व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भेदभावाची पाळेमुळे

भेदभावाची पाळेमुळे

भेदभावाची पाळेमुळे

भेदभावाची अनेक कारणे असू शकतात. तरीपण, वास्तविक पुराव्यावरून दोन कारणे ठळक दिसून येतात (१) लोकांना बळीचा बकरा हवा असतो आणि (२) गतकाळात झालेल्या अन्यायामुळे उत्पन्‍न झालेला द्वेष.

आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे एखादी विपत्ती घडते तेव्हा लोक त्याकरता दोषी ठरवण्याकरता बळीचा बकरा शोधतात. त्यातल्या त्यात सत्तेवर असलेल्या व्यक्‍ती जेव्हा एखाद्या अल्पसंख्याक गटाविषयी वारंवार तोच तोच आरोप करतात तेव्हा लोक नकळत तो खरा मानू लागतात आणि अशारितीने द्वेषपूर्ण भेदभावाचा जन्म होतो. एक सामान्य उदाहरण म्हणजे पाश्‍चात्य देशांत आर्थिक मंदीच्या काळात सहसा परदेशी कामगारांना येथील बेरोजगारीसाठी जबाबदार ठरवले जाते—खरे पाहता, परदेशी कामगार सहसा अशाप्रकारची कामे करतात की जी बहुतेक स्थानिक लोक करू इच्छिणार नाहीत.

पण भेदभाव नेहमीच बळीचा बकरा शोधल्यामुळे उत्पन्‍न होत नाहीत. कधीकधी त्याची पाळेमुळे इतिहासात रुजलेली असतात. युनेस्को अगेंस्ट रेसिझम या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, “जातीयवाद आणि काळ्या लोकांविरुद्ध सांस्कृतिक तिरस्काराची संकल्पना गुलामांच्या व्यापारातून उत्पन्‍न झाली असे म्हणण्यास हरकत नाही.” गुलामांची खरेदी विक्री करणाऱ्‍यांनी, मानवांच्या या किळसवाण्या व्यापाराचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात, आफ्रिकन लोक मुळातच क्षुद्र असल्याचा दावा केला. ही निराधार पूर्वधारणा आजही अस्तित्वात आहे; आणि, कालांतराने गोऱ्‍या लोकांनी जेथे कोठे वसाहती स्थापन केल्या तिथल्या स्थानिक लोकांचाही यात समावेश करण्यात आला.

अत्याचार व अन्यायाच्या अशाच इतिहासामुळे आजही सबंध जगात भेदभाव अस्तित्वात राहिले आहेत. आयर्लंडमधील कॅथलिक व प्रोटेस्टंट लोकांमधील वैमनस्य १६ व्या शतकापासून चालत आले आहे कारण त्या काळात इंग्लंडच्या शासकांनी कॅथलिकांचा छळ करून त्यांच्यापैकी अनेकांना हद्दपार केले होते. धर्मयुद्धांदरम्यान (क्रूसेड्‌स) तथाकथित ख्रिश्‍चनांनी केलेल्या भयंकर अत्याचारांमुळे आजही मध्यपूर्वेतील मुस्लिमांच्या मनात द्वेष जागृत होतो. बाल्कन द्वीपकल्पांतील देशांपैकी सर्बियन व क्रोएशन लोकांमधील वैरभाव, दुसऱ्‍या महायुद्धात झालेल्या सामान्य नागरिकांच्या कत्तलींमुळे अधिकच तीव्र झाला. या उदाहरणांवरून दिसून येते त्याप्रमाणे, दोन गटांत जुने वैमनस्य असल्यास भेदभावांना अधिकच पुष्टी मिळते.

अज्ञानाचा विकास

नुकतीच पावले टाकायला शिकलेल्या लहानशा मुलाच्या मनात कोणतेही भेदभाव नसतात. उलट अभ्यासकांच्या मते मुले सहसा दुसऱ्‍या वंशाच्या मुलाबरोबर खेळायला सहज तयार होतात. पण हेच मूल दहा अकरा वर्षाचे झाल्यावर दुसऱ्‍या जमातीच्या, वंशाच्या अथवा धर्माच्या लोकांचा तिरस्कार करण्याची शक्यता आहे. मुलांचे मन व चरित्र आकार घेत असते त्या सुरवातीच्या काळातच, त्यांच्या मनावर काही चुकीच्या धारणा बिंबवल्या जातात व या धारणा कधीकधी आयुष्यभर बदलत नाहीत.

या धारणा कशाप्रकारे बिंबवल्या जातात? तर या नकारात्मक मनोवृत्ती, सुरवातीला मूल आपल्या आईवडिलांच्या आणि नंतर आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा शिक्षकांच्या बोलण्यातून व कृतींतून आत्मसात करते. कालांतराने शेजारी, वृत्तपत्रे, रेडिओ किंवा टीव्ही यांचाही त्याच्यावर प्रभाव पडतो. आपल्याला न आवडणाऱ्‍या गटातील लोकांबद्दल सहसा फारशी माहिती नसतानाही, प्रौढावस्थेत पोचेपर्यंत त्याने त्यांच्याविषयी असा निष्कर्ष काढलेला असतो की ते आपल्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत आणि भरवशालायक नाहीत. कदाचित तो त्यांचा द्वेषही करत असेल.

