व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईजिप्तमधील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती

ईजिप्तमधील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती

ईजिप्तमधील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती

मोशे हा इतिहासातील सर्वश्रेष्ठ व्यक्‍तिमत्त्वांपैकी आहे. निर्गम ते अनुवाद या बायबलच्या चार पुस्तकांमध्ये मोशेचे नेतृत्व असलेल्या इस्राएलांशी देवाने कसा व्यवहार केला त्याचा बहुतेक तपशील दिला आहे. त्याने ईजिप्तमधून इस्राएलाच्या निर्गमनाचे निर्देशन केले, नियमशास्त्राच्या करारात तो मध्यस्थ बनला आणि इस्राएलला वाग्दत्त देशाच्या सीमेपर्यंत नेले. मोशे, फारोच्या घरात लहानाचा मोठा झाला होता परंतु तो देवाच्या लोकांचा नियुक्‍त नेता त्याचप्रमाणे संदेष्टा, न्यायी व ईश्‍वरप्रेरित लेखकसुद्धा बनला. एवढे असूनही तो “सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.”—गणना १२:३.

मोशेविषयी बायबलमध्ये सांगितलेले बहुतेक तपशील त्याच्या जीवनाच्या शेवटल्या ४० वर्षांबाबतीत आहेत; इस्राएलची दास्यातून सुटका होते तेव्हापासून ते मोशे वयाच्या १२० व्या वर्षी मरण पावतो तेव्हापर्यंतच्या कालावधीचा त्यात तपशील दिला आहे. ४० वर्षांपासून ८० वर्षांपर्यंत तो मिद्यानात मेंढपाळ होता. पण एका सूत्रानुसार, त्याची पहिली ४० वर्षे म्हणजे जन्मापासून ते ईजिप्तमध्ये पलायन करेपर्यंतचा कालावधी “त्याच्या आयुष्यातला सर्वात जिज्ञासा निर्माण करणारा आणि तरीसुद्धा सर्वात अस्पष्ट” असा होता. या कालावधीविषयी आपण काय जाणू शकतो? मोशे ज्या वातावरणात वाढला त्याचा परिणाम त्याच्या नंतरच्या जीवनावर कशाप्रकारे झाला असावा? त्याच्यावर कोणते प्रभाव पडले असतील? त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असेल? आणि या गोष्टींवरून आपण काय शिकू शकतो?

ईजिप्तमधील दास्यत्व

निर्गमाच्या पुस्तकात असे सांगितले आहे की, ईजिप्तमध्ये स्थायिक झालेल्या इस्राएलांची लोकसंख्या वाढू लागल्यावर एका फारोला त्यांची भीती वाटू लागली. आपण फार “चतुराईने” वागत आहोत असे समजून त्याने त्यांच्यावर जाच करणारे मुकादम नेमून कठीण चाकरीने—ओझी वाहणे, बांधकामासाठी चुना बनवणे आणि दररोज ठराविक प्रमाणात विटा बनवणे—त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला.—निर्गम १:८-१४, पं.र.भा.; ५:६-१८.

ईजिप्तचे हे वर्णन, ज्यादरम्यान मोशेचाही जन्म झाला होता, ऐतिहासिक पुराव्याला जुळणारे आहे. प्राचीन पपायरसवर आणि एका कबरेतील चित्रात, सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकात किंवा त्याहून आधी, गुलाम, मातीच्या विटा कसे बनवत होते त्याचे वर्णन दिले आहे. विटांचा पुरवठा करण्यासाठी जबाबदार असलेले अधिकारी शेकडो गुलामांचे ६ ते १८ लोकांचे गट करून प्रत्येक गटावर एक मुकादम किंवा देखरेख ठेवणारा नेमत असत. विटांसाठी लागणारी माती खोदून विटभट्टीत आणावी लागायची. वेगवेगळ्या देशातले कामगार पाणी काढायचे आणि माती व गवताच्या मिश्रणात ते फावड्याने कालवायचे. आयाताकृती साच्यांतून ओळीने कित्येक विटा तयार केल्या जात असत. मग मजूर, उन्हात सुकवलेल्या विटा खांद्यांवरील जुवांवर लादून बांधकामाच्या ठिकाणी वाहून नेत असत; काहीवेळा त्यांना या विटा घेऊन उतारावरून जावे लागत असे. हातात काठ्या धरलेले ईजिप्शियन मुकादम एका ठिकाणी बसून किंवा गुलामांच्या मागे राहून कामावर लक्ष ठेवत असत.

