सत्याच्या देवाचे अनुकरण करणे

सत्याच्या देवाचे अनुकरण करणे

सत्याच्या देवाचे अनुकरण करणे

“देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.”इफिसकर ५:१.

१. काहीजण सत्याविषयी काय मानतात आणि त्यांचा युक्‍तिवाद खरा का नाही?

“सत्य काय आहे?” (योहान १८:३८) जवळजवळ २००० वर्षांपूर्वी पंतय पिलाताने उपरोधाने विचारलेला तो प्रश्‍न असे सूचित करतो की सत्याचा शोध घेणे अतिशय कठीण आहे. आज बरेच लोक या गोष्टीशी सहमत होतील. सत्याच्या मूळ स्वरूपावर आघात होत आहे. तुम्ही लोकांना कदाचित असे म्हणताना ऐकले असेल, की प्रत्येक जणाच्या नजरेत सत्य वेगळे असते, किंवा सत्य सापेक्ष आहे ते सतत बदलत असते. अशाप्रकारचा युक्‍तिवाद खरा नाही. संशोधन व शिक्षण यांचा मूळ उद्देशच आपण राहत असलेल्या या जगाबद्दलची वस्तूस्थिती, सत्य जाणून घेणे हा आहे. सत्य हा वैयक्‍तिक मताचा प्रश्‍न नाही. उदाहरणार्थ, आत्मा एकतर अमर असेल किंवा तो नसेल. सैतान अस्तित्वात असेल किंवा नसेल. जीवनाला उद्देश असेल किंवा नसेल. या प्रत्येक बाबतीत केवळ एकच उत्तर बरोबर असू शकते. एक खरे असेल आणि दुसरे खोटे; दोन्ही खरे असणे शक्य नाही.

२. यहोवा कोणत्या अर्थाने सत्याचा देव आहे, आणि आता आपण कोणते प्रश्‍न पाहणार आहोत?

याआधीच्या लेखात आपण पाहिले की यहोवा सत्याचा देव आहे. त्याला सर्व गोष्टींविषयीचे सत्य ठाऊक आहे. आपला कपटी शत्रू दियाबल सैतान याच्या अगदी विरोधात यहोवा नेहमी सत्यवादी असतो. एवढेच नाही, तर यहोवा मोठ्या मनाने इतरांनाही सत्य प्रकट करतो. प्रेषित पौलाने सहख्रिस्ती बांधवांना असा आग्रह केला की, “देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ५:१) यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण सत्य बोलण्यात व त्यानुसार जगण्यात त्याचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतो? असे करणे महत्त्वाचे का आहे? आणि जे सत्यवादी मार्गाने चालतात त्यांना यहोवाची संमती मिळते असे आपण खात्रीने का म्हणू शकतो? पाहू या.

३, ४. प्रेषित पौल व पेत्र यांनी “शेवटल्या काळी” काय घडेल याविषयी कसे वर्णन केले?

आपण अशा युगात राहतो जेथे धार्मिक असत्य प्रचुर प्रमाणात आहे. प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने भाकीत केल्याप्रमाणे आजच्या ‘शेवटल्या काळात’ अनेक लोक भक्‍तिभावाचा केवळ दिखावा करतात पण त्यानुसार वागत नाहीत. काही सत्याचा विरोध करतात; ते ‘भ्रष्टबुद्धीचे’ बनतात. शिवाय, ‘दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतात.’ हे लोक सतत शिकत असूनही, ते कधीही ‘सत्याच्या ज्ञानाप्रत पोचत नाहीत.’—२ तीमथ्य ३:१, ५, ७, ८, १३.

प्रेषित पेत्रालाही शेवटल्या काळाविषयी लिहिण्यास प्रेरित करण्यात आले होते. त्याने भाकीत केल्याप्रमाणे लोक केवळ सत्याचा अव्हेर करत नाहीत तर ते देवाच्या वचनाची व जे त्यातील सत्य घोषित करतात त्यांची थट्टा करतात. हे थट्टा करणारे एका गोष्टीकडे “बुद्धिपुरस्सर” दुर्लक्ष करतात, ती अशी, की नोहाच्या काळातील जगाचा पाण्याने नाश झाला होता व ही गोष्ट भविष्यातील न्यायाच्या दिवसाकरता एक नमुना होती. अशा या विचारसरणीमुळे, अभक्‍तांचा नाश करण्याची देवाची वेळ येईल तेव्हा ते अशा या विचारसरणीमुळे स्वतःवर संकट ओढवतील.—२ पेत्र ३:३-७.

