व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?

तरुणांनो तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?

तरुणांनो तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?

आपल्या माध्यमिक शाळेच्या दिवसांची आठवण करून हिडेओ म्हणतो, “मी ख्रिस्ती सभांना जात होतो, पण मला यहोवाची सेवा करण्याची इतकी उत्कट इच्छा नव्हती. मी माझ्या वर्गसोबत्यांचा सर्वात आवडता आहे, माझ्यासोबत माझी मैत्रीण चालली आहे अशी मी कल्पना करायचो. माझी ध्येये अशी स्पष्ट नव्हती आणि आध्यात्मिक प्रगती करण्याची मला मुळीच इच्छा नव्हती.” हिडेओप्रमाणे, पुष्कळ युवक असेच उद्देशहीन जीवन जगतात, कसलेही उपयुक्‍त ध्येये गाठण्याची इच्छा करत नाहीत किंवा कसलीही प्रगती करत नाहीत.

तुम्हाला तरुणपणी सहसा खेळांत किंवा एखाद्या छंदात अधिक रस असतो. परंतु, आध्यात्मिक कार्यहालचालींबद्दल कदाचित तुम्हाला तसे वाटत नसेल. आध्यात्मिक ध्येयांबद्दलही असाच उत्साह वाटणे शक्य आहे का? स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांकडे लक्ष द्या: “परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. . . . परमेश्‍वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.” (स्तोत्र १९:७, ८) देवाचे वचन “भोळ्यांस” समंजसपणे वागायला लावून त्यांच्या “नेत्रांना प्रकाश देते.” होय, आध्यात्मिक गोष्टींनी तुम्ही आनंदी आणि हर्षित होऊ शकता. पण तसे वाटण्यास तुम्हाला काय करण्याची गरज आहे? तुम्ही कोठून सुरवात करावी?

देवाची सेवा करण्यास प्रेरित व्हा

प्रथम, तुम्हाला प्रेरणा झाली पाहिजे. यहूदाच्या राजा योशीयाचे उदाहरण पाहा. मंदिरात जेव्हा यहोवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला तेव्हा योशीयाने तो वाचून काढला आणि ऐकलेल्या गोष्टी त्याच्या मनाला भिडल्या. त्यामुळे, “इस्राएल लोक ज्या ज्या देशी होते तेथून योशीयाने सर्व अमंगळ वस्तु काढून टाकिल्या.” (२ इतिहास ३४:१४-२१, ३३) देवाचे वचन वाचल्याने शुद्ध उपासनेला बढावा देण्यासाठी योशीया प्रेरित झाला.

तुम्ही देखील बायबलचे नियमितरित्या वाचन करून आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करून यहोवाची सेवा करण्याची इच्छा निर्माण करू शकता. हिडेओला देखील यामुळे प्रेरणा मिळाली. तो, त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका पायनियरसोबत (यहोवाच्या साक्षीदारांचा पूर्ण-वेळेचा एक सेवक) जास्त संगती करू लागला. हा पायनियर बायबलचा एक मेहनती विद्यार्थी होता आणि त्यातील शिकवणुकींनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता. पायनियरच्या उदाहरणाने प्रोत्साहित होऊन, हिडेओ देखील त्यांचे अनुकरण करू लागला आणि मग त्याला देवाची आणि इतर लोकांची सेवा करावी असे मनापासून वाटू लागले. आध्यात्मिक प्रगती केल्याने त्याचे जीवन उद्देशपूर्ण बनले.

दररोज बायबल वाचणे हे तरुण लोकांकरता प्रेरणादायक असू शकते. ताकाहिरो म्हणतो: “काही वेळा, रात्री बिछान्यात पडल्यावर मला आठवले की मी आज बायबल वाचले नाही तर मी लगेच उठून बायबल वाचायचो. यामुळे, यहोवाचे मार्गदर्शन मला मिळत आहे असे मला जाणवायचे. बायबलचे दररोज वाचन केल्यामुळे माझ्या आध्यात्मिक प्रगतीला बराच हातभार लागला. यहोवाच्या सेवेत अधिक सहभाग घेण्याचा दृढनिश्‍चय असल्यामुळे मी उच्च माध्यमिक शाळेतून बाहेर पडताच सामान्य पायनियर कार्य सुरू केले. आणि त्यात मला खूप आनंद मिळतो.”

