व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मेक्सिकोच्या स्थानिक लोकांना सुवार्ता ऐकायला मिळाली

मेक्सिकोच्या स्थानिक लोकांना सुवार्ता ऐकायला मिळाली

मेक्सिकोच्या स्थानिक लोकांना सुवार्ता ऐकायला मिळाली

नोव्हेंबर १०, २००२ रोजी, मेक्सिकोतील मीके या स्थानिक जमातीचे लोक केटसॉल्टेपेक, सॅन मीगेल येथे एकत्रित झाले होते. हे लहानसे शहर ओक्साका नावाच्या निसर्गरम्य दक्षिणी राज्यात वसलेले आहे. हे लोक यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रांतीय अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्या विशिष्ट दिवशी सकाळी सर्वांना उत्कंठा होती ती एका बायबल नाटकाविषयी.

नाटकाचे सुरवातीचे काही संवाद ध्वनिप्रक्षेपकावरून ऐकू आले तेव्हा श्रोत्यांना विश्‍वासच बसेना. मग अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला, कित्येकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. नाटक त्यांच्या स्वतःच्या, म्हणजे मीके भाषेत सादर केले जात होते! नाटक संपल्यावर, या अनपेक्षित आशीर्वादाबद्दल कित्येकांनी मनापासून आभार व्यक्‍त केले. एक भगिनी म्हणाली, “आज पहिल्यांदा मला नाटक समजलं, अगदी माझ्या मनाला भिडलं.” दुसरी एक भगिनी म्हणाली: “यहोवानं मला माझ्या स्वतःच्या भाषेत नाटक ऐकण्याची संधी दिली. आता मी सुखानं मरेन.”

स्थानिक जमातींच्या लोकांपर्यंत राज्याची सुवार्ता पोचवण्याकरता, मेक्सिकोत राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनी अलीकडच्या काळात घेतलेल्या अथक परिश्रमांचे हे फळ होते.—मत्तय २४:१४;  २८:१९, २०.

यहोवाने प्रार्थना ऐकल्या

मेक्सिकोत स्थानिक जमातींचे ६०,००,००० पेक्षा अधिक लोक आहेत. या लोकांचेच मिळून एक स्वतंत्र राष्ट्र बनू शकते—६२ वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांचे बहुसांस्कृतिक राष्ट्र! यांपैकी, १५ भाषा बोलणाऱ्‍या लोकांची संख्या प्रत्येकी १,००,००० पेक्षा जास्त आहे. मेक्सिकोची अधिकृत भाषा तशी स्पॅनिश आहे पण स्थानिक जमातींच्या १०,००,००० पेक्षा जास्त लोकांना स्पॅनिश येत नाही. आणि ज्यांना येते त्यांनासुद्धा बायबलचे सत्य स्वतःच्या भाषेत शिकायला आणखी सोपे जाईल. (प्रेषितांची कृत्ये २:६; २२:२) काहींनी अनेक वर्षे बायबलचा अभ्यास केला आहे आणि ख्रिस्ती सभांनाही ते विश्‍वासूपणे उपस्थित राहतात, पण तरीसुद्धा त्यांचे बायबलविषयीचे ज्ञान अद्याप सीमितच आहे. तेव्हा सत्याचा संदेश स्वतःच्या भाषेत मिळावा अशी बऱ्‍याच काळापासून ते प्रार्थना करीत होते.

या आव्हानाला तोंड देण्याकरता, मेक्सिको येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराने, १९९९ साली स्थानिक भाषांतून मंडळीच्या सभा चालवण्याच्या व्यवस्थेस सुरवात केली. यासोबतच भाषांतर गट देखील तयार करण्यात आले. २००० सालापर्यंत, प्रांतीय अधिवेशनातील नाटक प्रथम माया व कालांतराने इतर अनेक भाषांतून सादर करण्यात आले.

