व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवाच्या समस्यांचा लवकरच अंत होणार!

मानवाच्या समस्यांचा लवकरच अंत होणार!

मानवाच्या समस्यांचा लवकरच अंत होणार!

“समस्यांचे मूळ कारण काढून टाकण्यासाठी व्यापक योजना नसली आणि त्याला राजनैतिक पाठिंबा नसला तर त्याचा फारसा फायदा होत नाही. अनुभवाने हे वारंवार सिद्ध झाले आहे की, केवळ मदत कार्यामुळे, जे मूलतः राजकीय स्वरूपाचे आहे, समस्या सुटू शकत नाहीत.”—जगातील निर्वासितांची स्थिती २०००, (इंग्रजी).

अनेक मदत कार्ये करूनही मानवांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. यावर कायमचा राजकीय उपाय निघण्याची काही शक्यता आहे का? फार कमी. पण आपल्याला आणखी कोणती आशा आहे? इफिसमधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्राच्या सुरवातीच्या अर्थपूर्ण उताऱ्‍यात, देव मानवांच्या सर्व समस्या कशा सोडवून टाकील याचे प्रेषित पौल स्पष्टीकरण देतो. हे करण्यासाठी देव कोणते साधन उपयोगात आणील याविषयीही त्याने सांगितले; या साधनाद्वारे आज आपल्याला ग्रासून टाकणाऱ्‍या सर्व समस्यांना मुळापासूनच काढून टाकण्यात येणार आहे. पौलाला काय सांगायचे होते त्याचा आपण विचार करू या. हा उतारा इफिसकर १:३-१० येथे सापडतो.

“जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे”

प्रेषित पौल म्हणतो की, देवाचा उद्देश “कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना” केलेली एक “योजना [किंवा व्यवस्था]” आहे. याचा काय अर्थ होतो? हाच की, देवाने एक समय निश्‍चित केला आहे व तेव्हा तो “स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र” करण्याकरता पाऊल उचलेल. (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर १:१०) होय, देवाने एक व्यवस्था केली आहे ज्याकरवी स्वर्गात व पृथ्वीवरील सर्वकाही त्याच्या थेट नियंत्रणाखाली एकत्र आणले जाईल. येथे वापरलेली संज्ञा, ‘एकत्र करणे,’ हिचा बायबल विद्वान जे. एच. थेयर अशाप्रकारे खुलासा करतात: “सर्व गोष्टी आणि व्यक्‍ती (ज्या आतापर्यंत पापामुळे विभाजित होत्या) ख्रिस्तामध्ये एकत्र करण्यासाठी . . . त्याच्याकरता पुन्हा एकदा गोळा करणे.”

यावरून, प्रथम फूट निर्माण झाल्यामुळे देवाला सर्व एकत्र का आणावे लागत आहे, हे समजते. मानवाच्या इतिहासाच्या सुरवातीला आपल्या मूळ पालकांनी अर्थात आदाम आणि हव्वेने देवाविरुद्ध बंड करण्यामध्ये दियाबल सैतानाचा पक्ष घेतला. स्वतःकरता योग-अयोग्य ठरवण्याचा अधिकार मिळवण्याद्वारे त्यांना स्वातंत्र्य हवे होते. (उत्पत्ति ३:१-५) दैवी न्यायानुसार, त्यांचा देवाच्या कुटुंबातून बहिष्कार करण्यात आला आणि त्याच्यासोबत असलेले त्यांचे नाते तुटले. त्यांनी मानवजातीवर अपरिपूर्णता ओढवली आणि त्याचे भयंकर परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहेत.—रोमकर ५:१२.

दुष्टाईला तात्पुरती अनुमती

काहीजण म्हणतील, ‘पण देवाने त्यांना असे का करू दिले? त्याने आपला सर्वश्रेष्ठ अधिकार वापरून स्वतःची इच्छा अंमलात आणून आपण आज भोगत असलेले दुःख व त्रास का टाळले नाही?’ आपल्या मनात हा विचार सहजासहजी येऊ शकतो. पण खरे पाहता, शक्‍तीचा वापर केल्यामुळे काय सिद्ध झाले असते? कोणा शक्‍तिशाली व्यक्‍तीने विरोधाचे लक्षण दिसताच लगेच तो खतम केला तर अशा व्यक्‍तीची तुम्ही प्रशंसा कराल का, किंवा अशी व्यक्‍ती तुम्हाला आवडेल का? मुळीच नाही.

त्या बंडखोर व्यक्‍तींनी देवाच्या सर्वश्रेष्ठ शक्‍तीला आव्हान दिले नव्हते. तर त्यांनी खासकरून त्याचा राज्य करण्याचा अधिकार किंवा योग्यता याला आव्हान दिले होते. हे मूलभूत वादविषय कायमचे सोडवण्यासाठी यहोवाने मानवांना थेट नियंत्रणात न ठेवता, काही मर्यादित काळापर्यंत त्यांचे कारभार त्यांनाच सांभाळायला दिले आहेत. (उपदेशक ३:१; लूक २१:२४) त्याने ठरवलेला काळ संपल्यावर तो हस्तक्षेप करून पृथ्वीचा संपूर्ण ताबा पुन्हा हाती घेईल. तोपर्यंत हे अगदी स्पष्ट होईल की, केवळ त्याच्या शासनाकरवीच पृथ्वीच्या रहिवाशांना कायमची शांती, आनंद आणि सुसंपन्‍नता मिळू शकते. नंतर जगातल्या सर्व जुलूमी लोकांचा कायमचा सर्वनाश केला जाईल.—स्तोत्र ७२:१२-१४; दानीएल २:४४.