यहोवाचे सेवक सत्य जाणतात

५. संदेष्टा दानीएल याने सांगितल्यानुसार, ‘अंतसमयात’ काय घडेल आणि ही भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण झाली आहे?

‘अंतसमयाचे’ वर्णन करताना संदेष्टा दानीएल याने देवाच्या लोकांमध्ये घडणाऱ्‍या एका अतिशय वेगळ्या घडामोडीविषयी सांगितले—धार्मिक सत्याचे पुनरुज्जीवन. त्याने लिहिले: “पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व [“खऱ्‍या ज्ञानाची,” NW] ज्ञानवृद्धि होईल.” (दानीएल १२:४) यहोवाचे लोक सर्वात मोठ्या ठकाच्या फसवणुकीला बळी पडून गोंधळात पडत नाहीत. बायबलच्या पानांत शोध करण्याद्वारे त्यांनी खरे ज्ञान आत्मसात केले आहे. पहिल्या शतकात, येशूने आपल्या शिष्यांना ज्ञानाची ज्योती दिली. “त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले.” (लूक २४:४५) आपल्या काळात, यहोवाने अशाचप्रकारे कार्य केले आहे. आपल्या वचनाच्या, पवित्र आत्म्याच्या व संस्थेच्या माध्यमाने त्याने सबंध पृथ्वीवरील लाखो लोकांना त्याच्याजवळ जे आधीपासूनच आहे अर्थात सत्य जाणून घेण्यास मदत केली आहे.

६. आज देवाचे लोक बायबलच्या सत्यांविषयी काय जाणतात?

देवाचे लोक या नात्याने आपल्याला अशा अनेक गोष्टी समजल्या आहेत ज्या अन्यथा आपल्याला कधीही समजल्या नसत्या. जगाच्या दृष्टीने ज्ञानी असलेल्या लोकांनी हजारो वर्षांपासून ज्या प्रश्‍नांची उत्तरे शोधली आहेत त्यांची उत्तरे आपल्याला ठाऊक आहेत. उदाहरणार्थ, दुःख का अस्तित्वात आहे, लोक का मरतात, आणि मनुष्याच्या प्रयत्नांनी जागतिक शांती व एकता का येऊ शकत नाही हे आपल्याला माहीत आहे. तसेच भविष्यात काय घडणार आहे याचीही झलक आपल्याला मिळाली आहे. अर्थात, देवाचे राज्य, परादीस पृथ्वी आणि परिपूर्ण सार्वकालिक जीवन. आपल्याला सर्वश्रेष्ठ देव यहोवा याचीही ओळख घडली आहे. त्याच्या सौहार्द व्यक्‍तिमत्त्वाविषयी आणि त्याच्या आशीर्वादांचा उपभोग घेण्याकरता आपल्याला काय केले पाहिजे हेही आपल्याला शिकायला मिळाले आहे. सत्याचे ज्ञान घेतल्यामुळे कोणती गोष्ट असत्य आहे हे आपल्याला लगेच ओळखता येते. सत्याचे पालन केल्यामुळे व्यर्थ ध्येयांच्या मागे लागण्यापासून आपले संरक्षण होते आणि यामुळे आपण जीवनाचा पूर्ण उपभोग घेऊन भविष्याची अद्‌भुत आशा बाळगू शकतो.

७. बायबलची सत्ये कोणाला समजू शकतात व कोणाला ती समजू शकत नाहीत?

