व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १०

शलमोन सुज्ञतेने राज्यकारभार चालवतो

शलमोन सुज्ञतेने राज्यकारभार चालवतो

यहोवा शलमोन राजाला बुद्धी व विवेकी मन देतो; शलमोनाच्या कारकिर्दीत इस्राएल लोक अतुलनीय शांती व समृद्धी उपभोगतात

एका सबंध राष्ट्राने व त्याच्या राजाने यहोवाला आपला सर्वोच्च अधिपती मानून त्याच्या कायद्यांचे पालन केल्यास काय परिणाम घडून येईल? शलमोन राजाच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास या प्रश्‍नाचे उत्तर मिळते.

दाविदाचा मृत्यू होण्याअगोदर त्याने आपला पुत्र शलमोन याला आपला वारसदार म्हणून नेमले. देवाने स्वप्नात शलमोनाला वर मागण्यास सांगितले. शलमोनाने योग्यपणे व सुज्ञतेने लोकांचा न्याय करण्यासाठी देवाकडे बुद्धी व ज्ञान मागितले. शलमोनाची ही विनंती ऐकून यहोवाचे मन आनंदित झाले आणि त्याने शलमोनाला बुद्धीमान व विवेकी अंतःकरण दिले. तसेच, तो यहोवाच्या आज्ञा पाळत राहिल्यास धनसंपत्ती, वैभव आणि दीर्घायुष्यही त्याला लाभेल असे आश्‍वासन यहोवाने दिले.

शलमोन सुज्ञतेने न्याय करत असल्यामुळे त्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पोचली. एकदा, एका लहान बाळावरून दोन स्त्रियांचे भांडण झाले. दोघीही त्या बाळाची आई असल्याचा दावा करत होत्या. शलमोनाने बाळाचे दोन तुकडे करून प्रत्येकीला एकेक तुकडा देण्याचा हुकूम दिला. पहिली स्त्री याला तयार झाली, पण बाळाची खरी आई मात्र गयावया करू लागली आणि बाळ त्या दुसऱ्‍या स्त्रीला द्या अशी तिने विनंती केली. ज्या स्त्रीचा जीव आपल्या बाळासाठी कळवळला तीच त्याची खरी आई असल्याची शलमोनाला खातरी पटली आणि त्याने तिचे बाळ तिच्या स्वाधीन केले. शलमोनाने दिलेल्या या सूज्ञ निर्णयाची खबर लवकरच सबंध इस्राएल राष्ट्रात पसरली आणि शलमोनाजवळ खरोखरच देवाची बुद्धी असल्याचे लोकांनी ओळखले.

शलमोनाने जेरूसलेममध्ये यहोवासाठी एक भव्य मंदिर उभारले. हे त्याच्या कार्यांपैकी सर्वात महान कार्य होते. हे मंदिर इस्राएल राष्ट्रात यहोवाच्या उपासनेचे केंद्रस्थान असणार होते. मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी केलेल्या प्रार्थनेत शलमोनाने देवाला म्हटले: “आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा?”—१ राजे ८:२७.

शलमोनाची ख्याती देशोदेशी, अगदी दूरवरच्या अरेबियातील शबा इथपर्यंत पसरली. शबाची राणी शलमोनाचे ऐश्‍वर्य पाहण्यासाठी आणि त्याच्या बुद्धिमत्तेची पारख करण्यासाठी दूरचा प्रवास करून आली. शलमोनाची बुद्धिमत्ता व इस्राएल राष्ट्राचे वैभव पाहून ती इतकी भारावून गेली की तिने अशा बुद्धिमान राजाला सिंहासनावर बसवल्याबद्दल यहोवाची स्तुती केली. खरोखर, यहोवाच्या आशीर्वादाने शलमोनाची कारकीर्द, प्राचीन इस्राएलातील सर्वात समृद्ध व शांतीपूर्ण काळ ठरला.

दुःखाची गोष्ट म्हणजे, शलमोन सातत्याने यहोवाच्या बुद्धिनुसार चालला नाही. देवाच्या आज्ञेच्या विरोधात जाऊन त्याने शेकडो स्त्रियांशी विवाह केला. त्यांपैकी अनेक स्त्रिया अन्य दैवतांच्या उपासक होत्या. हळूहळू त्याच्या बायकांनी त्याला यहोवाची उपासना करण्यापासून बहकवले व मूर्तीपूजा करायला लावले. यामुळे यहोवाने शलमोनास सांगितले की त्याच्या राज्याचा काही भाग त्याच्यापासून काढून घेतला जाईल. पण, शलमोनाचा पिता दावीद याला पूर्वी देण्यात आलेल्या प्रतिज्ञेमुळे राज्याच्या काही भागावर त्यांच्या घराण्याचा अधिकार राहील असे देवाने सांगितले. शलमोनाने यहोवाकडे पाठ फिरवली, पण यहोवा मात्र दाविदाशी केलेल्या राज्य कराराप्रती निष्ठावान राहिला.

१ राजे अध्याय १ ते ११; २ इतिहास अध्याय १ ते ९; अनुवाद १७:१७ वर आधारित.