एका प्राचीन अहवालात ६०२ मजुरांनी ३९,११८ विटा बनवल्याचे सांगितले होते; याचा अर्थ, प्रत्येक व्यक्‍तीने एका पाळीत सरासरी ६५ विटा बनवल्या. तसेच सा.यु.पू. १३ व्या शतकातील एका दस्तऐवजात असे म्हटले आहे: “लोक . . . दररोज त्यांना नेमून दिलेल्या प्रमाणात विटा बनवत आहेत.” हे सर्व, इस्राएलांकडून करवल्या जाणाऱ्‍या चाकरीविषयी निर्गमाच्या पुस्तकात दिलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळते.

परंतु असा जाच करूनही इब्री लोकांची लोकसंख्या कमी झाली नाही. उलट, “जो जो [ईजिप्शियन लोकांनी] त्यांस जाचले तो तो ते वाढून बहुगुणित झाले व . . . त्यांस इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला.” (निर्गम १:१०, १२) म्हणून, फारोने आधी इब्री सुइणींना आणि कालांतराने त्याच्या सर्व लोकांना प्रत्येक नवजात इस्राएली मुलग्याला ठार मारण्याची आज्ञा दिली. अशा भयंकर वेळीच, योखबेद आणि अम्राम यांना मोशे हा गोंडस मुलगा झाला.—निर्गम १:१५-२२; ६:२०; प्रेषितांची कृत्ये ७:२०.

लपवण्यात आला, सापडला आणि दत्तक घेण्यात आला

मोशेच्या आईवडिलांनी फारोच्या खुनी आज्ञाचे पालन न करता आपल्या लहान मुलाला लपवून ठेवले. गुप्तहेर आणि झडती घेणारे शिपाई मुलांचा शोध घ्यायला यायचे तेव्हा देखील ते त्याला लपवत असावेत का? आपण निश्‍चितपणे काही सांगू शकत नाही. पण, तीन महिन्यांनंतर मात्र मोशेच्या पालकांना त्याला लपवून ठेवणे कठीण जाऊ लागले. म्हणून नाईलाजास्तव त्याच्या आईने लगेच लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडून तो जलरोधक केला आणि बाळाला त्यात ठेवले. प्रत्येक नवजात इब्री मुलग्याला नाईल नदीत टाका या फारोने दिलेल्या आज्ञेप्रमाणे योखबेदने केले; फक्‍त त्याच्या आज्ञेच्या अक्षरशः अर्थाचे तिने पालन केले नाही. मग, मोशेची थोरली बहीण मिर्याम नदीच्या जवळपास त्याच्यावर नजर ठेवून राहिली.—निर्गम १:२२–२:४.

फारोची मुलगी नदीवर स्नान करायला येईल तेव्हा तिला मोशे सापडावा या हेतूने योखबेदने त्याला तेथे ठेवले की काय हे आपल्याला ठाऊक नाही. पण घडले मात्र तसेच. राजकन्येच्या लगेच लक्षात आले की, हा एक इब्री बालक आहे. तिने काय केले? आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करून तिने त्याला ठार मारण्याचा हुकूम दिला का? नाही, तिच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही सामान्य स्त्रीने जे केले असते तेच तिनेही केले. तिचा मायेचा पाझर फुटला.

मिर्याम लगेच तिच्याजवळ गेली. तिने तिला विचारले, “आपणाकरिता मुलास दूध पाजावयासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय?” काही जणांना हा उतारा विरोधाभासात्मक वाटतो. येथे मोशेच्या बहीणीची फारोशी तुलना केली जाते ज्याने आपल्या सल्लागारांशी सल्लामसलत करून इब्री लोकांशी “चतुराईने” वागण्यासाठी एक डाव रचला. अर्थात, राजकन्येने मोशेच्या बहिणीच्या कल्पनेला मान्यता दिली तेव्हाच हे निश्‍चित झाले की, त्याचे भले होणार होते. त्यावर फारोची मुलगी म्हणाली, “जा” आणि मिर्यामने लगेच आपल्या आईला आणले. एका अद्‌भुत मार्गाने, योखबेदला वेतन देऊन आपल्याच मुलाचे संगोपन करण्यासाठी राजाकडून संरक्षण मिळाले.—निर्गम २:५-९.

