व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गर्विष्ठ हृदय उत्पन्‍न होण्यापासून सांभाळा

गर्विष्ठ हृदय उत्पन्‍न होण्यापासून सांभाळा

गर्विष्ठ हृदय उत्पन्‍न होण्यापासून सांभाळा

“देव गर्विष्ठांना विरोध करितो.”—याकोब ४:६.

१. योग्य प्रकारचा अभिमान बाळगण्याविषयीचे एक उदाहरण द्या.

तुम्हाला अशी एखादी घटना आठवते का जेव्हा अभिमानाने तुमचे हृदय भरून आले? ही आनंददायक भावना बहुतेकांनी अनुभवली असेल. काही अंशी अभिमान बाळगणे चुकीचे नाही. उदाहरणार्थ, एखादे ख्रिस्ती जोडपे जेव्हा आपल्या मुलीच्या उत्तम वागणुकीबद्दल व मेहनती स्वभावाबद्दल तिच्या शिक्षकांनी लिहिलेला शेरा वाचतात तेव्हा साहजिकच त्यांना वाटणारे समाधान त्यांच्या चेहऱ्‍यावर झळकते. प्रेषित पौल व त्याच्या सोबत्यांनी एक नवी मंडळी स्थापन करण्यास हातभार लावला होता; या मंडळीच्या बांधवांनी विश्‍वासूपणे छळाला तोंड दिले तेव्हा साहजिकच पौलाला व त्याच्या सोबत्यांना त्यांच्याविषयी अभिमान वाटला.—१ थेस्सलनीकाकर १:१, ६; २:१९, २०; २ थेस्सलनीकाकर १:१, ४.

२. अभिमान बाळगणे सहसा अयोग्य का असते?

वरील उदाहरणांनुसार, आपण अभिमान म्हणतो, तेव्हा खरे तर एखादे कार्य पार पाडल्यावर किंवा एखादी वस्तू मिळवल्यावर जो आनंद आपल्याला वाटतो तो यावरून सूचित होतो. पण कधीकधी मात्र अभिमानाचा अर्थ आपल्या क्षमता, रूप, संपत्ती किंवा पदवीमुळे इतरांपेक्षा स्वतःला वरचढ समजण्याची भावनाही असू शकते. अशा वृत्तीची व्यक्‍ती सहसा उर्मट व मगरूर असते. या वृत्तीपासून आपण ख्रिश्‍चनांनी निश्‍चितच सांभाळून राहिले पाहिजे. का? कारण आपला पूर्वज आदाम याच्याकडून आपल्याला स्वार्थीपणाचा अवगुण उपजतच मिळाला आहे. (उत्पत्ति ८:२१) त्यामुळे आपले हृदय अगदी सहजपणे आपल्याला अयोग्य कारणांबद्दल अभिमान बाळगण्यास प्रवृत्त करू शकते. उदाहरणार्थ, ख्रिश्‍चनांनी इतरांच्या तुलनेत आपला वंश, संपत्ती, शिक्षण, स्वाभाविक गुण, किंवा कार्यक्षमतेविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती टाळली पाहिजे. अशा गोष्टींतून निर्माण झालेला अभिमान अयोग्य आहे आणि यहोवाला अशी वृत्ती मुळीच पसंत नाही.—यिर्मया ९:२३; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; १ करिंथकर ४:७; गलतीकर ५:२६; ६:३, ४.

३. अहंकार म्हणजे काय आणि येशूने याविषयी काय म्हटले?

अयोग्य प्रकारचा अभिमान टाळण्याचे आणखी एक कारण आहे. जर आपण अशाप्रकारची भावना आपल्या मनात निर्माण होऊ दिली तर हळूहळू ती तिरस्करणीय अभिमानाचे अर्थात अहंकाराचे रूप घेऊ शकते. अहंकार म्हणजे काय? इतरांपेक्षा स्वतःला वरचढ समजण्यासोबतच, अहंकारी व्यक्‍ती सहसा इतरांना, म्हणजे तिच्या दृष्टीने खालच्या दर्जाच्या व्यक्‍तींना तुच्छ लेखते. (लूक १८:९; योहान ७:४७-४९) येशूने ‘अहंकाराचा’ उल्लेख अशा इतर दुष्ट प्रवृत्तींसोबत केला की ज्या ‘माणसातून बाहेर निघून’ त्याला ‘भ्रष्ट करतात.’ (मार्क ७:२०-२३) तेव्हा अहंकारी हृदय उत्पन्‍न होऊ नये म्हणून सांभाळणे किती महत्त्वाचे आहे हे ख्रिश्‍चनांना माहीत आहे.

