व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘येताना पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण’

‘येताना पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण’

‘येताना पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण’

वरील शब्दांत, प्रेषित पौलाने आपल्या सहमिशनरी सेवकाला अर्थात तीमथ्याला आपल्यासाठी काही लिखित साहित्य आणण्याची विनंती केली. पौल कोणत्या पुस्तकांविषयी व चर्मपत्रांविषयी बोलत होता? त्याने ही विनंती का केली? त्याच्या या विनंतीवरून आपण काय शिकू शकतो?

इ.स. पहिल्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे पौलाने हे शब्द लिहिले तोपर्यंत इब्री शास्त्रवचनांतील ३९ पुस्तकांची एकतर २२ अथवा २४ पुस्तकांमध्ये विभागणी झाली होती; आणि यांपैकी बहुतेक पुस्तके वेगवेगळ्या गुंडाळ्यांच्या स्वरूपात होते. प्राध्यापक ॲलन मीलअर्ड यांनी असे म्हटले, की या गुंडाळ्या महाग असल्या, तरी ‘त्या श्रीमंत लोकांना परवडण्यासारख्या होत्या.’ काही लोकांजवळ कमीत कमी एक तरी गुंडाळी असायची. उदाहरणार्थ, एक कुशी षंढ आपल्या रथात बसून “यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता.” हा कुशी षंढ “कुशी लोकांची राणी कांदके, हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते.” ज्याअर्थी शास्त्रवचनांचा काही भाग त्याच्याजवळ होता, त्याअर्थी तो बऱ्‍यापैकी श्रीमंत असावा.—प्रे. कृत्ये ८:२७, २८.

पौलाने तीमथ्याला जी विनंती केली त्यात त्याने असे लिहिले: “माझा झगा त्रोवसांत कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये, आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेहि आण.” (२ तीम. ४:१३) यावरून पौलाजवळ अनेक पुस्तके होती हे सूचित होते. त्याच्याजवळ असलेल्या अनेक पुस्तकांपैकी देवाचे वचन हे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे होते. २ तीमथ्य ४:१३ यात उल्लेखिलेल्या ‘चर्मपत्रे’ या शब्दाविषयी बायबल विद्वान ए. टी. रॉबर्टसन यांनी असे निरीक्षण केले: “चर्मपत्र हे पपायरसपेक्षा अधिक महाग [व टिकाऊ] असल्यामुळे पौलाने उल्लेखिलेली चर्मपत्रे खासकरून जुन्या करारातील पुस्तकांच्या प्रती असण्याची शक्यता आहे.” पौल तरुण होता तेव्हापासून त्याला ‘गमलिएलाच्या चरणांजवळ शिक्षण मिळाले’ होते, जो मोशेच्या नियमशास्त्राचा शिक्षक व सर्व लोकांमध्ये प्रतिष्ठित होता. तेव्हा, पौलाने देवाच्या वचनाच्या आपल्या स्वतःच्या प्रती मिळवल्या असतील हे समजण्याजोगे आहे.—प्रे. कृत्ये ५:३४; २२:३.

ख्रिश्‍चनांनी गुंडाळ्यांचा कसा उपयोग केला?

पण, केवळ काही मोजक्याच लोकांजवळ पवित्र शास्त्राच्या गुंडाळ्या होत्या. तर मग, त्या काळी बहुतेक ख्रिश्‍चनांना देवाचे वचन ऐकणे व त्याचे वाचन करणे कसे शक्य झाले? याचे उत्तर, पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या आधीच्या पत्रावरून आपल्याला मिळू शकते. त्याने लिहिले: “मी येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन, उपदेश करणे व शिकवणे याकडे लक्ष दे.” (१ तीम. ४:१३, मराठी कॉमन लँग्वेज बायबल) सार्वजनिक वाचन हे ख्रिस्ती मंडळ्यांमधील सभांच्या कार्यक्रमाचा एक भाग असून ही परंपरा मोशेच्या काळापासून देवाच्या लोकांमध्ये अस्तित्वात होती.—प्रे. कृत्ये १३:१५; १५:२१; २ करिंथ. ३:१५.

एक ख्रिस्ती वडील या नात्याने तीमथ्याला देवाचे वचन मोठ्याने वाचायचे होते, कारण ज्यांच्याजवळ शास्त्रवचनांची आपली स्वतःची प्रत नव्हती अशांना त्या वाचनाचा फायदा होणार होता. देवाच्या वचनाचे सार्वजनिक वाचन केले जायचे तेव्हा त्यातील एकही शब्द चुकवू नये म्हणून सर्वांनी नक्कीच खूप लक्षपूर्वक ऐकले असावे आणि सभांमध्ये जे काही वाचण्यात आले होते त्याची घरी परतल्यावर पालक व मुले यांनी चर्चा केली असावी.

