व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय दहा

देवदूत आणि दुरात्मे यांच्याबद्दलचं सत्य

देवदूत आणि दुरात्मे यांच्याबद्दलचं सत्य

१. आपण देवदूतांबद्दल का जाणून घेतलं पाहिजे?

यहोवाची इच्छा आहे, की आपण त्याच्या कुटुंबाशी परिचित व्हावं. देवदूत त्याच्या कुटुंबातले सदस्य आहेत. बायबलमध्ये त्यांना ‘देवकुमार’ असंही म्हटलं आहे. (ईयोब ३८:७) देवदूतांची काय भूमिका आहे? आधीच्या काळात त्यांनी लोकांना कशी मदत केली? ते आज आपल्याला कशी मदत करतात?—अंत्यटीप ८ पाहा.

२. देवदूतांना कोणी निर्माण केलं? किती देवदूत निर्माण करण्यात आले?

देवदूतांना कोणी निर्माण केलं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कलस्सैकर १:१६ मध्ये म्हटलं आहे, की यहोवाने येशूला बनवल्यानंतर, “स्वर्गात व पृथ्वीवर, इतर सर्व . . . गोष्टी निर्माण करण्यात आल्या.” यांत देवदूतांचादेखील समावेश होतो. पण त्याने असे किती देवदूत बनवले? बायबलमध्ये म्हटलं आहे, की त्यांची संख्या अगणित आहे.—स्तोत्र १०३:२०; प्रकटीकरण ५:११.

३. ईयोब ३८:४-७ या वचनांतून आपल्याला देवदूतांविषयी काय कळतं?

बायबलमध्ये सांगितलं आहे की, पृथ्वीची निर्मिती करण्याआधी यहोवाने देवदूतांना निर्माण केलं. यहोवाने पृथ्वी घडवली तेव्हा देवदूतांना कसं वाटलं? बायबलमधल्या ईयोब नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे की, त्यांना खूप आनंद झाला. ते सर्व यहोवाची सेवा करणाऱ्या एका कुटुंबाचे भाग होते.—ईयोब ३८:४-७.

देवदूत देवाच्या सेवकांना मदत करतात

४. देवदूतांना मानवांमध्ये आवड आहे, हे आपण कशावरून म्हणू शकतो?

देवदूतांना सुरुवातीपासूनच मानवांबद्दल आणि पृथ्वी व मानव यांच्यासाठी असलेल्या यहोवाच्या संकल्पाबद्दल उत्सुकता होती. (नीतिसूत्रे ८:३०, ३१; १ पेत्र १:११, १२) जेव्हा आदाम व हव्वा यांनी देवाविरुद्ध बंड केलं तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. आज बहुतेक लोक देवाच्या आज्ञांचं उल्लंघन करतात हे पाहून त्यांना आणखी दुःख होत असावं. पण जेव्हा एखादी व्यक्ती पश्‍चात्ताप करून देवाकडे परत येते, तेव्हा देवदूतांना फार आनंद होतो. (लूक १५:१०) देवाची सेवा करणाऱ्यांमध्ये देवदूतांना विशेष आवड आहे. पृथ्वीवरच्या आपल्या सेवकांचं संरक्षण करण्यासाठी यहोवा देवदूतांचा उपयोग करतो. (इब्री लोकांना १:७, १४) याची काही उदाहरणं आपण पाहू या.

“माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली.”—दानीएल ६:२२

५. आधीच्या काळात देवदूतांनी देवाच्या सेवकांना कशा प्रकारे मदत केली?

सदोम व गमोरा या दोन शहरांचा नाश होताना, लोट आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी यहोवाने दोन देवदूतांना पाठवलं. (उत्पत्ति १९:१५, १६) तसंच, शेकडो वर्षांनंतर संदेष्टा दानीएल याला सिंहांच्या गुहेत फेकण्यात आलं. पण त्याला कसलीच इजा झाली नाही. कारण, “देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली.” (दानीएल ६:२२) नंतर एकदा, प्रेषित पेत्र तुरुंगात असताना यहोवाने देवदूताला पाठवून त्याची सुटका केली. (प्रेषितांची कार्ये १२:६-११) येशू पृथ्वीवर होता तेव्हा देवदूतांनी त्यालाही मदत केली. जसं की, त्याच्या बाप्तिस्म्यानंतर “देवदूत त्याची सेवा करत होते.” (मार्क १:१३) तसंच, येशूला मृत्युदंड मिळण्याच्या थोड्या वेळाआधी एका देवदूताने येऊन “त्याला धीर दिला.”—लूक २२:४३.

