व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘मी परमेश्‍वराची कशी उतराई होऊ?’

‘मी परमेश्‍वराची कशी उतराई होऊ?’

जीवन कथा

‘मी परमेश्‍वराची कशी उतराई होऊ?’

मारीया केरासिनीस यांच्याद्वारे कथित

मी १८ वर्षांची होते. आईबाबा माझ्यावर खूप नाराज झाले होते; माझ्या कुटुंबानं मला नाकारलं, गावात मी थट्टेचा विषय बनले होते. देवावरील माझी एकनिष्ठा तोडण्यासाठी, विनंत्या, जबरदस्ती, धमक्या या सर्वांचा उपयोग करून झाला होता—मी मात्र ठाम राहिले. मी बायबल सत्याशी एकनिष्ठपणे जडून राहिले तर मला आध्यात्मिक प्रतिफळ मिळेल, अशी माझी पक्की खात्री झाली होती. मी ५० वर्षांपासून केलेल्या यहोवाच्या सेवेचा आता विचार करते तेव्हा स्त्रोत्रकर्त्याप्रमाणे मलाही असे म्हणावेसे वाटते: ‘परमेश्‍वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याची कशी उतराई होऊ?’—स्तोत्र ११६:१२.

एकोणीसशे तीस साली, अँग्लोकास्ट्रो नावाच्या गावात माझा जन्म झाला; पहिल्या शतकात, खऱ्‍या ख्रिश्‍चनांची मंडळी स्थापण्यात आली त्या करिंथच्या इस्थमसच्या पूर्वेकडील चेंचेरिया बंदरापासून सुमारे २० किलोमीटर दूर हे गाव आहे.—प्रेषितांची कृत्ये १८:१८; रोमकर १६:१.

आमचं कुटुंब शांतीपूर्ण कुटुंब होतं. बाबा गावचे सरपंच होते, गावात सर्व त्यांना मान द्यायचे. मी पाच मुलांपैकी तिसरी होते. माझ्या आईवडिलांनी आमच्यावर ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चचे संस्कार केले. मी दर रविवारी मासला जायचे. मूर्तींसमोर प्रायश्‍चित करायचे, गावांतील चर्चमध्ये मेणबत्त्या जाळायचे, सर्व उपास-तपास करायचे. मी नेहमी नन व्हायचा विचार करायचे. पण कालांतरानं, माझ्या आईवडिलांना निराश करणारी मी पहिली होते.

बायबल सत्य मिळाल्याबद्दल आनंदी

मी १८ वर्षांची होते तेव्हा, कॅटिना नावाची माझ्या मोठ्या बहिणीची नणंद, जी जवळच्याच एका गावात राहत होती ती यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशनं वाचत होती आणि तिनं चर्चला जायचं सोडून दिलं होतं. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं; त्यामुळे मी ज्याला उचित मार्ग समजत होते त्या मार्गावर येण्यास तिला मदत करण्याचं मी ठरवलं. त्यामुळे, ती जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा मी तिला, पाळकांच्या घरी नेण्याचा विचार करून, आपण फिरायला जाऊ असं म्हणून बाहेर नेलं. त्या पाळकाच्या घरी गेल्यावर त्यानं यहोवाच्या साक्षीदारांविरुद्धचा पट्टाच सुरू केला, ते कॅटिनाला फसवणारे पाखंडी आहेत असं म्हटलं. सलग तीन रात्र ही चर्चा चालू राहिली. कॅटिनानं त्यांच्या सर्व आरोपांना, चांगली तयारी करून बायबलच्या आधारावर उत्तरं दिली. शेवटी, त्यांनी तिला सांगितलं, की तू इतकी सुंदर आहेस, हुशार आहेस, तेव्हा आता मजा करण्याचे दिवस आहेत, देव-देव म्हातारपणी करायचं.

