व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असा

यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असा

यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असा

“सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” मत्तय २४:४४.

१. यहोवाच्या दिवसाकडे लक्ष देण्याची गरज का आहे?

तो दिवस लढाईचा व संतापाचा दिवस असेल, क्लेशाचा व दुःखाचा दिवस असेल, अंधकाराचा व उजाडीचा दिवस असेल. नोहाच्या काळातील दुष्ट जग ज्याप्रमाणे जलप्रलयात बुडाले त्याचप्रमाणे यहोवाचा “महान व भयंकर दिवस” या दुष्ट व्यवस्थीकरणावर आल्याशिवाय राहणार नाही. त्यातून सुटका नाही. पण “जो कोणी परमेश्‍वराचा धावा करील तो तरेल.” (योएल २:३०-३२; आमोस ५:१८-२०) देव आपल्या शत्रूंचा नाश करेल व आपल्या लोकांचा बचाव करेल. संदेष्टा सफन्या काळाची निकड ओळखून लिहितो: “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” (सफन्या १:१४) पण देवाचा हा न्यायदंड केव्हा बजावण्यात येईल?

२, ३. यहोवाच्या दिवसाकरता स्वतःला सिद्ध करणे का अत्यावश्‍यक आहे?

येशूने म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) आपल्याला नेमकी वेळ ठाऊक नसल्यामुळे वर्ष २००४ च्या वार्षिक वचनाच्या या शब्दांकडे लक्ष देणे अत्यावश्‍यक आहे: “जागृत राहा . . . सिद्ध असा.”—मत्तय २४:४२, ४४.

जे सिद्ध असतील त्यांना किती अकस्मात बचावाकरता निवडले जाईल पण इतरांना सोडून दिले जाईल हे येशूने आपल्या पुढील शब्दांत सूचित केले: “त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.” (मत्तय २४:४०, ४१) त्या आणीबाणीच्या घटकेला आपली वैयक्‍तिक स्थिती काय असेल? आपण सिद्ध असू का की ध्यानीमनी नसताना, तो दिवस आपल्यावर अचानक येईल? आज आपण कोणती पावले उचलतो यावर बरेच काही अवलंबून आहे. यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असण्याकरता सध्याच्या काळात प्रचलित असलेली एक विशिष्ट मनोवृत्ती टाळणे, एका विशिष्ट आध्यात्मिक स्थितीत न येण्याचा प्रयत्न करणे आणि विशिष्ट जीवनशैलींचा धिक्कार करणे आवश्‍यक आहे.

आत्मसंतुष्ट मनोवृत्ती टाळा

४. नोहाच्या काळातील लोकांची मनोवृत्ती कशी होती?

नोहाच्या काळाचा विचार करा. बायबल सांगते: “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्‍त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्‍वासाने तारू तयार केले; त्या विश्‍वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले, आणि विश्‍वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.” (इब्री लोकांस ११:७) तारू नक्कीच असामान्य आणि उठून दिसणारे असेल. शिवाय, नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता. (२ पेत्र २:५) पण या दोन्ही गोष्टींनी, अर्थात नोहाच्या बांधकामाने किंवा त्याच्या प्रचारानेही त्याच्या काळातील लोकांना कृती करण्यास प्रवृत्त केले नाही. का? कारण ते “खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते.” नोहाने ज्यांना प्रचार केला ते लोक वैयक्‍तिक कार्यांत व आपल्या सुखासमाधानात इतके लवलीन होते की “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी लक्ष दिले नाही.”—मत्तय २४:३८, ३९, NW.

५. लोटाच्या काळात सदोमच्या रहिवाशांची कशी वृत्ती होती?

लोटाच्या काळातही हीच गत होती. शास्त्रवचने आपल्याला सांगतात: “ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधीत होते; परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नि व गंधक ह्‍यांची वृष्टि होऊन सर्वांचा नाश झाला.” (लूक १७:२८, २९) देवदूतांनी लोटाला येणाऱ्‍या नाशाची सूचना दिली तेव्हा त्याने लोटाच्या जावयांना देखील काय घडणार आहे याविषयी सांगितले. पण त्यांना मात्र “तो केवळ गंमत करीत आहेसे भासले.”—उत्पत्ति १९:१४.

६. कशाप्रकारची मनोवृत्ती आपण टाळली पाहिजे?

