व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५

पृथ्वीसाठी देवाचा काय संकल्प आहे?

पृथ्वीसाठी देवाचा काय संकल्प आहे?

१. देवाने पृथ्वी का निर्माण केली?

यहोवाने मानवांना राहण्यासाठी ही पृथ्वी बनवली. स्वर्गात राहण्यासाठी देवाने आधीच स्वर्गदूतांना बनवलं होतं. त्यामुळे आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याला देवाने स्वर्गात राहून आपलं कुटुंब वाढवण्यासाठी निर्माण केलं नव्हतं. (ईयोब ३८:४, ७) उलट, देवाने पहिल्या मानवाला पृथ्वीवर एदेन नावाच्या एक बागेत, म्हणजे एका सुंदर नंदनवनात ठेवलं. (उत्पत्ती २:१५-१७) यहोवाने आदाम आणि हव्वाला सांगितलं की ते आणि त्यांची मुलं पृथ्वीवर नेहमीसाठी आनंदाने राहू शकतील.—स्तोत्र ३७:२९; ११५:१६ वाचा.

सुरुवातीला नंदनवन हे फक्‍त एदेन बागेतच होतं. देवाने पहिल्या मानवी जोडप्याला आपलं कुटुंब वाढवून ही पृथ्वी भरून टाका असं सांगितलं होतं. हळूहळू त्यांना पूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवायचं होतं आणि त्याची काळजी घ्यायची होती. (उत्पत्ती १:२८) पृथ्वीचा कधीही नाश होणार नाही आणि मानव कायम या पृथ्वीवर राहतील.—स्तोत्र १०४:५ वाचा.

देवाने पृथ्वी का बनवली? हा व्हिडिओ पाहा

२. आज पृथ्वीवर नंदनवन का नाही?

आदाम आणि हव्वाने यहोवाची आज्ञा मोडली. त्यामुळे त्याने त्यांना एदेन बागेतून बाहेर काढलं. अशा रितीने मानव नंदनवन गमावून बसले. आणि त्यानंतर कोणताही मानव पृथ्वीला पुन्हा नंदनवन बनवू शकला नाही. बायबल सांगतं की पृथ्वी दुष्टांच्या हातात सोपवण्यात आली आहे.—ईयोब ९:२४.—उत्पत्ती ३:२३, २४ वाचा.

मग मानवजातीसाठी सुरुवातीला यहोवाचा जो विचार होता, तो त्याने आता बदलला आहे का? नाही. तो सर्वशक्‍तिमान आहे. तो जे ठरवतो ते कधीच पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. (यशया ४५:१८) मानवजातीला जसं जीवन द्यायची त्याची इच्छा होती, ते तो त्यांना नक्की देईल.—स्तोत्र ३७:११, ३४ वाचा.

३. ही पृथ्वी पुन्हा नंदनवन कशी बनेल?

देवाने निवडलेला राजा येशू या पृथ्वीवर राज्य करेल, तेव्हा ही पृथ्वी पुन्हा नंदनवन बनेल. पण त्याआधी एक लढाई होईल. बायबलमध्ये त्या लढाईला हर्मगिदोन म्हटलं आहे. या लढाईत येशू आणि स्वर्गदूतांचं सैन्य मिळून देवाचा विरोध करणाऱ्‍या सर्वांचा नाश करेल. त्यानंतर येशू सैतानाला १,००० वर्षांसाठी कैद करेल. पण देवाचे लोक या नाशातून बचावतील कारण येशू त्यांचं मार्गदर्शन आणि संरक्षण करेल. त्यानंतर ते पृथ्वीवरच्या नंदनवनात नेहमीसाठी आनंदाने राहतील.—प्रकटीकरण २०:१-३; २१:३, ४ वाचा.

४. सगळ्या दुःखांचा अंत कधी होईल?

देव या पृथ्वीवरच्या सगळ्या वाईट गोष्टींचा कधी अंत करेल? जगाचा अंत जवळ आला आहे हे ओळखण्यासाठी येशूने एक “चिन्ह” सांगितलं होतं. आणि आज घडत असलेल्या भयानक घटनांवरून दिसून येतं, की आपण खरोखरच जगाच्या “समाप्तीच्या” काळात जगत आहोत.—मत्तय २४:३, ७-१४, २१, २२ वाचा.

येशू स्वर्गातून या पृथ्वीवर १,००० वर्षं राज्य करेल. या काळादरम्यान तो दोन महत्त्वाच्या गोष्टी करेल. पहिली म्हणजे, एक राजा या नात्याने तो पृथ्वीवरच्या सगळ्या दुःखांचा अंत करेल. (यशया ९:६, ७; ११:९) आणि दुसरी म्हणजे देवावर प्रेम करणाऱ्‍या सगळ्या लोकांच्या पापांची तो क्षमा करेल. अशा रितीने देव येशूद्वारे आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू कायमचा काढून टाकेल.—यशया २५:८; ३३:२४ वाचा.

५. येणाऱ्‍या नंदनवनात कोण राहतील?

राज्य सभागृहात तुम्हाला असे लोक भेटतील, ज्यांचं देवावर प्रेम आहे आणि ज्यांना त्याच्याबद्दल शिकून घ्यायचं आहे

जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात तेच नंदनवनात राहतील. (१ योहान २:१७) येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, की जाऊन नम्र लोकांना शोधा आणि आपण देवाला कसं खूश करू शकतो हे त्यांना शिकवा. आज यहोवा लाखो लोकांना भविष्यात पृथ्वीवरच्या नंदनवनात राहण्यासाठी तयार करत आहे. (सफन्या २:३) यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहांमध्ये लोकांना चांगले पती-पत्नी आणि चांगले आईवडील कसं बनायचं हे शिकवलं जातं. तिथे आईवडील आणि मुलं सोबत मिळून देवाची उपासना करतात आणि भविष्यात देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे शिकतात.—मीखा ४:१-४ वाचा.