व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या उपासनेची व मूर्तीपूजेची टक्कर झाली ते ठिकाण

खऱ्‍या उपासनेची व मूर्तीपूजेची टक्कर झाली ते ठिकाण

खऱ्‍या उपासनेची व मूर्तीपूजेची टक्कर झाली ते ठिकाण

तुर्कस्थानाच्या पश्‍चिम किनाऱ्‍यावरील प्राचीन एफिससचे अवशेष एक शतकापेक्षा अधिक काळपासून, सखोल पुरातत्त्व संशोधनाचे ठिकाण बनले आहे. अनेक इमारती पुन्हा बांधण्यात आल्या आहेत व वैज्ञानिकांनी अनेक शोधांवर अभ्यास करून त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे, एफिसस आज, तुर्कस्थानातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनाचे आकर्षणस्थान आहे.

एफिससबद्दल काय शोध लागला आहे? या मोहक प्राचीन महानगराचे चित्र कसे रेखाटले जात आहे? एफिससचे अवशेष आणि ऑस्ट्रिया व्हिएन्‍नातील एफिसस वस्तुसंग्रहालय पाहिल्यावर आपल्याला, एफिससमध्ये खऱ्‍या उपासनेची व मूर्तीपूजेची टक्कर कशी झाली ते समजेल. सर्वप्रथम आपण एफिससविषयी जाणून घेऊ या.

अनेकांना हवेसे वाटणारे स्थळ

सा.यु.पू. ११ व्या शतकात, युरेशियात सतत गोंधळ माजत होता; लोक सारखे स्थलांतर करत होते. तेव्हाच, आयोनियन ग्रीकांनी आशिया मायनरच्या पश्‍चिम किनाऱ्‍यावर वसाहत करायला सुरुवात केली. या आरंभिक परदेशीयांची ओळख, मातृदेवतेची उपासना करणाऱ्‍या लोकांशी घडली; याच मातृदेवतेला कालांतराने एफिसियन आर्टिमीस म्हणून ओळखले जाणार होते.

सा.यु.पू. सातव्या शतकाच्या मध्यात काळ्या समुद्राकडून आशिया मायनर लुटण्यासाठी सिमेरियन भटक्या टोळ्या उत्तरेकडून आल्या. नंतर, सा.यु.पू. ५५० च्या सुमारास लिडियाचा राजा क्रोएसस राजासनावर बसला; हा शक्‍तिशाली शासक आपल्या अमाप संपत्तीसाठी प्रसिद्ध होता. पर्शियन साम्राज्याच्या परिसीमा वाढवताना सायरस राजाने आयोनियन शहरांसोबत एफिससवर देखील वर्चस्व मिळवले.

सा.यु.पू. ३३४ मध्ये मॅसेडोनियाच्या अलेक्झांडरने पर्शियाविरुद्ध आपली मोहीम सुरू केली व तो आता एफिससचा नवा शासक बनला. पण, सा.यु.पू. ३२३ मध्ये अलेक्झांडरच्या अकाली मृत्यूनंतर, त्याच्या सेनापतींमध्ये राज्याच्या विभागणीच्या संबंधाने सुरू झालेल्या झगड्यात एफिसस अडकले. सा.यु.पू. १३३ साली, पर्गममचा निपुत्रिक राजा ॲटलस तिसरा याने एफिससला रोमन साम्राजाच्या हवाली केले; अशाप्रकारे ते आशियाच्या रोमन प्रांताचा एक भाग बनले.