बायबलचे सत्य तुम्हाला समजले आहे का? असल्यास, तुम्हाला एक महान आशीर्वाद प्राप्त झाला आहे. एखादा लेखक जेव्हा एखादे पुस्तक लिहितो तेव्हा सहसा एका विशिष्ट गटाला ते पुस्तक आवडेल अशारितीने तो ते लिहितो. काही पुस्तके उच्चशिक्षित लोकांसाठी, काही मुलांसाठी तर काही विशिष्ट क्षेत्रांसाठी लिहिली जातात. बायबल सर्वांना सहज उपलब्ध असूनही ते केवळ एका विशिष्ट लोकसमूहाला समजेल व तेच त्याचा आनंद घेऊ शकतील अशाप्रकारे तयार करण्यात आले आहे. यहोवाने ते पृथ्वीच्या नम्र, लीन लोकांकरता रचले आहे. हे लोक बायबलचा अर्थ समजू शकतात, मग त्यांचे शिक्षण, संस्कृती, सामाजिक स्थिती किंवा जात कोणतीही असो. (१ तीमथ्य २:३, ४) दुसरीकडे पाहता, ज्यांची योग्य मनोवृत्ती नाही, मग ते कितीही बुद्धिमान किंवा सुशिक्षित असले तरी, त्यांना बायबलचे सत्य मिळू शकत नाही. अहंकारी, गर्विष्ठ लोक देवाच्या वचनातील सत्य समजू शकत नाहीत. (मत्तय १३:११-१५; लूक १०:२१; प्रेषितांची कृत्ये १३:४८) केवळ देवच असे अद्‌भुत पुस्तक अस्तित्वात आणू शकतो.

यहोवाचे सेवक सत्यवादी आहेत

८. येशू सत्याचे मूर्त स्वरूप कशाप्रकारे ठरला?

यहोवाप्रमाणेच त्याचे विश्‍वासू साक्षीदार देखील सत्यवादी आहेत. यहोवाचा सर्वथोर साक्षीदार येशू ख्रिस्त याने आपल्या शिकवणुकींद्वारे तसेच तो ज्याप्रकारे जगला व मृत्यू पावला त्याद्वारे सत्याला पुष्टी दिली. त्याने यहोवाचे वचन व त्याच्या प्रतिज्ञांचे समर्थन केले. यामुळे येशू, त्याने स्वतःच सांगितल्याप्रमाणे, सत्याचे मूर्त स्वरूप ठरला.—योहान १४:६; प्रकटीकरण ३:१४; १९:१०.

९. शास्त्रवचनांत सत्य बोलण्याविषयी काय सांगण्यात आले आहे?

येशू “अनुग्रह व सत्य ह्‍यांनी परिपूर्ण” होता आणि “त्याच्या मुखात काही कपट नव्हते.” (योहान १:१४; यशया ५३:९) इतरांशी सत्यशीलपणे वागण्याच्या येशूच्या आदर्शाचे खरे ख्रिस्ती देखील अनुकरण करतात. पौलाने सहविश्‍वासू बांधवांना असे मार्गदर्शन केले: “लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहो.” (इफिसकर ४:२५) याआधी संदेष्टा जखऱ्‍या याने लिहिले: “आपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला.” (जखऱ्‍या ८:१६) ख्रिस्ती सत्यवादी आहेत कारण त्यांना देवाला संतुष्ट करण्याची इच्छा आहे. यहोवा स्वतः सत्यवादी आहे आणि तो जाणतो की खोटेपणामुळे काय अपाय होतो. म्हणूनच तो आपल्या सेवकांकडून सत्य बोलण्याची अपेक्षा करतो हे योग्यच आहे.

१०. लोक खोटे का बोलतात आणि यामुळे कोणते वाईट परिणाम होतात?

१० बऱ्‍याच लोकांना, विशिष्ट स्वार्थ साधण्याकरता खोटे बोलणे अतिशय सोयीस्कर वाटते. काही लोक शिक्षा टाळण्याकरता, आपला फायदा व्हावा म्हणून किंवा इतरांची स्तुती मिळवण्यासाठी खोटे बोलतात. पण खोटे बोलणे हा एक अवगुण आहे. शिवाय, खोटे बोलणारा देवाची संमती मिळवू शकत नाही. (प्रकटीकरण २१:८, २७; २२:१५) आपण सत्यवादी असल्याचे लोकांना माहीत असल्यास आपण जे बोलतो त्याच्यावर ते विश्‍वास ठेवतात, आपल्यावर भरवसा ठेवतात. पण केवळ एकदाही खोटे बोलताना आपण पकडलो गेलो तर भविष्यात आपण काहीही बोललो तरी ते खरे आहे किंवा नाही असा लोक विचार करतील. आफ्रिकेत एक म्हण आहे: “एका लबाडीमुळे हजार सत्य व्यर्थ ठरतात.” आणखी एक सुविचार आहे, की “खोटे बोलणारा खरे बोलतो तेव्हाही लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत.”

