व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या जोडीदाराला गमावण्याच्या दुःखाला सामोरे जाताना

आपल्या जोडीदाराला गमावण्याच्या दुःखाला सामोरे जाताना

बायबलमध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे: पतीने “जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी.” तसेच, पत्नीने “आपल्या पतीची भीड राखावी” किंवा आदर करावा. पती-पत्नी दोघांनीही आपण “एकदेह” आहोत हे लक्षात ठेवून आपापली भूमिका पार पाडली पाहिजे. (इफिस. ५:३३; उत्प. २:२३, २४) कालांतराने, दोघांचे बंधन आणखी मजबूत होते आणि त्यांचे एकमेकांवरील प्रेमदेखील गाढ होते. ज्या प्रकारे एकमेकांच्या शेजारी वाढणाऱ्‍या झाडांची मुळे एकमेकांमध्ये गुंतली जातात, त्याच प्रकारे वैवाहिक जीवनात आनंदी असलेल्या पती-पत्नीमधील नातेसंबंधदेखील आणखी मजबूत होत जातो.

पण, पती किंवा पत्नी या दोघांपैकी एक जण मरण पावल्यास काय? तेव्हा मात्र पती-पत्नीच्या जीवनकाळात अतूट असलेले बंधन तुटते. मृत व्यक्‍तीच्या मागे असलेल्या पतीला किंवा पत्नीला अतोनात दुःख होते, एकाकी वाटते. कधीकधी, त्यांना राग येतो किंवा त्यांच्या मनात दोषभावनादेखील येतात. सुलभा यांनी त्यांच्या ५८ वर्षांच्या वैवाहिक जीवनात अशा अनेकांना पाहिले होते ज्यांनी आपल्या विवाहसोबत्याला मृत्यूमुळे गमावले. * पण, त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी असे म्हटले: “जोडीदाराला गमावण्याचं दुःख काय असतं हे मी याआधी कधीच समजू शकले नाही. स्वतः या अनुभवातून गेल्याशिवाय त्या भावना कशा असतात हे समजून घेणं अशक्य आहे.”

दीर्घकाळ राहणारे दुःख

विवाहसोबत्याला गमावण्याच्या दुःखापेक्षा इतर कोणत्याही प्रकारचे दुःख इतके तीव्र नसते असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. अनेक शोकाकुल विवाहसोबती याच्याशी सहमत होतात. निर्मला यांच्या पतीचा मृत्यू होऊन आता बरीच वर्षे झाली आहेत. एक विधवा म्हणून जीवन जगताना त्यांना कसे वाटते त्याबद्दल त्या असे म्हणतात: “मला अधू झाल्यासारखं वाटतं.” लग्नाच्या २५ वर्षांनंतर आपल्या सोबत्याला गमावल्यामुळे त्यांच्यावर कोणता परिणाम झाला त्याबद्दल बोलताना त्यांनी वरील शब्दांत आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

काही स्त्रिया आपल्या पतीच्या मृत्यूनंतर इतकी वर्षे का शोक करत बसतात असे सुमन यांना पूर्वी वाटायचे. मग लग्नाच्या ३८ वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. आज पतीच्या मृत्यूला २० वर्षे झाल्यानंतरही त्या असे म्हणतात: “त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही.” सुमन यांना आपल्या पतीची इतकी आठवण येते, की आजही अनेकदा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.

मृत्यूमुळे विवाहसोबत्याला गमावण्याचे दुःख हे अतिशय वेदनादायक असते आणि दीर्घकाळ राहते ही गोष्ट बायबलदेखील मान्य करते. साराचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या पतीने म्हणजे अब्राहामाने तिच्यासाठी “शोक व विलाप” केला. (उत्प. २३:१, २) देव मृतांना पुन्हा जिवंत करू शकतो यावर अब्राहामाला विश्‍वास होता; तरीसुद्धा, त्याच्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा त्याला खूप दुःख झाले. (इब्री ११:१७-१९) याकोबाची प्रिय पत्नी राहेल हिचा मृत्यू झाल्यावर तोदेखील तिला लवकर विसरू शकला नाही. तो आपल्या मुलांशी तिच्याबद्दल अतिशय जिव्हाळ्याने बोलत असे.—उत्प. ४४:२७; ४८:७.