यानंतरची पुढची पायरी होती, यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबल अभ्यास सहायक प्रकाशनांचे भाषांतर. प्रथम, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! या माहितीपत्रकाचा व्हॉवे, माया मासातेको, तोतोनाक, त्सेलताल आणि त्सोत्सील या भाषांत अनुवाद करण्यात आला. यानंतर आणखी प्रकाशनांचे भाषांतर झाले, जसे, माया भाषेत आमची राज्य सेवा याची आवृत्ती. काही प्रकाशनांचे ध्वनिफीत रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. स्थानिक जमातींच्या लोकांना स्वतःच्या भाषेत लिहा-वाचायला शिकवण्याकरता, अप्लाय युवरसेल्फ टू रीडिंग ॲन्ड रायटिंग (इंग्रजी) या माहितीपत्रकाचे स्थानिक वापराच्या दृष्टीने रूपांतर केले जात आहे. सध्या १५ स्थानिक भाषांतून बायबल साहित्य निर्माण केले जात आहे आणि आणखी अनेक प्रकाशने उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

“प्रयत्नांची पराकाष्टा”

हे भाषांतर कार्य सोपे नक्कीच नव्हते. पहिले कारण म्हणजे, बायबल साहित्याव्यतिरिक्‍त इतर प्रापंचिक साहित्य मेक्सिकोच्या स्थानिक भाषांतून आजवर फार कमी प्रमाणात निर्माण करण्यात आले आहे. बऱ्‍याचदा, शब्दकोश मिळवणे कठीण होते. भरीस भर म्हणजे यांपैकी काही भाषांच्या आणखी पोटभाषा आहेत. उदाहरणार्थ, झापोटेक भाषेच्या पाच वेगवेगळ्या पोटभाषा आहेत. आणि या एकमेकांपेक्षा इतक्या वेगळ्या आहेत की वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्‍या झापोटेक लोकांना एकमेकांची भाषा समजत नाही.

शिवाय, एखाद्या भाषेचे काही स्थापित नियम नसल्यास भाषांतरकारांना ते स्वतःहून निर्माण करावे लागतात. याकरता बराच अभ्यास आणि विचारविनिमय करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे व्हॉवे भाषांतर गटातील एलीडा हिच्यासारख्याच बऱ्‍याचजणांच्या सुरवातीला भावना होत्या! ती म्हणते, “मेक्सिकोच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात मला भाषांतरांचे काम करण्याकरता निमंत्रित करण्यात आले तेव्हा माझ्या मनात एकाच वेळी दोन भावना होत्या—एकतर आनंद आणि दुसरी भीती.”

भाषांतरकारांना कंप्युटर वापरणे, वेळापत्रकानुसार कार्यनियोजन करणे तसेच भाषांतराचे कौशल्यही शिकून घ्यावे लागले. अर्थात, भाषांतराच्या रूपात त्यांना एक मोठे आव्हान पेलावे लागले आहे. त्यांना याविषयी काय वाटते? माया भाषांतर गटाची एक सदस्या ग्लोरिया म्हणते: “आमच्या स्वतःच्या माया भाषेत बायबलची प्रकाशने भाषांतरीत करण्यात सहभाग घ्यायला मिळाल्याबद्दल आम्हाला किती आनंद वाटतो हे शब्दांत सांगता येणार नाही.” भाषांतर विभागाचे पर्यवेक्षक भाषांतरकारांविषयी आपले मत या शब्दांत व्यक्‍त करतात: “स्वतःच्या भाषेत बायबलची प्रकाशने उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा इतकी प्रबळ आहे की हे ध्येय गाठण्यासाठी ते कोणत्याही आव्हानाशी दोनहात करायला तयार आहेत.” त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत का?

“तुझे शतशः आभार, यहोवा बापा!”

स्थानीय भाषिक क्षेत्रातील कार्यावर यहोवाचा आशीर्वाद असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसून आले आहे. ख्रिस्ती सभा व संमेलनांतील उपस्थितीत बरीच वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, २००१ साली ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकाला मीके भाषा बोलणारे २२३ साक्षीदार उपस्थित होते. पण एकूण उपस्थिती १,६७४ इतकी होती, अर्थात, साक्षीदारांच्या संख्येच्या साडेसात पटीने जास्त!