नोहाच्या व लोटाच्या काळाप्रमाणेच “मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल,” असे येशूने म्हटले. (मत्तय २४:३९; लूक १७:३०) खरोखर आजच्या काळातील बऱ्‍याच लोकांची अशीच आत्मसंतुष्ट मनोवृत्ती आहे. या मनोवृत्तीचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून आपण सावध राहिले पाहिजे. स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेणे आणि माफक प्रमाणात मद्यपान करणे यात काही गैर नाही. त्याचप्रकारे विवाह देवाने केलेली एक व्यवस्था आहे. पण या गोष्टी आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या होऊन, त्यांमुळे आपण आध्यात्मिक कार्यांना एकीकडे सारल्यास, यहोवाच्या महाभयंकर दिवसाकरता आपण वैयक्‍तिकरित्या सिद्ध आहोत असे म्हणता येईल का?

७. कोणतेही मोठे कार्य हाती घेण्याआधी आपण स्वतःला कोणता महत्त्वपूर्ण प्रश्‍न विचारला पाहिजे आणि का?

प्रेषित पौलाने म्हटले: “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे. ह्‍यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्‍यापुढे ती नसल्यासारखे असावे.” (१ करिंथकर ७:२९-३१) देवाने आपल्यावर सोपवलेले राज्य प्रचाराचे कार्य संपवण्याकरता केवळ एक मर्यादित वेळ उरला आहे. (मत्तय २४:१४) पौल विवाहित असणाऱ्‍यांनाही सल्ला देतो की त्यांनी आपल्या जोडीदारात इतके रममाण होऊ नये की ज्यामुळे राज्याच्या कार्यांना त्यांच्या जीवनात दुय्यम स्थान मिळेल. पौलाने जी मनोभूमिका बाळगण्याची शिफारस केली ती आत्मसंतुष्ट मनोवृत्तीच्या अगदीच उलट आहे हे स्पष्ट आहे. येशूने म्हटले: “पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्तय ६:३३) कोणताही निर्णय घेण्याआधी, किंवा कोणतेही मोठे कार्य हाती घेण्याआधी स्वतःला विचारण्याजोगा महत्त्वपूर्ण प्रश्‍न हा आहे: ‘राज्याला माझ्या जीवनात प्राधान्य देण्यावर याचा कसा परिणाम होईल?’

८. जीवनातल्या दैनंदिन गोष्टींत जर आपण पूर्णपणे गुरफटलेले असू तर आपण काय केले पाहिजे?

पण आधीच जर आपण दैनंदिन कार्यात पूर्णपणे गुरफटलेले असू, इतके की आध्यात्मिक कार्यांसाठी आपल्याला वेळच उरत नाही, तर काय? आपल्या जीवनशैलीत आणि आपले शेजारी ज्यांना शास्त्रवचनांचे अचूक ज्ञान नाही व जे राज्याचे उद्‌घोषक नाहीत त्यांच्या जीवनशैलीत फार कमी फरक आहे का? जर असे असेल तर आपण याविषयी प्रार्थना केली पाहिजे. यहोवा आपल्याला योग्य मनोवृत्ती राखण्यास मदत करू शकतो. (रोमकर १५:५; फिलिप्पैकर ३:१५) तो आपल्याला राज्याच्या कार्यांना प्राधान्य देण्यास, जे योग्य ते करण्यास आणि त्याच्याप्रती आपले कर्तव्य पूर्ण करण्यास मदत करू शकतो.—रोमकर १२:२; २ करिंथकर १३:७.

आध्यात्मिक आळस झटकून टाका

९. प्रकटीकरण १६:१४-१६ यानुसार आध्यात्मिक आळस झटकून टाकणे का महत्त्वाचे आहे?

‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईविषयी’ अर्थात हर्मगिदोनाविषयी सांगणाऱ्‍या भविष्यवाणीतच असा इशारा देण्यात आला आहे की काहीजण जागृत राहणार नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो: “जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य.” (प्रकटीकरण १६:१४-१६) येथे उल्लेख केलेली वस्त्रे म्हणजे यहोवाचे ख्रिस्ती साक्षीदार म्हणून आपली ओळखचिन्हे. यात राज्य प्रचारक या नात्याने आपल्या कार्याचा आणि आपल्या ख्रिस्ती आचरणाचा समावेश आहे. जर आपण आळशी व अक्रियाशील झालो तर आपली ख्रिस्ती ओळख आपण गमावून बसू. हे लज्जास्पद आणि धोकेदायक आहे. म्हणूनच आपण आध्यात्मिक आळस अथवा मरगळ झटकून टाकली पाहिजे. हे आपण कसे करू शकतो?