४. अहंकारी व्यक्‍तींबद्दल बायबलमध्ये असलेल्या उदाहरणांवर विचार केल्याने आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?

अहंकारी व्यक्‍तींबद्दल बायबलमधील अहवालांचे परीक्षण केल्यास तुम्हाला ही वृत्ती टाळण्यास मदत मिळेल. यामुळे, तुमच्या मनात अयोग्य अभिमानाच्या भावना असल्यास किंवा भविष्यात कधी अशा भावना तुमच्या मनात उत्पन्‍न झाल्यास त्या तुम्हाला लगेच ओळखता येतील. तसेच ज्या भावना अहंकाराचे रूप घेऊ शकतात अशा भावना मनातून काढून टाकण्यास तुम्हाला मदत मिळेल. यामुळे, देवाने आपल्या लोकांना दिलेल्या पुढील इशाऱ्‍यानुसार जेव्हा तो कार्य करेल तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल: “मी तुझ्या उन्‍नतीचा अभिमान धरणाऱ्‍यांस तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू यापुढे तोरा मिरविणार नाहीस.”—सफन्या ३:११.

देव अहंकारी लोकांविरुद्ध कारवाई करतो

५, ६. फारो कशाप्रकारे अहंकारी वृत्तीने वागला आणि यामुळे काय घडले?

फारोसारख्या शक्‍तिशाली शासकांशी यहोवाने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरूनही तुम्हाला हे समजू शकते की अहंकाराविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे. फारोचे हृदय अतिशय अहंकारी होते यात शंका नाही. तो स्वतःला देव समजत होता. इतरांनी आपली उपासना करावी अशी त्याची अपेक्षा होती व त्याच्या गुलामांचा अर्थात इस्राएली लोकांचा तो तिरस्कार करत असे. इस्राएलांना यहोवाकरता “रानात उत्सव करावा म्हणून” त्यांना जाऊ द्यावे अशी जेव्हा फारोला विनंती करण्यात आली तेव्हा त्याने काय म्हटले तुम्हाला आठवते का? त्याने गर्विष्ठपणे उत्तर दिले: “यहोवा कोण आहे की मी इस्राएलास जाऊ देण्यासंबंधी त्याचा शब्द ऐकावा?”—निर्गम ५:१, २, पं.र.भा.

फारोने सहा पीडा अनुभवल्यानंतर यहोवाने मोशेला त्याच्याकडे जाऊन असे विचारण्यास सांगितले: “तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांस जाऊ देत नाहीस काय?” (निर्गम ९:१७) यानंतर मोशेने सातव्या पीडेविषयी घोषणा केली आणि गारांची वृष्टी होऊन सर्व देश उजाड झाला. दहाव्या पीडेनंतर इस्राएलांना सोडण्यात आल्यावर फारोने विचार बदलला आणि तो त्यांचा पाठलाग करू लागला. शेवटी फारो व त्याचे सैन्य तांबड्या समुद्राच्या मधोमध अडकले. पाण्याच्या भिंती त्यांच्यावर कोसळत असताना त्यांच्या मनात काय विचार आले असतील याची कल्पना करा. फारोच्या अहंकाराचा काय परिणाम झाला? त्याच्या शूरवीरांनी म्हटले: “आपण इस्राएलांपासून पळू, कारण यहोवा त्यांच्यासाठी मिसऱ्‍यांविरुद्ध लढत आहे.”—निर्गम १४:२५, पं.र.भा.

७. बॅबिलोनच्या शासकांचा अहंकार कशाप्रकारे दिसून आला?

