व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय चौदा

कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र

कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र
  • चांगला पती बनण्यासाठी काय आवश्यक आहे?

  • स्त्री पत्नीची भूमिका उत्तमरीत्या कशी वठवू शकते?

  • उत्तम पालक होण्यात काय गोवलेले आहे?

  • कौटुंबिक जीवन सुखी होण्यासाठी मुले कशी हातभार लावू शकतात?

१. सुखी कौटुंबिक जीवनाचा मंत्र काय आहे?

तुमचे कौटुंबिक जीवन सुखी व्हावे अशी यहोवा देवाची इच्छा आहे. त्याचे वचन बायबल यामध्ये, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी मार्गदर्शन आहे. शिवाय, प्रत्येकाने आपली भूमिका देवाच्या इच्छेनुसार यशस्वीरीत्या कशी वठवावी याबद्दलचे वर्णन आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य देवाच्या सल्ल्यानुसार आपली भूमिका पार पाडतो तेव्हा त्याचे परिणाम अतिशय समाधानकारक असतात. येशूने म्हटले: “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.”​—लूक ११:२८.

२. कोणत्या जाणीवेवर कौटुंबिक सौख्यानंद अवलंबून आहे?

येशूने ज्याला ‘आमच्या पित्या’ असे संबोधले त्या यहोवापासूनच कुटुंबाची उत्पत्ती झाली आहे, या जाणीवेवरच प्रामुख्याने कौटुंबिक आनंद अवलंबून आहे. (मत्तय ६:९) आपला स्वर्गीय पिता याच्यामुळेच पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंब अस्तित्वात आहे; त्यामुळे कुटुंबे कशी सुखी बनू शकतात हे निश्‍चितच त्याला माहीत आहे. (इफिसकर ३:​१४, १५) मग, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या भूमिकेविषयी बायबल काय शिकवते?

देवाकडून मानव कुटुंबाचा उगम

३. बायबल, मानव जीवनाच्या सुरुवातीचे वर्णन कसे देते आणि ते जे काही सांगते ते खरे आहे, हे आपल्याला कसे कळते?

देवाने पहिल्या मानवांना, आदाम व हव्वेला निर्माण केले आणि त्यांना पती व पत्नी म्हणून एकत्र आणले. त्याने त्यांना पृथ्वीवरील परादीसमध्ये अर्थात एदेन नावाच्या एका बागेत ठेवले आणि त्यांना आपले कुटुंब वाढवण्यास सांगितले. यहोवा त्यांना म्हणाला: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ति १:२६-२८; २:१८, २१-२४) ही भाकडकथा किंवा मिथ्यकथा नाही; कारण उत्पत्तिच्या पुस्तकात मानव जीवनाच्या सुरुवातीविषयी जे काही सांगितले आहे ते खरे असल्याचे येशूने दाखवून दिले. (मत्तय १९:​४, ५) आज आपण अनेक समस्यांचा सामना करत असलो आणि देवाने जसे उद्देशिले होते त्याप्रमाणे सध्या जीवन नसले तरी, कौटुंबिक जीवन सुखी होणे शक्य कसे आहे, हे आपण पाहू या.

४. (क) कुटुंबातील प्रत्येक सदस्य, कुटुंबातील सौख्यानंदाला हातभार कसा लावू शकतो? (ख) येशूच्या जीवनाचा अभ्यास करणे कौटुंबिक सौख्यानंदासाठी इतके महत्त्वपूर्ण का आहे?

देवाप्रमाणे प्रेम दाखवून कुटुंबातील प्रत्येक सदस्य कौटुंबिक जीवन सुखी बनवू शकतो. (इफिसकर ५:​१, २) पण आपण तर देवाला पाहू शकत नाही, मग त्याचे अनुकरण आपल्याला कसे करता येईल? आपण यहोवाच्या कार्यांविषयी शिकू शकतो. त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवले. (योहान १:​१४, १८) पृथ्वीवर असताना या पुत्राने अर्थात येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय पित्याचे इतके हुबेहुब अनुकरण केले की, येशूला पाहणे व त्याचा उपदेश ऐकणे हे यहोवासोबत असण्यासारखे व त्याचे शब्द ऐकण्यासारखे होते. (योहान १४:९) यास्तव, येशूने दाखवलेल्या प्रेमाविषयी शिकून व त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करून प्रत्येक सदस्य कौटुंबिक जीवन सुखी बनवण्यात हातभार लावू शकतो.