११. सत्यवादी असणे हे केवळ खरे बोलण्यापेक्षा अधिक कशाप्रकारे आहे?

११ केवळ खरे बोलल्याने एक व्यक्‍ती सत्यवादी ठरत नाही. ही एक जीवनरीती आहे. आपले सबंध व्यक्‍तिमत्त्व त्यात गोवलेले आहे. आपण केवळ जे बोलतो त्याद्वारे नव्हे, तर जे करतो त्याद्वारेही आपण इतरांवर सत्य प्रकट करतो. प्रेषित पौलाने विचारले: “दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करितोस काय?” (रोमकर २:२१, २२) इतरांना सत्य प्रकट करायचे असेल तर आपले सर्व मार्ग सत्याचे असले पाहिजेत. सत्यवादी व प्रामाणिक असण्याविषयी आपल्या नावलौकिकाचा, आपल्या शिकवणुकींना लोक कसा प्रतिसाद देतात यावर जबरदस्त प्रभाव पडेल.

१२, १३. एका तरुण व्यक्‍तीने सत्यवादी असण्याविषयी काय लिहिले आणि तिच्या उच्च नैतिक आदर्शामागे काय कारण होते?

१२ यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेली लहान मुले देखील सत्यवादी असण्याचे महत्त्व ओळखतात. जेनी नावाच्या एका मुलीने १३ वर्षांची असताना शाळेत एका निबंधात असे लिहिले: “प्रामाणिकता हा असा गुण आहे ज्याला मी खरोखर खूप महत्त्व देते. दुःखाची गोष्ट म्हणजे आज बरेच लोक खऱ्‍या अर्थाने प्रामाणिक नाहीत. मी मनोमन शपथ घेतली आहे की मी माझ्या जीवनात नेहमी प्रामाणिक राहीन. खरे बोलल्यामुळे मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना लगेच काही फायदा होणार नसेल तरीसुद्धा मी प्रामाणिक राहीन. मी मैत्रीही अशाच लोकांशी करेन जे खरे बोलतात आणि प्रामाणिक आहेत.”

१३ या निबंधाविषयी जेनीच्या शिक्षिकेने असे म्हटले: “इतक्या लहान वयात तू इतका उच्च नैतिक आदर्श विकसित केलास याचे मला कौतुक वाटते. मला खात्री आहे की या आदर्शाला तू जीवनभर जडून राहशील कारण मुळातच तुझ्याजवळ ते नैतिक बळ आहे.” या शाळकरी वयाच्या मुलीजवळ हे नैतिक बळ कोठून आले? तिच्या निबंधाच्या प्रस्तावनेतच तिने म्हटले की “जीवनातील [तिच्या] आदर्शांसाठी” तिचा धार्मिक विश्‍वास जबाबदार आहे. तो निबंध जेनीने लिहून आता सात वर्षे झाली आहेत. तिच्या शिक्षिकेच्या अंदाजानुसार जेनी आजही यहोवाची साक्षीदार या नात्याने आपल्या जीवनात एक उच्च नैतिक आदर्श पाळत आहे.

यहोवाचे सेवक सत्य प्रकट करतात

१४. देवाच्या सेवकांवर सत्याचे समर्थन करण्याची खास महत्त्वाची जबाबदारी का आहे?

१४ अर्थात यहोवाच्या साक्षीदारांव्यतिरिक्‍त इतर लोकही सत्य सांगू शकतात व प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करू शकतात. पण देवाचे सेवक या नात्याने आपल्यावर सत्याचे समर्थन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आपल्यावर बायबलची अशी सत्ये सोपवण्यात आली आहेत जी एका व्यक्‍तीला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ शकतात. त्याअर्थी हे ज्ञान इतरांना सांगण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. येशूने म्हटले: “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.” (लूक १२:४८) निश्‍चितच ज्यांना देवाचे मोलवान ज्ञान देऊन आशीर्वादित करण्यात आले आहे त्यांच्याकडून ‘पुष्कळ मागितले जाते.’

१५. इतरांना बायबलचे सत्य सांगताना तुम्हाला कशाप्रकारे आनंद मिळतो?

