व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला लहान मुलांची खरच काळजी आहे का?

देवाला लहान मुलांची खरच काळजी आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

देवाला लहान मुलांची खरच काळजी आहे का?

दर वर्षी, कोट्यवधी मुलांचे शोषण केले जाते, त्यांच्यावर अत्याचार आणि बरेचदा हिंसक हल्ले केले जातात. कित्येक मुलांकडून धोकेदायक परिस्थितीत गुलामांसारखे काम करवून घेतले जाते. काही मुलांचे अपहरण केले जाते आणि त्यांना जबरदस्तीने सैनिक किंवा बाल वेश्‍या बनवले जाते. शिवाय, कुटुंबातील सदस्यांकडून लैंगिक दुर्व्यवहार आणि बाल दुर्व्यवहाराच्या इतर भयंकर प्रकारांमुळे अनेक मुलांच्या भरवशाला कायमचा तडा जातो.

साहजिकच, प्रामाणिक व दयाळू मनोवृत्तीचे लोक मुलांची ही दशा पाहून हळहळतात. हे सर्व अत्याचार मानवाच्या स्वार्थामुळे व दुष्टपणामुळे होतात हे कबूल केले तरीसुद्धा काहीजणांना प्रश्‍न पडतो की देवाचे मानवजातीवर प्रेम असूनही तो असा घोर अन्याय कसा काय घडू देतो? त्यांना कदाचित असेही वाटत असेल की देवाने या मुलांना वाळीत टाकले आहे, कदाचित त्याला त्यांची काळजीच नाही. हे खरे आहे का? मुलांचे शोषण केले जाते आणि त्यांच्यावर अत्याचार केला जातो ही दुःखद वस्तुस्थिती, देवाला त्यांच्याविषयी काळजीच नसल्याचा पुरावा आहे का? याविषयी बायबल काय म्हणते?

देव अत्याचारी लोकांना दोषी ठरवतो

दुष्ट प्रौढ व्यक्‍तींकडून लहान मुलांचे शोषण व्हावे असा यहोवा देवाचा कधीही उद्देश नव्हता. बालकांवर होणारा अत्याचार हा एदेन बागेत मनुष्याने देवाविरुद्ध केलेल्या विद्रोहाच्या सर्वात दुःखदायक परिणामांपैकी एक आहे. देवाचे सार्वभौमत्व नाकारल्यामुळे मानवांना एकमेकांचे क्रूरतेने शोषण करण्याचा मार्ग मोकळा झाला.—उत्पत्ति ३:११-१३, १६; उपदेशक ८:९.

दुर्बल व असहाय्य व्यक्‍तींचा गैरफायदा घेणाऱ्‍यांचा देवाला वीट आहे. यहोवाची उपासना न करणाऱ्‍या अनेक प्राचीन देशांत बालकांचे बलिदान देण्याची प्रथा होती; पण यासंदर्भात यहोवाने म्हटले, “मी त्यास असली आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातहि आली नव्हती.” (यिर्मया ७:३१) प्राचीन काळातील आपल्या लोकांना देवाने असे बजावले होते: ‘तुम्ही पोरक्या मुलांना कोणत्याहि प्रकारे गांजिले आणि त्यांनी माझ्याकडे गाऱ्‍हाणे केले तर मी त्यांचे गाऱ्‍हाणे अवश्‍य ऐकेन; आणि माझा राग भडकेल.’—निर्गम २२:२२-२४.

यहोवाचे मुलांवर प्रेम आहे

मुलांविषयी देवाला वाटणारी काळजी, त्याने आईवडिलांना दिलेल्या सूज्ञ मार्गदर्शनावरून दिसून येते. सुरक्षिततेचे वातावरण असलेल्या घरांत वाढलेली मुले सहसा समंजस व इतरांशी चांगल्याप्रकारे जुळवून घेणारी असतात. म्हणूनच आपल्या निर्माणकर्त्याने विवाहाची स्थापना केली; ही एक कायमस्वरूपी व्यवस्था होती ज्यात “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ति २:२४) बायबलमध्ये, लैंगिक संबंधांना केवळ विवाह बंधनात परवानगी आहे, जेणेकरून मुलांची एका स्थायी स्वरूपाच्या वातावरणात काळजी घेतली जाईल.—इब्री लोकांस १३:४.

