व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता देवाने केलेली व्यवस्था

आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता देवाने केलेली व्यवस्था

आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता देवाने केलेली व्यवस्था

“आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे [देव] अवघे चालवितो.”—इफिसकर १:११.

१. एप्रिल १२, २००६ रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व मंडळ्या कशासाठी एकत्र येतील?

 बुधवार एप्रिल १२, २००६ रोजी संध्याकाळी जवळजवळ १.६ कोटी लोक प्रभूच्या सांज भोजनाकरता एकत्र येतील. हे लोक एकत्र येतील त्या प्रत्येक सभागृहात एक मेज ठेवलेला असेल व त्यावर ख्रिस्ताच्या शरीराचे प्रतीक असलेली बेखमीरी भाकरी, व त्याने वाहिलेल्या रक्‍ताचे प्रतीक असणारा तांबडा द्राक्षारस ठेवलेला असेल. या कार्यक्रमात येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीचा अर्थ समजावण्याकरता एक भाषण दिले जाईल व भाषणाच्या शेवटी सर्व उपस्थितांमध्ये प्रथम भाकरी व नंतर द्राक्षारस फिरवला जाईल. यहोवाच्या साक्षीदारांच्या मोजक्याच मंडळ्यांमध्ये, उपस्थितांमधून एक किंवा अनेक जण प्रतिकात्मक भाकरी खातील व द्राक्षारस पितील. बहुतेक ठिकाणी उपस्थितांमधून कोणीही खाणार किंवा पिणार नाही. स्वर्गातील जीवनाची आशा असणारे केवळ थोडकेच ख्रिस्ती प्रतिकात्मक भाकरी खातात व द्राक्षारस पितात पण पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असणारे बहुतेकजण तसे करत नाहीत असे का?

२, ३. (क) आपल्या उद्देशानुसार यहोवाने कशाप्रकारे सृष्टी केली? (ख) यहोवाने पृथ्वीची व मानवजातीची सृष्टी कोणत्या उद्देशाने केली?

यहोवा उद्देश बाळगून कार्य करणारा देव आहे. त्याच्या उद्देशाच्या पूर्णतेकरता “आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे तो अवघे चालवितो.” (इफिसकर १:११) त्याने सर्वप्रथम आपल्या एकुलत्या एक पुत्राची सृष्टी केली. (योहान १:१, १४; प्रकटीकरण ३:१४) मग आपल्या पुत्राच्या द्वारे यहोवाने प्रथम, आत्मिक पुत्रांचे कुटुंब व नंतर भौतिक विश्‍व व त्यात पृथ्वी व पृथ्वीवर राहण्याकरता मनुष्यही निर्माण केला.—ईयोब ३८:४, ७; स्तोत्र १०३:१९-२१; योहान १:२, ३; कलस्सैकर १:१५, १६.

ख्रिस्ती धर्मजगताच्या बऱ्‍याच चर्चेसमध्ये शिकवले जाते की देवाने मनुष्याला कसोटीस उतरवण्याकरता पृथ्वी निर्माण केली होती; जे कसोटीस खरे उतरतील त्या मानवांना तो स्वर्गात नेतो व आपल्या आत्मिक पुत्रांचे कुटुंब वाढवतो असे ते शिकवतात. पण यहोवाने यासाठी पृथ्वीची सृष्टी केली नव्हती. त्याने एका निश्‍चित उद्देशाकरता अर्थात “तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून” तिची सृष्टी केली. (यशया ४५:१८) देवाने मानवाकरता पृथ्वीची व पृथ्वीकरता मानवाची सृष्टी केली. (स्तोत्र ११५:१६) सबंध पृथ्वी एखाद्या रम्य बागेसारखी व्हावी, नीतिमान मानवांनी ती भरून जावी व त्यांनी या पृथ्वीची मशागत व देखरेख करावी असा देवाचा उद्देश होता. पृथ्वीवरील जीवन संपल्यावर स्वर्गात जाण्याची आशा देवाने पहिल्या मानवी जोडप्यासमोर कधीही ठेवली नाही.—उत्पत्ति १:२६-२८; २:७, ८, १५.

यहोवाच्या उद्देशाला विरोध

४. मानव इतिहासाच्या सुरुवातीलाच, यहोवा आपला सार्वभौम अधिकार ज्याप्रकारे चालवतो त्याविषयी कशारितीने आक्षेप घेण्यात आला?