फारोप्रमाणेच इतर अहंकारी शासकांनाही यहोवाच्या हातून मानखंडना सहन करावी लागली. यांपैकी एक होता अश्‍शूरचा राजा सन्हेरीब. (यशया ३६:१-४, २०; ३७:३६-३८) कालांतराने अश्‍शूरवर बॅबिलोन्यांनी विजय मिळवला पण बॅबिलोनच्या दोन राजांचाही पाणउतारा करण्यात आला. तुम्हाला राजा बेलशस्सरची मेजवानी आठवत असेल. या मेजवानीत त्याचे शाही पाहुणे यहोवाच्या मंदिरातून आणलेल्या पात्रांतून द्राक्षारस प्यायले आणि ते बॅबिलोनी देवतांची स्तुती करू लागले. तेव्हा अचानक मनुष्याचा हात दिसला व त्या हाताने भिंतीवर एक संदेश लिहिला. त्या गूढ संदेशाचा अर्थ समजावण्याकरता संदेष्टा दानीएल याला बोलावण्यात आले तेव्हा त्याने बेलशस्सरला आठवण करून दिली: “परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्‌नेस्सर यास राज्य [दिले] . . . पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला . . . तेव्हा त्याला त्याच्या राज्यपदावरुन काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले; हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाही.” (दानीएल ५:३, १८, २०, २२) त्याच रात्री मेद व पारसच्या सैन्याने बॅबिलोन्यांवर विजय मिळवला व बेलशस्सरला ठार मारण्यात आले.—दानीएल ५:३०, ३१.

८. गर्विष्ठ व्यक्‍तींशी यहोवाने कशाप्रकारे व्यवहार केला?

पलिष्टी राक्षस गल्याथ, पर्शियाचा पंतप्रधान हामान, यहुदियावर राज्य करणारा राजा हेरोद अग्रिप्पा यांसारख्या इतर अहंकारी व्यक्‍तींनीही यहोवाच्या लोकांचा तिरस्कार केला. त्यांच्या अहंकारामुळे या तिघांनाही देवाच्या हातून अपमानजनक पद्धतीने मृत्यू आला. (१ शमुवेल १७:४२-५१; एस्तेर ३:५, ६; ७:१०; प्रेषितांची कृत्ये १२:१-३, २१-२३) यहोवाने ज्याप्रकारे या व्यक्‍तींशी व्यवहार केला त्यावरून एक महत्त्वाचे सत्य समोर येते: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.” (नीतिसूत्रे १६:१८) खरोखर “देव गर्विष्ठांना विरोध करतो” हे अगदी खरे आहे.—याकोब ४:६.

९. सोरचे राजे कशाप्रकारे विश्‍वासघातकी ठरले?

इजिप्त, अश्‍शूर व बॅबेलोनच्या गर्विष्ठ शासकांनी देवाच्या लोकांचा तिरस्कार केला पण सोरच्या राजाने मात्र एकेकाळी देवाच्या लोकांना मदत केली होती. राजा दावीद व शलमोनाच्या राज्यादरम्यान त्याने राजाच्या महालांच्या व देवाच्या मंदिराच्या बांधकामाकरता कुशल कामगार व बांधकामाचे साहित्य देखील पुरवले. (२ शमुवेल ५:११; २ इतिहास २:११-१६) पण दुःखाची गोष्ट म्हणजे काळाच्या ओघात सोरचे राजे यहोवाच्या लोकांविरुद्ध कार्य करू लागले. असे का घडले?—स्तोत्र ८३:३-७; योएल ३:४-६; आमोस १:९, १०.

“तुझे हृदय उन्मत झाले”

१०, ११. (क) सोरच्या राजांशी कोणाची तुलना केली जाऊ शकते? (ख) सोरच्या राजांची इस्राएलप्रती असलेली मनोवृत्ती का बदलली?

१० सोरच्या राजघराण्याचा पर्दाफाश करण्यासाठी व त्यांच्याविरुद्ध न्यायसंदेश घोषित करण्यासाठी यहोवाने संदेष्टा यहेज्केल याला प्रेरित केले. ‘सोरेच्या राजाला’ उद्देशून असलेल्या या संदेशातील वर्णन केवळ सोरच्या राजांनाच नव्हे तर मूळ विश्‍वासघातकी सैतान यालाही अगदी योग्यपणे लागू होते कारण तो देखील “सत्यात टिकला नाही.” (यहेज्केल २८:१२; योहान ८:४४) एकेकाळी सैतान यहोवाच्या स्वर्गीय पुत्रांच्या संघटनेत एक विश्‍वासू आत्मिक प्राणी होता. यहेज्केलद्वारे यहोवा सूचित करतो की सोरचे राजे व सैतान या दोघांच्या विश्‍वासघातामागे कोणते कारण होते:

