व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला

विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला

विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला

“मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तोत्र ३२:८.

१. यशस्वी विवाहाकरता कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?

 उडत्या झुल्यावरून एक कसरतपटू स्वतःला झोकून देतो आणि पाय पोटाशी घेऊन हवेत कोलांट-उड्या मारतो. मग अचानक सरळ होऊन हात पुढे करताच, पुढच्या बाजूने त्याच क्षणी दुसऱ्‍या झुल्यावर उलटा लटकणारा कसरतपटू त्याचे हात धरतो. बर्फावर स्केटिंग करणारे एक जोडपे रिंगणात बर्फावरून अतिशय सुरेखपणे घसरत जात असतात. अचानक तो तिला उचलतो आणि हवेत फेकतो. ती गोल फिरते, अलगद एका पायावर उतरते, त्याचा हात धरते आणि पुन्हा दोघे बर्फावर घसरत जातात. या दोन्ही उदाहरणातील कसरतपटू अगदी विनाप्रयास हे खेळ करत आहेत असे भासते. पण पुरेसा सराव, चांगला जोडीदार आणि खासकरून योग्य प्रकारच्या मार्गदर्शनाशिवाय कोणी हे खेळ करण्याचे धाडस करेल का? त्याचप्रकारे यशस्वी विवाह देखील योगायोगाने घडून येतो असे कदाचित तुम्हाला वाटेल. पण तो देखील, चांगला जोडीदार, समान दिशेने केलेले दोघांचे प्रयत्न आणि खासकरून सुज्ञ मार्गदर्शनावर अवलंबून आहे. खरोखर, योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे.

२. (अ) विवाह संस्थेची सुरवात कोणी केली आणि कोणत्या उद्देशाने? (ब) काही विवाह कशापद्धतीने जुळवण्यात आले?

आपल्याला एखादा जोडीदार असावा किंवा जीवनसाथी असावा असा विचार अविवाहित तरुणाच्या किंवा तरुणीच्या मनात येणे साहजिक आहे. यहोवा देवाने विवाह संस्थेची सुरवात केल्यापासून स्त्री व पुरुषांचे विवाह सामान्य जीवनाचा अविभाज्य हिस्सा बनले आहेत. पण पहिला पुरुष आदाम याने आपली पत्नी स्वतःहून निवडली नव्हती. यहोवाने प्रेमळपणे त्याला एक पत्नी दिली होती. (उत्पत्ति २:१८-२४) ते पहिले दांपत्य बहुगुणित होऊन सबंध पृथ्वी मानवांनी भरली जाणार होती. त्या पहिल्या विवाहानंतर मात्र लग्न जुळवण्याचे काम सहसा मुलामुलींचे आईवडील करू लागले; कधीकधी मुलामुलीला विचारून हा निर्णय घेतला जायचा. (उत्पत्ति २१:२१; २४:२-४, ५८; ३८:६; यहोशवा १५:१६, १७) काही देशांत आणि संस्कृतींत अजूनही ठरवून लग्न करण्याची पद्धत आहे; पण आजकाल बरेच तरुणतरुणी आपल्या पसंतीने जोडीदार निवडतात.

३. विवाह जोडीदाराची निवड कशी केली जावी?

विवाह जोडीदाराची निवड कशी केली जावी? काहीजण रूप पाहून भाळतात आणि त्याच आधारावर निर्णय घेतात. इतरजण आर्थिक फायदा पाहतात; ते अशा व्यक्‍तीच्या शोधात असतात जी त्यांची चांगली काळजी घेईल आणि त्यांच्या सर्व गरजा व इच्छा पूर्ण करू शकेल. पण केवळ वर दिलेल्या या गोष्टींच्या आधारावर आनंददायक आणि समाधानकारक वैवाहिक जीवन मिळवता येते का? नीतिसूत्रे ३१:३० म्हणते: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्‍वराचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रीची प्रशंसा होते.” यातून एक महत्त्वाचा मुद्दा कळून येतो: यहोवाला डोळ्यापुढे ठेवूनच जोडीदाराची निवड केली पाहिजे.

देवाकडून प्रेमळ मार्गदर्शन

४. जोडीदार निवडण्याच्या बाबतीत देवाने कोणती मदत पुरवली आहे?

आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने, यहोवाने सर्व बाबतीत आपल्याला मार्गदर्शन पुरवण्यासाठी त्याचे लिखित वचन दिले आहे. तो म्हणतो: “परमेश्‍वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभु, म्हणतो; तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यशया ४८:१७) त्याअर्थी, विवाह जोडीदार निवडण्याच्या बाबतीतही बायबलमध्ये सर्व काळांना लागू होणारे मार्गदर्शन सापडेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. आपले वैवाहिक जीवन चिरस्थायी आणि आनंददायक असावे अशी यहोवाची इच्छा आहे. म्हणूनच हे मार्गदर्शन समजून आपण त्याचा अवलंब करावा यासाठी त्याने आपल्याला मदत पुरवली आहे. एका प्रेमळ निर्माणकर्त्याकडून आपण अशीच अपेक्षा करू शकत नाही का?—स्तोत्र १९:८.

५. दीर्घकाळ आनंदी वैवाहिक जीवनाकरता काय महत्त्वाचे आहे?

यहोवाने विवाह संस्थेची स्थापना केली तेव्हा हे बंधन कायमस्वरूप असावे असा त्याचा उद्देश होता. (मार्क १०:६-१२; १ करिंथकर ७:१०, ११) म्हणूनच त्याला “सूटपत्राचा तिटकारा आहे,” आणि केवळ “जारकर्माच्या” कारणामुळेच घटस्फोट घेण्याची तो परवानगी देतो. (मलाखी २:१३-१६; मत्तय १९:९) त्यामुळे, विवाह जोडीदाराची निवड जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक असून गांभिर्याने विचार करूनच हा निर्णय घेतला पाहिजे. जीवनात फार कमी असे निर्णय आहेत जे एकतर तुम्हाला नितान्त समाधान नाहीतर नितान्त दुःख देऊ शकतात. योग्य निवड केल्यास जीवन सुखासमाधानाने परिपूर्ण होते पण अयोग्य निवड केली तर दुःखाला अंतच नसतो. (नीतिसूत्रे २१:१९; २६:२१) दीर्घकाळ आनंदी वैवाहिक जीवनाकरता सुज्ञपणे निर्णय घेणे आणि शेवटपर्यंत निभावून नेण्याची तयारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण देवाने विवाहाची स्थापना याच उद्देशाने केली होती की या बंधनात पती पत्नींनी एकोप्याने राहावे व एकमेकांना साहाय्य करावे.—मत्तय १९:६.

६. तरुण स्त्रीपुरुषांनी जोडीदाराची निवड करताना खास काळजी घेण्याची का गरज आहे आणि सर्वात सुज्ञ निर्णय घेणे त्यांना कसे शक्य होईल?

जोडीदाराची निवड करताना शारीरिक आकर्षण आणि उत्कट भावना योग्य निर्णय घेण्यात अडथळा बनू नयेत याची तरुण स्त्रीपुरुषांनी खास काळजी घेतली पाहिजे. कारण केवळ या गोष्टींवर आधारित असलेला वैवाहिक संबंध काही काळातच कमकुवत होण्याची आणि पतीपत्नी एकमेकांना तुच्छ लेखण्याची किंवा एकमेकांचा द्वेष करू लागण्याची शक्यता आहे. (२ शमुवेल १३:१५) दुसरीकडे पाहता, जसजसे पतीपत्नी एकमेकांना अधिकाधिक जवळून ओळखू लागतात आणि त्यांना स्वतःच्याही व्यक्‍तिमत्त्वाची ओळख घडते तसतसे त्यांच्यातले प्रेम अधिक वाढते आणि चिरस्थायी बनते. आपल्या मनाला ज्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात त्या नेहमीच आपल्याकरता सगळ्यात उत्तम नसतात, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. (यिर्मया १७:९) म्हणूनच बायबलमध्ये सापडणारे देवाचे मार्गदर्शन इतके महत्त्वाचे आहे. कारण या मार्गदर्शनामुळे जीवनात सुज्ञपणे निर्णय कसे घ्यावेत हे समजून घेण्यास आपल्याला मदत मिळते. स्तोत्रकर्त्याने यहोवा असे म्हणत असल्याचे सूचित केले: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तोत्र ३२:८; इब्री लोकांस ४:१२) प्रत्येक व्यक्‍तीला उपजतपणे प्रेमाची आणि कोणाच्या तरी सोबतीची गरज असते आणि वैवाहिक जीवनातून ही गरज तृप्त होऊ शकते; पण विवाहात अनेक आव्हानांनाही तोंड द्यावे लागत असल्यामुळे वैचारिक परिपक्वता आणि समजूतदारपणाची खूप आवश्‍यकता आहे.