१०. दररोज बायबल वाचणे आपल्याला आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?

१० बायबल आपल्याला वारंवार, जागृत राहण्याच्या व सावध राहण्याच्या महत्त्वाविषयी सांगते. उदाहरणार्थ, शुभवर्तमान वृत्तांत आपल्याला आठवण करून देण्यात आली आहे: “जागृत राहा” (मत्तय २४:४२; २५:१३; मार्क १३:३५, ३७); “सिद्ध असा” (मत्तय २४:४४; लूक १२:४०); “सावध असा, जागृत राहा” (मार्क १३:३३). यहोवाचा दिवस या जगावर अकस्मात येईल हे सांगितल्यावर प्रेषित पौलाने सह विश्‍वासू बांधवांना असा आग्रह केला: “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:६) बायबलच्या शेवटल्या पुस्तकात गौरवान्वित ख्रिस्त येशूने आपल्या अचानक येण्याविषयी जोर देऊन म्हटले: “मी लवकर येतो.” (प्रकटीकरण ३:११; २२:७, १२, २०) बऱ्‍याच इब्री संदेष्ट्यांनी देखील यहोवाच्या न्यायाच्या महान दिवसाविषयी वर्णन केले व त्याविषयी इशारा दिला. (यशया २:१२, १७; यिर्मया ३०:७; योएल २:११; सफन्या ३:८) देवाचे वचन, बायबल दररोज वाचणे व वाचलेल्या भागावर मनन करणे आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याकरता बऱ्‍याच प्रमाणात सहायक ठरू शकते.

११. आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याकरता वैयक्‍तिक बायबल अभ्यास का महत्त्वाचा आहे?

११ खरोखरच, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या बायबल आधारित प्रकाशनांच्या साहाय्याने शास्त्रवचनांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केल्याने आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याची आपल्याला किती जोरदार प्रेरणा मिळते! (मत्तय २४:४५-४७) वैयक्‍तिक अभ्यास फायदेकारक ठरण्याकरता तो प्रगतीशील व नियमित असला पाहिजे. (इब्री लोकांस ५:१४–६:३) आपण आधात्मिक जडान्‍न नियमितरित्या घेतले पाहिजे. सध्याच्या या काळात वैयक्‍तिक अभ्यासाकरता वेळ मिळणे अतिशय कठीण वाटू शकते. (इफिसकर ५:१५, १६) पण केवळ वेळ मिळेल तेव्हा बायबल व शास्त्रवचनीय प्रकाशने वाचणे पुरेसे नाही. “विश्‍वासात खंबीर” राहण्याकरता आणि जागृत राहण्याकरता नियमित वैयक्‍तिक अभ्यास अत्यावश्‍यक आहे.—तीत १:१४.

१२. ख्रिस्ती सभा, संमेलने व अधिवेशने आपल्याला आध्यात्मिक आळस झटकून टाकण्याकरता कशी मदत करतात?

१२ ख्रिस्ती सभा, संमेलने व अधिवेशने देखील आपल्याला आध्यात्मिक आळस झटकून टाकण्याकरता मदत करतात. कशाप्रकारे? तेथे आपल्याला मिळणाऱ्‍या शिक्षणाद्वारे. या सभांमधून आपल्याला यहोवाचा दिवस किती जवळ आला आहे याविषयी वारंवार आठवण करून दिली जात नाही का? दर आठवड्याला होणाऱ्‍या ख्रिस्ती सभा ‘एकमेकांना प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन’ देण्याचीही संधी देतात. एकमेकांना अशाप्रकारे उत्तेजन दिल्यामुळे आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास मदत मिळते. म्हणूनच तर “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते” तसतसे अधिक नियमितरित्या एकत्र या असे आपल्याला सांगण्यात आले आहे.—इब्री लोकांस १०:२४, २५.

१३. ख्रिस्ती सेवाकार्य आपल्याला आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याकरता कशाप्रकारे मदत करते?

१३ आपण ख्रिस्ती सेवाकार्यात मनःपूर्वक सहभाग घेतो तेव्हा देखील आपल्याला जागृत राहण्यास मदत मिळते. या काळाची लक्षणे आणि त्यांचा अर्थ मनात ताजा ठेवण्यासाठी इतरांशी याविषयी बोलण्यापेक्षा चांगला मार्ग आणखी कोणता असू शकतो? आणि आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्यांना प्रगती करताना आणि शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागताना आपण पाहतो तेव्हा आपली निकडीची भावना देखील अधिक तीव्र होते. प्रेषित पेत्राने म्हटले: ‘आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहा.’ (१ पेत्र १:१३) आध्यात्मिक आळस दूर करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” असणे.—१ करिंथकर १५:५८.

