व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निवड करण्याची वेळ

निवड करण्याची वेळ

निवड करण्याची वेळ

“देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.”—उत्पत्ति १:२७.

बायबलच्या पहिल्या पुस्तकात दिलेले हे शब्द, देवाने ‘आपआपल्या समयी बनवलेल्या सुंदर’ गोष्टीकडे अर्थात आदाम आणि हव्वा या परिपूर्ण मानवी जोडप्याच्या सर्वोत्कृष्ट निर्मितीकडे लक्ष वेधतात. (उपदेशक ३:११) त्यांचा सृष्टिकर्ता या नात्याने यहोवा देवाने त्यांना म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.”—उत्पत्ति १:२८.

देवाने पहिल्या मानवी दांपत्याला जे काही म्हटले त्यातून त्याने त्यांना आपला उद्देश कळविला. त्यांनी पृथ्वीवर आपली संतती वाढवायची होती आणि पृथ्वीची देखभाल करायची होती. आपल्या व आपल्या संततीसाठी त्यांनी या पृथ्वीचे रूपांतर एका जगव्याप्त नंदनवनात करायचे होते. त्यांनी अमूक वर्षांपर्यंत जिवंत राहावे आणि अमूक वेळी मरावे असे आधीच ठरवण्यात आले नव्हते. उलट, देवाने त्यांच्यासमोर एक उज्ज्वल भवितव्य ठेवले होते. त्यांनी उचित निवड केली असती व देवाच्या उद्देशानुसार जगले असते तर ते अनंत शांतीसुखाचा उपभोग घेऊ शकले असते.

पण खेदाची गोष्ट म्हणजे त्यांनी चुकीची निवड केली. त्यामुळे सर्व मानवजातीच्या वाट्याला म्हातारपण व मृत्यू आला. कुलपिता ईयोब देखील या गोष्टीशी सहमत होता. त्याने म्हटले: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.” (ईयोब १४:१) मग पहिल्या मानवी दांपत्याचे नेमके कोठे चुकले बरे?

याचे स्पष्टीकरण बायबल असे देते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) तो ‘एक माणूस’ अर्थातच आदाम होता. देवाने त्याला दिलेल्या अगदी साध्या पण सुस्पष्ट आज्ञेचे त्याने जाणूनबुजून उल्लंघन केले. (उत्पत्ति २:१७) असे केल्यामुळे पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जीवन जगण्याची संधी आदाम स्वतःहून गमावून बसला व त्याच्या या चुकीमुळे त्याच्या संततीलाही हा बहुमोल वारसा गमवावा लागला. उलट त्याने आपल्या संततीला पाप आणि मृत्यूचा वारसा दिला. यावरून असे दिसत होते की सर्वकाही गमावले आहे. पण, खरोखरच असे होते का?

सर्व काही पुन्हा नवे करण्याची वेळ

या घटनेच्या हजारो वर्षांनंतर एका स्तोत्रकर्त्याला देवाने असे लिहिण्यास प्रेरित केले: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) एदेन बागेत दिलेले अभिवचन देव नक्कीच पूर्ण करील. तो लवकरच काय करणार आहे याचे सुरेख वर्णन त्याने आपल्या वचनात केले आहे: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” मग देव स्वतः असे म्हणतो: “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.”—प्रकटीकरण २१:४, ५.

प्रत्येक गोष्ट करण्याची एक नियुक्‍त वेळ असते. तेव्हा, साहाजिकच हा प्रश्‍न निर्माण होतो, की देवाने दिलेले उत्कृष्ट अभिवचन पूर्ण व्हावे म्हणून सर्व काही पुन्हा नवीन करण्याचा समय केव्हा येईल? आपण बायबलमध्ये सांगितलेल्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत व “सर्व गोष्टी नवीन” करण्याचा देवाचा तो समय अगदी जवळ आहे याची जाणीव, या नियतकालिकाचे प्रकाशक अर्थात यहोवाचे साक्षीदार लोकांना करून देत आहेत. (२ तीमथ्य ३:१) तेव्हा, तुम्हीही बायबलचे परीक्षण करावे आणि त्यात तुमच्यासाठी दिलेल्या सुंदर आशेविषयी जाणून घ्यावे अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो. तसेच, “परमेश्‍वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा,” हे आमंत्रण स्वीकारण्याची विनंतीही आम्ही तुम्हाला करतो. (यशया ५५:६) तुमचे जीवन व तुमचे भवितव्य नशिबाच्या नव्हे तर तुमच्या हातात आहे! (w०९ ३/१)

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो”