व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यहोवाने, आपल्या प्राचीन सेवकांमध्ये अर्थात इस्राएली लोकांमध्ये बहुपत्नीकत्वाला परवानगी दिली होती; आता ती परवानगी नाही. याचा अर्थ त्याचे दर्जे बदलत असतात का?

बहुपत्नीकत्वाविषयी यहोवाचा दृष्टिकोन बदललेला नाही. (स्तोत्र १९:७; मलाखी ३:६) सुरवातीपासूनच मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या व्यवस्थेत बहुपत्नीकत्वाला स्थान नव्हते आणि आताही नाही. यहोवाने आदामासाठी एक पत्नी म्हणून हव्वेला निर्माण केले तेव्हा त्याने एका पतीसाठी एक पत्नी हा ईश्‍वरी दर्जा ठरवून असे म्हटले: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.”—उत्पत्ति २:२४.

येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा त्याने देखील, घटस्फोट आणि विवाह यांविषयी विचारणा करणाऱ्‍यांना उत्तर देताना या दर्जाची पुनरुक्‍ती केली. त्याने म्हटले: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरूवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत.” येशूने पुढे म्हटले: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करितो तोहि व्यभिचार करितो].” (मत्तय १९:४-६,) यावरून हे स्पष्ट होते, की एकापेक्षा अधिक बायका करणे देखील व्यभिचार आहे.

पण मग, प्राचीन काळात बहुपत्नीकत्वाला परवानगी का देण्यात आली होती? ही गोष्ट लक्षात असू द्या, की या प्रथेची सुरवात यहोवाने केलेली नाही. काईनच्या वंशातला लामेख याला एकापेक्षा अधिक पत्नी होत्या, हा बायबलमधील सर्वात पहिला उल्लेख आहे. (उत्पत्ति ४:१९-२४) नोहाच्या दिवसांत यहोवाने जलप्रलय आणला तेव्हा, नोहा आणि त्याच्या तीन पुत्रांना प्रत्येकी केवळ एकच बायको होती. बहुपत्नी असलेल्या सर्वांचा प्रलयात नाश झाला होता.

अनेक शतकांनंतर यहोवाने इस्राएल लोकांना आपले लोक म्हणून निवडले तेव्हा त्यांच्यामध्ये बहुपत्नीकत्वाची प्रथा आधीपासूनच रूढ होती; एकापेक्षा अधिक पत्नी असणे ही प्रथा सर्वसामान्य होती असे दिसते. एकापेक्षा अधिक पत्नी असलेल्या कुटुंबांनी विभक्‍त व्हावे असे यहोवाने अपेक्षिले नाही. उलट, त्याने त्या प्रथेच्या संबंधाने नियम घातले.—निर्गम २१:१०, ११; अनुवाद २१:१५-१७.

बहुपत्नीकत्वाची ही प्रथा तात्पुरती होती हे, विवाहाच्या दर्जाविषयी यहोवाचा मूळ उद्देश काय आहे याबद्दल येशूने जे म्हटले केवळ त्यावरूनच नाही, तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषित पौलाने जे लिहिले त्यावरूनही दिसून येते. प्रेषित पौलाने म्हटले: “प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पति असावा.” (१ करिंथकर ७:२) पौलाला असेही लिहिण्याची प्रेरणा मिळाली, की ख्रिस्ती मंडळीत पर्यवेक्षक अथवा सेवा सेवक म्हणून नियुक्‍त केला जाणारा बांधव “एका स्त्रीचा पति असावा.”—१ तीमथ्य ३:२, १२; तीत १:६.

यामुळे, सुमारे २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली तेव्हापासूनच, यहोवाने बहुपत्नीकत्वाच्या प्रथेला अनुमती देण्याचे थांबवले. पुरुष आणि स्त्रीला देवाने निर्माण केल्यावर त्याने विवाहासाठी जो दर्जा ठरवला होता तोच दर्जा पुन्हा स्थापित झाला: एका पतीला एकच पत्नी. आज हाच दर्जा, संपूर्ण पृथ्वीवरील यहोवाच्या लोकांमध्येही पाहायला मिळतो.—मार्क १०:११, १२; १ करिंथकर ६:९, १०.