व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते चर्चला का जातात

ते चर्चला का जातात

ते चर्चला का जातात

“आता अमेरिकेच्या तुलनेत कोरियाच्या प्रजासत्ताकात चार पट अधिक प्रेसबिटेरियन पंथाचे लोक आहेत.” न्यूझवीक साप्ताहिकातील ते वाक्य वाचून कदाचित काहींना आश्‍चर्य वाटले असावे कारण पुष्कळांना वाटते की, कोरिया हे कंफूशियन किंवा बौद्ध राष्ट्र आहे. आज, एखाद्या पर्यटकाला तेथे असंख्य “ख्रिस्ती” चर्चेस दिसतील; सहसा त्यांच्यावर लाल नीऑन दिव्यांचे क्रॉस असतात. रविवारच्या दिवशी, दोन-दोन, तीन-तीन लोकांच्या झुंडी हातात बायबल घेऊन चर्चला जातानाचे दृश्‍य दिसते. १९९८ च्या एका सर्वेक्षणानुसार, सुमारे ३० टक्के कोरियन लोक कॅथलिक किंवा प्रोस्टेस्टंट चर्चला जातात; बौद्ध लोकांपेक्षा यांची संख्या अधिक आहे.

या काळात, कोणत्याही ठिकाणी इतके जास्त लोक नियमितपणे चर्चला जाताना दिसावेत ही असामान्य गोष्ट आहे. तरीपण, हे केवळ कोरियातच नव्हे तर आशियातील इतर देशांमध्ये त्याचप्रमाणे आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतही पाहायला मिळते. आज धर्माबद्दल उदासीनता आणि बेपर्वा मनोवृत्ती वाढत असताना इतके लोक देवावर अजूनही विश्‍वास असल्याचा दावा का करतात? ते चर्चला का जातात?

एका गॅलप सर्वेक्षणात हे प्रकट झाले की, कोरियातील चर्चला जाणारे निम्म्याहून अधिक लोक मनःशांतीच्या शोधात आहेत; एक तृतीयांश लोक मृत्यूनंतर अनंतकालिक जीवन असण्याची आशा धरतात; आणि १० पैकी १ जण आरोग्य, धनसंपत्ती आणि यशाच्या शोधात आहे.

चीनमध्ये कम्युनिस्ट मतप्रणालीची जागा हळूहळू भांडवलशाहीच्या उद्दिष्टांनी घेतल्यानंतर निर्माण झालेली आध्यात्मिक पोकळी भरून काढण्यासाठी पुष्कळ लोक चर्चेसमध्ये गर्दी करू लागले आहेत. दरवर्षी चीनमध्ये बायबलच्या लाखो प्रती छापून त्यांचे वितरण केले जाते आणि माओचे लहान लाल पुस्तक जितक्या आसक्‍तीने लोक वाचत होते तितक्याच उत्सुकतेने ते बायबलही वाचतात.

ब्राझीलमधील काही कॅथलिक, खासकरून तरुण पिढी, भविष्यातील आनंदी जीवनाच्या वचनाने समाधानी नाहीत—त्यांना आता आनंद हवा आहे. टुडु हे बातमी पत्रक म्हणते: “७० च्या दशकात मुक्‍ततेच्या चर्च शिकवणीने लोकांना प्रवृत्त केले तर आज सुसंपन्‍नतेच्या शिकवणीने लोक प्रवृत्त होतात.” ब्रिटनमध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात, चर्चला उपस्थित असलेल्यांना आपल्या चर्चविषयी कोणती एक गोष्ट आवडते असे विचारण्यात आले. बहुतेकांनी सहवास याचा सर्वात पहिला उल्लेख केला.

या सर्व गोष्टींवरून दिसून येते की, पुष्कळ लोकांचा देवावर अजूनही विश्‍वास असला तरी, सध्याच्या जीवनात काय मिळेल याची त्यांना चिंता आहे, भविष्याची चिंता नाही आणि देवाचा तर ते विचारही करत नाहीत. पण देवावर विश्‍वास ठेवण्याचे योग्य कारण काय असे तुम्हाला वाटते? याविषयी बायबल काय म्हणते? पुढील लेखात तुम्हाला याचे उत्तर मिळेल.