१५ इतरांना बायबलचे सत्य सांगणे एक आनंददायक कार्य आहे. येशूच्या पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे आपण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारख्या गांजलेल्या व पांगलेल्या लोकांना’ आणि जे “भुतांच्या” शिक्षणामुळे अंधळे व गोंधळलेले आहेत त्यांना सुवार्ता, अर्थात आशेचा एक आनंददायी संदेश घोषित करतो. (मत्तय ९:३६; १ तीमथ्य ४:१, २) प्रेषित योहानाने लिहिले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.” (३ योहान ४) योहानाच्या ‘मुलांच्या’—अर्थात ज्यांना त्याने सत्याची ओळख करून दिली त्यांच्या विश्‍वासूपणामुळे त्याला मोठा आनंद मिळाला. आपणही जेव्हा देवाच्या वचनाला कृतज्ञतापूर्वक प्रतिसाद देणाऱ्‍या लोकांना पाहतो तेव्हा आपल्यालाही आनंद होतो.

१६, १७. (अ) सर्वजण सत्याचा स्वीकार का करत नाहीत? (ब) बायबलचे सत्य घोषित करत असताना तुम्हाला कोणता आनंद प्राप्त होऊ शकतो?

१६ साहजिकच, सर्वजण सत्याचा स्वीकार करणार नाहीत. बऱ्‍याच लोकांना पसंत नसतानाही येशूने देवाविषयीचे सत्य सांगितले. त्याचा विरोध करणाऱ्‍या यहुद्यांना त्याने म्हटले: “मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्‍वास का ठेवीत नाही? जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो; तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”—योहान ८:४६, ४७.

१७ येशूप्रमाणे आपणही लोकांना यहोवाविषयीचे मोलवान सत्य सांगण्यापासून कचरत नाही. आपण जे सांगतो ते सर्वजण स्वीकारतील अशी आपण अपेक्षा करत नाही कारण येशूच्या शिकवणुकीही सर्वांनी स्वीकारल्या नाहीत. तरीपण, आपल्याला हे जाणून आनंद वाटतो की आपण योग्य ते करत आहोत. यहोवाच्या अपार प्रेमदयेमुळे त्याची अशी इच्छा आहे की मानवजातीला सत्याचे ज्ञान मिळावे. खऱ्‍या ख्रिश्‍चनांजवळ सत्य असल्यामुळे या अंधाऱ्‍या जगात ते ज्योतीवाहक आहेत. आपल्या शब्दांतून व कृतींतून सत्याचा प्रकाश चमकू देण्याद्वारे, इतरांनाही आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करण्यास आपण मदत करतो. (मत्तय ५:१४, १६) आपण जाहीर करतो की सैतानाच्या बनावटी सत्याचा आपण अव्हेर करतो आणि देवाच्या शुद्ध व निर्मळ वचनाचे समर्थन करतो. आपल्याला माहीत असलेले व आपण जे इतरांना सांगतो, ते सत्य जे स्वीकारतील त्यांना खरे स्वातंत्र्य मिळेल.—योहान ८:३२.

सत्यवादी मार्गाचे निरंतर पालन करा

१८. येशूने नथनेलाविषयी का व कशाप्रकारे पसंती व्यक्‍त केली?

१८ येशूला सत्य प्रिय होते व तो नेहमी सत्य बोलत असे. पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान जे सत्यवादी होते त्यांच्याविषयी त्याने पसंती व्यक्‍त केली. नथनेलाविषयी येशूने म्हटले: “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्‍याच्याठायी कपट नाही!” (योहान १:४७) नंतर नथनेल ज्याचे कदाचित बर्थलमय असेही नाव असावे, त्याला येशूच्या १२ प्रेषितांपैकी एक म्हणून निवडण्यात आले. (मत्तय १०:२-४) किती मोठा सन्मान!

१९-२१. एकेकाळी अंधळा असलेल्या माणसाला निर्भयपणे सत्य सांगितल्यामुळे कोणता आशीर्वाद मिळाला?