या चर्चेविषयी मी घरी काहीच सांगितलं नव्हतं, पण पुढच्या रविवारी चर्चला गेले नाही. दुपारी पाळक थेट आमच्या दुकानावरच आले. बाबांना दुकानावर मदत करायची होती म्हणून मी आले नाही, अशी मी त्यांना थाप मारली.

“नक्की?, की त्या मुलीनं तुझे कान भरले?” असं त्यांनी मला विचारलं.

मी त्यांना सरळ म्हणाले: “आपल्यापेक्षा या लोकांचेच विश्‍वास चांगले आहेत.”

तेव्हा माझ्या वडिलांकडे वळून ते म्हणाले: “मि. इकोनोमोस, त्या तुमच्या नातलगीणीला आताच्या आता घरातून काढा; तिनं तुमच्या घराला आग लावली आहे.”

माझ्या घरचे माझ्या विरुद्ध होतात

१९४० च्या उत्तरार्धात, ग्रीसमध्ये हिंसक यादवी युद्ध चाललं होतं तेव्हा हे सारे घडले. गनिमातील लोक मला पळवून नेतील या भीतीनं बाबांनी मला आमचं गाव सोडून जाण्याची व्यवस्था केली व कॅटिना जिथं राहत होती त्या गावात माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी राहण्यास मला पाठवलं. दोन महिने मी तिथं राहिले; त्यादरम्यान अनेक विषयांवर बायबल काय म्हणते हे मला समजायला मदत मिळाली. ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या अनेक शिकवणुकी शास्त्रवचनांवर आधारित नव्हत्या हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मूर्तींद्वारे देव उपासना स्वीकारत नाही, क्रूसाची उपासना यासारख्या विविध धार्मिक रीतीरिवाजांना ख्रिस्ती उगम नाही, देवाची स्वीकारयोग्य उपासना करायची आहे तर ती “आत्म्याने व खरेपणाने” केली पाहिजे, या सर्व गोष्टी मी शिकले. (योहान ४:२३; निर्गम २०:४, ५) या सर्वांहून अधिक म्हणजे, बायबल पृथ्वीवरील अनंतकाळच्या जीवनाची आशा देते हे मी शिकले! ही अनमोल बायबल सत्ये, यहोवाकडून मला सुरवातीला मिळालेल्या व्यक्‍तिगत लाभांपैकी होती.

काही दिवसांनी माझ्या बहिणीच्या व तिच्या यजमानांच्या लक्षात आलं, की मी जेवणाच्या वेळेस क्रूसाचं चिन्ह करत नाही किंवा धार्मिक मूर्तींसमोर प्रार्थना करत नाही. एकदा रात्री त्यांनी मला खूप मारलं. दुसऱ्‍याच दिवशी मी त्यांचं घरं सोडून माझ्या मावशीकडं राहायला गेले. माझ्या दाजींनी माझ्याविषयी बाबांना सांगितलं. त्यानंतर काही दिवसांत बाबा रडतच आले, त्यांनी माझं मन बदलण्याचा प्रयत्न केला. माझ्या दाजींनी माझ्यापुढे गुडघे टेकून मला क्षमा मागितली, मी त्यांना क्षमा केली. वाद मिटवण्यासाठी त्यांनी मला चर्चमध्ये पुन्हा येण्यास सांगितलं, पण मी मात्र ठाम राहिले.

घरी परतल्यावर माझ्यावर दबाव येतच राहिले. कॅटिनाशी माझा संपर्क तुटला, माझ्याकडे एकही प्रकाशन नव्हते की बायबल नव्हतं. पण माझ्या एका चुलत बहिणीनं मला मदत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला खूप आनंद झाला. ती करिंथला गेली तेव्हा ती एका साक्षीदार बहिणीला भेटली आणि तिनं तिच्याकडून माझ्यासाठी “देव सत्य होवो” हे पुस्तक आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची एक प्रत आणली; हे मी गुपचूप वाचू लागले.