बायबलमधील या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो? काही जणांना आपल्या जोडीदाराला गमावण्याचे दुःख कितीतरी वर्षांपर्यंत होत असते. ते जेव्हा अश्रू गाळतात आणि अधूनमधून दुःखी होतात तेव्हा ते दुर्बळ आहेत असे आपण समजू नये. त्यांनी जे गमावले आहे त्याबद्दल त्यांची अशी प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. अशांना आपण दीर्घकाळपर्यंत सहानुभूती दाखवली पाहिजे आणि त्यांना आधार दिला पाहिजे.

फक्‍त आजचा दिवस

मृत्यूमुळे जेव्हा एखादी व्यक्‍ती आपल्या पतीला किंवा पत्नीला गमावते तेव्हा ती एकाकी होते. पण, हा एकाकीपणा लग्नाआधीच्या एकाकीपणापेक्षा वेगळा आहे. अनेक वर्षे सहजीवन अनुभवल्यामुळे पतीला सहसा माहीत असते, की पत्नी दुःखी किंवा निराश असल्यास तिला कशा प्रकारे प्रोत्साहन द्यावे व तिचे सांत्वन कसे करावे. पण, पतीच्या निधनानंतर तिच्या जीवनातून प्रेमाचा आणि सांत्वनाचा आधार नाहीसा होतो. त्याच प्रकारे, अनेक वर्षे सोबत घालवल्यामुळे एक पत्नीदेखील हे शिकते की आपल्या पतीचा आत्मविश्‍वास कसा वाढवावा आणि त्याला आनंदी कसे ठेवावे. पत्नीचा प्रेमळ स्पर्श, तिचे सांत्वनदायक शब्द, आणि ती ज्या प्रकारे आपल्या पतीच्या आवडीनिवडींकडे व गरजांकडे लक्ष पुरवते याची तुलना आणखी कशाशीही करता येणार नाही. त्यामुळे, तिच्या मृत्यूनंतर पतीच्या जीवनात रिक्‍तपणा निर्माण होतो. म्हणून, ज्यांनी आपल्या सोबत्याला गमावले आहे त्यांच्यापैकी काहींना भविष्याबद्दल अनिश्‍चितता आणि भीती वाटते. तर मग, त्यांना बायबलमधील कोणत्या तत्त्वामुळे मनाची शांती मिळू शकते आणि सुरक्षित वाटू शकते?

दुःखाला सामोरे जाण्यास देव तुम्हाला प्रत्येक दिवशी मदत करेल

“उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्त. ६:३४) येशूचे हे शब्द प्रामुख्याने जीवनातील भौतिक गरजांबद्दल असले, तरी विवाहसोबत्याला गमावलेल्या अनेकांना या शब्दांमुळे धीराने दुःखाला सामोरे जाण्यास साहाय्य मिळाले आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर किशोर यांनी असे लिहिले: “मला अजूनही ममताची खूप खूप आठवण येते, आणि कधीकधी तर तिला गमावण्याचं दुःख असह्‍य होतं. पण, मी हे लक्षात ठेवतो, की असं होणं स्वाभाविक आहे आणि जसजसा वेळ सरत जाईल तसतसं कालांतरानं हे दुःख कमी होत जाईल.”

किशोर यांना धीर धरावा लागला. त्यांनी हे कसे केले? त्यांनी म्हटले: “यहोवाच्या मदतीनं मी ‘फक्‍त आजचा दिवस’ या तत्त्वाचा अवलंब केला.” किशोर दुःखसागरात बुडून गेले नाहीत. अर्थात, त्यांचे दुःख रातोरात नाहीसे झाले नाही, पण त्याच वेळी ते दुःखामुळे अगदी खचून गेले नाहीत. तुम्ही जर आपल्या सोबत्याला गमावले असेल, तर तुम्हीदेखील ‘फक्‍त आजचा दिवस’ या तत्त्वाचा अवलंब करा. म्हणजेच, गतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करण्याऐवजी, फक्‍त आज आपल्या दुःखाला यशस्वीपणे कसे तोंड देता येईल याचा विचार करा. कोण जाणे, येणारा नवीन दिवस तुमच्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी घेऊन येईल!