खऱ्‍या उपासनेची मूर्तीपूजेशी टक्कर

सा.यु. पहिल्या शतकात आपल्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याच्या शेवटी प्रेषित पौल एफिससला आला होता तेव्हा त्याला ३,००,००० रहिवासी असलेले एक शहर आढळले. (प्रेषितांची कृत्ये १८:१९-२१) आपल्या तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी पौल पुन्हा एफिससला गेला व सभास्थानांत देवाच्या राज्याविषयी नव्या उत्साहाने बोलला. परंतु, तीन महिन्यांनंतर यहुद्यांचा विरोध वाढत गेला; तेव्हा पौल दररोज तुरन्‍नाच्या पाठशाळेत व्याख्याने देऊ लागला. (प्रेषितांची कृत्ये १९:१, ८, ९) त्याचे प्रचार कार्य आणि चमत्काराने लोकांना बरे करणे व भुतांना काढणे यांसारखी शक्‍तिची अद्‌भुत कार्ये दोन वर्षे चालली. (प्रेषितांची कृत्ये १९:१०-१७) त्यामुळेच तर अनेकांनी विश्‍वास ठेवला! होय, यहोवाचे वचन इतके प्रबळ झाले, की पूर्वी जादूटोणा करणाऱ्‍या बहुत संख्येच्या लोकांनी स्वखुषीने आपली जादूटोण्याशी संबंधित असलेली मोलामहागाची पुस्तके जाळून टाकली.—प्रेषितांची कृत्ये १९:१९, २०.

पौलाच्या यशस्वी प्रचार कार्यामुळे पुष्कळ लोक आर्टिमीस देवतेची उपासना सोडायला प्रवृत्त झाले खरे, परंतु त्यामुळे मूर्तीपूजा करणारे चिडले. आर्टिमीस देवीचे रुप्याचे देव्हारे बनवण्याचा व्यवसाय किफायतशीर होता. हा व्यवसाय करणाऱ्‍या व्यापाऱ्‍यांना, आपला धंदा मंदावतो की काय अशी भीती वाटू लागल्यामुळे, देमेत्रिय नावाच्या एका सोनाराने दंगा माजवला.—प्रेषितांची कृत्ये १९:२३-३२.

या गोंधळाच्या शेवटी, “एफिसकरांची अर्तमी [आर्टिमीस] थोर” असे तब्बल दोन तासांसाठी जिवाचा आकांत करून लोक ओरडत होते. (प्रेषितांची कृत्ये १९:३४) दंगा शांत झाल्यावर पौलाने पुन्हा एकदा सहख्रिश्‍चनांना उत्तेजन दिले आणि तो आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघाला. (प्रेषितांची कृत्ये २०:१) परंतु, मासेदोनियास निघून गेल्यामुळे, आर्टिमीस पंथाचा शेवट होण्याचे थांबले नाही.

आर्टिमीस देवीचे मंदिर डगमगते

आर्टिमीस पंथाने एफिससमध्ये आपली मुळे खोलवर रोवली होती. क्रोएसस राजाच्या आधीच्या काळात, मातृदेवता सिबिली हिला, त्या क्षेत्रातील लोकांच्या धार्मिक जीवनात प्रमुख स्थान होते. सिबिली ग्रीक देवांशी संबंधित आहे, असा दावा करण्याद्वारे क्रोएसस, ग्रीक असलेल्या व नसलेल्या अशा दोन्ही लोकांना मान्य असलेली एक धार्मिक प्रतिमा स्थापित करू पाहत होता. क्रोएससच्या पाठिंब्याने सा.यु.पू. सहाव्या शतकाच्या मध्यात, सिबिलीची जागा घेतलेल्या आर्टिमीस देवीच्या मंदिराचे काम सुरू झाले.