११ “देवाची बाग एदेन यात तू होतास . . . अनेक तऱ्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; . . . तू पाखर घालणारा अभिषिक्‍त करूब होतास . . . तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठायी अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकारबुद्धि शिरून तू पातक केले; . . . हे पाखर घालणाऱ्‍या करूबा! . . . मी तुझा नाश केला आहे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धि भ्रष्ट झाली.” (यहेज्केल २८:१३-१७) होय, गर्वामुळेच सोरच्या राजांनी यहोवाच्या लोकांवर अत्याचार केला. सोर अतिशय धनाढ्य व्यावसायिक केंद्र बनले होते व त्यातील अलंकारिक उत्पादनांमुळे त्याला सुप्रसिद्धी मिळाली. (यशया २३:८, ९) हे पाहून सोरचे राजे उन्मत झाले व देवाच्या लोकांवर अत्याचार करू लागले.

१२. सैतान कशाप्रकारे विश्‍वासघातकी बनला आणि आजही तो काय करत आहे?

१२ त्याचप्रकारे, जो आत्मिक प्राणी नंतर सैतान बनला, त्याच्याजवळही एकेकाळी देवाने त्याला दिलेली कोणतीही कामगिरी उत्तमरित्या पार पाडण्याची बुद्धी होती. याकरता कृतज्ञ असण्याऐवजी तो “गर्वाने फुगून” देवाच्या शासनपद्धतीकडे तिरस्काराने पाहू लागला. (१ तीमथ्य ३:६) तो इतका गर्विष्ठ झाला की आदाम व हव्वेने आपली उपासना करावी अशी कामना तो बाळगू लागला. या दुष्ट इच्छेने परिपक्व होऊन पापाला जन्म दिला. (याकोब १:१४, १५) देवाने ज्या एकाच झाडाचे फळ खाण्याची मनाई केली होती त्या झाडाचे फळ तोडून खाण्यास सैतानाने हव्वेला भुलवले. मग त्याने तिच्या माध्यमाने आदामालाही ते मना केलेले फळ खाण्यास उद्युक्‍त केले. (उत्पत्ति ३:१-६) अशारितीने पहिल्या मानवी जोडप्याने देवाच्या शासनाचा धिक्कार केला व ते सैतानाचे उपासक बनले. पण सैतानाच्या गर्वाला सीमा नाही. त्याने स्वर्गात व पृथ्वीवर सर्व बुद्धिमान प्राण्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. येशू ख्रिस्तालाही त्याने सोडले नाही. उलट यहोवाच्या सार्वभौमत्वाचा धिक्कार करून आपली उपासना करण्यास सैतानाने त्याला भुलवण्याचा प्रयत्न केला.—मत्तय ४:८-१०; प्रकटीकरण १२:३, ४ ९.

१३. अहंकारामुळे काय परिणाम झाला आहे?

१३ तर अशाप्रकारे, अहंकार हा सैतानापासून आहे हे स्पष्ट आहे; या जगातील पाप, दुःख व दुष्टाईचे ते मूळ कारण आहे. ‘ह्‍या युगाचा दैवत’ सैतान लोकांच्या मनात अयोग्य अभिमानाच्या व अहंकाराच्या भावना उत्पन्‍न करतो. (२ करिंथकर ४:४) त्याचा काळ थोडा उरला आहे हे माहीत असल्यामुळे तो खऱ्‍या ख्रिश्‍चनांविरुद्ध लढत आहे. त्याचे उद्दिष्ट हेच आहे की त्यांना स्वार्थी, गर्विष्ठ व अहंकारी बनवून देवापासून दूर न्यावे. बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते की स्वार्थीपणा हा ‘शेवटल्या काळचे’ चिन्ह असेल.—२ तीमथ्य ३:१, २; प्रकटीकरण १२:१२, १७.

१४. यहोवा मानवांशी कोणत्या तत्त्वानुसार व्यवहार करतो?

१४ येशू ख्रिस्ताने सैतानाच्या अहंकारामुळे निष्पन्‍न झालेल्या दुष्परिणामांचा निर्भयपणे पर्दाफाश केला. कमीतकमी तीन वेळा आपल्या फाजील धार्मिक शत्रूंच्या देखत येशूने एक तत्त्व सांगितले ज्याच्या आधारावर यहोवा मानवजातीशी व्यवहार करतो: “जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल; व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.”—लूक १४:११; १८:१४; मत्तय २३:१२.

