व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधीच स्पष्टपणे बोलणं महत्त्वाचं आहे

आपल्या प्रिय व्यक्तीला जीवघेणा आजार होतो तेव्हा. . .

आपल्या प्रिय व्यक्तीला जीवघेणा आजार होतो तेव्हा. . .

विक्टर * फक्त ५४ वर्षांचे असताना त्यांना अतिशय तीव्र स्वरूपाचा ब्रेन ट्युमर असल्याचं निदान झालं. आपल्या पतीला झालेल्या या आजाराबद्दल ऐकून डायनाला खूप मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी सांगितलं की विक्टरजवळ आता फक्त थोडेच महिने उरले आहेत. डायना आठवून सांगते: “मी जे ऐकत होते त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. काही आठवड्यांसाठी मी पूर्णपणे सुन्न झाले होते. हे सगळं आमच्यासोबत नाही तर दुसऱ्या कोणासोबत घडत आहे, असं मला वाटत होतं. अचानक आलेल्या या परिस्थितीला सामोरं जायला मी तयार नव्हते.”

दुःखाची गोष्ट म्हणजे आज अनेकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. आणि त्यांची प्रतिक्रियाही डायनाप्रमाणे असते. कारण, जीवघेणा आजार हा कोणालाही आणि कधीही होऊ शकतो. पण, असे बरेच लोक आहेत जे स्वेच्छेने आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी स्वीकारतात. असे लोक खरंच प्रशंसेसाठी पात्र आहेत. पण, खरंतर आजारी व्यक्तीची काळजी घेणं एक आव्हानच आहे. मग, जीवघेणा आजार झालेल्या आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कुटुंबातले सदस्य काय करू शकतात? काळजी घेणारे स्वतःला भावनिक रीत्या स्थिर कसे ठेवू शकतात? मृत्यू जवळ येत असताना काय-काय होण्याची शक्यता आहे? पण आपण आधी हे पाहू, की जीवघेणा आजार झालेल्या व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी आज एक मोठं आव्हान का आहे?

आधुनिक काळातली वस्तुस्थिती

विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. यामुळे आजची परिस्थिती बदललेली आहे. जवळजवळ एका शतकाआधीची परिस्थिती पाहिली, तर अनेक विकसित देशांतही लोकांचं आयुष्य आताच्या तुलनेत कमी होतं. लोकांना संसर्गजन्य रोग झाला किंवा त्यांचा अपघात झाला की त्यांचा लगेच मृत्यू व्हायचा. यामागचं कारण म्हणजे, हॉस्पिटलची जास्त सोय नव्हती. शिवाय उपचार करणं लोकांना परवडण्यासारखंही नव्हतं. म्हणून, बहुतेक लोक आपल्या आजारी प्रियजनाची काळजी घरीच घ्यायचे. शेवटी, आजारी व्यक्तीचा मृत्यूही घरीच व्हायचा.

आज, वैद्यकीय क्षेत्रात भरपूर प्रगती झाली आहे. यामुळे आजारांवर प्रभावशाली रीत्या उपचार करणं आणि रुग्णांचं आयुष्य वाढवणं डॉक्टरांना शक्य आहे. पूर्वीच्या काळात ज्या आजारांमुळे लोकांचा लगेच मृत्यू व्हायचा, त्या आजारांचा सामना करूनही आज लोक बऱ्याच वर्षांपर्यंत जगू शकतात. पण, वाढलेलं आयुष्य मात्र आजारपणाचा उपचार नाही. कारण, रुग्णांची परिस्थिती सहसा इतकी खराब होते की त्यांना पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. अशा व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी खूप कठीण असते.

या कारणामुळे, आज बऱ्याच आजारी व्यक्तींना घरी ठेवण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येतं आणि सहसा त्यांचा मृत्यू तिथेच होतो. म्हणून, मृत्यू कसा होतो याबद्दल आज बहुतेक लोकांना माहीत नाही. आणि असे खूप कमी लोक आहेत ज्यांनी स्वतः कोणाचा मृत्यू होताना पाहिलं आहे. म्हणून आजारी व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी येते, तेव्हा कोणताही अनुभव नसल्यामुळे कुटुंबातले सदस्य गोंधळून जातात. शिवाय, काळजी कशी घेतली पाहिजे हे त्यांना समजत नाही. मग त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