६. (क) आजही देवदूत देवाच्या सेवकांना मदत करतात हे आपण कशावरून म्हणतो? (ख) कोणत्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत?

पूर्वीप्रमाणे देवदूत मानवांसमोर प्रकट होत नसले तरी, आजही आपल्या सेवकांना मदत करण्यासाठी देव त्यांचा उपयोग करतो. “परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (स्तोत्र ३४:७) पण आपल्याला संरक्षणाची गरज का आहे? कारण आपल्याला इजा करणारे अनेक शक्तिशाली शत्रू आहेत. हे शत्रू कोण आहेत? ते कुठून आले? आणि ते आपल्याला इजा का करू पाहत आहेत? या प्रश्नांची उत्तरं पाहण्याआधी आपण, आदाम व हव्वा यांना निर्माण केल्यानंतर काय घडलं ते पाहू या.

आपले अदृश्य शत्रू

७. सैतानाच्या फसवणुकीमुळे बहुतेक लोकांनी काय केलं?

एका देवदूताने देवाविरुद्ध बंड केलं, त्याला इतरांवर राज्य करायची इच्छा होती, याबद्दल आपण या पुस्तकाच्या ३ ऱ्या अध्यायात शिकलो. त्या देवदूताला बायबलमध्ये दियाबल सैतान म्हटलं आहे. (प्रकटीकरण १२:९) सैतानाने हव्वाला देवाबद्दल खोटं सांगून फसवलं, कारण आपल्याप्रमाणे मानवांनीसुद्धा देवाविरुद्ध बंड करावं अशी त्याची इच्छा होती. तेव्हापासून त्याने बहुतेक लोकांना फसवलं आहे. पण, हाबेल, हनोख आणि नोहा यांच्यासारखे लोक यहोवाला विश्वासू राहिले.—इब्री लोकांना ११:४, ५, ७.

८. (क) काही देवदूत दुरात्मे का झाले? (ख) जलप्रलयातून बचावण्यासाठी या दुरात्म्यांनी काय केलं?

नोहाच्या काळात काही देवदूतांनी देवाविरुद्ध बंड केलं. त्यांनी आपलं स्वर्गातलं स्थान सोडलं आणि ते पृथ्वीवर मानव म्हणून राहायला आले. त्यांनी असं का केलं? बायबलमध्ये सांगितलं आहे की, त्यांना पृथ्वीवरच्या स्त्रियांशी संबंध ठेवायचे होते. (उत्पत्ति ६:२ वाचा.) पण त्यांनी जे केलं ते योग्य नव्हतं. (यहूदा ६) त्या दुष्ट देवदूतांप्रमाणेच त्या काळातले बहुतेक लोकसुद्धा भ्रष्ट आणि हिंसक झाले. त्यामुळे यहोवाने पृथ्वीवरच्या सर्व दुष्ट लोकांचा नाश जलप्रलय आणून करायचं ठरवलं. पण त्याच्या विश्वासू सेवकांना मात्र त्याने वाचवलं. (उत्पत्ति ७:१७, २३) जलप्रलयातून वाचण्यासाठी दुष्ट देवदूत स्वर्गात परत गेले. या दुष्ट देवदूतांना बायबलमध्ये दुरात्मे म्हटलं आहे. ते स्वतःहून सैतानाच्या बंडाळीत सामील झाले आणि सैतान त्यांचा शासक बनला.—मत्तय ९:३४.

९. (क) दुरात्मे स्वर्गात परत गेले तेव्हा काय झालं? (ख) पुढच्या परिच्छेदांमध्ये आपण काय पाहणार आहोत?

दुरात्म्यांनी यहोवाविरुद्ध बंड केल्यामुळे, त्याने त्यांना परत आपल्या कुटुंबात घेतलं नाही. (२ पेत्र २:४) आज जरी ते मानव शरीर धारण करू शकत नसले तरी, ते “सबंध पृथ्वीवरील लोकांना” फसवत आहेत. (प्रकटीकरण १२:९; १ योहान ५:१९) पृथ्वीवरच्या इतक्या लोकांना ते चलाखीने कसे फसवतात हे आता आपण पाहू या.—२ करिंथकर २:११ वाचा.