“जगाच्या स्थापनेपूर्वी”

हे सर्व देवाने खूप पूर्वीच उद्देशिले होते. “जगाच्या स्थापनेपूर्वी” असे पौल म्हणतो. (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर १:४) याचा अर्थ पृथ्वीची निर्मिती किंवा आदाम आणि हव्वेची निर्मिती करण्याआधी नव्हे. कारण तेव्हाचे जग “फार चांगले” होते आणि तेव्हा बंडाळी झालीच नव्हती. (उत्पत्ति १:३१) मग, पौलाच्या मनात कोणते ‘जग’ होते? आदाम आणि हव्वेच्या मुलांचे जग—पापी, अपरिपूर्ण मानवांचे जग ज्याला मुक्‍ततेची आशा होती. आदामाच्या मुक्‍त होऊ शकणाऱ्‍या संततीची सुटका करण्यासाठी सर्वकाही कसे सुरळीत करावे हे यहोवाला, आदामाला मुले होण्याआधीच ठाऊक होते.—रोमकर ८:२०.

तथापि याचा असा अर्थ होत नाही की, विश्‍वाच्या सार्वभौमाचा कारभारही मानवांप्रमाणेच आहे. मानव, तातडीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात ठेवून विविध उपायांची योजना करतात. परंतु हे सर्वशक्‍तिमान देवाच्या बाबतीत खरे नाही; तो उद्देशतो आणि त्याची पूर्णता करतो. तरीसुद्धा, मानवाची कायमची सुटका करण्यासाठी देवाने काय ठरवले याचा खुलासा पौलाने केला. ते उपाय कोणते होते?

सुटका कोणामार्फत?

पौल स्पष्ट करतो की, आदामाच्या पापाद्वारे झालेली हानी भरून काढण्यासाठी ख्रिस्ताच्या आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या शिष्यांची एक खास भूमिका आहे. पौल म्हणतो, येशूबरोबर त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्यासाठी यहोवाने “आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.” याचे आणखी स्पष्टीकरण देत पौल म्हणतो की, यहोवाने “आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता . . . पूर्वीच नेमिले होते.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर १:४, ५) अर्थात, यहोवाने एकएकट्याला निवडले किंवा पूर्वीच नेमले नाही. तर, दियाबल सैतानासह आदाम आणि हव्वेने मानवी कुटुंबाचे केलेले नुकसान भरून काढण्यासाठी ख्रिस्ताबरोबर कार्य करणाऱ्‍या विश्‍वासू आणि भक्‍तिमान लोकांचा वर्ग त्याने नेमला.—लूक १२:३२; इब्री लोकांस २:१४-१८.

ही किती अद्‌भुत गोष्ट! सैतानाने देवाच्या सार्वभौमत्वाला पहिल्यांदा आव्हान दिले तेव्हा त्याने असे सुचवले की, देवाच्या निर्मितीत दोष होता व दबावाखाली किंवा मोहात पडल्यावर ते सर्व देवाच्या शासनाविरुद्ध बंड करतील. (ईयोब १:७-१२; २:२-५) यहोवाने आपल्या ‘अपात्र कृपेच्या गौरवाचे’ नाट्यमय प्रदर्शन दाखवून आदामाच्या पापी कुटुंबातील काहींना आध्यात्मिक मुले म्हणून दत्तक घेतले व कालांतराने आपल्या पार्थिव निर्मितीवरील आत्मविश्‍वास जाहीर केला. या लहान गटातील लोकांना स्वर्गात सेवा करण्यासाठी घेतले जाणार होते. कोणत्या उद्देशासाठी?—इफिसकर १:३-६; योहान १४:२, ३; १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७; १ पेत्र १:३, ४.

प्रेषित पौल म्हणतो, देवाचे हे दत्तक पुत्र, स्वर्गीय राज्यात “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” होतात. (रोमकर ८:१४-१७) राजे आणि याजक म्हणून मानवी कुटुंबाला सध्या होणाऱ्‍या दुःख-त्रासापासून मुक्‍त करण्यात त्यांचा सहभाग असेल. (प्रकटीकरण ५:१०) होय, “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” परंतु, लवकरच देवाचे हे खास निवडलेले पुत्र येशू ख्रिस्तासोबत कार्यवाही करतील आणि सर्व आज्ञाधारक मानव परत एकदा “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन . . . देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळवतील.—रोमकर ८:१८-२२.