यहोवाने मानवांना बनवले तेव्हा मानवांनी मरावे हा त्याचा उद्देश नव्हता. त्याउलट, मृत्यू हा सैतानाच्या कृत्यांपैकी एक आहे. (१ योहा. ३:८; रोम. ६:२३) सैतान मृत्यूचा आणि मृत्यूच्या भीतीचा वापर करून लोकांना गुलाम बनवतो आणि त्यांची आशा हिरावून घेतो. (इब्री २:१४, १५) म्हणून, जेव्हा कोणी खरा आनंद आणि समाधान कोठेच मिळू शकत नाही, देवाच्या नवीन जगातदेखील नाही असा विचार करून निराश होतो, तेव्हा सैतानाला आनंद होतो. लक्षात असू द्या, आदामाच्या पापाच्या आणि सैतानाच्या बंडाळीच्या परिणामस्वरूप तुम्हाला आपल्या पतीच्या किंवा पत्नीच्या मृत्यूमुळे दुःख सोसावे लागत आहे. (रोम. ५:१२) यहोवा मृत्यूला नाहीसे करेल आणि सैतानाने जे नुकसान केले आहे ते पूर्णपणे भरून काढेल. सैतान ज्या भीतीचा वापर करून लोकांना निराश करतो त्या भीतीतून त्यांना कायमचे मुक्‍त केले जाईल. यात अशा अनेकांचा समावेश होतो ज्यांनी आपल्या सोबत्याला गमावले आहे.

या पृथ्वीवर जगण्यासाठी ज्यांना पुन्हा जिवंत केले जाईल त्यांना अनेक बदलांना सामोरे जावे लागेल. मानवी नातेसंबंधांमध्ये बदल घडून येईल. उदाहरणार्थ, आईबाबा, आजी-आजोबा आणि इतर पूर्वजांचा विचार करा. त्यांचे पुनरुत्थान होईल आणि ते आपली मुले, नातवंडे यांच्यासोबत हळूहळू परिपूर्ण बनतील. म्हातारपणाचे परिणाम समूळ नष्ट केले जातील. त्या वेळी तरुण पिढीचे लोक आपल्या पूर्वजांकडे कदाचित आजच्यापेक्षा फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील. अशा बदलांचा मानवी कुटुंबाच्या सुधारणेत नक्कीच हातभार लागेल.

पुनरुत्थान झालेल्यांबद्दल आपल्या मनात कदाचित बरेच प्रश्‍न उद्‌भवू शकतात. जसे की, ज्यांनी एकापेक्षा जास्त विवाहसोबत्यांना मृत्यूमुळे गमावले आहे त्यांच्याबद्दल काय? येशूच्या काळात सदूक्यांनी एका स्त्रीबद्दल प्रश्‍न विचारला. त्या स्त्रीच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला, मग दुसऱ्‍या आणि असे करत करत आणखी पाच पतींचा मृत्यू झाला. (लूक २०:२७-३३) पुनरुत्थान झाल्यावर त्यांच्यामध्ये कोणते नाते असेल? याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. आणि जे माहीत नाही त्याबद्दल अंदाज बांधण्यात व चिंता करत बसण्यात काहीच अर्थ नाही. सध्या आपण एकच गोष्ट करू शकतो; ती म्हणजे देवावर भरवसा ठेवणे. एक गोष्ट मात्र नक्की, यहोवा भविष्यात जे काही करेल ते चांगलेच असेल. म्हणून भविष्याबद्दल भीती न बाळगता, आपण त्याकडे आतुरतेने पाहिले पाहिजे.

पुनरुत्थानाच्या आशेमुळे सांत्वन मिळते

मरण पावलेले प्रियजन पुन्हा जिवंत होतील ही देवाच्या वचनातील एक सुस्पष्ट शिकवण आहे. गतकाळात ज्यांना मेलेल्यांतून पुन्हा जिवंत करण्यात आले त्यांच्याबद्दल असलेल्या बायबलमधील अहवालांतून आपल्याला ही खात्री मिळते, की “कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” (योहा. ५:२८, २९) त्या वेळी जगणाऱ्‍या लोकांना, मेलेल्यांतून पुन्हा जिवंत झालेल्या आपल्या प्रियजनांना भेटून आनंद होईल. आणि पुनरुत्थान झालेल्यांना किती आनंद होईल याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही.

जसजसे मरण पावलेल्या लाखो लोकांचे पुनरुत्थान होईल, तसतसा पृथ्वीवर चोहीकडे कधी नव्हे इतका आनंद पसरेल. (मार्क ५:३९-४२; प्रकटी. २०:१३) ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्या सर्वांना भविष्यात होणाऱ्‍या या चमत्कारावर मनन केल्याने नक्कीच सांत्वन मिळेल.

