व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय सतरा

देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान

देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान

“आकाश [व] पृथ्वी ही निर्माण” करणारा देव आपल्या प्रार्थना ऐकण्यास तयार आहे.—स्तोत्र ११५:१५

१, २. देवाला प्रार्थना करणं हा एक बहुमान का आहे आणि प्रार्थनेविषयी बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते आपण का जाणून घेतलं पाहिजे?

संपूर्ण विश्वाच्या तुलनेत पृथ्वी फार लहान आहे. जेव्हा यहोवा या पृथ्वीकडे पाहतो, तेव्हा पृथ्वीवरचे सर्व लोक जणू त्याला पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे वाटतात. (स्तोत्र ११५:१५; यशया ४०:१५) आपण विश्वाच्या तुलनेत इतके लहान असलो तरी, “जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो,” असं स्तोत्र १४५:१८, १९ मध्ये म्हटलं आहे. या वचनांवरून कळतं की आपल्याला किती मोठा बहुमान मिळाला आहे! यहोवा सर्वशक्तिमान निर्माणकर्ता असूनही त्याला आपल्याशी जवळचं नातं जोडण्याची आणि आपल्या प्रार्थना ऐकण्याची इच्छा आहे. त्याला प्रार्थना करण्याचा आपल्या प्रत्येकाला सन्मान मिळाला आहे. खरंच, प्रार्थना हा यहोवाने आपल्याला दिलेला बहुमान आहे.

पण, त्याला मान्य असलेल्या पद्धतीनेच जर आपण त्याला प्रार्थना केली, तर तो आपली प्रार्थना ऐकायला तयार आहे. मग प्रश्न येतो की प्रार्थना कशी केली पाहिजे? बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे, ते आपण पाहू या.

यहोवाला प्रार्थना का केली पाहिजे?

३. आपण यहोवाला प्रार्थना का केली पाहिजे?

यहोवाची इच्छा आहे, की आपण त्याला प्रार्थना करावी आणि त्याच्याशी बोलावं. असं आपण का म्हणू शकतो? कृपया फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा. या वचनांत आपल्याला देण्यात आलेल्या प्रेमळ आमंत्रणावर विचार करा. या विश्वाच्या निर्माणकर्त्याला आपली खूप काळजी आहे! आपल्या मनात कोणत्या भावना आहेत, आपल्याला कोणत्या समस्या आहेत हे आपण त्याला सांगावं, अशी त्याची इच्छा आहे!

४. यहोवाला नेहमी प्रार्थना केल्याने त्याच्यासोबत तुमची मैत्री कशी घनिष्ठ होईल?

प्रार्थनेद्वारे यहोवाशी बोलल्याने त्याच्याबरोबरची आपली मैत्री आणखी घनिष्ठ होईल. दोन मित्र जेव्हा मनातले विचार, भावना, चिंता एकमेकांना सांगतात तेव्हा त्यांची मैत्री आणखी घनिष्ठ होते. यहोवाला प्रार्थना करण्याबाबतीतही हे खरं आहे. बायबलद्वारे यहोवाने आपल्याला त्याचे विचार, त्याच्या भावना कळवल्या आहेत; भविष्यात तो काय करणार आहे हेही त्याने सांगितलं आहे. तर प्रार्थनेद्वारे तुम्ही त्याला तुमच्या मनातले विचार, तुमच्या भावना नेहमी सांगू शकता. असं केल्याने त्याच्यासोबत तुमची मैत्री आणखी घनिष्ठ होईल.—याकोब ४:८.

यहोवाने तुमची प्रार्थना ऐकावी म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे?

५. यहोवा सगळ्याच प्रार्थना ऐकत नाही हे आपल्याला कशावरून कळतं?

यहोवा सगळ्याच प्रार्थना ऐकतो का? नाही. तो सगळ्याच प्रार्थना ऐकत नाही. संदेष्टा यशया याच्या काळात यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं: “तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.” (यशया १:१५) यावरून कळतं की ज्या गोष्टींची यहोवाला घृणा वाटते अशा गोष्टी जर आपण करत असू, तर तो आपल्या प्रार्थना ऐकणार नाही.