माझ्या जीवनाला अनपेक्षित वळण लागते

तीन वर्षांपर्यंत माझा कडाडून विरोध करण्यात आला. साक्षीदारांबरोबर माझा कसलाच संबंध राहिला नाही, आणि मला त्यांची प्रकाशनेही मिळत नव्हती. पण माझ्या जीवनाला खूप मोठं वळण लागणार होतं याची मला जराही जाणीव नव्हती.

बाबांनी मला सांगितलं होतं, की मला थेस्सलनायकामधील माझ्या मामांकडे राहायला जावं लागेल. निघण्याआधी मी, एक कोट शिवून घेण्यासाठी करिंथमध्ये एका शिंप्याकडे गेले. काय आश्‍चर्य, तिथं मी कॅटिनाला भेटले! ती तिथं कामाला होती. इतक्या दिवसांनी आम्ही एकमेकींना भेटत होतो म्हणून आम्हा दोघींना खूप आनंद वाटला. दुकानातून निघताना आम्ही सायकलीवर कामावरून घरी चाललेल्या एका अगदी लोभस तरुण मनुष्याला भेटलो. त्याचं नाव होतं, खरालामबोस. आम्हा दोघांची मैत्री झाली आणि एकमेकांची चांगल्याप्रकारे ओळख झाल्यावर आम्ही लग्न करायचं ठरवलं. जवळजवळ याच वेळेला, जानेवारी ९, १९५२ रोजी मी यहोवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला.

खरालामबोस यांचा आधीच बाप्तिस्मा झाला होता. त्यांनाही त्यांच्या कुटुंबाकडून पुष्कळ विरोध सहन करावा लागला होता. ते अतिशय आवेशी होते. ते असिस्टंट कॉन्ग्रीगेशन सर्व्हंट म्हणून सेवा करत होते आणि अनेक बायबल अभ्यास संचालित करत होते. काही दिवसांनी त्यांच्या मोठ्या भावांनीसुद्धा सत्य स्वीकारलं आणि आज त्यांच्या भावांच्या कुटुंबातील बहुतेकजण यहोवाची सेवा करत आहेत.

बाबांना खरालामबोस खूप आवडले, त्यामुळे त्यांनी लग्नाला होकार दिला पण आई सहजासहजी राजी झाली नाही. इतकं सर्व असूनही खरालामबोस आणि मी मार्च २९, १९५२ रोजी विवाहबद्ध झालो. माझा एक थोरला भाऊ आणि एक चुलत भाऊ माझ्या लग्नाला आले. पण खरालामबोस माझ्यासाठी यहोवाकडून एक अतुलनीय वरदान ठरणार होते हे मला तेव्हा माहीत नव्हतं! त्यांची सहचारिणी म्हणून मी यहोवाच्या सेवेवर केंद्रित असलेलं जीवन जगू शकले.

बांधवांना मजबूत करणे

१९५३ साली, खरालामबोस आणि मी अथेन्सला राहायला जाण्याचा निश्‍चय केला. प्रचार कार्यात आणखी वेळ घालवण्याची इच्छा असल्यामुळे खरालामबोस यांनी आपला व्यापार सोडून दिला आणि अर्धवेळ नोकरी करू लागले. आम्ही दुपारी ख्रिस्ती सेवा करत होतो आणि अनेक बायबल अभ्यास संचालित करत होतो.