देवाच्या आत्मिक पुत्रांपैकी एकाने विद्रोह केला व यहोवाच्या उद्देशास निष्फळ करण्याचा त्याने निश्‍चय केला. देवाने दिलेल्या इच्छास्वातंत्र्याचा त्याने गैरवापर केला. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला प्रेमापोटी अधीनता दाखवणाऱ्‍यांना जी शांती लाभते ती त्याने भंग केली. सैतानाने पहिल्या मानवी जोडप्याला देवापासून स्वतंत्र होऊन मार्गाक्रमण करण्यास उद्युक्‍त केले. (उत्पत्ति ३:१-६) त्याने केव्हाही यहोवाच्या सामर्थ्याला नाकबूल केले नाही; पण यहोवा आपला सार्वभौम अधिकार ज्याप्रकारे चालवतो त्याविषयी त्याने आक्षेप घेतला, म्हणजेच देवाला शासन करण्याचा अधिकार आहे किंवा नाही याविषयी त्याने प्रश्‍न उपस्थित केला. अशारितीने, मानव इतिहासाच्या अगदी सुरुवातीलाच या पृथ्वीवर यहोवाच्या सार्वभौमत्त्वासंबंधी एक मूलभूत वादविषय निर्माण झाला.

५. कोणता दुसरा वादविषय उभा करण्यात आला व यात कोणाचा समावेश होता?

सबंध विश्‍वाच्या सार्वभौमत्त्वाच्या त्या मूलभूत वादविषयासोबतच, ईयोबाच्या काळात सैतानाने दुसरा एक वादविषय उभा केला. यहोवाने निर्माण केलेले प्राणी कोणत्या हेतूने त्याच्या अधीन राहतात व त्याची सेवा करतात याविषयी सैतानाने शंका व्यक्‍त केली. त्याने असे सुचवले की ते स्वार्थी उद्देशाकरता देवाची सेवा करतात आणि जर त्यांच्यावर परीक्षा आणली तर ते देवाकडे पाठ फिरवतील. (ईयोब १:७-११; २:४, ५) ही शंका त्याने यहोवाच्या एका मानवी सेवकाच्या संबंधाने व्यक्‍त केली असली तरीही, या वादविषयात देवाच्या आत्मिक पुत्रांचा व त्याच्या एकुलत्या एका पुत्राचाही समावेश होता.

६. यहोवाने कशाप्रकारे आपल्या उद्देशाला व आपल्या नावाच्या अर्थसूचकतेला विश्‍वासू राहून कार्य केले?

यहोवाने आपल्या उद्देशाला व आपल्या नावाच्या अर्थसूचकतेला विश्‍वासू राहून कार्य केले. व याकरता त्याने संदेष्टा व तारणकर्त्याची भूमिका घेतली. * त्याने सैतानाला सांगितले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) येथे “स्त्री” यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गीय भागाला सूचित करते. तर या ‘स्त्रीच्या’ संततीच्या माध्यमाने सैतानाने उठवलेल्या वादविषयाचे उत्तर देण्याचे व आदामाच्या वंशजांना मुक्‍तता व जीवन मिळण्याची आशा देण्याचे यहोवाने ठरवले.—रोमकर ५:२१; गलतीकर ४:२६, ३१.

“स्वसंकल्पाचे रहस्य”

७. प्रेषित पौलाद्वारे यहोवाने कोणता उद्देश प्रकट केला?

इफिसस येथील ख्रिस्ती बांधवांना लिहिलेल्या पत्रात, यहोवा आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता सर्व गोष्टींची कशी व्यवस्था लावतो याचा प्रेषित पौलाने अतिशय सुरेखपणे खुलासा केला. पौलाने लिहिले: “त्याने स्वतःच्या इच्छेनुरुप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले, ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.” (इफिसकर १:९, १०) यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला प्रेमापोटी अधीन होणाऱ्‍या सर्व प्राण्यांना एका संयुक्‍त विश्‍वात एकत्रित करावे असा यहोवाचा अद्‌भुत उद्देश आहे. (प्रकटीकरण ४:११) अशारितीने त्याचे नाव पवित्र केले जाईल, सैतानाचे सर्व दावे खोटे आहेत हे सिद्ध केले जाईल आणि देवाची इच्छा ‘जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरहि’ पूर्ण होईल.—मत्तय ६:१०.

८. ‘व्यवस्था’ असे भाषांतर केलेल्या शब्दाचा काय अर्थ होतो?