दुरात्मे लोकांची फसवणूक कशी करतात?

१०. दुरात्मे लोकांची फसवणूक कशी करतात?

१० दुरात्मे लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतात. लोक स्वतःहून किंवा एखाद्या मांत्रिकाद्वारे अथवा जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीद्वारे दुरात्म्यांबरोबर संपर्क साधतात. दुरात्म्यांबरोबर संपर्क साधण्याला भुताटकी किंवा जादूटोणा म्हटलं जातं. दुरात्म्यांबरोबर आपण कोणताही संपर्क ठेवू नये, अशी आज्ञा बायबलमध्ये दिली आहे. (गलतीकर ५:१९-२१) असं का? कारण जसं एक शिकारी, प्राण्यांना पकडण्यासाठी पाश लावतो तसंच, हे दुरात्मे वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना पाशात अडकवून त्यांना आपल्या मुठीत ठेवतात.—अंत्यटीप २६ पाहा.

११. शकुन पाहणं म्हणजे काय आणि आपण ते का टाळलं पाहिजे?

११ दुरात्मे वापरत असलेल्या पाशांपैकी एक पाश म्हणजे शकुन पाहणं. याचा अर्थ भविष्य जाणण्यासाठी अलौकिक शक्तींचा वापर करणं. ताऱ्यांकडे पाहून, शुभाशुभ पाहून, हस्तरेषा पाहून किंवा चेहरा पाहून भविष्य पाहणं म्हणजे शकुन पाहणं. या सर्व गोष्टींमुळे आपली हानी होणार नाही, असं बहुतेक लोकांना जरी वाटत असलं तरी ते खरं नाही. या सर्व गोष्टी घातक आहेत. कारण बायबलमध्ये असं म्हटलं आहे की, भविष्य सांगणारे लोक दुरात्म्यांच्या मदतीशिवाय कार्य करू शकत नाहीत. प्रेषितांची कार्ये १६:१६-१८ या वचनांमध्ये आपण एका “भविष्य सांगणाऱ्या दुरात्म्याने पीडित” मुलीविषयी वाचतो जी “भविष्य” सांगत असे. जेव्हा प्रेषित पौलने या मुलीच्या अंगातून दुरात्मा बाहेर काढला तेव्हा त्या मुलीची भविष्य सांगण्याची शक्ती नाहीशी झाली.

१२. (क) मृतांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं घातक का आहे? (ख) अंत्यसंस्काराच्या वेळी आणि नंतर पाळल्या जाणाऱ्या काही प्रथांपासून देवाच्या सेवकांनी दूर का राहिलं पाहिजे?

१२ लोकांना पाशात पकडण्यासाठी दुरात्मे आणखी एका युक्तीचा उपयोग करतात. दुरात्मे आपल्याला असा विश्वास करायला लावतात, की आपण मृत लोकांबरोबर बोलू शकतो कारण ते कुठेतरी जिवंत असतात, आपल्याशी संपर्क साधू शकतात आणि आपल्याला त्रासही देऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्याचा नातेवाईक किंवा मित्र मरतो तेव्हा तो मृतांबरोबर संपर्क साधण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडे जातो. मृतांबरोबर बोलण्याचा दावा करणारी व्यक्ती, मृत व्यक्तीबद्दल आपल्याला एखादी महत्त्वाची गोष्ट सांगेल किंवा मृत व्यक्तीच्या आवाजात बोलेल. (१ शमुवेल २८:३-१९) मृत लोक कुठेतरी जिवंत असतात या विश्वासावर, अत्यंसंस्काराचे अनेक विधी आधारलेले आहेत. जसं की, अत्यंसंस्काराचे विधी, वार्षिक मृत्यू दिवस पाळणं, मृतांसाठी बळी देणं, विधवेच्या प्रथा किंवा मृतांसाठी जागरण करणं. हे सर्व विधी व प्रथा दुरात्म्यांशी संबंधित आहेत. जेव्हा खरे ख्रिस्ती अशा प्रथांमध्ये भाग घेत नाहीत तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांकडून, ते राहत असलेल्या गावातून, किंवा समाजाकडून त्यांचा विरोध केला जाऊ शकतो, टीका होऊ शकते किंवा त्यांच्याशी ते सर्व संबंध तोडू शकतात. पण ख्रिस्ती लोकांना हे माहीत आहे की मृत लोक दुसऱ्या कुठल्याही जागी अस्तित्वात नाहीत. त्यामुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही किंवा ते आपल्याला कसलीही हानी करू शकत नाहीत. (स्तोत्र ११५:१७) म्हणून सावधगिरी बाळगा! मृतांबरोबर किंवा दुरात्म्यांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि दुरात्म्यांशी संबंधित असलेल्या कुठल्याही प्रकारच्या प्रथांमध्ये भाग घेऊ नका.—अनुवाद १८:१०, ११ वाचा; यशया ८:१९.

