व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलमध्ये जुगाराचा निषेध करण्यात आला आहे का?

बायबलमध्ये जुगाराचा निषेध करण्यात आला आहे का?

बायबलमध्ये जुगाराचा निषेध करण्यात आला आहे का?

लोकप्रिय चित्रपटांमध्ये व टीव्ही कार्यक्रमांमध्ये, कॅसिनो (जुगाराचे अड्डे) सुंदर, धनाढ्य व उच्चभ्रू लोकांचे करमणुकीचे ठिकाण असल्याचे दाखवले जाते. अर्थात, लोकांना हे माहीत आहे की चित्रपटांमध्ये व टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये जे दाखवले जाते ते काल्पनिक असते.

तरीपण, खरोखरच्या जगात लॉटरीची तिकिटे, सामन्यांवरील पैज आणि इंटरनेटवरील जुगार, कॅसिनोंप्रमाणेच जुगाऱ्‍यांना आपल्याकडे आकर्षित करतात. जुगाराचे “वेड हे सार्वत्रिक आहे; एखाद्या वणव्यासारखे लोकांमध्ये ते पसरत आहे,” असे इंटरनेट गॅमब्लिंग नावाच्या एका पुस्तकात म्हटले आहे. जसे की, पत्त्यांचा खेळ टीव्हीवर व इंटरनेटवर सर्वसाधारण खेळ म्हणून दाखवला जातो. एका बातमीपत्रात म्हटले होते, की काही तज्ज्ञ मंडळीने अमेरिकेत पत्ते खेळणाऱ्‍यांची संख्या मोजली आणि १८ महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा ही संख्या मोजली तेव्हा त्यांना याचे प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून आले.

जुगार म्हणजे अशा गोष्टीसाठी पैसा लावणे ज्याचा मोबदला पुन्हा मिळेलच याची खात्री नसते. पुष्कळ लोकांना वाटते, की जोपर्यंत ते पैसे जुगाऱ्‍याचे असतात व त्याला याची वाईट सवय लागत नाही तोपर्यंत जुगार खेळण्यात काहीही गैर नाही. एवढेच नव्हे तर, न्यू कॅथलिक एन्सायक्लिपिडिआ यात असे म्हटले आहे, की “जुगार खेळणारी व्यक्‍ती तिच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यास हेळसांड करत नसेल तर ते पाप नाही.” पण असा निष्कर्ष काढण्यासाठी बायबलमधील कोणत्याही वचनांचा उल्लेख करण्यात आला नाही. मग जुगाराबद्दल ख्रिश्‍चनांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? बायबल जुगाराचा निषेध करते का?

बायबलमध्ये जुगाराचा कोठेही प्रत्यक्ष उल्लेख आढळत नाही, या गोष्टीची आपण नोंद घेतली पाहिजे. पण याचा अर्थ, याबाबतीत आपल्याला काहीही मार्गदर्शन नाही, असे आपण समजू नये. प्रत्येक कार्याबद्दल किंवा परिस्थितीबद्दल नियम देण्याऐवजी बायबल आपल्याला “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या” असे आर्जवते. (इफिसकर ५:१७) बायबल विद्वान ई. डब्ल्यू बुलिंगर यांच्या मते, “समजून” असे भाषांतरीत करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, ‘एखाद्या विषयावर खोलवर विचार करून ज्ञान मिळवणे’ असा होतो. एक ख्रिस्ती व्यक्‍ती, जुगाराच्या संबंधाने असलेल्या बायबल तत्त्वांना एकत्र करून त्यांवर विचार करून याबाबतीत देवाची काय इच्छा आहे हे समजून घेऊ शकते. या लेखात उल्लेखण्यात आलेली बायबल वचने जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘या वचनांत जे सांगितले आहे ते जुगार खेळण्याशी जुळते का? याबाबतीत देवाच्या वचनात त्याच्या इच्छेबद्दल काय सांगितले आहे?’

नशीबावर विश्‍वास करण्याचा धोका

जुगारात धोक्याची जाणीव असूनही लाभाच्या आशेने पैसे लावले जात असल्यामुळे, पुष्कळ लोक नशीबावर विश्‍वास ठेवतात. नशीब म्हणजे एक गूढ दैवी शक्‍ती जी अचानक घडणाऱ्‍या घटनांवर ताबा ठेवते, असा लोकांचा विश्‍वास आहे. जसे की, लॉटरी तिकिटांसाठी शुभ अंक निवडले जातात; माह-जाँग जुगार खेळणाऱ्‍यांमध्ये विशिष्ट शब्द उच्चारण्यास मनाई आहे; फास टाकला जातो तेव्हा त्यावर हवेची फुंकर मारली जाते. का केले जाते हे सर्व? नशीब म्हटली जाणारी दैवी शक्‍ती, खेळाच्या परिणामावर प्रभाव पाडेल किंवा पाडू शकते, असा जुगार खेळणाऱ्‍यांचा विश्‍वास असतो.