“खंडणी भरून मिळविलेली मुक्‍ति”

सुटका करण्याजोग्या मानवजातीच्या जगाप्रती देवाच्या अपात्र कृपेच्या सर्वात उल्लेखनीय आणि उदात्त अभिव्यक्‍तीद्वारे अर्थात येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाद्वारे हे सर्व शक्य करण्यात आले. पौलाने लिहिले: [येशू ख्रिस्ताच्या] कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्‍ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.” (तिरपे वळण आमचे.)इफिसकर १:७.

देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत येशू ख्रिस्त ही मुख्य व्यक्‍ती आहे. (इब्री लोकांस २:१०) त्याच्या खंडणी बलिदानामुळे, यहोवाला आपल्या नियमांवरील व तत्त्वांवरील आत्मविश्‍वास कमी न करता, स्वर्गीय कुटुंबात आदामाच्या काही वंशजांना दत्तक घेण्यासाठी आणि आदामाच्या पापाच्या परिणामांपासून मानवजातीची सुटका करण्यासाठी कायदेशीर आधार मिळाला. (मत्तय २०:२८; १ तीमथ्य २:६) यहोवाने आपली धार्मिकता कायम ठेवून व परिपूर्ण न्यायाच्या अपेक्षेनुसार कार्य केले आहे.—रोमकर ३:२२-२६.

देवाचे ‘पवित्र रहस्य’

पृथ्वीसाठी असलेला आपला उद्देश कसा पूर्ण केला जाईल हे देवाने हजारो वर्षांपर्यंत प्रकट केले नव्हते. सा.यु. पहिल्या शतकात, “त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे [“पवित्र,” NW] रहस्य [ख्रिश्‍चनांना] कळविले.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर १:९) देवाच्या उद्देशात येशू ख्रिस्ताला नेमून दिलेली मोठी भूमिका पौल व त्याच्या सह अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्पष्टपणे समजली होती. तसेच ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात सहवारीस म्हणून त्यांची खास भूमिकाही त्यांना कळू लागली. (इफिसकर ३:५, ६, ८-११) होय, येशू ख्रिस्ताचे राज्य सरकार आणि त्याचे सहराजे या साधनाद्वारे देव केवळ स्वर्गातच नव्हे तर पृथ्वीवरही कायमची शांती प्रस्थापित करील. (मत्तय ६:९, १०) आणि याच साधनाद्वारे यहोवा आपल्या मूळ उद्देशाप्रमाणे पृथ्वीला पूर्वस्थितीत आणेल.—यशया ४५:१८; ६५:२१-२३; प्रेषितांची कृत्ये ३:२१.

पृथ्वीवरील जाचजुलूम आणि अन्याय काढून टाकण्यासाठी तो स्वतः पाऊल उचलेल ती नियुक्‍त वेळ नजीकच्या भविष्यात आहे. परंतु पुनर्स्थापनेचे कार्य यहोवाने खरे पाहता सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ मध्येच सुरू केले. कसे? त्या वेळी त्याने ‘स्वर्गात जे आहे ते’ अर्थात ख्रिस्तासोबत स्वर्गामध्ये राज्य करणाऱ्‍यांना एकत्र करायला सुरवात केली. यात इफिसकर ख्रिश्‍चनांचाही समावेश होता. (इफिसकर २:४-७) अलीकडील काळात, यहोवा “पृथ्वीवर जे आहे ते” एकत्र करत आहे. (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर १:१०) जागतिक प्रचाराच्या मोहिमेद्वारे तो येशू ख्रिस्ताच्या राज्य सरकाराविषयीची सुवार्ता सर्व राष्ट्रांना कळवत आहे. जे प्रतिसाद देतात त्यांना आजही आध्यात्मिक अर्थाने संरक्षणाच्या व रोगमुक्‍तीच्या ठिकाणी एकत्र केले जात आहे. (योहान १०:१६) लवकरच, एका स्वच्छ परादीस पृथ्वीवर सर्व अन्याय आणि त्रासापासून त्यांना पूर्ण मुक्‍ती मिळेल.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण ११:१८.

त्रस्त मानवजातीसाठी केल्या जाणाऱ्‍या मदत कार्यांमध्ये “आश्‍चर्यकारक प्रगती” करण्यात आली आहे. (जगातील मुलांची स्थिती २०००) परंतु, स्वर्गीय राज्य सरकारातील ख्रिस्त येशू आणि त्याचे सहराजे लवकरच जो हस्तक्षेप करणार आहेत ती प्रगती सर्वात आश्‍चर्यकारक असेल. समस्यांची मूळ कारणे आणि आपल्याला घेरलेल्या इतर दुष्ट गोष्टींचा ते समूळ नाश करतील. मानवांच्या समस्यांना ते मुळातून उपटून टाकतील.—प्रकटीकरण २१:१-४.

[४ पानांवरील चित्रे]

मदत कार्यांमुळे मानवाच्या समस्या सुटलेल्या नाहीत

[६ पानांवरील चित्र]

ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाने मानवजातीला आदामाच्या पापापासून मुक्‍त केले

[७ पानांवरील चित्र]

आज आध्यात्मिक संरक्षण आणि रोगमुक्‍ती मिळवणे शक्य आहे

[७ पानांवरील चित्रे]

लवकरच मशीही राज्याद्वारे समस्यांपासून पूर्णतः सुटका मिळेल