७. जोडीदार निवडण्यासंबंधी काहीजण बायबलच्या आधारावर दिलेला सल्ला का स्वीकारत नाहीत पण असे केल्यामुळे काय घडू शकते?

जोडीदाराची निवड करण्यासंबंधी विवाह संस्थेची स्थापना करणाऱ्‍याचा सल्ला विचारात घेणे शहाणपणाचे आहे. कधीकधी आईवडील किंवा ख्रिस्ती वडील बायबलच्या आधारावर यासंबंधी काही सल्ला देतात तेव्हा आपण नाराज होतो. हे लोक आपल्या भावना समजू शकत नाहीत असे आपल्याला वाटते आणि त्या उत्कट भावनांच्या आहारी जाऊन आपण मनाप्रमाणे निर्णय घेतो. पण जेव्हा वास्तविकता समोर येते, तेव्हा आपल्याला पस्तावा होतो की आपल्या भल्यासाठी दिलेला सुज्ञ सल्ला आपण ऐकला नाही. (नीतिसूत्रे २३:१९; २८:२६) पण तोपर्यंत आपण एका प्रेमहीन वैवाहिक संबंधात अडकलेले असतो, अनुभव नसताना आईवडील बनलेले असतो किंवा सत्यात नसलेल्या जोडीदारासोबत संसार करण्याची पाळी आपल्यावर येते. वैवाहिक जीवनात अपरिमित आनंद मिळण्याऐवजी सतत दुःख मिळाल्यास किती दुर्दैवी गोष्ट ठरेल!

सुभक्‍तिशील मनोवृत्ती—सर्वात महत्त्वाची

८. वैवाहिक संबंध चिरस्थायी आणि आनंददायक व्हावा यासाठी सुभक्‍तिशील मनोवृत्ती कशी सहायक ठरू शकते?

एका तरुण व तरुणीला एकमेकांविषयी आकर्षण असल्यास वैवाहिक संबंध अधिकच मजबूत होतो हे खरे आहे. पण चिरस्थायी व आनंददायक वैवाहिक संबंधाकरता त्या दोघांच्या जीवनात समान मूल्ये असणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, जर दोघांची यहोवा देवाप्रती सुभक्‍तिशील मनोवृत्ती असेल तर या गोष्टीमुळे त्यांच्यात अतूट बंधन आणि ऐक्य निर्माण होईल. (उपदेशक ४:१२) ख्रिस्ती दांपत्य आपल्या जीवनात यहोवाच्या खऱ्‍या उपासनेला सर्वात जास्त महत्त्व देतात तेव्हा आध्यात्मिकरित्या, मानसिकरित्या आणि नैतिकरित्या त्यांच्यात नेहमी ऐक्यभाव असतो. ते दोघे मिळून देवाच्या वचनाचा अभ्यास करतात. दोघे मिळून प्रार्थना करतात, आणि यामुळे त्यांच्यात एक अतूट बंधन निर्माण होते. ते एकमेकांसोबत ख्रिस्ती सभांना जातात आणि क्षेत्र सेवेतही सोबत कार्य करतात. हे सर्व केल्यामुळे त्यांच्यात एक आध्यात्मिक नाते निर्माण होते आणि ते एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे त्यांना यहोवाचा आशीर्वाद मिळतो.

९. इसहाकासाठी पत्नी शोधण्याची वेळ आली तेव्हा अब्राहामने काय केले आणि याचा काय परिणाम झाला?

विश्‍वासू कुलपिता अब्राहाम सुभक्‍तीशील मनोवृत्तीचा असल्यामुळेच त्याच्या पुत्रासाठी अर्थात इसहाकासाठी पत्नी निवडण्याची वेळ आली तेव्हा त्याने देवाला संतोष वाटेल अशा पद्धतीने हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या विश्‍वासू सेवकाला अब्राहामने म्हटले: “मी तुला परमेश्‍वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. . . . [परमेश्‍वर] तुझ्यापुढे आपला दूत पाठवील, आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण.” रिबका एक आदर्श पत्नी ठरली आणि इसहाकाचे तिच्यावर खूप प्रेम होते.—उत्पत्ति २४:३, ४, ७, १४-२१, ६७.

१०. पती व पत्नींकडून बायबलच्या सल्ल्यानुसार काय अपेक्षा केल्या जातात?