अहंकारापासून आपल्या हृदयाचे रक्षण करा

१५, १६. हागार कशामुळे गर्विष्ठ झाली?

१५ अहंकारी व्यक्‍तींची जी उदाहरणे आपण लक्षात घेतली ती सर्व महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्‍तींची होती हे तुमच्या लक्षात आले असेल. याचा अर्थ सर्वसाधारण लोक अहंकारी असू शकत नाहीत असा आहे का? मुळीच नाही. अब्राहामच्या कुटुंबात घडलेल्या एका घटनेचे उदाहरण घ्या. कुलपिता अब्राहाम याला कोणीही वारस नव्हता व त्याची पत्नी सारा वृद्ध झाली होती. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे, अब्राहाम दुसरी पत्नी करून मुलांना जन्म देऊ शकत होता. देवाने अशा विवाहांना परवानगी दिली होती कारण खऱ्‍या उपासकांमध्ये विवाहाच्या मूळ नियमांना पुन्हा स्थापित करण्याची त्याची वेळ अजून आलेली नव्हती.—मत्तय १९:३-९.

१६ आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून अब्राहाम सारेची मिस्री दासी हागार हिच्याद्वारे वारसाला जन्म देण्यास तयार झाला. हागार अब्राहामची दुसरी पत्नी बनली व ती गर्भवती झाली. आपल्याला मिळालेल्या या मानाबद्दल तिने मनापासून कृतज्ञ असावयास हवे होते. पण तिने आपल्या हृदयात अहंकार उत्पन्‍न होऊ दिला. बायबल सांगते: “आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली.” तिच्या अशा मनोवृत्तीमुळे अब्राहामच्या कुटुंबातील कलह इतका विकोपाला गेला की शेवटी सारेने हागारला हाकलून लावले. पण या समस्येवर उपाय होता. देवाने हागारला असा सल्ला दिला: “तू आपल्या धनिणीकडे परत जा, आणि तू तिच्या हाताखाली तिच्या आज्ञेत राहा.” (प्रारंभ १६:४, ९, पं.र.भा.) हागारने या सल्ल्याचे पालन करून सारेप्रती आपली मनोवृत्ती बदलली आणि अशारितीने ती एका मोठ्या जनसमुदायाची जननी बनली.

१७, १८. आपण सर्वांनीच अहंकारी वृत्तीपासून सांभाळून राहणे का आवश्‍यक आहे?

१७ हागारच्या अहवालावरून असे दिसून येते की एखाद्याच्या जीवनातली परिस्थिती सुधारते तेव्हा ती व्यक्‍ती गर्विष्ठ बनू शकते. यावरून हे शिकायला मिळते की जरी एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती आतापर्यंत चांगल्या मनोवृत्तीने देवाची सेवा करत असली तरीसुद्धा, धनसंपत्ती किंवा अधिकार मिळाल्यावर ही व्यक्‍ती गर्विष्ठ बनू शकते. तसेच, एखाद्या व्यक्‍तीला मिळालेल्या यशाबद्दल, तिच्या बुद्धिमत्तेबद्दल अथवा कौशल्याबद्दल जेव्हा तिची स्तुती केली जाते, तेव्हाही या व्यक्‍तीच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो. तेव्हा, आपल्या मनात केव्हाही असा अहंकार निर्माण होऊ नये म्हणून ख्रिश्‍चनांनी खबरदारी बाळगली पाहिजे. विशेषतः जेव्हा आपण एखाद्या कार्यात सफल होतो किंवा आपल्यावर अधिक जबाबदाऱ्‍या सोपवल्या जातात तेव्हा या संदर्भात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे.

१८ अहंकारी वृत्ती टाळण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या वृत्तीबद्दल देवाचा असलेला दृष्टिकोन. त्याचे वचन सांगते: “चढेल दृष्टि व गर्विष्ठ अंतःकरण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत.” (नीतिसूत्रे २१:४) खासकरून, जे ‘प्रस्तुत युगात धनवान’ आहेत अशा ख्रिश्‍चनांना बायबलमध्ये निक्षून सांगण्यात आले आहे की त्यांनी “अभिमानी” होऊ नये. (१ तीमथ्य ६:१७; अनुवाद ८:११-१७) जे ख्रिस्ती धनवान नाहीत त्यांनीही “हेवा” करण्याची वृत्ती टाळली पाहिजे आणि अभिमानी वृत्ती श्रीमंत असो अथवा गरीब, कोणामध्येही निर्माण होऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.—मार्क ७:२१-२३; याकोब ४:५.