आध्यात्मिकरित्या हानीकारक अशी जीवनशैली टाळा

१४. लूक २१:३४-३६ यात वर्णन केल्याप्रमाणे येशूने कशाप्रकारच्या जीवनशैलींविषयी इशारा दिला?

१४ आपल्या उपस्थितीच्या महान भविष्यवाणीत येशूने आणखी एक सूचना दिली. त्याने म्हटले: “संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.” (लूक २१:३४-३६) लोक सर्वसामान्यपणे कोणत्या प्रकारच्या जीवनशैली जोपासतात याचे येशूने अचूक वर्णन केले: खाण्यापिण्यात अतिरेक, दारूबाजी आणि चिंता वाढतील अशाप्रकारची राहणी.

१५. खाण्यापिण्याचा अतिरेक आपण का टाळला पाहिजे?

१५ खाण्यापिण्यात अतिरेक आणि दारूबाजी बायबलच्या तत्त्वांशी सुसंगत नसल्यामुळे अशाप्रकारची जीवनशैली टाळणेच योग्य आहे. बायबल म्हणते: “मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्‍यास उभा राहू नको.” (नीतिसूत्रे २३:२०) पण या पातळीला गेल्यावरच खाण्यापिण्यामुळे धोका संभवतो असे नाही. त्याआधीही या गोष्टी एका व्यक्‍तीला आळशी व सुस्त बनवू शकतात. बायबलचे एक नीतिसूत्र म्हणते: “आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही.” (नीतिसूत्रे १३:४) अशाप्रकारची व्यक्‍ती देवाची इच्छा पूर्ण करण्यास उत्सुक असते पण निष्काळजीपणामुळे तिची ही इच्छा अपूर्णच राहते.

१६. आपल्या कुटुंबाविषयीच्या चिंतांमुळे खचून जाण्याचे आपण कसे टाळू शकतो?

१६ येशूने ज्यांच्याविषयी इशारा दिला त्या जीवनाच्या चिंता कोणत्या असू शकतात? या वैयक्‍तिक विवंचना, कौटुंबिक जबाबदाऱ्‍या व यांसारख्या इतर गोष्टींविषयीच्या चिंता असू शकतात. या चिंतांमुळे खचून जाणे किती अविचारीपणाचे आहे! येशूने म्हटले: “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?” त्याने आपल्या श्रोत्यांना निक्षून सांगितले: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” राज्याच्या कार्यांना जीवनात प्राधान्य देऊन यहोवा आपल्या गरजा पुरवेल याची खात्री बाळगल्यास आपोआपच आपल्या चिंता नियंत्रणात राहतील आणि आपल्याला जागृत राहण्यास मदत मिळेल.—मत्तय ६:२५-३४.

१७. भौतिक गोष्टींच्या मागे लागल्यामुळे चिंतांमध्ये कशाप्रकारे भर पडू शकते?

१७ भौतिक गोष्टींच्या मागे लागल्यामुळेही चिंता वाढतात. उदाहरणार्थ काहीजण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्चिक राहणीमान ठेवून आपल्या समस्या वाढवतात. इतरजण झटपट श्रीमंत होण्याच्या नाना स्कीम्समध्ये आणि जोखीम असलेल्या योजनांमध्ये पैसा गुंतवण्याच्या मोहात पडतात. इतरजणांकरता प्रापंचिक शिक्षण मिळवून आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्याची इच्छा एक पाश ठरते. विशिष्ट प्रमाणात शिक्षण घेणे हे नोकरी मिळवण्याकरता आवश्‍यक आहे यात शंका नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे, की उच्च शिक्षण घेण्याच्या वेळखाऊ ध्येयाच्या मागे लागून काहींनी स्वतःची आध्यात्मिक हानी करून घेतली आहे. यहोवाचा दिवस जवळ येत असताना अशा परिस्थितीत स्वतःला आणणे किती धोकेदायक आहे! बायबल बजावून सांगते: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.”—१ तीमथ्य ६:९.

१८. भौतिकवादी जीवनशैलीच्या मागे लागण्याचा पाश टाळण्याकरता आपण काय करण्यास शिकले पाहिजे?