यहोवाचा ‘स्वसंकल्प’ किंवा उद्देश एका ‘व्यवस्थेमार्फत’ पूर्ण केला जाईल. येथे पौलाने जो शब्द वापरला त्याचा मूळ अर्थ “घरगुती कारभार” असा होतो. हा शब्द कारभार करण्याची पद्धत यास सूचित करतो. * यहोवा आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता सर्व गोष्टींची ज्या अद्‌भूत रितीने व्यवस्था लावतो ते एका ‘रहस्याच्या’ रूपात काळाच्या ओघात प्रकट केले जाणार होते.—इफिसकर १:१०; ३:९.

९. यहोवाने आपल्या स्वसंकल्पाचे रहस्य क्रमाक्रमाने कसे प्रकट केले?

एदेन बागेत प्रतिज्ञा केलेल्या संततीविषयीचा आपला उद्देश कशाप्रकारे पूर्ण होईल हे यहोवाने अनेक करारांच्या माध्यमाने क्रमाक्रमाने प्रकट केले. अब्राहामसोबत करार करताना त्याने असे प्रकट केले की प्रतिज्ञात संतती अब्राहामच्या वंशातून पृथ्वीवर येईल आणि या संततीद्वारे “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे” आशीर्वादित होतील. याच करारात असेही प्रकट करण्यात आले की संततीच्या प्रमुख घटकात इतरजणांचाही समावेश असेल. (उत्पत्ति २२:१७, १८) शारीरिक इस्राएलसोबत करण्यात आलेल्या नियमशास्त्राच्या कराराने, एक “याजकराज्य” निर्माण करण्याविषयीच्या यहोवाच्या उद्देशावर प्रकाश टाकला. (निर्गम १९:५, ६) दाविदासोबत केलेल्या करारातून स्पष्ट झाले की या संततीचे राजासन कायमचे स्थापित केले जाईल. (२ शमुवेल ७:१२, १३; स्तोत्र ८९:३, ४) नियमशास्त्राच्या कराराने यहुद्यांना मशीहापर्यंत पोचवल्यानंतर यहोवाने आपल्या उद्देशाच्या पूर्णतेविषयी आणखी काही गोष्टी प्रकट केल्या. (गलतीकर ३:१९, २४) संततीच्या प्रमुख घटकात ज्या मानवांचा समावेश असणार होता ते पूर्वभाकीत केलेल्या ‘याजकराज्याचे’ सदस्य बनतील व त्यांना नवे, अर्थात आत्मिक “इस्राएल” यानात्याने ‘नव्या करारात’ सामील केले जाईल असे प्रकट करण्यात आले.—यिर्मया ३१:३१-३४; इब्री लोकांस ८:७-९. *

१०, ११. (क) यहोवाने पूर्वभाकित संततीविषयी कशाप्रकारे उलगडा केला? (ख) देवाचा एकुलता एक पुत्र पृथ्वीवर का आला?

१० देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेची व्यवस्था करण्याकरता पूर्वभाकीत केलेली संतती पृथ्वीवर येण्याची वेळ आली. यहोवाने गब्रीएल देवदूताला मरीयेकडे पाठवून तिला कळविले की ती एका पुत्राला जन्म देईल व त्याचे नाव तिने येशू ठेवावे. देवदूताने तिला सांगितले: “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) अशारितीने प्रतिज्ञात संततीची ओळख स्पष्ट झाली.—गलतीकर ३:१६; ४:४.

११ यहोवाचा एकुलता एक पुत्र पृथ्वीवर येऊन, त्याची परीक्षा होणार होती. सैतानाने केलेल्या दाव्याचे सर्वात चांगले प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी येशूच्या खांद्यावर असणार होती. तो आपल्या पित्याला विश्‍वासू राहील का? याचा एक पवित्र रहस्याशी संबंध होता. प्रेषित पौलाने येशूच्या भूमिकेविषयी सांगताना नंतर असा खुलासा केला: “सुभक्‍तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.” (१ तीमथ्य ३:१६) होय, मृत्यूपर्यंत पूर्णपणे विश्‍वासू राहण्याद्वारे येशूने सैतानाच्या दाव्याला खोटे ठरवले. पण पवित्र रहस्याच्या इतर तपशीलांचा अद्याप उलगडा व्हायचा होता.

‘देवाच्या राज्याचे रहस्य’

१२, १३. (क) ‘देवाच्या राज्याच्या रहस्याचा’ एक पैलू कोणता आहे? (ख) काही मानवांना स्वर्गात जाण्याकरता कशाप्रकारे निवडण्यात आले?