पण नशीबावर भरवसा ठेवला जाणारा जुगार खेळ अनपायकारक आहे का? प्राचीन इस्राएलमधील काही लोकांना असेच वाटले. नशीब म्हटली जाणारी दैवी शक्‍ती त्यांना मालामाल करू शकते, असा त्यांचा समज होता. पण यहोवा देवाला हे कसे वाटत होते? त्याने आपला संदेष्टा यशया याच्याद्वारे असे कळवले: “तुम्ही परमेश्‍वरास सोडिले; जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करीत नाही, गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार करिता, मनीसाठी (कर्मदेवतेसाठी) मिश्रित पेयाचे प्याले भरून ठेविता.” (यशया ६५:११) नशीबावर विश्‍वास ठेवणे एक प्रकारची मूर्तिपूजा आहे आणि खऱ्‍या उपासनेशी या विश्‍वासाचा मेळ बसत नाही, असा देवाचा दृष्टिकोन आहे. खऱ्‍या देवाऐवजी लोक, एका कल्पित शक्‍तीवर भरवसा ठेवतात. देवाचा हा दृष्टिकोन आजही बदललेला नाही.

बक्षिसे कशी जिंकली जातात?

इंटरनेटद्वारे पैसे लावणे असो, लॉटरीचे तिकीट विकत घेणे असो, एखाद्या खेळावर पैज लावणे असो किंवा कॅसिनोत खेळ खेळणे असो, जुगार खेळणारे सहसा, ते जे बक्षीस मिळवण्याची आशा करत असतात ते कोठून येते त्याचा मुळीच विचार करत नाहीत. जुगार हे कायदेशीर व्यवहार किंवा विकत देणे-घेणे नसते; तर, जुगार खेळणाऱ्‍या व्यक्‍तीला, इतरांनी गमावलेले पैसे जिंकायचे असतात. * “कोट्यवधी रूपयांची लॉटरी जिंकणाऱ्‍यांना कोट्यवधी रूपये हरलेल्या लोकांचे पैसे मिळत असतात!” असे कॅनडाच्या व्यसनाधीन व मानसिक आरोग्य केंद्राने म्हटले. याबाबतीत देवाला काय वाटते हे एका ख्रिस्ती व्यक्‍तीला समजायला बायबलमधील कोणती तत्त्वे मदत करू शकतात?

इस्राएल लोकांना देण्यात आलेल्या दहा आज्ञांतील शेवटली आज्ञा अशी होती: “आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्‍याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीहि वस्तु ह्‍यांचा लोभ धरू नको.” (निर्गम २०:१७) दुसऱ्‍याच्या वस्तुंचा—मग तो त्याच्या मालमत्तेचा असो, त्याच्या संपत्तीचा असो किंवा त्याच्या पैशांचा असो—लोभ धरणे हे दुसऱ्‍याच्या बायकोचा लोभ धरण्यासारखेच एक गंभीर पाप होते. अनेक शतकांनंतर, प्रेषित पौलाने हीच आज्ञा ख्रिश्‍चनांनाही दिली: ‘लोभ धरू नका.’ (रोमकर ७:७) जी व्यक्‍ती, दुसऱ्‍या व्यक्‍तीने गमावलेली गोष्ट मिळवायचा प्रयत्न करते ती लोभ धरण्याचे गंभीर पापच करत असते, नाही का?

‘जुगार खेळणारे बहुतेक लोक ही गोष्ट मान्य करोत अगर नाही, तरीपण, ते आपल्याजवळ जितका पैसा आहे, मग तो थोडा असला तरी, बक्कळ पैसा जिंकण्याचे स्वप्न आपल्या मनात रंगवून यात लावतात,’ असे जे. फिलिप वोगल नावाच्या एका स्तंभलेखकाने लिहिले. असे जुगारी, एका झटक्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू लागतात. पण अशी स्वप्ने पाहणे बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याच्या अगदी विरोधात आहे. “गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे,” असा सल्ला बायबल ख्रिश्‍चनांना देते. (इफिसकर ४:२८) आणि प्रेषित पौलाने असे स्पष्ट सांगितले, की “कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊहि नये.” त्याने पुढे म्हटले: “त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्‍न खावे.” (२ थेस्सलनीकाकर ३:१०, १२) पण मग जुगार कायद्यानुसार काम असू शकते का?