हे मंदिर, ग्रीक वास्तुकलेत मैलाचा दगड होते. अशाप्रकारचे व इतक्या मोठ्या आकाराचे संगमरवरी दगड पूर्वी कधी इमारतीसाठी वापरण्यात आले नव्हते. हे मंदिर सा.यु.पू. ३५६ मध्ये जाळून नाश करण्यात आले. पण तितकेच भव्य पुनःनिर्मित मंदिर, रोजगार मिळवून देणारा महत्त्वपूर्ण स्रोत आणि भाविकांसाठी एक प्रमुख आकर्षणस्थळ बनले. ७३ मीटर रुंदीच्या व १२७ मीटर लांबीच्या एका सपाट मंचावरील हे पुनःनिर्मित मंदिर ५० मीटर रुंद व १०५ मीटर लांब होते. ते जगातल्या सात आश्‍चर्यांपैकी एक समजले जात होते. परंतु, सर्वांचेच त्याविषयी अनुकूल मत नव्हते. एफिससचा तत्त्ववेत्ता हेराक्लायटस याने वेदीकडे जाणाऱ्‍या अंधाऱ्‍या मार्गाची तुलना ओंगळपणाच्या अंधाराशी केली व मंदिरात येणाऱ्‍यांची नैतिकता प्राण्यांपेक्षाही नीच आहे असे म्हटले. पुष्कळ लोकांना असे वाटत होते, की एफिससमधील आर्टिमीसचे मंदिर कधीच नष्ट होणार नाही. परंतु याच्या अगदी उलट झाले, यास इतिहास साक्ष आहे. एफिसोस—डे नोईफ्युरर (एफिसस—नवीन मार्गदर्शक) या पुस्तकात असे म्हटले आहे: “दुसऱ्‍या शतकापर्यंत, आर्टिमीसची उपासना आणि इतर स्थापित दैवतांचे देव्हारे अचानक नाहीसे झाले.”

सा.यु. तिसऱ्‍या शतकात एफिससला एका मोठ्या भूमिकंपाचा हादरा बसला. शिवाय, काळ्या समुद्राहून आलेल्या गॉथ खलाशांनी आर्टिमीस मंदिरातील सोनेनाणे लुटले आणि मग मंदिराला आग लावून दिली. आताच ज्या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला ते असेही म्हणते: “पराजित व स्वतःच्या मंदिराचे संरक्षण करू न शकणाऱ्‍या आर्टिमीस देवीला, इथूनपुढे शहराची संरक्षक देवता म्हणून कसे काय लेखता येईल बरे?”—स्तोत्र १३५:१५-१८.

सरतेशेवटी, सा.यु. चवथ्या शतकाच्या शेवटी सम्राट थिओडोशियस पहिला याने “ख्रिस्ती धर्माला” राजधर्म म्हणून घोषित केले. लवकरच, एकेकाळी प्रतिष्ठित असलेले आर्टिमीसचे भव्य मंदिर दगडाची खाण बनले. आर्टिमीसच्या उपासनेला काहीच महत्त्व उरले नाही. एका अनामिक व्यक्‍तीने, प्राचीन जगातील एक आश्‍चर्य म्हणून या मंदिराची स्तुती करणाऱ्‍या एका कवितेविषयी म्हटले: “ते मंदिर आता पूर्णपणे ओसाड व दयनीय स्थितीत आहे.”

आर्टिमीसपासून ‘देवाच्या आईपर्यंत’

आपण गेल्यानंतर, “क्रूर लांडगे” येतील आणि काही माणसे उठून “विपरीत गोष्टी बोलतील” असा इशारा पौलाने एफिससमधील मंडळीतील वडिलांना दिला. (प्रेषितांची कृत्ये २०:१७, २९, ३०) अगदी असेच घडले. घटनांवरून हे सिद्ध होते, की धर्मत्यागी ख्रिस्ती धर्माच्या रुपाने एफिससमध्ये सर्वत्र खोटी उपासना चालत असे.

सा.यु. ४३१ मध्ये, एफिसस येथे तिसरी सर्वपंथीय परिषद होती; येथे ख्रिस्त देव होता की मनुष्य होता यावर चर्चा करण्यात आली. एफिसोस—डे नोईफ्युरर पुढे म्हणते: ‘ख्रिस्त मनुष्य नव्हे तर देवच होता, असा अलेक्झांड्रियन लोक करत असलेला विश्‍वास तेथे मान्य करण्यात आला.’ याचा दूरगामी परिणाम झाला. “एफिससमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे मरीयेचे स्थान उंचावण्यात आले; पूर्वी तिला ख्रिस्ताला जन्म देणारी म्हणून मानले जात होते, आता तिला देवाची आई हे स्थान देण्यात आले; अशाप्रकारे फक्‍त मरीयेच्या पंथाचा पायाच रचण्यात आला नाही तर चर्चमध्ये सर्वात मोठी फाळणी झाली. . . . आजही हा वादाचा विषय आहे.”