६. विश्वास असणं महत्त्वाचं का आहे? तुमच्याकडे विश्वास आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

यहोवाने आपली प्रार्थना ऐकावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. (मार्क ११:२४) “विश्वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे, कारण देवाजवळ येणाऱ्याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो,” असं प्रेषित पौलने म्हटलं. (इब्री लोकांना ११:६) ‘आमचा विश्वास आहे,’ इतकंच बोलून चालणार नाही तर आपण यहोवाच्या आज्ञांचं दररोज पालन करण्याद्वारे आपला विश्वास कार्यांतून दाखवला पाहिजे.—याकोब २:२६ वाचा.

७. (क) यहोवाला आपण आदरपूर्वक व नम्रपणे प्रार्थना का केली पाहिजे? (ख) आपण प्रामाणिकपणे आणि मनापासून प्रार्थना कशी करू शकतो?

यहोवाला आपण आदरपूर्वक व नम्रपणे प्रार्थना का केली पाहिजे? जर आपण एखाद्या राजासमोर किंवा राष्ट्रपतीसमोर उभं असलो तर आपण कसं बोलू? नक्कीच आपण आदराने बोलू. यहोवा सर्वशक्तिमान देव आहे. मग त्याच्याबरोबर बोलताना आपण आणखी आदराने व नम्रपणे बोलू नये का? (उत्पत्ति १७:१; स्तोत्र १३८:६) आपण प्रामाणिकपणे आणि मनापासून प्रार्थना केली पाहिजे. तसंच, आपण कुठल्याही प्रार्थना पुस्तकातून, न समजणाऱ्या भाषेतून, किंवा तेच-तेच शब्द वापरून प्रार्थना करणं टाळलं पाहिजे.—मत्तय ६:७, ८.

८. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्यासोबत काय करणं गरजेचं आहे?

आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असू तर त्यानुसार आपण कार्यदेखील केलं पाहिजे. जसं की, आपण जर यहोवाकडे आपल्या रोजच्या गरजांसाठी प्रार्थना करत असू तर आपल्याला आळस सोडावा लागेल. तसंच, आपल्याकडे काम करण्याची ताकद असेल तर, यहोवा आपल्याला सर्वकाही देईल अशी अपेक्षा करून चालणार नाही. आपण मेहनत करून मिळेल ते काम स्वीकारलं पाहिजे. (मत्तय ६:११; २ थेस्सलनीकाकर ३:१०) किंवा आपण एखादी चुकीची सवय सोडण्यासाठी प्रार्थना करत असू तर आपण अशी परिस्थिती टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू ज्यामुळे आपल्याला ती गोष्ट करण्याचा मोह होऊ शकतो. (कलस्सैकर ३:५) आता आपण प्रार्थनेविषयी सहसा मनात येणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करू या.

प्रार्थनेविषयी सहसा मनात येणारे प्रश्न

९. आपण कोणाला प्रार्थना केली पाहिजे? योहान १४:६ या वचनावरून आपण प्रार्थनेविषयी काय शिकतो?

आपण कोणाला प्रार्थना केली पाहिजे? येशूने असं शिकवलं, की आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याला प्रार्थना केली पाहिजे. (मत्तय ६:९) त्याने असंही म्हटलं: “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही.” (योहान १४:६) म्हणजे आपण, यहोवालाच प्रार्थना केली पाहिजे आणि ती प्रार्थना येशूच्या नावाने केली पाहिजे. पण येशूच्या नावाने प्रार्थना करणं म्हणजे काय? म्हणजे, यहोवाने आपली प्रार्थना स्वीकारण्यासाठी आपण त्याने येशूला दिलेल्या खास अधिकाराबद्दल आदर दाखवला पाहिजे. आपण आधीच्या अध्यायात शिकलो की, पाप आणि मृत्यू यांपासून आपली सुटका करण्यासाठी येशू पृथ्वीवर आला होता. (योहान ३:१६; रोमकर ५:१२) तसंच, यहोवाने येशूला महायाजक व न्यायाधीश नियुक्त केल्यामुळे तो आपल्याला अपराधांपासून व पापांपासून क्षमा मिळवून देऊ शकतो.—योहान ५:२२; इब्री लोकांना ६:२०.