१२ एकदा गालीलात प्रचार करत असताना येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की पवित्र रहस्याचा संबंध त्याच्या मशीही राज्यशासनाशी आहे. तो म्हणाला: “स्वर्गाच्या राज्याची [‘देवाच्या राज्याची,’ मार्क ४:११] रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे.” (मत्तय १३:११) त्या रहस्याच्या एका पैलूचा संबंध १,४४,००० मानवांच्या एका ‘लहान कळपाला’ निवडण्याशी होता; संततीचा एक भाग या नात्याने आपल्या पुत्रासोबत स्वर्गात राज्य करण्याकरता यहोवा या लहान कळपाला निवडणार होता.—लूक १२:३२; प्रकटीकरण १४:१, ४.

१३ मानवांना मुळात पृथ्वीवर राहण्याकरता निर्माण करण्यात आले होते; त्यामुळे, काही मानव स्वर्गात जाण्याकरता यहोवाकरवी त्यांची “नवी उत्पत्ती” केली जाण्याची आवश्‍यकता होती. (२ करिंथकर ५:१७) या अलौकिक स्वर्गीय जीवनाकरता निवडलेल्यांपैकी एक असणाऱ्‍या प्रेषित पेत्राने असे लिहिले: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्‍तीने विश्‍वासाच्या योगे रक्षिलेले आहा, त्या तुम्हांसाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.”—१ पेत्र १:३, ४.

१४. (क) ‘देवाच्या राज्याच्या रहस्यात’ गैरयहुद्यांचा कशाप्रकारे समावेश करण्यात आला? (ख) आपण ‘देवाच्या गहन गोष्टी’ का समजू शकतो?

१४ भविष्यातील राज्य शासनाशी संबंधित असलेल्या पवित्र रहस्याचा आणखी एक पैलू होता; देवाची अशी इच्छा होती की ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याकरता ज्या थोडक्या जणांना पाचारण केले जाईल त्यांच्यात काही गैरयहुदीही असावेत. आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता यहोवाने ज्याप्रकारे सर्व गोष्टींची ‘व्यवस्था लावली’ त्यात या पैलूचाही समावेश होता असे पौलाने स्पष्ट केले: “ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्टयांना प्रगट करुन दाखविलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानास कळविण्यात आले नव्हते, ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधु, आमच्या बरोबर एकशरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.” (इफिसकर ३:५, ६) पवित्र रहस्याच्या या पैलूविषयी “पवित्र प्रेषितांना” उलगडा करण्यात आला. त्याचप्रकारे आज पवित्र आत्म्याच्या साहाय्याशिवाय आपल्यालाही ‘देवाच्या गहन गोष्टींचा’ उलगडा झाला नसता.—१ करिंथकर २:१०; ४:१; कलस्सैकर १:२६, २७.

१५, १६. यहोवाने ख्रिस्तासोबत राज्य करणाऱ्‍यांना मानवांतून का निवडले?

१५ स्वर्गीय सीयोन डोंगरावर ‘कोकऱ्‍याबरोबर’ उभे असलेले “एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम,” “पृथ्वीवरून विकत घेतलेले,” “देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत,” असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १४:१-४) एदेन बागेत प्रतिज्ञा केलेल्या संततीचा मुख्य भाग होण्याकरता यहोवाने आपल्या स्वर्गीय पुत्रांपैकी सर्वात प्रथम पुत्राला निवडले, पण ख्रिस्तासोबत राज्य करण्याकरता त्याने काहीजणांना मानवांतून का निवडले? प्रेषित पौल खुलासा करतो की या मर्यादित संख्येच्या लोकांना, यहोवाने ‘त्याच्या संकल्पाप्रमाणे,’ “आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे” बोलावले.—रोमकर ८:१७, २८-३०; इफिसकर १:५, ११; २ तीमथ्य १:९.

१६ यहोवा आपल्या महान व पवित्र नावाचे पवित्रीकरण व आपले सार्वभौमत्त्व निर्विवादपणे स्थापित करू इच्छितो. हा त्याचा उद्देश आहे. त्याच्या अतुलनीय सुबुद्धीने त्याने याकरता सर्व गोष्टींची ‘व्यवस्था लावली’ व आपल्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवर पाठवले जेथे त्याची मृत्यूपर्यंत परीक्षा घेण्यात आली. शिवाय, जे मृत्यूपर्यंत यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे विश्‍वासूपणे समर्थन करतील अशा काही मानवांचाही आपल्या पुत्राच्या मशीही राज्यशासनात समावेश असावा असे यहोवाने ठरवले.—इफिसकर १:८-१२; प्रकटीकरण २:१०, ११.

१७. ख्रिस्त व त्याच्यासोबत शासन करणाऱ्‍यांनी मानव जीवन अनुभवलेले आहे हे जाणून आपण आनंदी का होऊ शकतो?