अशाप्रकारे, सिबिली आणि आर्टिमीसच्या उपासनेची जागा मरीयेच्या उपासनेने किंवा “देवाची आई” हिच्या उपासनेने घेतली. सदर पुस्तक म्हणते त्यानुसार, “एफिससमध्ये मरियेची उपासना . . . आजही केली जाते; आर्टिमीसच्या उपासनेशी तिचा नक्कीच संबंध आहे.”

विस्मरण झालेले

आर्टिमीसची उपासना नाहीशी झाल्यानंतर पाठोपाठ एफिससचेही पतन झाले. भूमिकंप, मलेरिया आणि बंदरावर हळूहळू गाळ तुंबू लागल्यामुळे शहरातील जीवन आणखीनच कठीण होऊन बसले.

सा.यु. सातव्या शतकापर्यंत, इस्लाम धर्माची भरभराट होऊ लागली होती. इस्लामने आपल्या तत्त्वप्रणालीने अरबी टोळ्यांना सुसंघटित केले. अरबी तांडे सा.यु. सातव्या आणि आठव्या शतकात एफिससला लुटत होते. बंदर पूर्णपणे गाळात बुडाले तेव्हा एफिससचे नामोनिशाणच मिटले; शहर केवळ अवशेषांचा ढीग बनले. त्या भव्य नगरराज्यांपैकी, आया सेल्चुक नावाची केवळ एक लहानशी वस्ती तेवढी राहिली.

इफिससच्या ढिगाऱ्‍यांतून मारलेला फेरफटका

एफिससच्या ऐश्‍वर्याची झलक हवी असेल तर तेथील अवशेषांतून आपण एक फेरफटका मारू शकतो. तुम्ही वरच्या प्रवेशद्वारापासून जर आत शिरलात तर तुम्हाला लगेच क्यूरेट्‌सच्या मार्गापासून सेल्ससच्या ग्रंथालयापर्यंतचे विलोभनीय दृश्‍य पाहायला मिळेल. रस्त्याच्या उजव्या बाजूला, सा.यु. दुसऱ्‍या शतकात बांधलेले ओडियम अर्थात एक लहानसे रंगमंदिर तुम्हाला खुणावते. सुमारे १,५०० लोकांसाठी बसण्याची सोय असलेले हे रंगमंदिर कदाचित केवळ परिषद कक्ष म्हणूनच नव्हे तर सार्वजनिक मनोरंजनासाठी देखील वापरले जात असावे. क्यूरेट्‌सच्या मार्गावर दोन्ही बाजूला ओळीने इमारती आहेत; जसे की राज्याच्या बाबींची जिथे चर्चा केली जात असे ते राज्य अगोरा, हॅड्रियनचे मंदिर, काही सार्वजनिक कारंजे आणि टेकडीच्या उतारावर ओळीने असलेली घरे; ही घरे बड्या एफिसकरांची होती.