बायबलमध्ये, आईवडिलांनी मुलांना प्रशिक्षण देण्याच्या महत्त्वावरही जोर देण्यात आला आहे. बायबल म्हणते: “संतति ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत.” (स्तोत्र १२७:३, ४) मुले म्हणजे देवाकडून मिळणारी मोलवान देणगी आहे आणि त्यांचा उत्तम विकास व्हावा अशी देवाची इच्छा आहे. तिरंदाज ज्याप्रकारे बाण सोडण्याआधी नीट निशाणा लावतो त्याप्रकारे आईवडिलांनी आपल्या मुलांना जीवनात योग्य दिशा दाखवावी अशी देव त्यांना आज्ञा देतो. देवाचे वचन असे मार्गदर्शन देते, “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.

यहोवाने मुलांबद्दल आपले प्रेम आणखी एका मार्गाने प्रगट केले आहे. ते कसे? तर दुष्ट व्यक्‍तींपासून आपल्या मुलांचे कसे संरक्षण करावे हे पालकांना शिकवण्याद्वारे. प्राचीन इस्राएलात अगदी लहान ‘बालकांनासुद्धा’ नियमशास्त्र ऐकण्याची आज्ञा होती; नियमशास्त्रात इतर मार्गदर्शनासोबतच योग्य व अयोग्य लैंगिक वर्तनाविषयीही नियम होते. (अनुवाद ३१:१२; लेवीय १८:६-२४) देवाची इच्छा आहे की मुलांचे शोषण किंवा त्यांच्याशी दुर्व्यवहार करू शकेल अशा कोणत्याही व्यक्‍तीपासून पालकांनी मुलांचे आपल्या पूर्ण शक्‍तीनिशी संरक्षण करावे.

मुलांकरता आशा

मुलांकरता यहोवाचे प्रेम, आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे हुबेहूब प्रतिबिंब असणाऱ्‍या येशू ख्रिस्ताद्वारे अतिशय सुरेखपणे प्रदर्शित झाले. (योहान ५:१९) एकदा येशूला विसावा मिळावा या प्रांजळ उद्देशाने त्याच्या प्रेषितांनी आईवडिलांना त्यांच्या मुलांना येशूकडे आणण्यापासून मनाई केली तेव्हा येशू त्यांच्यावर रागावला व त्याने त्यांना दटावले. तो म्हणाला, “बाळकास माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” मग, “त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१३-१६) निश्‍चितच, यहोवा देवाच्या किंवा त्याच्या पुत्राच्या नजरेत बालके कमी मोलाची नाहीत.

किंबहुना, आपला नियुक्‍त राजा येशू ख्रिस्त याच्याद्वारे लवकरच देव अत्याचाराने पीडित मुलांना मुक्‍ती देण्याकरता कार्य करील. स्वार्थीपणे शोषण करणाऱ्‍या व क्रूरपणे अत्याचार करणाऱ्‍यांचा या जगातून कायमचा उच्छेद केला जाईल. (स्तोत्र ३७:१०, ११) यहोवाचा शोध घेणाऱ्‍या लीन जनांविषयी बायबल म्हणते: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

अर्थात हे भविष्यात घडेल. पण सध्या ज्यांचे शोषण होत आहे व ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्या सर्वांना आजही आध्यात्मिक व भावनिक साहाय्य पुरवण्याद्वारे देव आपले प्रेम प्रकट करतो. तो आश्‍वासन देतो: “मी हरवलेल्यांस शोधीन, हाकून दिलेल्यांस परत आणीन, घायाळास पट्टी बांधीन, रोग्यांस बळ देईन.” (यहेज्केल ३४:१६) आपल्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आणि ख्रिस्ती मंडळीद्वारे यहोवा दीनदुबळ्या व गरीब मुलांचे सांत्वन करतो. “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, . . . तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो,” आणि भविष्यातही करेल हे आश्‍वासन खरोखर आनंददायक नाही का?—२ करिंथकर १:३, ४. (g०४ ८/८)

[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Mikkel Ostergaard /Panos Pictures