सर्व पतींसाठी एक नमुना

५, ६. (क) येशू मंडळीला जसे वागवतो ते पतींसाठी एक उदाहरण कसे आहे? (ख) पापांची क्षमा मिळवायची असेल तर काय करण्याची गरज आहे?

येशूने आपल्या शिष्यांना जसे वागवले तसेच पतींनी आपल्या पत्नींना वागवले पाहिजे, असे बायबल म्हणते. बायबलमधील या सूचनेवर विचार करा: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, . . . ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले. . . . त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो.”​—इफिसकर ५:२३, २५-२९.

शिष्यांच्या मंडळीबद्दल येशूला असलेले प्रेम, पतींसाठी सर्वोत्तम उदाहरण आहे. येशूने ‘शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रेम’ केले. ते अपरिपूर्ण होते तरीसुद्धा त्याने त्यांच्यासाठी आपले जीवन अर्पण केले. (योहान १३:१; १५:१३) त्याचप्रमाणे, पतींना असे आर्जवण्यात येते: “तुम्ही आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.” (कलस्सैकर ३:​१९) पती हा सल्ला कसा लागू करू शकतो, खासकरून त्याची पत्नी जेव्हा कधीकधी अविचारीपणे वागते? अशावेळी त्याने, आपल्या हातूनही चुका होतात व देवाकडून क्षमा मिळण्यासाठी आपण काय केले पाहिजे, हे आठवावे. त्याने काय केले पाहिजे? त्याच्याविरुद्ध पाप करणाऱ्यांना त्याने क्षमा केली पाहिजे; दुसऱ्या शब्दांत, त्याने आपल्या पत्नीला क्षमा केली पाहिजे. अर्थात, तिने देखील असेच केले पाहिजे. (मत्तय ६:​१२, १४, १५) आता तुम्हाला समजले का, की यशस्वी विवाह एकमेकांना क्षमा करणाऱ्या दोन व्यक्तींचे मीलन आहे, असे का म्हटले जाते?

७. येशूला कशाची जाणीव होती, व असे करण्याद्वारे त्याने पतींसाठी कोणते उदाहरण मांडले?

येशूने नेहमी आपल्या शिष्यांना समजून घेतले; तसेच पतींनीही आपल्या पत्नीला समजून घेतले पाहिजे. येशूला त्याच्या शिष्यांची मर्यादा, त्यांच्या शारीरिक गरजांची जाणीव होती. जसे की, एकदा ते थकले होते तेव्हा तो त्यांना म्हणाला: “एकांती चला व थोडा विसावा घ्या.” (मार्क ६:३०-३२) पत्नींच्या बाबतीतही विचारीपणा दाखण्याची गरज आहे. बायबल त्यांना “नाजूक व्यक्ति” म्हणते. त्यामुळे पतींना, त्यांना “मान” देण्याची आज्ञा देण्यात आली आहे. का? कारण पती आणि पत्नी या दोघांनाही समानतेने ‘जीवनरूपी कृपादान’ मिळणार आहे. (१ पेत्र ३:७) पतींनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की एखादी व्यक्ती ती पुरुष किंवा स्त्री म्हणून नव्हे, तर तिच्या विश्वासूपणामुळे ती देवाला मौल्यवान वाटते.​—स्तोत्र १०१:६.

८. (क) ‘जो पती आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो,’ हे कसे? (ख) “एकदेह” असण्याचा पती व पत्नीसाठी काय अर्थ होतो?

