोबाकरता अधिकच वास्तविक बनला होता, जणू तो त्याला आपल्या डोळ्यांनी पाहत होता. शिष्य याकोबाने असे म्हटले: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याको. ४:८) तर मग, आपण देवाच्या वचनातील प्रश्‍नांसह, त्यातील प्रत्येक भागाचा, आध्यात्मिक उन्‍नती करण्यासाठी आणि यहोवाला आणखी जवळून ‘पाहण्यासाठी’ उपयोग करू या.

[१४ पानांवरील चौकट]

स्वतःला पुढील प्रश्‍न विचारल्याने, तुम्हाला कशा प्रकारे यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्यास मदत होईल?

▪ “ परमेश्‍वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय?”—१ शमु. १५:२२.

▪ “ ज्याने डोळा बनविला तो पाहाणार नाही?”—स्तो. ९४:९.

▪ “ आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणाराइसम तुला दिसतो काय?”—नीति. २६:१२.

▪ “ तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?”—योना ४:४.

▪ “ मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?”—मत्त. १६:२६.

▪ “ ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्‍त करील?”—रोम. ८:३५.

▪ “ जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे?”—१ करिंथ. ४:७.

▪ “ उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार?”—२ करिंथ. ६:१४.

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाने विचारलेल्या प्रश्‍नांपासून ईयोब काय शिकला?