सत्य स्वीकारणाऱ्‍या काहीजणांना आता अगदी सुरवातीपासूनच ते स्वतःच्या भाषेत शिकून व समजून घेणे शक्य झाले आहे. माया भाषेत सभा घेण्यास सुरवात होण्याआधी, आपली काय परिस्थिती होती याविषयी मीरना सांगते. ती म्हणते, “तीन महिने अभ्यास केल्यानंतर माझा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा घेतला पाहिजे इतकेच मला माहीत होते, पण खरं सांगते, बायबलमधील सत्ये जितकी स्पष्टपणे समजली पाहिजेत तितकी ती मला समजलेली नव्हती. मला वाटतं माझी मूळ भाषा माया असल्यामुळे आणि मला स्पॅनिश तितकी चांगली समजत नसल्यामुळे असं घडलं. सत्याचा खरा अर्थ समजून घेण्याकरता मला काही काळ लागला.” आज ती व तिचे पती माया भाषांतर गटाचे सदस्य आहेत आणि याविषयी त्यांना खूप आनंद वाटतो.

स्वतःच्या भाषेत साहित्य मिळते तेव्हा मंडळीतल्या सर्वांनाच अतिशय आनंद होतो. भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! हे अलीकडेच भाषांतरीत करण्यात आलेले माहितीपत्रक त्सॉत्सीलमध्ये प्रकाशित करण्यात आले तेव्हा ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यास नुकतीच सुरवात केलेल्या एका स्त्रीने ते हृदयाशी कवटाळून म्हटले: “तुझे शतशः आभार, यहोवा बापा!” वृत्तांवरून असे दिसून येते की अनेक बायबल विद्यार्थी आता बाप्तिस्म्यापर्यंत अधिक जलद प्रगती करू लागले आहेत, अक्रियाशील प्रचारक पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि अनेक ख्रिस्ती बांधवांना आता मंडळीतील जबाबदाऱ्‍या हाताळण्यास अधिक आत्मविश्‍वास वाटू लागला आहे. काही घरमालक स्वतःच्या भाषेत प्रकाशने स्वीकारण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास अधिक आनंदाने तयार होतात.

एक साक्षीदार बहीण बायबल अभ्यास घेण्यास एका घरी गेली. पण ती स्त्री काही घरी नव्हती. तिच्या पतीने दार उघडले तेव्हा बहिणीने आपण एका माहितीपत्रकातून काही माहिती वाचून दाखवू इच्छितो असे त्याला म्हटले. तेव्हा त्याने म्हटले, “मला काही नको.” बहिणीने त्याला तोतोनाक भाषेत सांगितले की हे माहितीपत्रक त्यांच्या मातृभाषेत आहे. हे ऐकल्यावर त्या माणसाने एक बाक ओढला व तो त्यावर बसला. बहिण वाचत होती तेव्हा तो वारंवार म्हणत होता, “खरंय. अगदी खरंय.” आता हा माणूस ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागला आहे.

युकातान राज्यात एका साक्षीदार बहिणीचा पती सत्याचा विरोध करायचा आणि कधीकधी ती सभांनंतर घरी परतल्यावर तिला मारायचा देखील. माया भाषेत सभा चालवल्या जाऊ लागल्या तेव्हा तिने त्याला सभांना येण्याचे निमंत्रण देण्याचे ठरवले. तो आला आणि त्याला सभा आवडल्या. आता तो नियमित सभांना येतो, बायबल अभ्यासही करतो; शिवाय, आता तो आपल्या पत्नीला मारत नाही हे अर्थातच वेगळे सांगायला नको.

तोतोनाक भाषा बोलणाऱ्‍या एका माणसाने दोन साक्षीदार बहिणींना, आपण कधीही प्रार्थना करीत नाही असे सांगितले. का, तर एका कॅथलिक पाद्रीने म्हणे एकदा त्याला सांगितले की देव फक्‍त स्पॅनिशमध्ये केलेल्या प्रार्थनाच ऐकतो. तोतोनाक लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी त्याला पाद्रीला पैसे द्यावे लागत. साक्षीदारांनी समजावून सांगितले की देव कोणत्याही भाषेत केलेल्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांनी त्याला तोतोनाक भाषेत एक माहितीपत्रक दिले जे त्याने अतिशय आनंदाने स्वीकारले.—२ इतिहास ६:३२, ३३; स्तोत्र ६५:२.