आमच्या सेवेवर अधिकृत बंदी असल्यामुळे आम्हाला परिस्थितीनुसार कार्य करावं लागलं. उदाहरणार्थ, खरालामबोस जिथं काम करत होते त्या अथेन्सच्या अगदी मध्य असलेल्या एका किओस्क किंवा टपरीच्या खिडकीत टेहळणी बुरूज नियतकालिकाची एक प्रत ठेवायचं आम्ही ठरवलं. एका उच्च पोलिस अधिकाऱ्‍यानं या नियतकालिकावर बंदी असल्याचं आम्हाला सांगितलं. तरीपण, ते आम्हाला म्हणाले, की मला या नियतकालिकाची एक प्रत द्या, मी सुरक्षा कार्यालयात त्याविषयी चौकशी करतो. सुरक्षा कार्यालयात जेव्हा त्यांना हमी देण्यात आली, की हे नियतकालिक कायदेशीर आहे तेव्हा याविषयी ते आम्हाला सांगायला आले. मग ज्या ज्या बांधवांच्या किओस्क्स किंवा टपऱ्‍या होत्या त्यांनीही लगेच आपल्या किओस्क्सच्या खिडकीत टेहळणी बुरूज नियतकालिक ठेवायला सुरवात केली. एका मनुष्यानं आमच्या टपरीतून एक टेहळणी बुरूज नियतकालिक घेतले, तो साक्षीदार बनला आणि आज वडील या नात्याने सेवा करत आहे.

माझ्या धाकट्या भावानंही सत्य स्वीकारल्याचं पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. तो अथेन्स येथे मर्चंट मरीन कॉलेजमध्ये शिकायला आला होता; आम्ही त्याला आमच्याबरोबर एका अधिवेशनाला नेलं. आमची अधिवेशनं जंगलात गुप्तपणे चालत. या अधिवेशनात ऐकलेल्या गोष्टी त्याला खूप आवडल्या, त्यानंतर लगेच तो व्यापारी खलाशी म्हणून सुमद्रप्रवासाला निघून गेला. अशाच एका दौऱ्‍यादरम्यान तो अर्जेंटिना येथील बंदरावर आला. तेथे, एक मिशनरी बांधव प्रचार करण्यासाठी जहाजात चढले आणि माझ्या भावानं त्यांच्याकडून नियतकालिके घेतली. “मला सत्य मिळालं आहे. माझ्यासाठी या मासिकाची वर्गणी भरा,” असे जेव्हा त्यानं आम्हाला पत्रात सांगितलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. आज तो आणि त्याचं कुटुंब विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहे.

१९५८ साली खरालामबोस यांना प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं. आमच्या कार्यावर बंदी असल्यामुळे व परिस्थिती कठीण असल्यामुळे प्रवासी पर्यवेक्षक सहसा त्यांच्या पत्नींना आपल्यासोबत प्रवासाला नेत नसत. १९५९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात शाखा दफ्तरातील जबाबदार बांधवांना आम्ही विचारलं, की मीही खरालामबोस यांच्याबरोबर जाऊ का. त्यांनी संमती दिली. तेव्हा आम्हाला मध्य आणि उत्तर ग्रीसमधील मंडळ्यांना भेटी देऊन त्यांना मजबूत करायचं होतं.

हे दौरे सोपे नव्हते. पक्के रस्ते फार कमी होते. शिवाय, आमच्याजवळ आमची कार नसल्यामुळे बहुतेकदा आम्ही सार्वजनिक वाहनातून किंवा कोंबड्या आणि इतर सामानसुमान घेऊन जाणाऱ्‍या पिकअप ट्रकनं प्रवास करत असू. कच्च्या रस्त्यावरून जावं लागत असल्यामुळे आम्ही रबराचे बूट घालायचो. प्रत्येक गावात एक नागरी शिबंदी असल्यामुळे, चौकशी टाळण्याकरता आम्ही रात्रीच्या वेळी गावांमध्ये शिरायचो.

बांधवांना या भेटींची खूप कदर होती. त्यांच्यापैकी बहुतेकजण दिवसभर शेतात कष्ट करायचे पण तरीसुद्धा रात्रीच्या वेळी वेगवेळ्या घरांमध्ये होणाऱ्‍या सभांना ते उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचे. ते पाहुणचारही खूप चांगला करायचे; त्यांच्याजवळ थोडंच होतं तरीसुद्धा ते आम्हाला सर्वात उत्तम, जे देता येईल ते द्यायचे. कधीकधी तर आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत एकाच खोलीत झोपायचो. बांधवांचा विश्‍वास, धीर आणि आवेश हा आम्हाला मिळालेला आणखी एक मौल्यवान लाभ होता.