१० आपण अविवाहित ख्रिस्ती असल्यास, सुभक्‍तीशील मनोवृत्ती आपल्याला विवाहाविषयी बायबलमध्ये दिलेल्या अपेक्षांनुसार वागण्याकरता आवश्‍यक असलेले गुण विकसित करण्यास मदत करेल. प्रेषित पौलाने उल्लेख केल्याप्रमाणे बायबलमध्ये पती व पत्नींकडून केल्या जाणाऱ्‍या अपेक्षांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. . . . पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले . . . पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी . . . तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वत:वर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:२२-३३) पौलाच्या या देवप्रेरित शब्दांवरून प्रीति आणि आदर या गुणांचे महत्त्व लक्षात येते. या सल्ल्याचे पालन करण्यासाठी यहोवाविषयी आदरयुक्‍त भय असणे आवश्‍यक आहे. तसेच चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत आपल्या पती किंवा पत्नीशी एकनिष्ठ राहण्याची मनापासून तयारी असणेही आवश्‍यक आहे. जे ख्रिस्ती, विवाह करू इच्छितात त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असले पाहिजे.

विवाह केव्हा करावा हे ठरवणे

११. (अ) लग्न केव्हा करावे या संदर्भात बायबलमध्ये काय सल्ला देण्यात आला आहे? (ब) बायबलमध्ये १ करिंथकर ७:३६ येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे शहाणपणाचे आहे हे कोणत्या उदाहरणावरून लक्षात येते?

११ आपण विवाह करण्यास तयार आहो किंवा नाही हे ठरवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्‍ती वेगळी असल्यामुळे लग्न करण्याचे निश्‍चित वय बायबलमध्ये सांगितलेले नाही. पण बायबल असे जरूर सांगते की “तारुण्याचा बहर ओसरेपर्यंत” म्हणजेच उत्कट लैंगिक इच्छा योग्य निर्णय घेण्यात बाधा बनू शकतील असा ऐन तारुण्याचा काळ ओसरून जाईपर्यंत थांबणे केव्हाही चांगले आहे. (१ करिंथकर ७:३६, NW) मिशेल म्हणते, “माझे सर्व मित्रमैत्रिणी डेटिंग आणि लग्न करत होते, कित्येक तर विशी गाठण्याआधीच. तेव्हा या सल्ल्याप्रमाणे वागणे कधीकधी मला फार कठीण जायचे. पण मला जाणीव झाली की हा सल्ला यहोवाकडून आहे आणि तो जे काही सांगतो ते आपल्या भल्यासाठीच असते. लग्नाची घाई न केल्यामुळे, मी यहोवासोबतच्या माझ्या नातेसंबंधाविषयी अधिक जागरुक राहू शकले आणि मला जीवनाचा अनुभव आला, जो अठरा-एकोणीस वर्षांत मिळणे शक्य नव्हते. काही वर्षांनंतर वैवाहिक जीवनाच्या जबाबदाऱ्‍या आणि सहसा निर्माण होणाऱ्‍या समस्यांना तोंड देण्यास मी अधिक समर्थ झाले.”

१२. अगदी तरुणपणी लग्नाची घाई न करणे का शहाणपणाचे आहे?

१२ अगदी तरुण वयात लग्न करण्याची घाई करणारे तरुणतरुणी जसजसे प्रौढ होत जातात तसतशा त्यांच्या गरजा आणि इच्छा बदलत जातात असे त्यांना आढळते. मग त्यांना जाणीव होते की पूर्वी ज्या गोष्टी त्यांना हव्याहव्याशा वाटत होत्या त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. एका ख्रिस्ती तरुणीने १६ व्या वर्षीच लग्न करण्याचे ठरवले होते. तिच्या आजीचे आणि आईचे देखील लग्न सोळाव्या वर्षी झाले होते. तिला एक तरुण आवडत होता, पण त्याने १६ व्या वर्षी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिने अशा तरुणाला निवडले जो तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला. पण नंतर या मुलीला आपल्या अविचारीपणाचा खूपच पस्तावा झाला.

१३. लग्नाची घाई करणाऱ्‍यांजवळ सहसा काय नसते?

१३ लग्न करण्याआधी सर्व गोष्टींचा साधकबाधक विचार करता येणे महत्त्वाचे आहे. लग्नाची घाई केल्यामुळे अनेक समस्या येऊ शकतात आणि या समस्यांना तोंड देण्याकरता तरुण जोडपे अद्याप तयार नसते. वैवाहिक जीवनाच्या ताणतणावांना तोंड देण्यासाठी आणि मुलांचे संगोपन करण्यासाठी आवश्‍यक असलेला अनुभव आणि परिपक्वता त्यांच्याजवळ नसते. म्हणूनच शेवटपर्यंत साथ देण्यासाठी आपण शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या तयार झाल्यावरच लग्नाचा विचार केला जावा.