बायबल म्हणते, की “जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो.” असे यासाठी कारण पती व पत्नी “पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत,” असे येशूने दाखवून दिले. (मत्तय १९:६) त्यामुळे त्यांनी विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवू नयेत. (नीतिसूत्रे ५:​१५-२१; इब्री लोकांस १३:४) त्यांना एकमेकांच्या हिताची निःस्वार्थ काळजी असेल तरच ते असे करतील. (१ करिंथकर ७:​३-५) “कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो,” या विधानाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पती जसे स्वतःवर प्रेम करतो तसेच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम केले पाहिजे. त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याला, आपला मस्तक अर्थात येशू ख्रिस्ताला जाब द्यायचा आहे.​—इफिसकर ५:२९; १ करिंथकर ११:३.

९. फिलिप्पैकर १:८ मध्ये येशूच्या कोणत्या गुणाचा उल्लेख करण्यात आला आहे आणि हाच गुण पतीने आपल्या पत्नीशी वागताना का दाखवला पाहिजे?

प्रेषित पौल ‘ख्रिस्त येशूठायी असलेल्या कळवळ्याविषयी’ अर्थात त्याच्या कोमलतेविषयी बोलला. (फिलिप्पैकर १:८) येशूचा कोमल स्वभाव त्याच्या शिष्यांमध्ये असलेल्या स्त्रियांना तजेला आणणारा होता. (योहान २०:​१, ११-१३, १६) पत्नी आपल्या पतीकडून कोमल व्यवहाराची अपेक्षा करते.

पत्नींसाठी एक उदाहरण

१०. येशू पत्नींसाठी कसे उदाहरण मांडतो?

१० कुटुंब एक संस्था आहे आणि ही संस्था सुरळीत चालावी म्हणून तिला एका मस्तकपदाची गरज आहे. येशूला देखील एक मस्तक आहे ज्याच्या तो अधीन आहे. ‘प्रत्येक पुरुषाचे मस्तक जसे ख्रिस्त’ आहे तसेच “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.” (१ करिंथकर ११:३) येशू देवाच्या मस्तकपदाच्या आज्ञेत राहून एक उत्तम उदाहरण मांडतो. आपल्या सर्वांवर एक मस्तक आहे ज्याच्या अधीन आपण राहिले पाहिजे.

११. पत्नीने पतीबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि तिच्या वर्तनाचा काय परिणाम होऊ शकतो?

११ अपरिपूर्ण पुरूष चुका करतात आणि अनेकदा आदर्श कौटुंबिक मस्तक ठरत नाहीत. अशावेळी, पत्नीने काय करावे? पती जे करतो ते तिने क्षुल्लक लेखू नये अथवा तिने मस्तकपद आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न करू नये. पत्नीने हे लक्षात ठेवावे, की देवाच्या नजरेत, सौम्य व शांत वृत्तीची व्यक्ती बहुमूल्य आहे. (१ पेत्र ३:४) तिची अशी वृत्ती असेल तर तिला, कठीण परिस्थितीतही देवाने ठरवलेल्या मस्तकाच्या अधीन राहायला सोपे वाटेल. शिवाय बायबल म्हणते: “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३) पण पती जर ख्रिस्ताला आपले मस्तक मानत नसेल तर? बायबल पत्नींना असे आर्जवते: “िस्त्रयांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या िस्त्रयांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.”​—१ पेत्र ३:१, २.

१२. पत्नी आदरपूर्वक आपले मत व्यक्त करते तेव्हा त्यात वावगे असे का नाही?

१२ पती सत्यात असला अथवा नसला तरी ती व्यवहारचातुर्याचा उपयोग करून, त्याच्या मतापेक्षा वेगळे असलेले आपले मत व्यक्त करते तेव्हा त्याला अनादर दाखवत नसते. तिचे मत बरोबर असू शकेल, आणि पतीने जर तिचे म्हणणे ऐकले तर संपूर्ण कुटुंबाला फायदा होऊ शकेल. साराने जेव्हा एका घरगुती समस्येवर व्यावहारिक उपाय सांगितला तेव्हा अब्राहामला तो आवडला नाही; पण देवाने त्याला सांगितले: “सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक.” (उत्पत्ति २१:९-१२) अर्थात, पती जेव्हा देवाच्या नियमाच्या विरुद्ध न जाणारा अंतिम निर्णय घेतो तेव्हा पत्नीने या निर्णयाला सहकार्य देऊन त्याच्या अधीन राहिले पाहिजे.​—प्रेषितांची कृत्ये ५:२९; इफिसकर ५:२४.