“कुआल्तसीन ताखतोऊआ”

या सर्व घडामोडींमुळे अनेक राज्य प्रचारक इतके उत्साहित झाले आहेत की ते देखील स्थानिक भाषांपैकी एखादी शिकून घेण्याचा किंवा आधीपासूनच एखादी येत असल्यास तिच्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. उत्तर प्वेबला राज्यातील पाच नाव्हातल भाषिक मंडळ्यांत सेवा करणारे एक विभागीय पर्यवेक्षक अगदी हेच करत आहेत. ते सांगतात: “सभा सुरू असताना सहसा झोपी जाणारी मुले देखील, मी नाव्हातल भाषेत बोलू लागल्यापासून अगदी तल्लख होऊन लक्षपूर्वक ऐकत असतात. एका सभेच्या शेवटी, एका चार वर्षांच्या चिमुकल्याने माझ्याजवळ येऊन म्हटले: ‘कुआल्तसीन ताखतोऊआ’ (तुम्ही छान बोलता). त्याक्षणी, मला माझ्या सर्व प्रयत्नांचे चीज झाल्यासारखे वाटले.”

होय, स्थानीय भाषिक क्षेत्र खरोखर “कापणीसाठी पांढरी” झाली आहेत आणि या कार्यात भाग घेणाऱ्‍या सर्वांना अतिशय उत्तेजन मिळाले आहे. (योहान ४:३५) भाषांतर समूहांचे समायोजन करण्यात सहभाग घेतलेले रोबर्तो म्हणतात: “स्वतःच्या भाषेत सत्याचा संदेश ऐकायला मिळतोय, व त्याचा अचूक अर्थ आपल्याला उमगतोय या भावनेनं हर्षित होऊन आपल्या बांधवांच्या व भगिनींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळताना मी पाहिलेय; खरोखर हा एक अविस्मरणीय अनुभव होता. त्याची आठवण करताना मलाही गहिवरून येतं.” निश्‍चितच, राज्याकरता योग्य भूमिका घेण्यास या प्रामाणिक लोकांना मदत देण्यात आल्यामुळे यहोवाचे मनही आनंदित झाले आहे.—नीतिसूत्रे २७:११.

[१०, ११ पानांवरील चौकट]

भांषांतरकारांपैकी काहींना भेटूया

● “मी अगदी लहान होते तेव्हापासून माझ्या आईवडिलांनी मला सत्याचे शिक्षण दिले. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, मी ११ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी ख्रिस्ती मंडळीशी संबंध तोडला. दोन वर्षांनंतर आमची आई आम्हाला टाकून गेली. तेव्हा मी अद्याप शाळेला जात होते. पण पाच मुलांपैकी सर्वात थोरली असल्यामुळे आईच्या जबाबदाऱ्‍या माझ्यावर आल्या.

“आध्यात्मिक बंधूभगिनींचा आम्हाला प्रेमळ आधार लाभला, पण तरीही जीवन अतिशय कठीण होते. कधीकधी मी विचार करायचे: ‘आपल्याच जीवनात असं का घडावं? तेसुद्धा इतक्या लहान वयात!’ यहोवाच्या मदतीनेच मी ते सगळं सोसलं. उच्च माध्यमिक शाळेतून उत्तीर्ण झाल्यावर मी पूर्णवेळेची सेवा सुरू केली आणि यामुळे मला खूप मदत झाली. नाव्हातल भाषांतर गटाची स्थापना झाली तेव्हा मला त्याची सदस्या होण्याचं निमंत्रण देण्यात आलं.

“आता माझे वडील मंडळीत परतले आहेत आणि माझी लहान भावंडं यहोवाची सेवा करत आहेत. यहोवाला विश्‍वासू राहिल्याचं उत्तम प्रतिफळ मला मिळालं आहे. त्यानं माझ्या कुटुंबावर अनेक आशीर्वादांचा वर्षाव केला आहे.”—आलीसिया.