तुम्ही कधीही यहोवाला प्रार्थना करू शकता

१०. प्रार्थना करताना आपण एका विशिष्ट स्थितीत असणं गरजेचं आहे का? समजावून सांगा.

१० प्रार्थना करताना आपण एका विशिष्ट स्थितीत असणं गरजेचं आहे का? नाही. आपण गुडघे टेकून, बसून किंवा उभं राहून प्रार्थना करावी, असं यहोवा आपल्याला सांगत नाही. बायबलमध्ये सांगितलं आहे की आपण कुठल्याही आदरणीय स्थितीत यहोवाशी बोलू शकतो. (१ इतिहास १७:१६; नहेम्या ८:६; दानीएल ६:१०; मार्क ११:२५) प्रार्थना करताना आपण कुठल्या स्थितीत आहोत याकडे यहोवा लक्ष देत नाही तर प्रार्थना करताना आपली मनोवृत्ती कशी आहे, हे तो पाहतो. आपण मोठ्याने, मनातल्या-मनात, रात्र असो वा दिवस, कुठेही किंवा कधीही प्रार्थना करू शकतो. आपण जेव्हा मनातल्या-मनात प्रार्थना करतो तेव्हा इतरांना ती ऐकू येत नसली तरी, यहोवाला ती ऐकू येते हा भरवसा आपण बाळगू शकतो.—नहेम्या २:१-६.

११. कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो?

११ आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो? यहोवाला मान्य असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपण त्याला प्रार्थना करू शकतो. “त्याच्या इच्छेनुसार असलेले काहीही आपण मागितले तरी तो आपले ऐकतो,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (१ योहान ५:१४) आपल्या खासगी गोष्टींबद्दल आपण प्रार्थना करू शकतो का? हो, करू शकतो. आपल्या अगदी जवळच्या मित्राशी जसं आपण मनमोकळेपणाने बोलतो तसंच यहोवा पुढे आपण आपलं मन प्रार्थनेत मोकळं करू शकतो. (स्तोत्र ६२:८) योग्य गोष्टी करण्याची शक्ती मिळावी म्हणून आपण त्याच्याकडे पवित्र आत्मा मागू शकतो. (लूक ११:१३) ‘योग्य निर्णय घेता यावेत म्हणून मला बुद्धी दे, जीवनातल्या कठीण समस्यांना तोंड देण्यासाठी मला बळ दे’, अशी आपण त्याला प्रार्थना करू शकतो. (याकोब १:५) आपण आपल्या पापांच्या क्षमेसाठी त्याला प्रार्थना करू शकतो. (इफिसकर १:३, ७) कुटुंबातल्या सदस्यांसाठी, मंडळीतल्या बांधवांसाठी आणि इतरांसाठीदेखील आपण प्रार्थना केली पाहिजे.—प्रेषितांची कार्ये १२:५; कलस्सैकर ४:१२.

१२. प्रार्थना करताना आपण कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे?

१२ प्रार्थना करताना आपण कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे? प्रार्थना करताना आपण यहोवा आणि त्याची इच्छा यांना सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपण मनापासून त्याचे आभार मानले पाहिजेत. (१ इतिहास २९:१०-१३) पृथ्वीवर असताना येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करायची हे शिकवलं तेव्हा त्याने याच गोष्टीवर जोर दिला. (मत्तय ६:९-१३ वाचा.) त्याने म्हटलं, की सर्वात आधी आपण देवाचं नाव पवित्र होण्याविषयी प्रार्थना केली पाहिजे. मग, येशूने सांगितलं की आपण देवाचं राज्य येण्यासाठी आणि त्याची इच्छा संपूर्ण पृथ्वीवर पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना केली पाहिजे. या महत्त्वाच्या गोष्टींनंतर आपण आपल्या गरजांविषयी प्रार्थना करू शकतो. प्रार्थनेत जेव्हा आपण यहोवा आणि त्याची इच्छा यांना महत्त्व देतो तेव्हा आपण दाखवून देतो, की आपल्यालासुद्धा याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

१३. आपली प्रार्थना किती मोठी असली पाहिजे?