मृत समुद्राजवळ सापडलेली यशयाची सुप्रसिद्ध गुंडाळी (डेड सी स्क्रोल ऑफ आयझाया) जवळजवळ २४ फूट (७.३ मीटर) लांब आहे. सहसा एक गुंडाळी खूप जड असायची. कारण गुंडाळीच्या दोन्ही बाजूंना एकेक दांडा असायचा व त्यावर सहसा एक संरक्षक आवरण असायचे. बहुतेक ख्रिश्‍चनांना अनेक गुंडाळ्या प्रचार कार्याला घेऊन जाणे बहुधा शक्य नव्हते. पौलाजवळ त्याच्या वैयक्‍तिक उपयोगासाठी शास्त्रवचनांच्या काही गुंडाळ्या असल्या, तरी प्रवासात सर्वच गुंडाळ्या घेऊन जाणे कदाचित त्याला शक्य नव्हते. त्यामुळेच त्याने त्रोवसातील आपला मित्र कार्प याच्याजवळ आपल्या काही गुंडाळ्या ठेवल्या असाव्यात.

पौलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

तीमथ्याला केलेल्या विनंतीच्या थोड्याच काळाआधी पौल रोममध्ये दुसऱ्‍यांदा तुरुंगवासात होता. त्या वेळी त्याने असे लिहिले: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, . . . आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे.” (२ तीम. ४:७, ८) पौलाने हे शब्द, बहुधा इ.स. ६५ मध्ये, म्हणजे रोमी सम्राट नीरो याने ख्रिश्‍चनांचा छळ केला त्या काळादरम्यान लिहिले होते. या वेळी पौलाला ठोठावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा खूप कडक होती. किंबहुना, लवकरच आपल्याला मृत्यूदंड दिला जाईल याची त्याला जाणीव झाली होती. (२ तीम. १:१६; ४:६) त्यामुळे, पौलाने आपल्या गुंडाळ्या जवळ बाळगण्याची मनस्वी इच्छा का व्यक्‍त केली हे आपण समजू शकतो. पौलाला याची पूर्ण खातरी होती, की त्याने आपले सुयुद्ध संपवले आहे. तरीसुद्धा, देवाच्या वचनाचा अभ्यास करून स्वतःला बळकट करत राहण्याची त्याची तीव्र इच्छा होती.

पौलाने तीमथ्याला गुंडाळ्या व चर्मपत्रे आणण्याची विनंती केली तेव्हा तीमथ्य बहुधा इफिसमध्येच होता. (१ तीम. १:३) त्रोवसमार्गे इफिस ते रोमचा प्रवास साधारणतः १,६०० किलोमीटरचा होता. पौलाने त्याच पत्रात तीमथ्याला असे आर्जवले: “होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये.” (२ तीम. ४:२१) पौलाने सांगितल्याप्रमाणे हिवाळ्यापूर्वी रोमला जाण्यासाठी तीमथ्याला बोट मिळाली की नाही याविषयी बायबल आपल्याला सांगत नाही.

पौलाने, ‘पुस्तके आणि विशेषेकरून चर्मपत्रे आणण्याची’ जी विनंती केली त्यावरून आपण काय शिकू शकतो? पौलाने आपल्या जीवनातील या सगळ्यात खडतर काळात देवाच्या वचनाची लालसा बाळगली. यामुळेच तो आध्यात्मिक रीत्या नेहमी जागरूक व उत्साही होता व अनेकांसाठी उत्तेजनाचा स्रोत ठरला.

आज आपल्याजवळ संपूर्ण बायबलची आपली स्वतःची प्रत असल्यास आपण नक्कीच खूप धन्य आहोत. आपल्यापैकी काहींजवळ तर बायबलच्या अनेक प्रती व आवृत्त्याही आहेत. पौलाप्रमाणे, शास्त्रवचनांची गहन समज प्राप्त करण्यासाठी आपण लालसा विकसित केली पाहिजे. पौलाला १४ ईश्‍वरप्रेरित पत्रे लिहिण्याचा विशेषाधिकार लाभला. त्यांपैकी तीमथ्याला लिहिलेले दुसरे पत्र हे त्याचे शेवटचे पत्र होते. त्याने स्वतःसाठी केलेली विनंती त्या पुस्तकाच्या शेवटी आढळते. किंबहुना, ‘येताना पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण,’ ही पौलाने केलेली विनंती, बायबलमध्ये नमूद असलेली त्याची शेवटची इच्छा होती.

पौलाप्रमाणेच, शेवटपर्यंत विश्‍वासाचे सुयुद्ध लढण्याची तुमचीही मनस्वी इच्छा आहे का? तुम्ही उत्साहाने यहोवाची सेवा करू इच्छिता का, व प्रभूची इच्छा आहे तोपर्यंत साक्ष देण्याच्या कार्यात सहभाग घेण्यास सज्ज होऊ इच्छिता का? मग, पौलाने ख्रिश्‍चनांना जे करण्याचे प्रोत्साहन दिले ते तुम्ही करू शकता. त्याने म्हटले: ‘आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवा.’ तुम्हाला हे कसे करता येईल? आज बायबल, पूर्वी कधी नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; तसेच, ते वापरण्यासही गुंडाळ्यांपेक्षा कितीतरी सहजसोपे आहे. तेव्हा, बायबलचा उत्साहाने व नियमितपणे अभ्यास करा.—१ तीम. ४:१६.

[१८, १९ पानांवरील नकाशा/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

इफिस

त्रोवस

रोम