आमच्या सेवेचा विस्तार

१९६१ सालच्या फेब्रुवारी महिन्यात, अथेन्समधील शाखा दफ्तराला भेट देत असताना, तुम्हाला बेथेलमध्ये सेवा करायला आवडेल का असं आम्हाला विचारण्यात आलं. आम्ही यशयाप्रमाणे म्हणालो: “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया ६:८) दोन महिन्यांनंतर आम्हाला एक पत्र मिळालं; त्यात, लवकरात लवकर बेथेलमध्ये या असं म्हटलं होतं. मे २७, १९६१ रोजी आम्ही बेथेल सेवा सुरू केली.

आम्हाला आमची नवी नेमणूक खूप आवडली, आम्ही तिथं खूप लवकर रुळलो. खरालामबोस सेवा आणि वर्गणी विभागात काम करायचे आणि नंतर काही काळासाठी शाखा समितीतही त्यांनी सेवा केली. मला होम डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी कामं होती. तेव्हा बेथेल कुटुंबात एकूण १८ सदस्य होते, पण सुमारे पाच वर्षं बेथेलमध्ये वडिलांसाठी एक प्रशाला चालली होती म्हणून सुमारे ४० लोक होते. सकाळी मी भांडी धुण्याचं, स्वयंपाकाचं, १२ बिछाने आवरायचं आणि दुपारच्या जेवणासाठी टेबल मांडण्याचं काम करायचे. दुपारी, कपडे इस्त्री करायचं, शौचालये आणि खोल्या साफ करायचं काम करायचे. आठवड्यातून एकदा लॉन्ड्रीत काम करायचे. खूप काम होतं तरीसुद्धा माझा कुठंतरी उपयोग होतोय म्हणून मला आनंद वाटायचा.

आम्ही आमच्या बेथेल नेमणुकीत आणि क्षेत्र सेवेत व्यस्त होतो. पुष्कळदा आम्ही सात बायबल अभ्यास संचालित करायचो. शनिवार-रविवारी, खरालामबोस विविध मंडळ्यांना भाषण द्यायला जायचे तेव्हा मीही त्यांच्याबरोबर जायचे. आम्ही दोघं नेहमी सोबतच असायचो.

आम्ही एका जोडप्याबरोबर अभ्यास करायचो ज्यांचं ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चबरोबर घनिष्ठ नातं होतं आणि चर्चच्या विरुद्ध जाणाऱ्‍या पाखंड्यांना शोधण्याचं काम करणाऱ्‍या पाळकाशी सख्य होतं. त्यांच्या घरातील एक खोली मूर्तींनीच भरली होती; तिथं सतत धूप जाळला जायचा व दिवसभर बायझनटाईन गीते लावलेली असायची. काही दिवसांपर्यंत आम्ही गुरूवारच्या दिवशी त्यांच्याकडे बायबल अभ्यासासाठी जायचो आणि शुक्रवारच्या दिवशी त्यांचा तो पाळक मित्र त्यांच्या घरी यायचा. एके दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे तेव्हा तुम्ही कसेही करून याच. आम्ही गेलो तेव्हा त्यांनी सर्वात पहिल्यांदा आम्हाला ती खोली दाखवली. त्यांनी त्या खोलीतल्या सर्व मूर्ती काढून टाकल्या होत्या आणि तिची डागडुजी केली होती. या जोडप्याने प्रगती केली आणि बाप्तिस्मा घेतला. आम्ही ज्यांच्याबरोबर बायबल अभ्यास केला अशा एकूण ५० लोकांना यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेताना पाहून आम्हाला खूप आनंद वाटला.

अभिषिक्‍त बांधवांबरोबरचा सहवास मला मिळाला तो एक खास सुहक्क होता. बंधू नॉर, फ्रान्झ, हेन्शल यांसारख्या नियमन मंडळाच्या सदस्यांच्या भेटी खूपच उत्तेजनात्मक होत्या. ४० पेक्षा अधिक वर्षांनंतर, मला आजही असेच वाटते, की बेथेलमध्ये सेवा करणे हा मोठा सन्मान व सुहक्क आहे.

आजारपण आणि मृत्यू

१९८२ साली, खरालामबोस यांच्यात अल्झायमर आजाराची लक्षणं दिसू लागली. १९९० सालापर्यंत त्यांची तब्येत पूर्णपणे ढासळली, त्यांची सतत काळजी घ्यावी लागायची. त्यांच्या जीवनाच्या शेवटल्या आठ वर्षांत आम्ही बेथेल सोडून कोठे जाऊ शकत नव्हतो. बेथेल कुटुंबातील पुष्कळ प्रिय बांधवांनी तसेच जबाबदार पर्यवेक्षकांनी, आम्हाला साहाय्य देण्याची व्यवस्था केली. त्यांचे तर साहाय्य होतेच, तरीसुद्धा मला खरालामबोस यांच्यासोबतच रात्रंदिवस राहावं लागायचं. कधीकधी तर खूप त्रास व्हायचा, मला अनेक रात्री जागून काढाव्या लागायच्या.

१९९८ सालच्या जुलै महिन्यात माझे प्रिय खरालामबोस मला सोडून गेले. मला अजूनही त्यांची खूप आठवण येते, पण ते यहोवाच्या ध्यानात आहेत आणि पुनरुत्थानाच्या वेळी इतर कोट्यवधी लोकांबरोबर यहोवा त्यांची देखील आठवण करेल या गोष्टीमुळे मला सांत्वन मिळते.—योहान ५:२८, २९.

यहोवाच्या उपकारांबद्दल आभारी

खरालामबोस आता माझ्याबरोबर नसले तरीसुद्धा मी एकटी नाही. बेथेलमध्ये सेवा करायचा सुहक्क मला अजूनही आहे आणि बेथेल कुटुंबातील सर्वजण माझ्यावर प्रेम करतात, माझी काळजी घेतात. याशिवाय, अख्ख्या ग्रीसमध्ये माझे आध्यात्मिक भाऊ आणि बहिणी आहेतच. आता मी ७० पेक्षा अधिक वर्षांची आहे तरीसुद्धा किचनमध्ये आणि डायनिंग हॉलमध्ये पूर्ण दिवस काम करू शकते.

न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त मुख्यालयाला भेट देण्याचं माझं स्वप्न १९९९ साली पूर्ण झालं. तेव्हा मला किती आनंद झाला होता त्याचं मी वर्णन करू शकत नाही. तो खरोखरच एक उभारणीकारक व कधीही विसरता येणार नाही असा अनुभव होता.

मी मागे वळून पाहते तेव्हा मला अगदी मनापासून वाटतं, की मी माझ्या जीवनाचं सार्थक केलं आहे. पूर्ण वेळ यहोवाची सेवा करण्यासारखं दुसरं उत्तम जीवनध्येय नाही. मी पूर्ण खात्रीनं म्हणू शकते, की मला कशाची कमी भासली नाही. यहोवानं आम्हा दोघा पतीपत्नीची आध्यात्मिकरीत्या आणि शारीरिकरीत्या प्रेमानं काळजी घेतली. माझ्या अनुभवावरून मला समजते, की “परमेश्‍वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?” असे स्तोत्रकर्त्याने का विचारले असावे.—स्तोत्र ११६:१२.

[२६ पानांवरील चित्र]

खरालामबोस आणि मी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो

[२७ पानांवरील चित्र]

माझे पती, शाखेतील आपल्या कार्यालयात काम करताना

[२८ पानांवरील चित्र]

मला वाटतं, की बेथेल सेवा एक मोठा बहुमान आहे