१३ आपली प्रार्थना किती मोठी असली पाहिजे? याबद्दल बायबल काही सांगत नाही. परिस्थितीनुसार आपण एकतर लहान किंवा मोठी प्रार्थना करू शकतो. जसं की, जेवणाआधी आपण कदाचित छोटीशी प्रार्थना करू. पण, यहोवाचे आभार मानायचे असतात किंवा आपल्या चिंतांबद्दल त्याला सांगायचं असतं तेव्हा मात्र आपण मोठी प्रार्थना करू शकतो. (१ शमुवेल १:१२, १५) येशूच्या काळातले काही लोक, इतरांवर छाप पाडण्यासाठी लांबलचक प्रार्थना करायचे. आपण तसं करणार नाही. (लूक २०:४६, ४७) कारण अशा प्रार्थना ऐकून यहोवा प्रभावित होत नाही, तर आपण करत असलेली प्रार्थना मनापासून आहे की नाही, हे तो पाहतो.

१४. आपण किती वेळा प्रार्थना केली पाहिजे? यावरून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?

१४ आपण किती वेळा प्रार्थना केली पाहिजे? आपण यहोवाला नेहमी प्रार्थना करावी, अशी तो अपेक्षा करतो. बायबलमध्ये बऱ्याच वेळा असं म्हटलं आहे की तुम्ही “प्रार्थना करत राहा.” (मत्तय २६:४१; रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१७) यहोवा आपली प्रार्थना ऐकायला नेहमी तयार असतो. तो दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल आणि उदारतेबद्दल आपण त्याला दररोज धन्यवाद देऊ शकतो. मार्गदर्शन, बळ आणि सांत्वन मिळण्यासाठी आपण त्याला प्रार्थना करू शकतो. यहोवाबरोबर बोलण्याचा आपल्याला किती मोठा बहुमान मिळाला आहे, याची जर आपल्याला जाणीव असेल तर आपण त्याच्याशी बोलण्याची कोणतीही संधी सोडणार नाही.

१५. प्रार्थनेच्या शेवटी आपण “आमेन” का म्हटलं पाहिजे?

१५ प्रार्थनेच्या शेवटी आपण “आमेन” का म्हटलं पाहिजे? “आमेन” या शब्दाचा अर्थ, “असंच होऊ दे” असा होतो. प्रार्थनेत आपण जे काही म्हटलं ते खरंच मनापासून होतं, हे दाखवण्यासाठी आपण आमेन म्हणतो. (स्तोत्र ४१:१३) सार्वजनिक प्रार्थनेच्या वेळी, प्रार्थना करणाऱ्याने जे काही म्हटलं त्याच्याशी आपण सहमत आहोत हे दाखवण्यासाठी एकतर मोठ्याने किंवा मनातल्या मनात “आमेन” म्हणणं योग्य आहे, असं बायबलमध्ये सांगितलं आहे.—१ इतिहास १६:३६; १ करिंथकर १४:१६.

यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?

१६. यहोवा खरंच आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो का? समजावून सांगा.

१६ यहोवा खरंच आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो का? हो नक्की देतो. “तू . . . प्रार्थना ऐकतोस,” असं बायबलमध्ये त्याच्याविषयी म्हटलं आहे. (स्तोत्र ६५:२) कोट्यवधी लोकांच्या प्रार्थना यहोवा देव ऐकतो आणि वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचं उत्तर देतो.

