व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एलीयास हटर आणि त्यांचे उल्लेखनीय हिब्रू बायबल

एलीयास हटर आणि त्यांचे उल्लेखनीय हिब्रू बायबल

बायबल काळातली हिब्रू भाषा तुम्हाला वाचता येते का? तुम्ही कदाचित ‘नाही’ असं म्हणाल. तुम्ही हिब्रू भाषेतलं बायबल कदाचित पाहिलंसुद्धा नसेल. १६ व्या शतकातले विद्वान एलीयास हटर यांनी हिब्रू भाषेत बायबलच्या दोन आवृत्त्या प्रकाशित केल्या. यांबद्दल जाणून घेतल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या बायबलबद्दल तुमची कदर आणखीन वाढेल.

एलीयास हटर यांचा जन्म १५५३ साली गोरलित्झ इथे झाला. गोरलित्झ जर्मनीत असलेलं एक लहान शहर आहे. हे शहर पोलंड आणि चेक रिपब्लिक यांच्या सध्याच्या सीमेजवळ आहे. हटर यांनी जेना इथल्या लूथर युनिवर्सिटीमधून, मध्य-पूर्व देशांत बोलल्या जाणाऱ्या भाषांचा अभ्यास केला. वयाच्या २४ व्या वर्षीच त्यांना लाइपसिक इथे हिब्रू भाषेचे प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. शिक्षण क्षेत्रात भरपूर प्रगती करण्याची हटर यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी पुढे जाऊन नुरिमबर्ग शहरात एक शाळा उघडली. या शाळेत विद्यार्थी फक्त चार वर्षांत हिब्रू, ग्रीक, लॅटीन आणि जर्मन भाषा शिकू शकत होते. त्या काळी कोणत्याच शाळेत किंवा युनिवर्सिटीत हे शक्य नव्हतं.

“या आवृत्तीचं वैभव”

१५८७ मध्ये प्रकाशित झालेल्या हटरच्या हिब्रू भाषेतल्या बायबलचं मुखपृष्ठ

हटर यांनी १५८७ मध्ये हिब्रू भाषेतल्या बायबलची आवृत्ती प्रकाशित केली. त्याला सहसा जुना करार म्हणून ओळखलं जातं. या आवृत्तीचं नाव डेरेख हा-कोदेश असं होतं. हे नाव यशया ३५:८ वर आधारलेलं होतं. त्याचा अर्थ “पवित्र मार्ग” असा होतो. या आवृत्तीवर सुंदर अक्षरांनी असं लिहिलं होतं: “यातल्या प्रत्येक गोष्टीवरून या आवृत्तीचं वैभव दिसून येतं.” पण या बायबलचं वैशिष्ट्य म्हणजे, ते एक असं प्रभावशाली साधन ठरलं, ज्यामुळे विद्यार्थ्यांना हिब्रू भाषा शिकण्यासाठी मदत झाली.

पण हटर यांचं हिब्रू बायबल इतकं मदतीचं का ठरलं? यासाठी हिब्रू भाषेतलं बायबल वाचताना विद्यार्थ्यांना कोणत्या दोन समस्यांचा सामना करावा लागतो याचा विचार करा. पहिली समस्या म्हणजे उजवीकडून डावीकडे वाचल्या जाणाऱ्या या हिब्रू भाषेची अक्षरं, अनोळखी व वेगळी आहेत. दुसरी समस्या म्हणजे मूळ शब्दाला जेव्हा उपसर्ग किंवा प्रत्यय जोडला जातो, तेव्हा मूळ शब्द ओळखणं कठीण जातं. “आत्मा” असा अर्थ असलेल्या हिब्रू भाषेतला शब्द निफेश (हिब्रू शब्द נפשׁ) याचं उदाहरण घ्या. यहेज्केल १८:४ या वचनात निफेश या शब्दाआधी हा (ה) असा उपसर्ग येतो. यामुळे हाननिफेश (हिब्रू शब्द הנפשׁ) असा संयुक्त शब्द तयार होतो. हिब्रू भाषा शिकत असलेल्या एका नवीन व्यक्तीला हाननिफेश (הנפשׁ) आणि निफेश (נפשׁ) हे दोन्ही अगदी वेगवेगळे शब्द असल्यासारखे वाटू शकतात.

म्हणून विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी हटर यांनी छपाईच्या तंत्राचा एका अनोख्या प्रकारे वापर केला. त्यांनी मूळ शब्द ठळक रूपात आणि उपसर्ग व प्रत्ययांच्या अक्षरांना साध्या रूपात छापलं. यामुळे विद्यार्थ्यांना मूळ हिब्रू शब्द समजण्यास सोपं झालं आणि भाषा शिकण्यासाठी त्यांना मदत मिळाली. द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—विथ रेफरेनसेस या बायबलच्या तळटीपांमध्येही याच पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या इंग्रजी बायबलमध्ये हिब्रूचा मूळ शब्द ठळक अक्षरांत आणि उपसर्ग व प्रत्यय ही साध्या अक्षरांत लिहिली आहेत. यहेज्केल १८:४ हे बायबलमधलं वचन आपल्याला चित्रात पाहायला मिळतं. या चित्रात हटर यांच्या हिब्रू भाषेतल्या बायबलमधली अक्षरं आणि रेफरेन्स बायबल याच्या तळटीपेतली अक्षरं आपण पाहू शकतो.