१८ भौतिकवादी जीवनशैलीच्या पाशात पडण्याचे टाळायचे असेल तर सर्वप्रथम निर्णय घेताना योग्य काय व अयोग्य काय यात फरक करायला शिकणे आवश्‍यक आहे. हे शिकण्याकरता ‘प्रौढांसाठी असलेले जड अन्‍न’ नियमितरित्या घेणे आणि ‘वहिवाटीने ज्ञानेंद्रियांना सराव’ देणे गरजेचे आहे. (इब्री लोकांस ५:१३, १४) तसेच जीवनात कशास प्राधान्य द्यावे हे ठरवताना “जे श्रेष्ठ” ते पसंत केल्यामुळेही अयोग्य निर्णय घेण्यापासून आपला बचाव होईल.—फिलिप्पैकर १:१०.

१९. आध्यात्मिक गोष्टींकरता आपल्याजवळ फारच कमी वेळ आहे असे दिसून आल्यास आपण काय केले पाहिजे?

१९ भौतिकवादी जीवनशैली आपल्याला अंधळे बनवू शकते, जेणेकरून आपल्याला आध्यात्मिक ध्येयांकरता थोडाही वेळ मिळणार नाही. आपण स्वतःचे परीक्षण करून अशाप्रकारच्या जीवनशैलीच्या पाशात पडण्याचे कसे टाळू शकतो? यासाठी, आपले जीवन आपण कसे आणि कितपत साधे ठेवू शकतो याविषयी प्रार्थनापूर्वक विचार करणे गरजेचे आहे. प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने म्हटले: “कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.” (उपदेशक ५:१२) अनावश्‍यक भौतिक वस्तूंची काळजी घेण्यात आपला बराच वेळ व शक्‍ती वाया जात आहे का? आपल्याजवळ जितक्या अधिक वस्तू असतील तितकाच त्या सुस्थितीत ठेवण्याचा, विम्याचे हफ्ते भरण्याचा व त्या वस्तू सुरक्षित ठेवण्याचा त्रास वाढतो. विशिष्ट वस्तूंपासून स्वतःला मोकळे करून आपले जीवन साधे ठेवल्यास आपला फायदा होऊ शकेल का?

सर्व प्रकारे सिद्ध असा

२०, २१. (अ) प्रेषित पेत्र यहोवाच्या दिवसासंबंधाने काय आश्‍वासन देतो? (ब) यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध राहण्याकरता आपण काय करत राहिले पाहिजे?

२० नोहाच्या काळातील जगासाठी उरलेला वेळ एके दिवशी संपला तसाच सध्याच्या व्यवस्थीकरणाचा उरलेला वेळही लवकरच संपेल. प्रेषित पेत्र आपल्याला आश्‍वासन देतो: “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” देवाच्या जळजळत्या क्रोधाच्या अग्नीतून लाक्षणिक स्वर्ग, अर्थात दुष्ट सरकारे किंवा लाक्षणिक पृथ्वी, अर्थात, देवापासून दुरावलेला मानव समाज दोन्ही बचावू शकणार नाहीत. त्या दिवसाकरता आपण स्वतःला कसे सिद्ध करू शकतो हे पेत्राने सूचित केले: “ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”—२ पेत्र ३:१०-१२.

२१ ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहणे आणि सुवार्तेच्या प्रचारकार्यात सहभाग घेणे, हे पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहण्यात समाविष्ट आहे. यहोवाच्या महान दिवसाची धीराने वाट पाहत असता, ही पवित्र कृत्ये आपण देवाबद्दल मनःपूर्वक भक्‍तिभाव बाळगून करत राहू या. “त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून [आपण] होईल तितके प्रयत्न [करू या.]”—२ पेत्र ३:१४.

तुम्हाला आठवते का?

• आपण यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध का असावे?

• जीवनातल्या सामान्य गोष्टी जर आपला सर्व वेळ घेत असतील तर आपण काय करावे?

• आध्यात्मिक आळस झटकून टाकण्याकरता आपल्याला कशामुळे मदत होईल?

• आपण कोणत्या हानीकारक जीवनशैली टाळाव्यात आणि आपल्याला हे कसे करता येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२०, २१ पानांवरील चित्रे]

नोहाच्या काळातील लोकांनी येणाऱ्‍या नाशाकडे लक्ष दिले नाही —तुम्ही देता का?

[२३ पानांवरील चित्र]

आध्यात्मिक ध्येयांकरता अधिक वेळ मिळावा म्हणून तुम्ही आपले जीवन साधे करू शकता का?