१४. वैवाहिक जीवनातील तणावपूर्ण समस्या सोडवण्यासाठी कशाची गरज आहे?

१४ पौलाने लिहिले की जे लग्न करतील त्यांना “हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथकर ७:२८) लग्न म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्‍तिमत्त्वांचे मिलन; त्यामुळे समस्या येणे साहजिक आहे कारण दोघे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतील. मनुष्य मुळातच अपरिपूर्ण असल्यामुळे वैवाहिक जीवनात, बायबलमध्ये सांगितल्यानुसार आपली भूमिका बजावणे काहीवेळा आपल्याला कठीण वाटेल. (१ करिंथकर ११:३; कलस्सैकर ३:१८, १९; तीत २:४, ५; १ पेत्र ३:१, २, ७) तणावपूर्ण समस्या प्रेमळपणे सोडवण्याकरता देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यासाठी परिपक्वता आणि मजबूत आध्यात्मिकता असणे आवश्‍यक आहे.

१५. आपल्या मुलांना विवाहाकरता तयार करण्यासाठी आईवडील काय करू शकतात? उदाहरण द्या.

१५ आईवडील आपल्या मुलांना देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे शिकवून त्यांना वैवाहिक जीवनाच्या जबाबदाऱ्‍यांकरता तयार करू शकतात. बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशनांचा विचारपूर्वक वापर करून आईवडील आपल्या मुलांना हे ठरवण्यास मदत करू शकतात की ते किंवा त्यांनी निवडलेली व्यक्‍ती विवाहाची वचनबद्धता निभावण्यास तयार आहे किंवा नाही. * अठरा वर्षांची ब्लॉसम तिच्याच मंडळीतल्या एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तो पूर्ण वेळेचा पायनियर सेवक होता आणि त्या दोघांनाही लग्न करण्याची इच्छा होती. पण ती अद्याप वयाने लहान आहे असा विचार करून तिच्या आईवडिलांनी तिला एक वर्ष थांबण्यास सांगितले. ब्लॉसमने नंतर लिहिले: “मी त्यांचा सुज्ञ सल्ला ऐकला म्हणून फार बरे झाले. वर्षभर थांबल्यावर मी पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रौढपणे विचार करायला शिकले आणि मला जाणीव झाली की या तरुणाजवळ चांगल्या जोडीदारात अपेक्षित असलेले गुण नव्हते. शेवटी तो संस्था सोडून गेला, पण मी मात्र एका फार मोठ्या संकटातून बचावले. योग्य भरवशालायक निर्णय घेणारे आईवडील असणे हा किती मोठा आशीर्वाद आहे!”

‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा’

१६. (अ) ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करण्याच्या’ आज्ञेसंबंधाने ख्रिश्‍चनांची परीक्षा कशाप्रकारे होऊ शकते? (ब) विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करण्याचा मोह होतो तेव्हा ख्रिश्‍चनांनी कोणाच्या उदाहरणावर विचार करावा?

१६ ख्रिश्‍चनांकरता यहोवाचे मार्गदर्शन अगदी स्पष्ट आहे: ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा.’ (१ करिंथकर ७:३९) ख्रिस्ती आईवडील आणि त्यांच्या मुलांची याबाबतीत खरोखर परीक्षा होऊ शकते. कशाप्रकारे? तरुणतरुणांची कदाचित लग्न करण्याची इच्छा असेल पण लग्न करण्यालायक सुयोग्य व्यक्‍ती मंडळीत नसेल. निदान असेच भासत असेल. एखाद्या विशिष्ट भागात उपवर मुलींपेक्षा मुले कमी असतील किंवा एखाद्या व्यक्‍तीला कदाचित त्यांपैकी कोणी स्वतःकरता सुयोग्य वाटत नसेल. मंडळीत एक समर्पित सदस्य नसलेला तरुण कदाचित एखाद्या ख्रिस्ती तरुणीशी लग्न करण्यास इच्छुक असेल (किंवा याउलटही घडू शकते); असे घडते तेव्हा यहोवाने घालून दिलेल्या आदर्शांच्या बाबतीत हातमिळवणी करण्याचा दबाव येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अब्राहामच्या उदाहरणावर विचार करणे श्रेयस्कर ठरेल. आपला पुत्र इसहाक याचे लग्न कोणत्याही परिस्थितीत यहोवाची उपासना करणाऱ्‍या मुलीशीच व्हावे याची खात्री करण्याद्वारे त्याने यहोवासोबत आपला चांगला नातेसंबंध टिकवून ठेवला. इसहाकानेही आपला पुत्र याकोब याच्याबाबतीत असेच केले. अर्थात यासाठी त्यांना काही न काही प्रयत्न जरूर करावा लागला पण असे केल्यामुळे त्यांनी यहोवाला संतुष्ट केले आणि यामुळे त्यांना त्याचा आशीर्वाद मिळाला.—उत्पत्ति २८:१-४.