बायबलच्या वाचनाव्यतिरिक्‍त, यहोवाची स्तुती करण्याची तुम्हाला कशामुळे अधिक प्रेरणा मिळू शकते? टोमोहिरोला त्याच्या आईने बायबलचे सत्य शिकवले होते. तो म्हणतो: “मी १९ वर्षांचा असताना जीवनात उद्देश आहे (इंग्रजी) या पुस्तकाचा कसून अभ्यास केला आणि त्यानंतरच यहोवाची प्रीती आणि येशूचे खंडणी बलिदान यांनी मी स्पर्शून गेलो. देवाच्या प्रीतीबद्दल अशाप्रकारे कृतज्ञता वाटल्यामुळे यहोवाच्या सेवेत अधिक करण्याची मला प्रेरणा मिळाली.” (२ करिंथकर ५:१४, १५) टोमोहिरोप्रमाणे, अनेक युवकांना बायबलचा मनःपूर्वक व्यक्‍तिगत अभ्यास करून आध्यात्मिक प्रगती करण्यास उत्तेजन दिले जाते.

पण तरीही, तुम्हाला यहोवाची सेवा करण्याची मनापासून इच्छा होत नसल्यास काय? तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता का? प्रेषित पौलाने लिहिले: “कारण इच्छा करणे व कृति करणे ही तुमच्या ठायी . . . साधून देणारा तो देव आहे.” (फिलिप्पैकर २:१३) तुम्ही यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केल्यास, तो मुक्‍तहस्ते तुम्हाला आपला पवित्र आत्मा देईल ज्यामुळे तुम्हाला केवळ ‘कृती करण्यास’ नव्हे तर ‘इच्छा करण्यासही’ शक्‍ती मिळेल. याचा अर्थ देवाचा पवित्र आत्मा, यहोवाची सर्वोत्तम सेवा करण्यासाठी तुमची इच्छा वाढवेल आणि आध्यात्मिक वाढ करण्यास तुम्हाला मदत करील. त्यामुळे, यहोवाच्या सामर्थ्यावर पूर्ण भरवसा ठेवा आणि आपले अंतःकरण दृढ करा!

स्वतःसमोर ध्येय ठेवा

यहोवाची सर्वतोपरी सेवा करण्याचा दृढनिश्‍चय केल्यावर आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुम्ही व्यक्‍तिगत ध्येये राखली पाहिजेत. माना नावाची ख्रिस्ती मुलगी म्हणाली: “ध्येये राखल्याचा मला खूप फायदा झाला. मी मागे जाण्याऐवजी, धैर्याने आणखी प्रगती करत राहिले. माझ्या मनात काही ध्येये राखून मी मार्गदर्शनासाठी यहोवाला कळकळीने प्रार्थना केली तेव्हा मी कशानेही विचलित न होता प्रगती करू शकले.”

तुमची ध्येये वास्तविक आणि साधण्याजोगी असली पाहिजेत. दररोज बायबलचा एक अध्याय वाचणे हे एक रास्त ध्येय आहे. तुम्ही एखाद्या विषयावर संशोधन करायलाही सुरू करू शकता. उदाहरणासाठी, टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी) यात “यहोवा” या नोंदीखाली “नावांसहित गुण” या उपशिर्षकामध्ये दिलेल्या यहोवाच्या गुणांचा तुम्ही अभ्यास करू शकता. अशा ४० नोंदी आहेत ज्यांवर तुम्ही विचार करू शकता. हे संशोधन तुम्हाला निश्‍चितच यहोवाजवळ आणील आणि त्याच्याकरता अधिक करण्यास प्रेरित करील. साधण्याजोगी इतर ध्येये म्हणजे, प्रत्येक ख्रिस्ती सभेत, श्रोत्यांचा सहभाग असलेल्या भागांमध्ये एक तरी उत्तर देणे, प्रत्येक सभेत मंडळीच्या निदान एका सदस्याशी नीट परिचय करून घेणे, यहोवाला प्रार्थना न करता आणि त्याच्याविषयी इतरांना न सांगता एकही दिवस जाऊ न देणे.

तुम्ही अद्याप ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत सामील झाला नसला तर ते ध्येय तुम्ही ठेवू शकता. जाहीर सेवाकार्यात तुम्ही भाग घेत आहात का? नसल्यास, तुम्ही बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याच्या दिशेने प्रयत्न करू शकता. यानंतर, यहोवासोबतच्या नातेसंबंधाबद्दल गंभीर विचार करणे आणि स्वतःचे जीवन त्याला समर्पित करणे हे साहजिकच पुढचे पाऊल ठरेल. अनेक युवक, पूर्ण-वेळेची सेवा करून आपले समर्पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

आपल्या जीवनात ध्येय बाळगणे उत्तम गोष्ट आहे, परंतु स्पर्धात्मक वृत्ती ठेवण्यापासून सावध राहा. इतरांसोबत तुम्ही स्वतःची तुलना केली नाही तर स्वतःच्या कामगिरीतून तुम्हाला अधिक आनंद मिळेल.—गलतीकर ५:२६; ६:४.

