व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विपर्यास करण्यात आलेले पुस्तक

विपर्यास करण्यात आलेले पुस्तक

विपर्यास करण्यात आलेले पुस्तक

“पृथ्वी आपल्या अक्षाभोवती आणि सूर्याभोवती फिरते हा दुहेरी गतीचा सिद्धान्त धडधडीत खोटा असून पवित्र शास्त्रवचनांच्या पूर्णपणे विरोधात आहे.” हे होते १६१६ साली रोमन कॅथलिक चर्चच्या काँग्रिगेशन ऑफ दी इन्डेक्सने काढलेल्या एका हुकुमनाम्यातील शब्द.१ बायबलमध्ये आणि वैज्ञानिक वस्तुस्थितींमध्ये खरोखरच तफावत आहे का? की त्याचा विपर्यास करण्यात आला आहे?

तो १६०९/१० चा हिवाळा होता; गॅलिलीओ गॅलिली यांनी आपली नवनिर्मित दुर्बिण आकाशाच्या दिशेने फिरवली आणि त्यांना ज्युपिटर ग्रहाच्या भोवती फिरणाऱ्‍या चार चंद्रांचा शोध लागला. त्यांना हे पाहायला मिळाल्यामुळे, सर्व खज्योती पृथ्वीभोवतीच प्रदक्षिणा घालतात ही त्याकाळी अस्तित्वात असणारी समजूत पार धुळीस मिळाली. त्यापूर्वी १५४३ साली, पोलिश खगोलशास्त्रज्ञ नीकोलाऊस कोपरनिकस यांनी ग्रह सूर्याभोवती फिरतात असे मानणारा सिद्धान्त मांडला होता. गॅलिलीओ यांनी हा सिद्धान्त वैज्ञानिकदृष्ट्या खरा असल्याचे पटवून दिले.

कॅथलिक धर्मवेत्त्यांच्या लेखी मात्र, हा सरासर पाखंड होता. पृथ्वी ही विश्‍वाच्या मध्याशी आहे अशी चर्चची जुनी धारणा होती. शास्त्रवचनांत एका ठिकाणी, ‘पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहे की ती कधीही ढळणार नाही,’ या शब्दांत पृथ्वीचे चित्रण केलेले आहे; या वचनाचा शब्दशः अर्थ लावून त्या आधारावर चर्चने हा दृष्टिकोन पत्करला होता. (स्तोत्र १०४:५) रोम येथे बोलावण्यात आल्यावर गॅलिलीओ यांना धार्मिक न्यायालयापुढे हजर व्हावे लागले. येथे कसून चौकशी करण्यात आल्यावर त्यांना आपले शोध मागे घेण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यापुढे आयुष्यभर त्यांना घरी स्थानबद्ध राहावे लागले.

गॅलिलीओ यांचा मृत्यू होऊन तब्बल ३५० वर्षे लोटली, तेव्हा कोठे १९९२ साली कॅथलिक चर्चने शेवटी कबूल केले, की गॅलिलीओ यांचेच म्हणणे खरे होते. पण, जर गॅलिलीओ यांचे खरे होते तर मग बायबल खोटे होते का?

बायबलमधील उताऱ्‍यांचा खरा अर्थ शोधणे

गॅलिलीओ यांचा बायबलवर विश्‍वास होता. त्यामुळे त्यांच्या शास्त्रीय शोधांत आणि काही विशिष्ट बायबल वचनांचा अर्थ लावण्याच्या तत्कालीन पद्धतींत तफावत आढळल्यास, धर्मवेत्त्यांच्या नजरेतून त्या त्या उताऱ्‍यांचा खरा अर्थ निसटला आहे असे अनुमान ते काढत असत. काही झाले तरी, त्यांनी लिहिल्याप्रमाणे, “दोन खऱ्‍या गोष्टी कधीच एकमेकांच्या विरोधात असू शकत नाहीत.” त्यांनी असे सुचवले की बायबलमधील सर्वसाधारण वापरातील शब्द विज्ञानाच्या पारिभाषिक शब्दांच्या विरोधात नाहीत. पण ते धर्मवेत्ते मात्र काहीएक ऐकून घ्यायला तयार झाले नाहीत. त्यांचा अट्टहास असा, की बायबलमधील पृथ्वीविषयक विधानांचा, मग ती कोणतीही असोत, त्यांचा शब्दशः अर्थ घेण्यात यावा. परिणामस्वरूप, त्यांनी गॅलिलीओच्या शोधांचा अव्हेर तर केलाच केला, पण त्यासोबत अशा प्रकारच्या शास्त्रवचनीय वाक्यांशांचा खरा अर्थ समजून घेण्याची संधीही त्यांनी गमावली.

खरे पाहता, बायबल ‘पृथ्वीच्या चार कोनांच्या’ संदर्भात बोलते, त्याअर्थी बायबल लेखक पृथ्वीला अक्षरशः चौकोनी समजत होते असा त्याचा अर्थ होत नाही; हे आपल्याला व्यवहार ज्ञानाने समजले पाहिजे. (प्रकटीकरण ७:१) बायबल सर्वसाधारण लोकांच्या भाषेत लिहिण्यात आले आहे, त्यात डोळ्यांसमोर चित्र उभे करणारे भाषालंकार वारंवार वापरलेले आढळतात. त्यामुळे, पृथ्वीच्या संदर्भात बोलताना तिला ‘चार कोन,’ एक चिरस्थायी “पाया,” “स्तंभांचा पाया” आणि “कोनशिला” आहे असे बायबल सांगते तेव्हा ते पृथ्वीचे शास्त्रशुद्ध वर्णन करण्याच्या प्रयत्नात आहे असा त्याचा अर्थ होत नाही; आपणही कित्येकदा आपल्या रोजच्या संभाषणात तुलना करून बोलतो तसेच बायबल देखील त्या त्या वचनांत रूपकांचा उपयोग करते हे तर उघडच आहे. aयशया ५१:१३; ईयोब ३८:६.