सा.यु. दुसऱ्‍या शतकात बांधलेल्या सेल्ससचे भव्य ग्रंथालय पाहून तुम्हाला खूप कौतुक वाटेल. एका मोठ्या वाचन खोलीत अनेक गुंडाळ्या भिंतीतल्या कोनाड्यांत ठेवल्या होत्या. इमारतीच्या भव्य दर्शनी भागात ठेवलेले चार पुतळे, सेल्सससारख्या उच्च रोमी सरकारी सेवकाकडून जे गुण अपेक्षिले जात होते, त्यांचे चित्रण करतात; जसे की सोफिया (बुद्धी), अरेटी (सद्‌गुण), एनिए (श्रद्धा), आणि एपिस्टीमी (ज्ञान किंवा समज). मूळ पुतळे व्हिएन्‍ना येथील एफिसस वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळू शकतात. ग्रंथालयालाच लागून असलेल्या मोकळ्या जागेत एक भव्य द्वार आहे ज्यातून तुम्ही टेट्रागोनोस अगोरा, अर्थात बाजारपेठेत जाऊ शकता. या मोठ्या चौकात लोक आपले दैनंदिन व्यवहार करत असत; चौकाच्या चहुबाजूला छप्पर असलेले विहारपथ होते.

यानंतर तुम्ही मार्बल रोडवर येता जो तुम्हाला मोठ्या रंगमंदिराकडे नेतो. रोमी साम्राज्याच्या काळात या रंगमंदिराचा शेवटचा विस्तार करण्यात आला; त्यात सुमारे २५,००० प्रेक्षक बसू शकत होते. त्याचा दर्शनी भाग स्तंभ, उत्थित शिल्पे आणि पुतळे यांनी अतिशय सुरेखपणे सजवलेला होता. देमेत्रिय या सोनाराने तिथे जमलेल्या लोकसमुदायाला चेतवल्यामुळे किती गोंधळ माजला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

मोठ्या रंगमंदिरापासून शहराच्या बंदराकडे जाणारा रस्ता देखील अतिशय प्रेक्षणीय आहे. तो ५०० मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे; रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्तंभ आहेत. याच रस्त्यावर, रंगमंदिराची व्यायामशाळा आणि बंदराची व्यायामशाळा होती; दोन्ही व्यायामशाळा शारीरिक प्रशिक्षणाकरताच राखून ठेवलेल्या होत्या. रस्त्याच्या टोकाला असलेले बंदराचे फाटक, थेट समुद्राकडे खुले होते; येथेच, जगातल्या सर्वात प्रेक्षणीय अवशेषांमधून घेतलेली आपली धावती भेट संपते. व्हिएन्‍नातील एफिसस वस्तुसंग्रहालयात या ऐतिहासिक नगरराज्याचा आणि इतर अनेक स्मारकांचा लाकडी नमुना आहे.

वस्तुसंग्रहालयातून एक फेरफटका मारताना व एफिशियन आर्टिमीसचा पुतळा पाहताना, एफिससमधील आरंभीच्या ख्रिश्‍चनांना किती धीर धरावा लागला असेल याचा विचार केल्याशिवाय राहवत नाही. जादूटोण्यात पूर्णपणे बुडालेल्या व धार्मिक पूर्वग्रहामुळे अंध झालेल्या लोकांच्या शहरात त्यांना राहावे लागले होते. आर्टिमीसच्या उपासकांनी राज्य संदेशाचा कडा विरोध केला. (प्रेषितांची कृत्ये १९:१९; इफिसकर ६:१२; प्रकटीकरण २:१-३) आणि अशा खडतर वातावरणात, खऱ्‍या उपासनेने मूळ धरले. आर्टिमीसच्या प्राचीन उपासनेसारखाच, आपल्या काळातील खोट्या धर्माचा अंत होईल तेव्हा पुन्हा एकदा खऱ्‍या देवाच्या उपासनेचा विजय होईल.—प्रकटीकरण १८:४-८.

[२६ पानांवरील नकाशा/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

मासेदोनिया

काळा समुद्र

आशिया मायनर

एफिसस

भूमध्य समुद्र

ईजिप्त

[२७ पानांवरील चित्र]

आर्टिमीसच्या मंदिराचे अवशेष

[२८, २९ पानांवरील चित्रे]

१. सेल्ससचे ग्रंथालय

२. अरेटीचे जवळून घेतलेले चित्र

३. मोठ्या रंगमंदिराकडे जाणारा मार्बल रोड