साराने पत्नींसाठी कोणते उत्तम उदाहरण मांडले?

१३. (क) तीत २:​४, ५ विवाहित स्त्रियांना काय करण्यास आर्जवते? (ख) फारकत व घटस्फोट घेण्याविषयी बायबल काय सांगते?

१३ कुटुंबाची काळजी घेताना पत्नी अनेक मार्गांनी आपली भूमिका वठवू शकते. जसे की बायबल म्हणते, की लग्न झालेल्या स्त्रियांनी “आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपआपल्या नवऱ्यांच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे.” (तीत २:४, ५) पत्नी व मातेची भूमिका वठवणारी स्त्री जेव्हा असे वागते तेव्हा ती नेहमी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे प्रेम आणि आदर मिळवते. (नीतिसूत्रे ३१:​१०, २८) पण, विवाह म्हणजे दोन अपरिपूर्ण व्यक्तींचे मीलन असल्यामुळे काही बिकट परिस्थितींमुळे पती-पत्नी फारकत घेतात किंवा त्यांचा घटस्फोट होतो. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये फारकत घेण्याला बायबल परवानगी देते. तरीपण, फारकत घेण्याला आपण क्षुल्लक समजू नये, कारण बायबल असा सल्ला देते: “पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये; . . . पतीनेहि पत्नीला सोडू नये.” (१ करिंथकर ७:१०, ११) आणि एखाद्या जोडीदाराने केलेले जारकर्मच, घटस्फोट घेण्यास शास्त्रवचनीय आधार पुरवतो.​—मत्तय १९:९.

पालकांसाठी एक परिपूर्ण उदाहरण

१४. येशूने मुलांशी कसा व्यवहार केला आणि मुलांना पालकांकडून काय हवे आहे?

१४ येशूने मुलांशी केलेला व्यवहार, पालकांसाठी एक परिपूर्ण उदाहरण आहे. येशूजवळ येणाऱ्या चिमुरड्यांना इतरांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशू म्हणाला: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” मग, “त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला,” असे बायबल म्हणते. (मार्क १०:१३-१६) येशूने चिमुरड्यांबरोबर वेळ घालवला; तुम्हीही आपल्या मुलांबरोबर वेळ घालवू नये का? त्यांना थोड्या थोड्या प्रमाणात नव्हे तर अधिक प्रमाणात वेळ दिला पाहिजे. त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे कारण यहोवा पालकांना हेच तर करायला सांगतो.​—अनुवाद ६:​४-९.

१५. पालक आपल्या मुलांचे संरक्षण करण्याकरता काय करू शकतात?

१५ हे जग दुष्टाईकडे जितके जास्त जात आहे तितके अधिक मुलांना आपल्या पालकांच्या संरक्षणाची गरज आहे. लैंगिक शोषण करणाऱ्या दुष्ट लोकांपासून पालकांनी आपल्या मुलांचे संरक्षण केले पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांचे संरक्षण कसे केले ते पाहा. तो त्यांना प्रेमाने “मुलांनो,” असे संबोधायचा. त्याला जेव्हा अटक करण्यात आली व लवकरच त्याला ठार मारले जाणार होते तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना तेथून पळ काढता यावा म्हणून योजना केली. (योहान १३:३३; १८:​७-९) पालक या नात्याने तुम्ही, तुमच्या मुलांवर हल्ला करणाऱ्या दियाबलाच्या प्रयत्नांच्या बाबतीत दक्ष असले पाहिजे. त्यांना आधीच सतर्क करण्याची गरज आहे. * (१ पेत्र ५:८) पूर्वी कधी नव्हे इतका आज, त्यांच्या शारीरिक, आध्यात्मिक व नैतिक सुरक्षिततेला धोका आहे.

मुलांबरोबरील येशूच्या व्यवहारावरून पालक काय शिकू शकतात?