आधीच योजना करा

जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीला जीवघेणा आजार होतो, तेव्हा डायनाप्रमाणे बऱ्याच लोकांना धक्का बसतो. मग अशा चिंतेच्या, भीतीच्या आणि दुःखाच्या काळात पुढे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होऊ शकते? देवाच्या एका विश्वासू सेवकाने अशी प्रार्थना केली होती: “आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” (स्तोत्र ९०:१२) सुज्ञपणे आपले ‘दिवस गणण्यास’ किंवा नीट योजना करण्यासाठी मदत व्हावी म्हणून यहोवा देवाजवळ मनापासून प्रार्थना करा. उरलेल्या दिवसांचा चांगल्या प्रकारे आणि सुज्ञपणे उपयोग करा.

यासाठी चांगली योजना करणं गरजेचं आहे. आजारी व्यक्तीला बोलता येत असेल आणि ती बोलण्याच्या मनःस्थितीत असेल, तर तुम्ही पुढील काही गोष्टींवर तिच्याशी बोलू शकता. जसं की, ती स्वतःचे निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसेल तेव्हा तिच्यासाठी निर्णय कोण घेईल? तिची परिस्थिती खूप नाजूक असेल तेव्हा व्हेंटिलेटरसारख्या कृत्रिम यंत्रणांच्या साहाय्याने तिला जिवंत ठेवलं जावं अशी तिची इच्छा आहे का? तिला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचा उपचार करण्याची इच्छा आहे का? अशा गोष्टींवर चर्चा केल्यामुळे काय करायचं आहे हे निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत असेल. यामुळे निर्णय घेताना तिच्या मनात कोणतीही शंका किंवा दोषीपणाची भावना नसेल. या गोष्टींवर आधीच स्पष्टपणे बोलल्यामुळे आजारी व्यक्तीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याकडे कुटुंबाला लक्ष देण्यासाठी मदत होते. बायबलमध्येसुद्धा असं म्हटलं आहे, की “मसलत देणारे पुष्कळ असले तर ते [बेत] सिद्धीस जातात.”—नीतिसूत्रे १५:२२.

काळजी कशी घ्यावी?

काळजी घेणाऱ्याचं मुख्य काम सहसा आजारी व्यक्तीला सांत्वन देण्याचं असतं. ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे तिला या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे, की तिच्यावर सर्वांचं प्रेम आहे. हे कसं करता येईल? काळजी घेणारी व्यक्ती असं काही वाचून दाखवू शकते किंवा अशी काही गाणी गाऊ शकते, ज्यामुळे आजारी व्यक्तीला उत्तेजन मिळेल आणि तिला बरं वाटेल. बऱ्याच आजारी व्यक्तींचा असा अनुभव आहे की जेव्हा कुटुंबातले सदस्य त्यांचा हात धरून त्यांच्याशी प्रेमाने बोलतात तेव्हा त्यांना बरं वाटतं.

आजारी व्यक्तीला कोण भेटायला आलं आहे हे तुम्ही त्यांना सांगू शकता. एक अहवाल सांगतो: “असं म्हटलं जातं की आपल्या पाच इंद्रियांपैकी ऐकण्याची क्षमता ही सर्वात शेवटी जाते. [रुग्ण] गाढ झोपेत आहेत असं वाटत असलं, तरी ते स्पष्टपणे ऐकू शकतात. त्यामुळे, त्यांच्यासमोर असं काहीही बोलू नका जे तुम्ही ते जागे असताना बोलणार नाही.”

शक्य असेल तर त्यांच्यासोबत मिळून प्रार्थना करा. बायबलमध्ये म्हटलं आहे, की एका प्रसंगी पौल नावाचा देवाचा सेवक आणि त्याचे सोबती अतिशय कठीण परिस्थितीत होते आणि त्यांचा जीवही धोक्यात होता. अशा वेळी त्यांना कशामुळे मदत मिळाली? पौलने आपल्या सोबत्यांना अशी विनंती केली: “तुम्हीही आमच्यासाठी देवाला याचना करण्याद्वारे आमचे साहाय्य करू शकता.” (२ करिंथकर १:८-११) अतिशय तणावात असताना आणि गंभीर आजाराचा सामना करताना मनापासून प्रार्थना केल्याने खूप मदत होऊ शकते.