१३. दुरात्म्यांच्या भीतीखाली राहणारे हजारो लोक आज काय करू शकले आहेत?

१३ दुरात्मे लोकांना फक्त फसवतच नाहीत तर त्यांना घाबरवतातदेखील. आज सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना माहीत आहे, की आपला “फार कमी वेळ उरला आहे.” कारण, देव लवकरच त्यांना पृथ्वीवरून काढून टाकणार आहे. म्हणून ते खूप रागीट आणि हिंसक बनले आहेत. (प्रकटीकरण १२:१२, १७) पण या दुरात्म्यांना पूर्वी घाबरून जगणारे हजारो लोक, आज त्यांच्या भीतीपासून मुक्त झाले आहेत. पण त्यांना या भीतीपासून कशी मुक्ती मिळाली?

दुरात्म्यांच्या प्रभावाचा विरोध करा आणि त्यांपासून स्वतःची सुटका करा

१४. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांप्रमाणे आपणसुद्धा दुरात्म्यांपासून स्वतःची सुटका कशी करू शकतो?

१४ आपण दुरात्म्यांच्या प्रभावाचा विरोध कसा करायचा आणि त्यांच्यापासून स्वतःची सुटका कशी करायची ते बायबलमध्ये सांगितलं आहे. जसं की, पहिल्या शतकातल्या इफिसस शहरातले काही लोक सत्य शिकण्याआधी दुरात्म्यांबरोबर संपर्क साधायचे. मग त्यांनी स्वतःची सुटका कशी केली? “जादूटोणा करणाऱ्या पुष्कळ लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांसमोर जाळून टाकली,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (प्रेषितांची कार्ये १९:१९) ख्रिस्ताचे अनुयायी बनण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी जादूटोण्याशी संबंधित असलेली त्यांच्याजवळची सर्व पुस्तकं नष्ट केली. आज आपल्यालासुद्धा तसंच करण्याची गरज आहे. ज्यांना यहोवाची सेवा करायची आहे, त्यांनी दुरात्म्यांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत. यांमध्ये अशा प्रकारची पुस्तकं, मासिकं, जन्मकुंडल्या, चित्रपट, संगीत, खेळ आणि पोस्टरसुद्धा सामील आहेत ज्यामुळे जादूटोणा, दुरात्मे किंवा अलौकिक शक्ती हानीकारक नसून मनोरंजक आहेत असं वाटू शकतं. वाईट गोष्टींपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अंगावर बांधले जाणारे गंडेदोरे, ताईत किंवा यांसारख्या गोष्टीदेखील काढून टाकणं गरजेचं आहे.—१ करिंथकर १०:२१.

१५. सैतान आणि त्याचे दुरात्मे यांचा प्रतिकार करण्यासाठी आणखी काय करण्याची गरज आहे?