१७. सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करण्याचे परिणाम सहसा अतिशय दुःखद का असतात आणि ‘प्रभूमध्ये लग्न करण्याचे’ सर्वात महत्त्वाचे कारण कोणते आहे?

१७ सत्यात नसलेला विवाह जोडीदार कालांतराने सत्यात आल्याची उदाहरणे आहेत. पण, सहसा असे पाहण्यात येते की सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करण्याचे अतिशय दुःखद परिणाम होतात. अशा विजोड दांपत्याचे विश्‍वास, आदर्श किंवा जीवनातील ध्येयेही सारखी नसतात. (२ करिंथकर ६:१४) यामुळे त्यांना एकमेकांशी सुसंवाद साधता येत नाही आणि पर्यायाने वैवाहिक जीवनातला आनंद कमी होऊ लागतो. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती स्त्रीने अतिशय दुःखाने सांगितले की अतिशय उभारणीकारक सभा झाल्यानंतर ती घरी जाऊन सत्यात नसलेल्या तिच्या पतीशी आध्यात्मिक गोष्टींविषयी चर्चा करू शकत नाही. पण या सर्व कारणांपेक्षा ‘प्रभूमध्ये लग्न करण्याचे’ सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ही यहोवाला एकनिष्ठ राहण्याची बाब आहे. आपण देवाच्या वचनाच्या एकवाक्यतेत वागतो तेव्हा आपले मन आपल्याला दोषी ठरवत नाही कारण आपण यहोवाला “जे आवडते ते करितो.”—१ योहान ३:२१, २२.

१८. विवाहाचा विचार करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे आणि का?

१८ लग्नाचा विचार करताना, तुम्ही ज्या व्यक्‍तीशी लग्न करू इच्छिता तिच्या चांगल्या गुणांचा आणि आध्यात्मिकतेचा सर्वात आधी विचार करा. आकर्षक स्वरूपापेक्षा ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व, देवाबद्दलचे प्रेम आणि त्याला पूर्णपणे एकनिष्ठ असणे कित्येक पटीने जास्त महत्त्वाचे आहे. आध्यात्मिकरित्या सुदृढ राहण्याच्या जबाबदारीची जे विवाह जोडीदार जाणीव ठेवतात आणि ही जबाबदारी पूर्ण करतात त्यांना परमेश्‍वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. विवाहित जोडप्याचा संबंध जी गोष्ट सर्वात जास्त मजबूत करू शकते ती म्हणजे दोन्ही जोडीदारांनी निर्माणकर्त्याला पूर्णपणे समर्पित असणे आणि त्याच्या मार्गदर्शनाचा दोघांनी मनःपूर्वक स्वीकार करणे. असे केल्यास यहोवाचा गौरव होतो आणि एका मजबूत आध्यात्मिक पायावर वैवाहिक जीवनाची बांधणी होऊ शकते; शिवाय यामुळे हे बंधन चिरस्थायी ठरते.

[तळटीप]

^ टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, १९९९ अंकात पृष्ठे ४-८ पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• योग्य विवाह जोडीदार निवडताना देवाचे मार्गदर्शन का आवश्‍यक आहे?

• सुभक्‍तिशील मनोवृत्ती वैवाहिक बंधनाला मजबूत कशी बनवू शकते?

• आईवडील आपल्या मुलांना यशस्वी वैवाहिक जीवनाकरता कसे तयार करू शकतात?

• ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करणे’ का महत्त्वाचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रे]

विवाह जोडीदाराची निवड करताना देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे ही आनंदाची गुरूकिल्ली आहे

[१८ पानांवरील चित्रे]

केवळ ‘प्रभूमध्ये लग्न केल्यामुळे’ समृद्ध आशीर्वाद मिळतात