मृत लोक पुन्हा जिवंत होतील तेव्हा कोणाजवळ दुःखी होण्याचे कारण असेल का? नाही. बायबल सांगते, की तेव्हा कोणाजवळही दुःखी होण्याचे कारण नसेल. यशया २५:८ (पं.र.भा.) या वचनात म्हटले आहे, की यहोवा “मरणाला कायमचे गिळून टाकेल.” म्हणजेच, तो मृत्यू आणि त्यामुळे होणाऱ्‍या भयंकर परिणामांना समूळ काढून टाकेल. भविष्यवाणीत पुढे असे म्हटले आहे: “प्रभू यहोवा सर्व मुखांवरील आसवे पुसून टाकेल.” तुमच्या विवाहसोबत्याला गमावल्यामुळे तुम्हाला आज दुःख होत असेल, तर पुनरुत्थानाच्या आशेमुळे तुम्हाला नक्कीच आनंद झाला पाहिजे.

नवीन जगात देव जे काही करणार आहे ते आज कोणीही मानव पूर्णपणे समजू शकत नाही. यहोवा म्हणतो: “आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.” (यश. ५५:९) भविष्यात होणाऱ्‍या पुनरुत्थानाबद्दल येशूने जे अभिवचन दिले आहे त्यामुळे अब्राहामाप्रमाणेच आपल्यालाही यहोवावर भरवसा ठेवण्याची संधी मिळते. पण ते अभिवचन पूर्ण होईपर्यंत, देव सर्व ख्रिश्‍चनांकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्या आपण करत राहणे गरजेचे आहे. तसे केल्यास, आपण पुनरुत्थान झालेल्यांसोबत नवीन जगात राहण्यास योग्य ठरू.—लूक २०:३५.

आशा बाळगण्याचे कारण

भविष्याबद्दल भीती बाळगण्याऐवजी, पुनरुत्थानाची अद्‌भुत आशा नेहमी डोळ्यांसमोर ठेवा. मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास भविष्य अंधकारमय वाटेल. पण, यहोवा मात्र आपल्याला भविष्याबद्दल आशा बाळगण्याचे कारण देतो. तो नेमक्या कशा प्रकारे आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करेल हे जरी आपल्याला माहीत नसले, तरी तो नक्कीच तसे करेल याबद्दल आपण शंका बाळगू नये. प्रेषित पौलाने असे लिहिले: “जी आशा दृश्‍य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्‍य झाले आहे त्याची आशा कोण धरेल? पण जे अदृश्‍य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.” (रोम. ८:२४, २५) देवाच्या अभिवचनांबद्दल पक्की आशा बाळगल्यास, आपल्या सोबत्याला गमावण्याच्या दुःखाचा धीराने सामना करण्यास तुम्हाला मदत मिळेल. धीर धरल्यास, तुम्ही भविष्यातील तो आनंददायक दिवस पाहू शकाल जेव्हा यहोवा तुमचे “मनोरथ पूर्ण करेल.” तो सर्व “प्राणिमात्राची इच्छा पुरी” करेल.—स्तो. ३७:४; १४५:१६; लूक २१:१९.

आनंदी भविष्याबद्दल यहोवाने दिलेल्या अभिवचनावर भरवसा ठेवा

येशूच्या मृत्यूची घडी जवळ आली होती तेव्हा त्याचे प्रेषित दुःखी, घाबरलेले व गोंधळलेले होते. येशूने पुढील शब्दांत त्यांचे सांत्वन केले: “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्‍वास ठेवा आणि माझ्यावरही विश्‍वास ठेवा.” त्याने त्यांना म्हटले: “मी तुम्हाला अनाथ [“शोकाकुल,” NW] असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन.” (योहा. १४:१-४, १८, २७) येशूच्या या सांत्वनदायक शब्दांमुळे, अनेक शतकांदरम्यान त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांना आशा बाळगण्यास व धीर धरण्यास मदत मिळणार होती. त्यांच्याप्रमाणेच, जे पुनरुत्थानात आपल्या मृत प्रियजनांना पाहण्यास आसुसलेले आहेत त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. यहोवा आणि त्याचा पुत्र येशू अशांना शोकाकुल अवस्थेत सोडणार नाही याची तुम्ही पूर्ण खात्री बाळगू शकता!

^ नावे बदलण्यात आली आहेत.