१९. उज्जाने आपली पूर्वीची सर्व चांगली कृत्ये कशाप्रकारे धुळीस मिळवली?

१९ इतर दुष्ट प्रवृत्तींप्रमाणेच अहंकारी वृत्तीमुळेही यहोवासोबतचा आपला चांगला नातेसंबंध बिघडू शकतो. उदाहरणार्थ उज्जा राजाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला, “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. . . . देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले.” (२ इतिहास २६:४, ५) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, उज्जा राजाचे “हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला” आणि अशारितीने त्याने आपली पूर्वीची सर्व चांगली कृत्ये धुळीस मिळवली. तो इतका अभिमानी बनला की त्याने मंदिरात शिरून धूप जाळण्याचे धैर्य केले. याजकांनी जेव्हा त्याला असा गर्विष्ठपणा न करण्याची ताकीद दिली तेव्हा “उज्जीयास क्रोध आला.” परिणामस्वरूप, यहोवाने त्याला कोडी बनवले आणि तेव्हा एकदाचा तो देवाच्या नजरेतून जो उतरला तो त्याचा मृत्यू होईपर्यंत तसाच राहिला.—२ इतिहास २६:१६-२१.

२०. (क) हिज्कीयाची पूर्वीची सर्व चांगली कामे कशामुळे व्यर्थ ठरली असती? (ख) पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२० या उदाहरणाची तुलना तुम्ही राजा हिज्कीयाच्या उदाहरणाशी करू शकता. या राजानेही बरीच चांगली कामे केली होती. पण एकदा मात्र ‘त्याचेही हृदय उन्मत झाले.’ उज्जाप्रमाणेच त्याचीही पूर्वीची सर्व चांगली कामे व्यर्थ ठरली असती. पण आनंदाची गोष्ट म्हणजे हिज्कीया ‘आपल्या हृदयाच्या उन्मत्तत्तेविषयी अनुताप पावून नम्र झाला,’ आणि अशारितीने पुन्हा एकदा त्याच्यावर देवाची कृपादृष्टी झाली. (२ इतिहास ३२:२५, २६) हिज्कीयाच्या अहंकारावरील औषध, नम्रता हे होते. होय, नम्रता अहंकाराच्या अगदी विरुद्ध आहे. तेव्हा, आपण ख्रिस्ती नम्रता कशी उत्पन्‍न करू शकतो याविषयी पुढील लेखात पाहुया.

२१. नम्र ख्रिस्ती कोणती आशा बाळगू शकतात?

२१ पण अहंकारामुळे आजपर्यंत किती वाईट परिणाम झाला आहे हे आपण कधीही विसरू नये. “देव गर्विष्ठांना विरोध करतो” हे लक्षात ठेवून आपण अयोग्य अभिमानाच्या भावनांना कधीही थारा देऊ नये. नम्र ख्रिस्ती होण्याचा प्रयत्न करत असताना आपण देवाच्या मोठ्या दिवसातून जिवंत बचावण्याची आशा करू शकतो. कारण तेव्हा सर्व गर्विष्ठ जन व त्यांची कार्ये या पृथ्वीवरून नाहीशी केली जातील. मग “लोकांचा उन्मतपणा भंग पावेल. मनुष्याचा गर्व उतरेल; आणि परमेश्‍वरच कायतो उच्चस्थानी विराजेल.”—यशया २:१७. (w०५ १०/१५)

मनन करण्याकरता मुद्दे

• गर्विष्ठ व्यक्‍तीचे तुम्ही कसे वर्णन कराल?

• अहंकाराची सुरुवात कोठून झाली?

• एखाद्या व्यक्‍तीच्या मनात अहंकार कशामुळे निर्माण होऊ शकतो?

• आपण अहंकारी वृत्तीपासून सावध का राहिले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

हागारची स्थिती सुधारताच तिच्या मनात अहंकार उत्पन्‍न झाला