१९ बायबलमधील योहान या पुस्तकातील एक संपूर्ण अध्याय आणखी एका प्रामाणिक माणसाला समर्पित करण्यात आला आहे ज्याला येशूने आशीर्वादित केले. त्याचे नाव आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे सांगण्यात आले आहे की हा माणूस एक भिकारी होता जो जन्मापासून अंधळा होता. येशूने त्याची दृष्टी त्याला परत दिली तेव्हा लोक अचंबित झाले. या चमत्कारिक कृत्याची खबर काही परुशांच्या कानापर्यंत पोचली; सत्याचा द्वेष करणाऱ्‍या या लोकांनी आपसात ठरवले होते की जो कोणी येशूवर विश्‍वास ठेवील त्याला सभास्थानातून बहिष्कृत केले जावे. त्यांचे हे षडयंत्र माहीत असल्यामुळे, या एकेकाळी अंधळा असलेल्या माणसाच्या आईवडिलांनी परुशांना खोटे सांगितले; आपल्या मुलाची दृष्टी परत कशी आली किंवा हे कोणी केले याविषयी आपल्याला काहीही माहीत नाही असे त्यांनी परुशांना सांगितले.—योहान ९:१-२३.

२० बऱ्‍या झालेल्या या माणसाला पुन्हा परुशांपुढे बोलवण्यात आले. परिणामांची पर्वा न करता त्याने बेधडक सत्य सांगितले. आपल्याला कशाप्रकारे बरे करण्यात आले व येशूने हे केले असल्याचे त्याने खुलासा करून सांगितले. येशू देवाकडून असल्याचे हे प्रतिष्ठित व सुशिक्षित लोक मानत नाहीत याचे आश्‍चर्य वाटून, या बऱ्‍या झालेल्या माणसाने जे निर्विवाद सत्य होते ते स्वीकारण्याचा निर्भयपणे आग्रह केला: “हा देवापासून नसता तर ह्‍याला काही करता आले नसते.” निरुत्तर झाल्यामुळे, परुशांनी या माणसावर उद्धटपणाचा आरोप लावून त्याला बाहेर घालवले.—योहान ९:२४-३४.

२१ येशूला हे कळले तेव्हा त्याने प्रेमळपणे वेळ काढून त्या माणसाचा शोध घेतला. तो सापडल्यावर त्याने दाखवलेल्या विश्‍वासाला येशूने अधिक बळकट केले. येशूने उघडपणे स्वतःची मशीहा म्हणून ओळख करून दिली. सत्य बोलण्याचे धाडस केल्यामुळे या माणसाला किती मोठा आशीर्वाद मिळाला! नक्कीच जे सत्य बोलतात त्यांना देवाची कृपापसंती प्राप्त होते.—योहान ९:३५-३७.

२२. सत्यवादी मार्गाचे निरंतर पालन का करावे?

२२ सत्याचे पालन करण्याचा आपण सर्वांनी गांभिर्याने प्रयत्न केला पाहिजे. लोकांसोबत व देवासोबत चांगले संबंध कायम करण्याकरता व ते टिकवून ठेवण्याकरता हे अत्यावश्‍यक आहे. सत्यवादी असणे म्हणजे निष्कपट, प्रामाणिक, कोणालाही आपल्याकडे येण्यास भीती वाटणार नाही असे व भरवशालायक असणे. (स्तोत्र १५:१, २) याउलट असत्य मार्गाने चालणे म्हणजे कपटी, अविश्‍वासार्ह व खोटे असणे आणि अशा लोकांना देव पसंत करत नाही. (नीतिसूत्रे ६:१६-१९) तेव्हा नेहमी सत्यवादी मार्गाचे पालन करण्याचा निर्धार करा. किंबहुना, सत्याच्या देवाचे अनुकरण करण्याकरता सत्य जाणून घेणे, सत्य बोलणे व सत्याप्रमाणे चालणे अनिवार्य आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपल्याला सत्य माहीत आहे याबद्दल आपण का कृतज्ञ असू शकतो?

• सत्यवादी असण्यात आपण कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण करू शकतो?

• इतरांना बायबलचे सत्य सांगण्याचे कोणते फायदे आहेत?

• सत्यवादी मार्गाचे निरंतर पालन करणे का महत्त्वाचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रे]

ख्रिश्‍चनांवर बायबलचे सत्य सोपवण्यात आले असल्यामुळे ते आवेशाने इतरांना याविषयी सांगतात

[१८ पानांवरील चित्रे]

येशूने बरे केलेल्या अंधळ्या माणसाने सत्य सांगितल्यामुळे त्याला मोठा आशीर्वाद मिळाला