१७. प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी यहोवा देवदूतांचा किंवा पृथ्वीवरच्या त्याच्या सेवकांचा उपयोग कसा करतो?

१७ आपल्या प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी यहोवा त्याच्या देवदूतांचा किंवा पृथ्वीवरच्या त्याच्या सेवकांचा उपयोग करतो. (इब्री लोकांना १:१३, १४) जसं की, बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टी समजण्यास मदत मिळावी म्हणून लोकांनी प्रार्थना केल्यानंतर काही वेळातच यहोवाचे साक्षीदार त्यांच्या घरी गेल्याची कित्येक उदाहरणं आहेत. या अनुभवांवरून सिद्ध होतं की, “सर्वकाळाचा आनंदाचा संदेश” सांगण्याचं काम देवदूतांच्या मार्गदर्शनाने चालवलं जात आहे. (प्रकटीकरण १४:६ वाचा.) तसंच, आपल्यातले कितीतरी जण, काही विशिष्ट समस्येविषयी किंवा गरजेविषयी यहोवाला प्रार्थना करतात तेव्हा त्यांना एखाद्या ख्रिस्ती बांधवाकडून किंवा बहिणीकडून हवी ती मदत मिळते.—नीतिसूत्रे १२:२५; याकोब २:१६.

यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर इतर बांधवांच्या मदतीद्वारे करू शकतो

१८. आपल्या प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी यहोवा त्याचा पवित्र आत्मा आणि बायबल यांचा उपयोग कसा करतो?

१८ प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याचादेखील उपयोग करतो. एखाद्या समस्येला तोंड देण्यासाठी आपण यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी किंवा त्या समस्येला तोंड देण्यासाठी पवित्र आत्म्याचा उपयोग करतो. (२ करिंथकर ४:७) यहोवा बायबलचा उपयोग करूनदेखील आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत करतो. बायबलचं वाचन करताना आपल्याला अशी वचनं सापडतील ज्यांमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. यहोवा कधीकधी सभेतल्या एखाद्या बांधवाला अथवा बहिणीला असं उत्तर देण्याची प्रेरणा देईल ज्यामुळे आपल्याला उत्तेजन मिळेल. किंवा, तो मंडळीतल्या एखाद्या वडिलांना बायबलमधून असा मुद्दा सांगण्याची प्रेरणा देईल ज्यातून आपल्याला मदत होईल.—गलतीकर ६:१.

१९. यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही असं आपल्याला का वाटू शकतं?

१९ पण कधीकधी आपल्याला वाटेल, ‘माझ्या प्रार्थनेचं उत्तर यहोवाने अजूनपर्यंत का दिलं नाही?’ आपल्या प्रार्थनांचं उत्तर केव्हा आणि कसं द्यायचं, हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तसंच, आपल्याला कशाची गरज आहे हेही तो जाणतो. तसंच, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कदाचित सतत प्रार्थना करावी लागेल आणि आपला त्याच्यावर खरोखर भरवसा आहे हे दाखवून द्यावं लागेल. (लूक ११:५-१०) काही वेळा यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर अशा प्रकारे देईल ज्याची आपण अपेक्षाही केली नसेल. उदाहरणार्थ, आपण एखादी कठीण समस्या काढून टाकण्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करू, पण ती काढून टाकण्याऐवजी तो आपल्याला त्या परिस्थितीत टिकून राहण्याचं बळ देईल.—फिलिप्पैकर ४:१३ वाचा.

२०. आपण यहोवाला नेहमी प्रार्थना का केली पाहिजे?

२० प्रार्थनेद्वारे यहोवाबरोबर बोलण्याचा आपल्याला खरोखरच एक मोठा बहुमान मिळाला आहे! तो आपली प्रार्थना नक्की ऐकेल, अशी आपण खातरी बाळगू शकतो. (स्तोत्र १४५:१८) आपण यहोवाला जितकी मनापासून प्रार्थना करू, तितकी त्याच्याबरोबरची आपली मैत्री आणखी घनिष्ठ होईल.