वास्तविकता स्वीकारा

आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, ही कल्पनाच खूप निराश करणारी आहे. आणि हे साहजिकच आहे कारण मृत्यू हा नैसर्गिक नाही. मृत्यू हा जीवनाचाच एक भाग आहे हे आपण स्वीकारू शकत नाही; कारण आपली रचना तशी करण्यात आलेली नाही. (रोमकर ५:१२) याच कारणामुळे बायबलमध्ये मृत्यूला “शत्रू” म्हटलं आहे. (१ करिंथकर १५:२६) यामुळे, प्रिय व्यक्तीचा मृत्यू होईल ही गोष्ट स्वीकारण्यास तयार नसणं हे समजण्याजोगं आहे आणि त्यात वेगळं असं काही नाही.

पण, असं असलं तरी आजारी व्यक्तीसोबत पुढे काय होऊ शकतं यावर विचार करणं गरजेचं आहे. यामुळे कुटुंबातल्या सदस्यांना भीतीवर मात करता येईल. तसंच, आजारी व्यक्तीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याकडेही त्यांना लक्ष देता येईल. आजारी व्यक्तीसोबत ज्या गोष्टी घडू शकतात त्यांबद्दल “ आयुष्यातले शेवटचे काही आठवडे” या चौकटीत सांगितलं आहे. पण, या सर्व गोष्टी प्रत्येकासोबत घडतीलच असं नाही. शिवाय, त्या गोष्टी दिलेल्या क्रमानुसार घडतील असंही नाही. पण, त्यातल्या काही गोष्टी बऱ्याच आजारी व्यक्तींसोबत घडतात.

प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर अशा एखाद्या मित्राला फोन करणं सुज्ञपणाचं ठरेल, ज्याने मदत करण्याची तयारी दाखवली होती. काळजी घेणाऱ्या व्यक्तीला आणि कुटुंबातल्या सदस्यांना या गोष्टीची खात्री पटवून देणं गरजेचं आहे, की त्यांची प्रिय व्यक्ती आता सर्व वेदनांतून आणि समस्यांतून मुक्त झाली आहे. तिला आता कोणताही त्रास होत नाही. मानवांचा निर्माणकर्ता प्रेमळपणे आपल्याला सांगतो, की “मृतांस . . . काहीच कळत नाही.”—उपदेशक ९:५.

खरा सांत्वनदाता

आपण सर्वांची मदत स्वीकारली पाहिजे

देवावर निर्भर राहणं खूप गरजेचं आहे. फक्त आपली प्रिय व्यक्ती आजारी असते तेव्हाच नाही, तर तिच्या मृत्यूनंतर दुःखात असतानाही आपण त्याच्यावर निर्भर राहिलं पाहिजे. आपल्याला मदत करण्यासाठी तो इतरांचा वापर करू शकतो. त्यांच्या सांत्वन देणाऱ्या शब्दांमुळे आणि कार्यांद्वारे आपल्याला मदत होऊ शकते. डायना म्हणते: “सर्वांकडून मिळणारी मदत स्वीकारली पाहिजे हे मी शिकले. खरंतर आम्हाला इतकी जास्त मदत मिळाली की आम्ही भारावून गेलो. माझ्या पतीला आणि मला त्या वेळी हे स्पष्टपणे जाणवत होतं की यहोवाच आम्हाला मदत पुरवत आहे. ‘या कठीण प्रसंगात मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला नक्की मदत करेन’ असं जणू तो आम्हाला सांगत होता. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.”

यहोवा देव, हाच खरा सांत्वनदाता आहे. आपला निर्माणकर्ता या नात्याने तो आपलं दुःख आणि आपला त्रास चांगल्या प्रकारे समजू शकतो. तो आपल्याला कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली मदत आणि प्रोत्साहन देऊ शकतो. असं करण्याची त्याच्याजवळ फक्त क्षमताच नाही, तर तशी इच्छासुद्धा आहे. पण यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्याने आपल्याला वचन दिलं आहे, की तो लवकरच मृत्यूला कायमचं नाहीसं करणार आहे. तसंच, ज्या लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे ते त्याच्या स्मरणात आहेत. आणि तो त्या सर्वांचं पुनरुत्थान करणार आहे, म्हणजेच त्यांना पुन्हा जिवंत करणार आहे. (योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:३, ४) त्यानंतर सर्व लोक, पौलने बायबलमध्ये जे लिहिलं त्याप्रमाणे म्हणू शकतील: “अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे?”—१ करिंथकर १५:५५.

^ परि. 2 नावं बदलण्यात आली आहेत.