प्रवास व दळणवळण क्षेत्रांत बरीच प्रगती झाल्यापासून बऱ्‍याच देशांत वेगवेगळ्या संस्कृतींचा व वांशिक गटांचा संपर्क वाढला आहे. तरीपण, ज्याच्या मनात तीव्र भेदभावाच्या भावना मुळावलेल्या असतात तो सहसा आपल्या पूर्वधारणांनाच चिकटून बसतो. एखाद्या गटात विशिष्ट अवगुण असल्याचे जर त्याला वाटत असेल तर तो त्या गटातील हजारो, कदाचित लाखो लोकांत तो अवगुण असलाच पाहिजे असा अट्टहास करतो. मग त्या गटातील एकाही व्यक्‍तीकडून एखाद्या वेळी वाईट अनुभव आल्यास त्याची अधिकच खात्री पटते आणि तो त्या गटाचा आणखीनच द्वेष करू लागतो. पण चांगले अनुभव आल्यास मात्र ते केवळ अपवाद म्हणून बाजूला सारले जातात.

भेदभावाच्या जंजाळातून मुक्‍ती

बहुतेकजण भेदभावाचे समर्थन करत नसले तरीसुद्धा फार कमी लोक त्याच्या तावडीतून सुटतात. किंबहुना, ज्यांच्या मनात तीव्र भेदभावाच्या धारणा रुजल्या आहेत, तेसुद्धा हे कबूल करणार नाहीत. इतरजण म्हणतात की तुमच्या मनात भेदभाव असले तरी, ते तुम्ही आपल्याजवळच ठेवले तर कोणाचे नुकसान होणार नाही. पण भेदभावामुळे नुकसान नक्कीच होते कारण यामुळे लोकांची मने दुखावली जातात आणि त्यांच्यामध्ये फूट पडते. अज्ञानामुळे भेदभाव आणि भेदभावामुळे द्वेष असे एक दुष्टचक्र सुरू होते. चार्ल्स केलब कोल्टन (१७८०?-१८३२) या लेखकाने म्हटले: “काहीजणांना आपण चांगल्याप्रकारे ओळखत नसल्यामुळे त्यांचा द्वेष करतो, आणि आपण त्यांचा द्वेष करत असल्यामुळे कधीही त्यांना चांगल्याप्रकारे ओळखू शकणार नाही.” पण ज्याप्रकारे भेदभाव आत्मसात केले जाऊ शकतात त्याचप्रकारे ते विसरताही येतात. ते कसे? (g०४ ९/८)

[७ पानांवरील चौकट]

धर्म—सहिष्णुतेचा जनक की भेदभावाचा?

द नेचर ऑफ प्रेजुडिस या पुस्तकात गॉर्डन डब्ल्यू. ॲल्पोर्ट म्हणतात की, “स्थूलमानाने पाहिल्यास, चर्चला न जाणाऱ्‍यांपेक्षा चर्चचे नियमित सदस्यच जास्त भेदभाव करतात असे आढळते.” हा निष्कर्ष तसा नवल वाटण्याजोगा नाही, कारण कित्येकदा धर्माने भेदभाव मिटवण्याऐवजी ते उत्पन्‍न केले आहेत. उदाहरणार्थ, शतकानुशतके यहुदी-विरोधी भावना स्वतः पाळकांनीच लोकांच्या मनात चेतवल्या. ए हिस्ट्री ऑफ क्रिस्चिॲनिटी या ग्रंथानुसार, हिटलरने एकदा असे म्हटले होते: “यहुद्यांच्या बाबतीत विचार केल्यास, मी काही नवीन केलेले नाही, तर कॅथलिक चर्चने १५०० वर्षांपासून अवलंबलेली नीती मी पुढे चालवत आहे.”

बाल्कन देशांत हिंसाचार घडत होता तेव्हा ऑर्थोडॉक्स व कॅथलिक धर्मसिद्धान्त, लोकांना दुसऱ्‍या धर्माचे पालन करणाऱ्‍या आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल सहिष्णुतेने व आदराने वागण्यास प्रवृत्त करण्यात असफल ठरले.

तसेच रवांडामध्ये चर्चच्या सदस्यांनी आपल्याच चर्चच्या सदस्यांची कत्तल केली. द नॅशनल कॅथलिक रिपोर्टर यात असे म्हणण्यात आले की रवांडामधील संघर्ष “खऱ्‍या अर्थाने जातिसंहार होता आणि दुर्दैवाने याकरता कॅथलिक देखील जबाबदार आहेत.”

खुद्द कॅथलिक चर्चने आपल्या असहिष्णुतेच्या इतिहासाविषयी कबुलीजबाब दिला आहे. २००० साली पोप जॉन पॉल दुसरे यांनी रोममध्ये एका सार्वजनिक धर्मविधीदरम्यान, “इतिहासात घडलेल्या गैरवर्तनाविषयी” क्षमा मागितली. या विधीदरम्यान “यहुदी, स्त्रिया, विविध प्रदेशांतील स्थानिक लोक, देशांतर केलेले परदेशी, दरिद्र आणि जन्माला न आलेली अर्भके यांच्याविरुद्ध घडलेल्या धार्मिक असहिष्णुतेच्या व अन्यायाच्या प्रकारांचा” खास उल्लेख करण्यात आला.

[६ पानांवरील चित्र]

वरती: निर्वासितांची छावणी, बोस्निया, हेर्जेगोव्हिना, ऑक्टोबर २०, १९९५

यादवी युद्धाच्या अंताची वाट पाहणाऱ्‍या बोस्नियन सर्ब निर्वासितांपैकी दोघे

[चित्राचे श्रेय]

छायाचित्र Scott Peterson/Liaison

[७ पानांवरील चित्र]

द्वेषाचे धडे

आईवडिलांचे बोलणेवागणे, टीव्ही आणि इतर माध्यमांतून मूल नकारात्मक मनोवृत्ती आत्मसात करते