● “एकदा माझ्या वर्गातल्या एका साक्षीदार मुलीने जीवनाच्या उगमाविषयी भाषण दिले. पण मी त्या वर्गाला उपस्थित राहू शकले नाही. पण परीक्षेत तोच प्रश्‍न आला तर पंचाईत होईल, म्हणून मी तिला तो विषय मला समजावून सांगण्याची विनंती केली. लोक का मरतात हा प्रश्‍न बऱ्‍याच काळापासून माझ्या मनात होता. तिने मला निर्मिती पुस्तक * दिले आणि बायबल अभ्यास करण्याविषयी विचारले तेव्हा मी आनंदाने तयार झाले. निर्माणकर्त्याचा उद्देश व त्याची प्रीती याविषयी जाणून मला मनापासून आनंद झाला.

“माझे शालेय शिक्षण संपल्यावर मला स्पॅनिश व त्सॉत्सील या भाषांचा दुभाषिक शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण यासाठी मला दुसऱ्‍या गावी जावे लागत होते; शिवाय, शनिवार रविवारीही वर्ग घ्यायचे, म्हणजे ख्रिस्ती सभा बुडवणं आलं. म्हणून मी त्याऐवजी गवंडीकाम करू लागलो. माझे वडील साक्षीदार नव्हते. त्यांना माझा हा निर्णय मुळीच पसंत पडला नाही. नंतर मी पायनियर सेवा करत असताना त्सॉत्सील भाषेत बायबलचे साहित्य भाषांतरीत करण्याकरता भाषांतर गट निर्माण करण्यात आला. मला त्यात सहभागी झाल्याशिवाय राहावले नाही.

“स्वतःच्या भाषेत प्रकाशने मिळतात तेव्हा आपली कदर केली जाते, आपला आदर केला जातो असे बंधूभगिनींना वाटते. यामुळे हे काम अतिशय समाधानदायक आहे. मला या कार्यात सहभाग घ्यायला मिळाला हा मी एक बहुमान समजतो.”—अम्बर्टो.

● “मी सहा वर्षांची असताना, आई आम्हाला टाकून गेली. माझ्या वडिलांनी मी किशोरवयात असताना यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्यास सुरवात केली. एके दिवशी एका बहिणीने, मलाही बायबल अभ्यास करायला आवडेल का असं विचारलं. या अभ्यासात तरुणांसाठी विशेष सल्ला असेल असंही तिनं सांगितलं. तरुण वयात आईची सावली नसलेल्या माझ्यासारख्या मुलीसाठी हा अभ्यास अत्यंत उपयोगी ठरेल असं मला वाटलं. १५ व्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला.

“१९९९ साली, माझ्या वडिलांच्या जमिनीवर डोळा असलेल्या काही दुष्ट नराधमांनी त्यांचा खून केला. माझ्यावर आभाळ कोसळलं. मी इतकी विषण्ण झाले की आता आपण फार दिवस जिवंत राहणार नाही असं मला वाटू लागलं. पण मी सतत यहोवाला प्रार्थना करून ताकद मागत राहिले. प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीने माझे खूप सांत्वन केले. लवकरच मी सामान्य पायनियर बनले.

“एकदा सभेत, तोतोनाक भाषेत २० मिनिटांचे एक भाषण ऐकायला सहा तास पायी चालून आलेल्या काहीजणांना मी पाहिलं. सभेचे बाकीचे भाग स्पॅनिशमध्ये होते, जी त्यांना समजत नव्हती. त्यामुळे, तोतोनाक भाषेत बायबल प्रकाशनांच्या भाषांतरात मदत करण्याकरता मला निमंत्रित करण्यात आलं तेव्हा मला खूप आनंद झाला.

“मी माझ्या वडिलांना नेहमी म्हणायचे की यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरात सेवा करण्याचं माझं स्वप्न आहे. पण माझ्या वयाच्या अविवाहित मुलीनं हे स्वप्न न पाहिलेलंच बरं असं ते मला म्हणायचे. पुनरुत्थानात ते परत येतील तेव्हा, माझं स्वप्न पूर्ण झालं आणि आमच्या स्वतःच्या भाषेत बायबल प्रकाशनांच्या भाषांतरात मी सहभाग घेऊ शकले हे त्यांना समजेल तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही!”—एडीत.

[तळटीप]

^ परि. 28 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे १९८५ साली प्रकाशित जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी)

[९ पानांवरील चित्र]

त्सॉत्सील भांषांतर गटाचे सदस्य एका कठीण शब्दाचे कसे भाषांतर करता येईल याविषयी चर्चा करताना