१७ आपल्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवून व या पुत्राच्या राज्यात सहवारस होण्याकरता मानवांतून काहीजणांना निवडून यहोवाने आदामाच्या वंशजांबद्दल त्याला असलेले असीम प्रेम व्यक्‍त केले. हाबेलापासून जे जे यहोवाला विश्‍वासू राहिले त्यांना यामुळे कोणता फायदा होईल? अपरिपूर्ण मानव जन्मतःच पाप व मृत्यूचे गुलाम असल्यामुळे, यहोवाच्या मानवजातीबद्दलच्या मूळ उद्देशानुसार, त्यांना परिपूर्ण अवस्थेत आणण्याकरता आध्यात्मिक व शारीरिकरित्या रोगमुक्‍त केले जावे लागेल. (रोमकर ५:१२) पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्याची आशा असणारे याविषयी निश्‍चिंत राहू शकतात की त्यांचा राजा, ज्याप्रकारे पृथ्वीवर असताना आपल्या शिष्यांशी प्रेमळपणे व समजूतदारपणे वागला त्याचप्रमाणे तो त्यांच्याशीही व्यवहार करेल. हे जाणून त्यांना किती सांत्वन मिळते! (मत्तय ११:२८, २९; इब्री लोकांस २:१७, १८; ४:१५; ७:२५, २६) आणि ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणारे सह शासक, एकेकाळी आपल्यासारखेच वैयक्‍तिक दुर्बलतांना व जीवनातील निरनिराळ्या परीक्षांना तोंड दिलेल्या विश्‍वासू स्त्रीपुरुषांपैकी असतील हे जाणून त्यांना किती दिलासा मिळतो!—रोमकर ७:२१-२५.

यहोवाच्या उद्देशाची पूर्णता अटळ

१८, १९. इफिसकर १:८-११ यातील पौलाचे शब्द आपल्याला अधिक स्पष्ट का झाले आहेत व पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१८ आता आपण पौलाने अभिषिक्‍त ख्रिस्ती बांधवाना इफिसकर १:८-११ यात लिहिलेला मजकूर अधिक स्पष्टपणे समजू शकतो. त्याने म्हटले की यहोवाने त्यांना ‘स्वसंकल्पाचे रहस्य कळविले.’ ते असे की, त्यांना “ख्रिस्ताच्या ठायी वतनदार” नेमण्यात आले असून, “आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे [ते] पूर्वी नेमलेले” आहेत. आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता यहोवा ज्या अद्‌भुत प्रकारे सर्व गोष्टींची ‘व्यवस्था लावतो’ त्याच्याशी हे अनुरूप आहे हे आपल्याला समजले आहे. तसेच, प्रभूच्या सांज भोजनात केवळ काही ख्रिस्तीच प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारस का खातात व पितात हेही समजण्यास आपल्याला यामुळे मदत होते.

१९ पुढील लेखात आपण पाहू की ज्या ख्रिश्‍चनांना स्वर्गीय जीवनाची आशा आहे त्यांच्याकरता ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी काय अर्थ राखून आहे? तसेच, ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे त्या लाखो जणांनीही स्मारकविधीचा अर्थ समजून घेण्याविषयी मनःपूर्वक उत्सुकता का बाळगावी हेही आपण पुढील लेखात पाहू या. (w०६ २/१५)

[तळटीपा]

^ परि. 6 देवाच्या नावाचा अर्थ असा होतो, की आपले उद्देश वास्तवात उतरवण्यासाठी जी काही भूमिका घ्यावी लागते, ती भूमिका घेण्यास यहोवा समर्थ आहे. अधिक माहितीकरता “बायबल नेमके काय शिकवते?” यातील परिशिष्टात पृष्ठ १९७ पाहावे.

^ परि. 8 ही व्यवस्था मशीही राज्याला सूचित करत नाही कारण पौलाच्या शब्दांवरून दिसून येते की ही ‘व्यवस्था’ त्याच्या काळातही कार्यरत होती, पण मशीही राज्याची स्थापना १९१४ सालापर्यंत झालेली नव्हती.

^ परि. 9 देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेशी संबंधित असलेल्या या करारांविषयी सविस्तर माहितीकरता टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९० या अंकातील पृष्ठे १०-१५ पाहावीत.

उजळणी

• यहोवाने पृथ्वीची सृष्टी करून मानवाला या पृथ्वीवर का ठेवले?

• यहोवाच्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर येऊन त्याची परीक्षा घेतली जाणे का आवश्‍यक होते?

• यहोवाने ख्रिस्तासोबत शासन करण्याकरता मानवांतून काही जणांना का निवडले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]