१६. येशूचे शिष्य अपरिपूर्ण होते तरी, त्यांच्याशी त्याने केलेल्या व्यवहारावरून पालक काय शिकू शकतात?

१६ येशूचा मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री त्याच्या शिष्यांत, आपल्यापैकी कोण मोठा आहे यावर वाद झाला. त्यांच्यावर क्रोधीत होण्याऐवजी येशूने आपल्या शब्दांतून व कृतींतून अगदी प्रेमळपणे त्यांना समजावले. (लूक २२:​२४-२७; योहान १३:​३-८) तुम्ही पालक असाल तर, आपल्या मुलांना तुम्ही ज्या पद्धतीने सुधरवण्याचा प्रयत्न करता त्यात तुम्ही येशूचे अनुकरण करू शकता का? हे खरे आहे, की मुलांना शिक्षेची अथवा सुधारणुकीची गरज आहे; परंतु ती कधीही रागाच्या भरात दिली जाऊ नये तर “योग्य” प्रमाणात देण्याची गरज आहे. “तरवार भोसकावी तसे” अविचारी बोलणे तुम्ही करू नये. (यिर्मया ३०:११; नीतिसूत्रे १२:१८) शिक्षा अशा पद्धतीने दिली पाहिजे की, मुलांना नंतर, ती शिक्षा किती उचित होती हे समजले पाहिजे.​—इफिसकर ६:४; इब्री लोकांस १२:​९-११.

मुलांसाठी एक आदर्श

१७. येशूने कोणकोणत्या मार्गांनी मुलांसाठी एक परिपूर्ण उदाहरण मांडले?

१७ मुलेही येशूकडून काही शिकू शकतात का? होय! येशूने आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिले, की मुलांनी आपल्या पालकांच्या अधीन राहिले पाहिजे. येशू म्हणाला: “पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.” तो पुढे म्हणाला: “जे [पित्याला] आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहान ८:२८, २९) येशू आपल्या स्वर्गीय पित्याच्या आज्ञेत होता आणि मुलांनी आपल्या पालकांच्या आज्ञेत असले पाहिजे, असे बायबल सांगते. (इफिसकर ६:​१-३) येशू परिपूर्ण बालक होता आणि त्याचे मानवी पालक योसेफ आणि मरीया हे अपरिपूर्ण होते तरीदेखील तो त्यांच्या आज्ञेत होता. यामुळे, येशूच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदी होता!​—लूक २:​४, ५, ५१, ५२.

१८. येशू नेहमी आपल्या स्वर्गीय पित्याच्या आज्ञेत का राहिला, आणि मुले आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहतात तेव्हा कोणाला आनंद होतो?

१८ आपण कोणकोणत्या मार्गांनी होता होईल तितके येशूप्रमाणे होऊन आपल्या पालकांना आनंदी करू शकू, हे मुलांना दिसते का? काही वेळा मुलांना आपल्या पालकांच्या आज्ञेत राहणे कठीण वाटते, हे खरे आहे पण मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे, अशी देवाचीच इच्छा आहे. (नीतिसूत्रे १:८; ६:२०) येशू नेहमी, म्हणजे खडतर परिस्थितीतही आपल्या स्वर्गीय पित्याच्या आज्ञेत राहिला. एकदा, देवाची अशी इच्छा होती की येशूने एक अतिशय कठीण काम करावे तेव्हा येशू म्हणाला: “तुझी इच्छा असली तर हा प्याला [अर्थात एक विशिष्ट काम] माझ्यापासून दूर कर.” तरीपण देवाने येशूला जे सांगितले ते त्याने केले. कारण आपल्या पित्याने जे सांगितले आहे तेच आपल्याकरता सर्वात उत्तम आहे याची येशूला जाणीव होती. (लूक २२:४२) आज्ञेत राहण्यास शिकण्याद्वारे मुले आपल्या पालकांना आणि आपल्या स्वर्गीय पित्याला आनंदित करतील. *​—नीतिसूत्रे २३:​२२-२५.

मुलांसमोर चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह येतो तेव्हा त्यांनी कशाचा विचार केला पाहिजे?