जुगार हा असा एक खेळ आहे जो एखाद्याला त्याच्या नादी लावू शकतो. जुगाऱ्‍याला मिळणारे पैसे त्याने जिंकलेले असतात; त्याने कुठले तरी काम केल्यामुळे त्याच्या मोबदल्यात मिळणारी ही कमाई नसते. जुगारात, अंधळेपणाने पैसे लावले जातात, परिणाम योगा-योगावर अवलंबून असतो, या नाही तर त्या डावात आपल्या हाती पैसे येतील अशा आशेवर जुगार खेळला जातो. थोडक्यात, जुगार खेळणारी व्यक्‍ती आयता लाभ मिळण्याची अपेक्षा करते. परंतु ख्रिश्‍चनांना, कष्ट करून पैसे मिळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. “मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीहि इष्ट नाही; हेहि देवाच्या हातून मिळते” असे राजा शलमोनाने लिहिले. (उपदेशक २:२४) होय, देवाची सेवा करणारे अशी स्वप्ने पाहत नाहीत किंवा एका रात्रीत श्रीमंत होण्याचे मार्ग शोधत नाहीत. तर आनंद व आशीर्वाद मिळण्याकरता देवावर अवलंबून राहतात.

आपण टाळला पाहिजे असा ‘पाश’

जुगार खेळणारा कसेही करून जिंकला तरी त्याने, जिंकण्याच्या क्षणिक आनंदाचा नव्हे तर जुगारामुळे होणाऱ्‍या दूरगामी परिणामांवर विचार करावा. “आरंभी उतावळीने मिळविलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही.” (नीतिसूत्रे २०:२१) लॉटरीत व जुगारात पैसे जिंकलेल्या अनेकांना नंतर पस्तावा झाला आहे; त्यांनी मिळवलेल्या पैशाने ते आनंदी झाले नाहीत, हे त्यांना नंतर समजले आहे. तेव्हा, “चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करणे किती फायदेकारक आहे!—१ तीमथ्य ६:१७.

जुगार खेळण्यात फक्‍त हरणे व जिंकणे इतकेच नसते; तर ते हानीकारक देखील असते. देवाचे वचन सांगते, “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.” (१ तीमथ्य ६:९) सावजाला धरण्यासाठी पाश रचला जातो. पुष्कळ लोक सुरुवातीला, फक्‍त थोड्याच पैशांची पैज लावतात किंवा मग, बघूया लाभ झालाच तर झाला असे समजून कधीकधीच जुगार खेळतात; पण एकदा या पाशांत अडकल्यावर त्यांना या सवयीतून बाहेर पडणे मुश्‍किल होऊन जाते. अशा पाशांत अडकलेले नोकरीधंदा गमावून बसले आहेत, त्यांचे प्रिय जन दुःखावले आहेत, त्यांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

जुगाराशी संबंधित असलेल्या बायबलमधील अनेक वचनांवर विचार केल्यावर आता तुम्हाला, जुगाराच्या बाबतीत देवाचा काय दृष्टिकोन आहे ते समजले आहे का? प्रेषित पौलाने त्याच्या बरोबरच्या ख्रिस्ती बांधवांना असे आर्जवले: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) ख्रिश्‍चनांनी, लोकांच्या म्हणण्यानुसार नव्हे तर देवाच्या इच्छेनुसार वागले पाहिजे. आणि यहोवा देव आनंदी देव आहे. जुगाराच्या पाशांत पडून दुःखद परिणाम भोगण्याऐवजी, आपण जीवनाचा आनंद लुटावा अशी त्याची इच्छा आहे.—१ तीमथ्य १:११. (w११-E ०३/०१)

[तळटीप]

^ शेअर बाजारात पैसे गुंतवणे जुगारी नाही, हे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या ऑक्टोबर ८, २००० सावध राहा! या इंग्रजी अंकात समजावून सांगण्यात आले आहे.

[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाचे सेवक ईमानदारीने काम करून पैसे कमवतात

[३१ पानांवरील चौकट]

जिंकण्याची उर्मी

एकदा जुगार खेळल्यास त्याची सवय लागून व्यसन जडू शकते का? जिंकल्यावर व हरल्यावर जुगाऱ्‍यांची काय प्रतिक्रिया असते याचा अभ्यास केल्यावर डॉ. हान्स ब्रायटर यांनी असे म्हटले: “कोकेन हा मादक पदार्थ खाल्यावर मेंदूत जी प्रक्रिया होते तशीच प्रक्रिया, पैसे मिळणार या आशेमुळे जुगाऱ्‍यांच्या मेंदूत सुरू होते.”

[३१ पानांवरील चित्र]

जुगारी खरे तर कोणाचे पैसे जिंकण्याची आशा करत असतात?