व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १

सृष्टिकर्ता मानवासाठी एक नंदनवन बनवतो

सृष्टिकर्ता मानवासाठी एक नंदनवन बनवतो

देव भौतिक विश्‍वाची आणि पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती करतो; तो एका परिपूर्ण मनुष्याची व स्त्रीची निर्मिती करून त्यांना एका सुंदर बागेत ठेवतो आणि काही आज्ञा देतो

“प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” (उत्पत्ति १:१) बायबलचे सुरुवातीचे हे शब्द इतर कोणत्याही पुस्तकाच्या सुरुवातीच्या शब्दांच्या तुलनेत सर्वात प्रसिद्ध आहेत असे म्हटले जाते. या साध्याच पण जोरदार वाक्याने बायबल आपल्याला पवित्र शास्त्रातील सर्वात प्रमुख व्यक्‍तिमत्त्व असलेल्या सर्वशक्‍तिमान यहोवा देवाची ओळख करून देते. देव या अफाट भौतिक विश्‍वाचा—ज्यात आपल्या पृथ्वी ग्रहाचाही समावेश होतो—निर्माणकर्ता आहे हे बायबलमधील या पहिल्या वचनातून प्रकट होते. पुढील वचनांत स्पष्ट केले आहे की यानंतर अनेक दीर्घ कालावधींदरम्यान, ज्यांना लाक्षणिक रीत्या दिवस म्हटले आहे, देवाने ही पृथ्वी मानवांना राहण्याजोगी बनवली व निसर्गातील सर्व अद्‌भुत गोष्टी अस्तित्वात आणल्या.

देवाने पृथ्वीवर जे काही बनवले होते त्या सर्वांमध्ये मनुष्य हा सर्वश्रेष्ठ होता. मनुष्याला देवाच्या स्वरूपात बनवण्यात आले होते, म्हणजेच तो प्रीती व बुद्धी यांसारखे यहोवाचे गुण प्रदर्शित करू शकत होता. देवाने मनुष्याला मातीपासून बनवले व त्याला आदाम हे नाव दिले. देवाने त्याला एका नंदनवनात—एदेनच्या बागेत ठेवले. असंख्य फलदायी व सुंदर झाडे असलेली ती बाग देवाने स्वतः लावली होती.

मनुष्याला एक साथीदार असणे आवश्‍यक आहे हे देवाने पाहिले. देवाने आदामाच्या एका फासळीचा उपयोग करून स्त्री बनवली व आदामाची पत्नी होण्यासाठी तिला त्याच्याकडे आणले. नंतर त्या स्त्रीला हव्वा हे नाव देण्यात आले. तिला पाहून आदाम इतका भारावून गेला की त्याने कवितेच्या रूपात आपल्या भावना व्यक्‍त केल्या: “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे.” देवाने स्पष्ट केले: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.”—उत्पत्ति २:२२-२४; ३:२०.

देवाने आदाम व हव्वा यांना दोन आज्ञा दिल्या. पहिली, देवाने त्यांना पृथ्वीची मशागत करण्यास व काळजी घेण्यास आणि कालांतराने आपल्या मुलांद्वारे संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकण्यास सांगितले. दुसरी, त्याने त्यांस त्या विशाल बागेतील केवळ एका झाडाचे म्हणजे “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे” फळ खाऊ नये म्हणून सांगितले. (उत्पत्ति २:१७) आज्ञेचे उल्लंघन केल्यास ते मरणार होते. या आज्ञांद्वारे, आपण देवाचे आधिपत्य स्वीकारतो हे दाखवण्याची संधी तो मनुष्याला व स्त्रीला देत होता. ते आज्ञाधारक राहिल्यास त्यातून त्यांचे प्रेम व कृतज्ञता दिसून आली असती. त्याच्या प्रेमळ शासनाचा स्वीकार करणे सर्व दृष्टींनी त्यांच्या हिताचे होते. त्या परिपूर्ण मनुष्यांमध्ये कोणतीच उणीव नव्हती. बायबल आपल्याला असे सांगते: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ति १:३१.

उत्पत्ति १ व अध्यायांवर आधारित.