१५ इफिससमधल्या लोकांनी आपली जादूटोण्याची पुस्तकं जाळून टाकली तरी, त्यांना काही वर्षांपर्यंत “दुष्ट आत्मिक शक्तींबरोबर” लढावं लागलं, असं प्रेषित पौलने लिहिलं. (इफिसकर ६:१२) त्यांनी ती पुस्तकं जाळून टाकल्यावरही दुरात्मे त्यांना त्रास का देत होते? त्यांना आणखी काय करण्याची गरज होती? प्रेषित पौलने त्यांना सांगितलं: “विश्वासाची मोठी ढाल हाती घ्या, ज्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे सर्व जळते बाण विझवू [किंवा, रोखू] शकाल.” (इफिसकर ६:१६) ढालीमुळे जसं एखाद्या सैनिकाचं संरक्षण होतं, तसंच आपल्या विश्वासामुळे आपलं संरक्षण होतं. यहोवा आपलं संरक्षण करू शकतो, असा आपला पक्का विश्वास असेल तर आपण सैतान आणि त्याचे दुरात्मे यांचा प्रतिकार करू शकतो.—मत्तय १७:२०.

१६. यहोवावरचा आपला विश्वास आपण आणखी पक्का कसा करू शकतो?

१६ यहोवावरचा आपला विश्वास आपण पक्का कसा करू शकतो? दररोज बायबलचं वाचन केल्याने आणि संरक्षणासाठी त्याच्यावर अवलंबून राहिल्याने आपला विश्वास पक्का होऊ शकतो. यहोवावर जर आपला ठाम विश्वास असेल, तर सैतान आणि त्याचे दुरात्मे आपली हानी करू शकणार नाहीत.—१ योहान ५:५.

१७. आणखी कोणत्या गोष्टीमुळे आपलं दुरात्म्यांपासून संरक्षण होऊ शकतं?

१७ इफिससमधल्या ख्रिश्चनांना आणखी काय करण्याची गरज होती? इफिसस शहरातले बहुतेक लोक भुताटकी करणारे होते. त्यामुळे पौलने ख्रिश्चनांना सल्ला दिला की त्यांनी प्रत्येक प्रसंगी प्रार्थना केली पाहिजे. (इफिसकर ६:१८) जर त्यांना संरक्षणासाठी सर्व प्रसंगी यहोवाला प्रार्थना करणं गरजेचं होतं, तर मग आपल्याबद्दल काय? आज आपणसुद्धा अशा जगात राहत आहोत जिथे अनेक लोक भुताटकी किंवा जादूटोणा करतात. त्यामुळे आपणही संरक्षणासाठी सर्व प्रसंगी यहोवाला प्रार्थना करणं आणि विशेष म्हणजे त्याचं नाव घेऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. (नीतिसूत्रे १८:१० वाचा.) ‘सैतानापासून आमची सुटका कर,’ अशी प्रार्थना आपण यहोवाला करत राहिलो तर तो नक्कीच आपली प्रार्थना ऐकेल.—स्तोत्र १४५:१९; मत्तय ६:१३.

१८, १९. (क) सैतान आणि त्याचे दुरात्मे यांच्याविरुद्धची लढाई आपण कशी जिंकू शकतो? (ख) पुढच्या अध्यायात आपल्याला कोणत्या प्रश्‍नाचं उत्तर मिळेल?

१८ जादूटोण्याशी संबंधित सर्व गोष्टी नष्ट केल्याने व संरक्षणासाठी यहोवावर अवलंबून राहिल्याने आपण सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा प्रतिकार करू शकतो. आपल्याला त्यांना घाबरण्याची गरज नाही. (याकोब ४:७, ८ वाचा.) कारण यहोवा या दुरात्म्यांपेक्षा खूप शक्तिशाली आहे. नोहाच्या दिवसांत त्याने त्यांना शिक्षा दिली आणि भविष्यात तो त्यांचा नाश करणार आहे. (यहूदा ६) दुरात्म्यांसोबतच्या लढाईत आपण एकटे नाही. आपलं संरक्षण करण्यासाठी यहोवा त्याच्या देवदूतांचा उपयोग करतो. (२ राजे ६:१५-१७) आपण भरवसा ठेवू शकतो की, यहोवाच्या मदतीने आपण सैतान आणि त्याचे दुरात्मे यांच्याविरुद्धची लढाई नक्की जिंकू शकतो.—१ पेत्र ५:६, ७; २ पेत्र २:९.

१९ पण मग सैतान आणि त्याचे दुरात्मे लोकांना इतका त्रास देत आहेत, तरी अजून देवाने त्यांचा नाश का केला नाही? या प्रश्‍नाचं उत्तर आपल्याला पुढच्या अध्यायात मिळेल.