कदाचित, तुम्हाला कमअनुभवी असल्यासारखे किंवा रास्त ध्येये ठेवणे शक्य नाही असे वाटत असेल. मग बायबलच्या सल्ल्याचे पालन करा: “ज्ञान्याची वचने कान लावून ऐक.” (नीतिसूत्रे २२:१७) आपल्या पालकांची किंवा इतर प्रौढ ख्रिश्‍चनांची मदत घ्या. या बाबतीत, पालकांनी आणि इतरांनी देखील समंजस आणि प्रोत्साहन देणारे असले पाहिजे. इतरांनी तरुणांसमोर ध्येये ठेवली आणि ती गाठण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला तर तरुणांना त्यात आनंद वाटणार नाही आणि ध्येये राखण्याचा मूळ उद्देशच निरर्थक ठरेल. हेच एका मुलीच्या बाबतीत घडले. ती म्हणाली: “माझ्या पालकांनी माझ्यासमोर एकामागोमाग एक ध्येये ठेवली जसे की, ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत सामील होणे, क्षेत्र सेवेत भाग घेणे, बाप्तिस्मा घेणे, पायनियर बनणे वगैरे. ते प्रत्येक ध्येय गाठण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला. एक ध्येय गाठल्यावर माझ्या पालकांनी माझी प्रशंसा कधी केली नाही; उलट माझ्यासमोर दुसरे ध्येय ठेवले. त्यामुळे, ही ध्येये मला जबरदस्तीने गाठावी लागताहेत असे मला वाटू लागले. मी थकून गेले होते आणि आपण काही साध्य केले असे मला जाणवतही नव्हते.” यात काय चुकत होते? ही सर्व ध्येये चांगली होती, पण ती तिची स्वतःची ध्येये नव्हती. तुम्हाला यशस्वी व्हायचे असल्यास, स्वतःकरता एखादे ध्येय ठेवायला तुम्ही आपणहून प्रेरित झाले पाहिजे.

येशू ख्रिस्ताचा विचार करा. तो पृथ्वीवर आला तेव्हा आपला पिता, यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो याची त्याला चांगली जाणीव होती. यहोवाची इच्छा पूर्ण करणे हे केवळ त्याचे ध्येय नव्हते तर त्याची ती कामगिरी होती. आपल्या या नेमणुकीबद्दल येशूचा काय दृष्टिकोन होता? तो म्हणाला: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात येशूला आनंद वाटला आणि त्याने आपल्या पित्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या. त्याच्याकरता ते अन्‍नासारखे होते अर्थात त्याच्याकडून अपेक्षा केलेले कार्य पूर्ण करण्यामध्ये त्याला आनंद आणि समाधान वाटत होते. (इब्री लोकांस १०:५-१०) तुमचे पालक तुम्हाला जे करण्यासाठी प्रोत्साहन देतात ते करण्याची तुम्हाला योग्य प्रेरणा असल्यास तुम्हालाही त्यात आनंद वाटू शकतो.

चांगले ते करण्यास माघार घेऊ नका

तुमच्या मनात एखादे ध्येय असल्यास ते साध्य करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. गलतीकर ६:९ म्हणते: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” स्वतःच्या ताकदीवर किंवा क्षमतेवर केव्हाही अवलंबून राहू नका. तुमच्यासमोर अडथळे येतीलच आणि काही वेळा तुम्हाला तात्पुरत्या काळासाठी अपयशही जाणवेल. पण बायबल आपल्याला असे आश्‍वासन देते: “तू आपल्या सर्व मार्गांत [देवाचा] आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:६) आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता यहोवा तुम्हाला टिकवून ठेवेल.

होय, यहोवाची सेवा करण्याची इच्छा निर्माण करून आणि आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करून तुम्ही ‘तुमची प्रगती सर्वांना दाखवू शकाल.’ (१ तीमथ्य ४:१५) मग देवाच्या सेवेत एक अर्थपूर्ण जीवन तुम्ही जगू शकाल.

[९ पानांवरील चित्र]

बायबल वाचल्याने आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन केल्याने यहोवाची सेवा करण्यास तुम्हाला प्रेरणा मिळेल

[१० पानांवरील मथळा]

येशूने आपल्या पित्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या