१९. (क) सैतान मुलांना मोहात पाडायचा प्रयत्न कसा करतो? (ख) मुलांच्या वाईट वागण्याचा पालकांवर काय परिणाम होऊ शकतो?

१९ दियाबलाने येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. तर आपण खात्रीने म्हणू शकतो, की तो आजही मुलांना चुकीच्या गोष्टी करण्याच्या मोहात पाडू शकतो. (मत्तय ४:​१-१०) दियाबल सैतान, मित्रांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, ज्याचा प्रतिकार करणे मुलांना कठीण वाटू शकेल. त्यामुळे मुलांनी चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांची सोबत न धरणे हे किती महत्त्वाचे आहे! (१ करिंथकर १५:३३) याकोबाची मुलगी दीना हिची यहोवाची उपासना न करणाऱ्यांबरोबर दोस्ती असल्यामुळे किती मोठे संकट कोसळले. (उत्पत्ति ३४:​१, २) कुटुंबातील एक सदस्य लैंगिक अनैतिकतेत गुरफटला असेल तर इतर सदस्यांना त्यामुळे किती मानसिक यातना होऊ शकतात, याचा तुम्ही विचार करू शकता.​—नीतिसूत्रे १७:​२१, २५.

कौटुंबिक सौख्यानंदाचा मंत्र

२०. आनंदी कौटुंबिक जीवन उपभोगण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने काय करण्याची गरज आहे?

२० बायबलच्या सल्ल्याचे अनुकरण केले जाते तेव्हा कुटुंबातील समस्यांना तोंड देणे सोपे जाते. वास्तविक पाहता, अशा सल्ल्याचे पालनच कौटुंबिक सौख्यानंदाचा मंत्र आहे. तेव्हा, पतींनो, आपल्या पत्नींवर प्रेम करा आणि येशू मंडळीशी जसा व्यवहार करतो तसाच आपल्या पत्नींशी व्यवहार करा. पत्नींनो, आपल्या नवऱ्यांच्या मस्तकपदाच्या अधीन राहा आणि नीतिसूत्रे ३१:​१०-३१ मध्ये वर्णन केलेल्या सद्‌गुणी स्त्रीच्या उदाहरणाचे अनुकरण करा. पालकांनो, आपल्या मुलांना वळण लावा. (नीतिसूत्रे २२:६) बापांनो, ‘आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवा.’ (१ तीमथ्य ३:४, ५; ५:८) आणि मुलांनो, आपल्या पालकांच्या आज्ञेत राहा. (कलस्सैकर ३:२०) कुटुंबातील कोणीच परिपूर्ण नसल्यामुळे सर्वजण चुका करतात. त्यामुळे नम्र व्हा आणि एकमेकांची क्षमा मागा.

२१. आपल्यासमोर कोणती उदात्त आशा आहे, आणि आपण आनंदी कौटुंबिक जीवनाचा उपभोग कसा घेऊ शकतो?

२१ खरेच, बायबलमध्ये कौटुंबिक जीवनाविषयी अमूल्य सल्ल्याचा आणि मार्गदर्शनाचा मोठा खजिना आहे. शिवाय, ते आपल्याला देवाच्या नवीन जगाविषयी आणि यहोवाची उपासना करणाऱ्या आनंदी लोकांनी भरलेल्या पृथ्वीवरील परादीसविषयी शिकवते. (प्रकटीकरण २१:​३, ४) आपल्यासमोर किती उदात्त आशा आहे! पण आपण आताही, देवाचे वचन बायबल यातील देवाच्या सूचनांचे पालन करून आनंदी कौटुंबिक जीवनाचा उपभोग घेऊ शकतो.

^ परि. 15 मुलांचे संरक्षण कसे करायचे याबाबतीत अधिक माहिती, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले महान शिक्षकाकडून शिका (इंग्रजी) या पुस्तकाच्या ३२ व्या अध्यायात दिली आहे.

^ परि. 18 एखादा पालक आपल्या मुलाला देवाची आज्ञा मोडण्यास सांगत असला तरच मुलाने पालकाची आज्ञा मोडणे उचित आहे.​—प्रेषितांची कृत्ये ५:२९.