“नवा करार” याची हिब्रू आवृत्ती

हटर यांनी नवा करार म्हणून सहसा ओळखलं जाणारं बायबल १२ भाषांमध्ये छापण्याचं कामसुद्धा केलं. हटर यांनी छापलेली बायबलची ही आवृत्ती नुरिमबर्गमध्ये १५९९ साली प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीला सहसा नुरिमबर्ग पॉलीग्लॉट असंदेखील म्हणतात. हटर यांना या आवृत्तीत ख्रिस्ती ग्रीक शास्त्राचं हिब्रू भाषेतलं भाषांतरसुद्धा छापायचं होतं. पण त्यांना तसं करता आलं नाही. कारण ते म्हणतात, की त्यांनी भरपूर पैसे जरी दिले असते तरी त्यांना हिब्रू भाषेतली आवृत्ती शोधूनही सापडली नसती. * त्यामुळे त्यांनी ग्रीक भाषेतला नवा करार स्वतःच हिब्रू भाषेत भाषांतर करण्याचं ठरवलं. हटर यांनी आपली बाकीची सर्व कामं बाजूला ठेवून भाषांतराचं काम केलं. त्यांनी फक्त एका वर्षात हे पूर्ण केलं!

हटर यांच्या बायबलबद्दल १९ व्या शतकातले हिब्रू विद्वान फ्रांझ डेलेच, यांनी असं लिहिलं: “यांचं हिब्रू भाषांतर वाचलं की समजतं, की त्यांना या भाषेबद्दल चांगली समज होती. अशी समज जी सहसा ख्रिस्ती लोकांमध्ये आढळत नाही. या बायबलचा अजूनही आधार घेतला जाऊ शकतो. कारण यात हटर यांनी बहुतेक वेळा अगदी योग्य वाक्यांशांचा वापर केला आहे.” यावरून कळतं की हटर यांनी केलेलं ख्रिस्ती ग्रीक शास्त्राचं हिब्रू भाषांतर, खरंच खूप चांगलं होतं.

आजही मौल्यवान

असं दिसून येतं की हटर यांच्या आवृत्त्यांचा जास्त खप झाला नाही. त्यामुळे भाषांतराच्या कामातून त्यांना भरपूर पैसे कमवता आले नाही. पण असं असलं, तरी त्यांच्या कामाचं मूल्य कधीच कमी झालं नाही. उदाहरणार्थ, विल्यम रॉबर्टसन यांनी १६६१ मध्ये आणि रिचर्ड कॅडीक यांनी १७९८ मध्ये हटरच्या हिब्रू भाषेतल्या नव्या कराराची सुधारित आवृत्ती तयार करून छापली. मूळ ग्रीक भाषेतून भाषांतर करताना हटर यांनी योग्यपणे यहोवाच्या नावाचा वापर केला. ग्रीक शास्त्रवचनांत हिब्रू वचनाचा संदर्भ देताना ज्या ठिकाणी देवाच्या नावासाठी कायरिओस (प्रभू) आणि थिओस (देव) अशा पदव्या वापरण्यात आल्या, त्या ठिकाणी त्यांनी “यहोवा” (יהוה, JHVH) हे नाव वापरलं. तसंच, जेव्हा शास्त्रवचनं यहोवाला उद्देशून आहेत असं त्यांना वाटलं, तेव्हाही त्यांनी यहोवा या नावाचा वापर केला. हे लक्ष वेधून घेणारं आहे. कारण नव्या कराराच्या बऱ्याच भाषांतरात देवाचं नाव वापरण्यात आलेलं नाही. पण हटर यांच्या भाषांतरात ते वापरण्यात आलं आहे. यामुळे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत योग्य ठिकाणी देवाच्या नावाचा वापर करण्याचा आपल्याला एक भक्कम आधार मिळतो.

पुढच्या वेळी तुम्ही ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत जेव्हा “यहोवा” हे देवाचं नाव पाहाल, तेव्हा एलीयास हटर यांच्या कामगिरीची आणि त्यांच्या उल्लेखनीय हिब्रू बायबलची नक्की आठवण करा.

^ परि. 9 पण खरं पाहता, काही विद्वानांनी याआधी नवा करार याचं हिब्रू भाषांतर केलं होतं. १३६० च्या आसपास सायमन ऑटोमानोस आणि १५६५ च्या आसपास जर्मन विद्वान ओस्वॉल्ड श्रेकनफुक्स यांनी हिब्रू भाषेत भाषांतर केलं होतं. पण ही भाषांतरं कधीच प्रकाशित करण्यात आली नाहीत आणि आज ती अस्तित्वातही नाहीत.