गॅलिलीओ गॅलिली या ग्रंथात, चरित्र लेखक एल. गेमोनॉट यांनी म्हटले: “बायबलच्या आधारावर युक्‍तिवाद करून विज्ञानावर मर्यादा घालू पाहणारे संकुचित वृत्तीचे धर्मवेत्ते उलट बायबलचीच पायमल्ली करतील.” नेमके तेच घडले. वास्तविक पाहता, धर्मवेत्त्यांनी बायबलचा जो अर्थ लावला, त्यामुळेच विज्ञानावर अवाजवी मर्यादा घातल्या गेल्या—स्वतः बायबलमुळे नव्हे.

तशाच प्रकारे आजच्या काळातही, पृथ्वी ही प्रत्येकी २४ तासांच्या सहा दिवसांत निर्माण करण्यात आली असा अट्टहास करणारे धार्मिक मूलतत्त्ववादी बायबलचा विपर्यास करतात. (उत्पत्ति १:३-३१) हा दृष्टिकोन न विज्ञानाच्या एकवाक्यतेत आहे न बायबलच्या. दररोजच्या बोली भाषेत वापरतात त्याचप्रकारे, बायबलमध्येही “दिवस” हा एक स्थितीस्थापक शब्द आहे, वेगवेगळ्या लांबीच्या कालावधींच्या संदर्भात बोलताना त्याचा उपयोग होऊ शकतो. उत्पत्ति २:४, NW येथे निर्मितीच्या एकूण सहा दिवसांच्या संदर्भात बोलताना त्यांना एकच सर्वसमावेशक ‘दिवस’ म्हणण्यात आले आहे. बायबलमध्ये ज्या इब्री शब्दाचे भाषांतर “दिवस” असे करण्यात आले आहे, त्याचा नुसता “एक प्रदीर्घ काळ” असाही अर्थ होऊ शकतो. त्याअर्थी प्रत्येक निर्मिती दिवस २४ तासांचा होता असा बायबलच्या आधारावर तरी अट्टहास करता येणार नाही. याच्या विरोधात शिकवण देऊन, मूलतत्त्ववादी बायबलचा विपर्यास करतात.—२ पेत्र ३:८ देखील पाहा.

सबंध इतिहासात धर्मवेत्त्यांनी कितीतरी वेळा बायबलचा विपर्यास केला आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील वेगवेगळ्या पंथांनी इतर मार्गांनीही बायबलच्या शिकवणुकींचा कसा विपर्यास केला आहे ते पाहा.

धर्माने केलेला विपर्यास

आपण बायबलचे पालन करतो असे म्हणणाऱ्‍यांचे आचरण सहसा या पुस्तकाच्या चांगल्या नावावर कलंक आणते; आणि दुसरीकडे पाहता, आपण या पुस्तकाचा आदर करतो असा दावाही ते करतात. तथाकथित ख्रिश्‍चनांनी देवाच्या नावाखाली एकमेकांचे रक्‍त सांडले आहे. तथापि, बायबल तर ख्रिस्ताच्या अनुयायांना “एकमेकांवर प्रीति करावी” अशी आज्ञा देते.—योहान १३:३४, ३५; मत्तय २६:५२.

काही पाळक आपल्या कळपांतील लोकांची पिळवणूक करतात, त्यांच्याकडून कष्टाने कमवलेला पैसा उकळतात—कोठे त्यांची अशी ही वागणूक आणि कोठे शास्त्रवचनांतील आज्ञा: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.”—मत्तय १०:८; १ पेत्र ५:२, ३.

अगदीच स्पष्ट आहे, जे लोक बायबलमधील शब्दांचा नुसता पुनरुच्चार करतात किंवा त्यांनुसार चालण्याचा दावा करतात, अशांच्या बोलण्यावरून आणि आचरणावरून खुद्द बायबलविषयी निष्कर्ष काढता येणार नाही. यामुळेच मोकळ्या मनाचा माणूस स्वतः हे शोधून काढणे पसंत करील की शेवटी बायबल आहे तरी काय आणि ते एवढे असामान्य पुस्तक का आहे.

[तळटीप]

a उदाहरणार्थ, आजच्या काळात सुद्धा अगदी शब्दशः अर्थाला धरून चालणारे खगोलशास्त्रज्ञ देखील सूर्य, तारका आणि तारकापुंजांच्या संदर्भात बोलताना “उगवणे” आणि “मावळणे” यांसारखे शब्द वापरतात. परंतु खरे पाहता, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे या खज्योती गतिशील असल्याचा केवळ भास होत असतो.

[४ पानांवरील चित्र]

गॅलिलीओ यांच्या दोन दुर्बिणी

[५ पानांवरील चित्र]

धार्मिक न्यायालयातील धर्माधिकाऱ्‍यांपुढे गॅलिलीओ