राजकन्येने दाखवलेली दया तिच्या वडिलांच्या क्रूरतेच्या अगदी उलट होती. तिला यातले काहीच माहीत नव्हते किंवा तिला फसवले गेले अशातली गोष्ट नव्हती. पण तिला अंतःकरणातून कळवळा वाटल्यामुळे तिने त्याला दत्तक घेतले तसेच या बाळाला दूध पाजायला ती इब्री दाई ठेवायला तयार झाली यावरून आपल्या पित्यासारखे तिचे मन कलुषित नव्हते हे दिसून येते.

संगोपन आणि शिक्षण

योखबेद त्या बाळाला “घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली, आणि तो तिचा पुत्र झाला.” (निर्गम २:९, १०) मोशे आपल्या खऱ्‍या आईवडिलांसोबत किती काळ राहिला याविषयी बायबल सांगत नाही. काहींच्या मते, त्याचे दूध सुटेपर्यंत अर्थात, दोन किंवा तीन वर्षांपर्यंत किंवा कदाचित त्याहून अधिक काळापर्यंत तो त्यांच्यासोबत राहिला असावा. निर्गममध्ये केवळ एवढेच म्हटले आहे की, तो आपल्या आईवडिलांकडे ‘मोठा झाला.’ हे कोणत्याही वयाला सूचित होऊ शकते. परंतु, अम्राम आणि योखबेदने या काळात निश्‍चितच आपल्या मुलाला तो मुळात इब्री असल्याचे सांगितले असेल आणि यहोवाविषयी त्याला शिकवले असेल इतके आपण सांगू शकतो. मोशेच्या हृदयात धार्मिकतेबद्दल विश्‍वास आणि आवड निर्माण करण्यात ते कितपत यशस्वी ठरले हे कालांतरानेच कळणार होते.

फारोच्या मुलीकडे त्याला परत पाठवल्यानंतर मोशेला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे” शिक्षण देण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये ७:२२) याचा असा अर्थ होऊ शकतो की, मोशेला दरबारी कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले असावे. ईजिप्तच्या लोकांच्या शिक्षणात गणित, भूमिती, शिल्पकला, बांधकाम आणि इतर कला व विज्ञानांचा समावेश होता. कदाचित, त्याला ईजिप्शियन धर्माचेही शिक्षण मिळावे अशी राजघराण्याची इच्छा असावी.

मोशेला राजघराण्यातील इतर मुलांबरोबर हे खास शिक्षण मिळाले असावे. हे उच्च शिक्षण “परदेशी शासकांच्या मुलांनाही मिळत असे ज्यांना ईजिप्तमध्ये ‘सुसंस्कृत’ होण्यासाठी ओलीस ठेवून नंतर [फारोच्या] अंकित असलेले राजे म्हणून राज्य करण्यास परत पाठवले जाई” व ते फारोला विश्‍वासू राहत असत. (चवथा थुटमोसचे राज्य, इंग्रजी, बेट्‌सी एम. ब्रायन यांचे लिखित) राजाच्या महालांना जोडून असलेल्या बालगृहांमध्ये मुलांना दरबारातील अधिकारी बनण्यासाठी तयार केले जात असे. * ईजिप्शियन मध्यसाम्राज्य काळातील व नवसाम्राज्य काळातील लिखाणांतून हे प्रकट होते की, फारोच्या कित्येक व्यक्‍तिगत सेवकांच्या व उच्च पदावरील सरकारी अधिकाऱ्‍यांच्या संदर्भात “बालगृहाचा बालक” ही आदरणीय पदवी मोठेपणीही वापरली जात असे.

दरबारी जीवनात मोशेची परीक्षा होणार होती. त्याला धन, ऐषाराम आणि सत्ता मिळू शकत होती. पण त्यासोबत नैतिक धोकेही होते. मोशेची काय प्रतिक्रिया होती? तो कोणाला विश्‍वासू राहिला? तो मनापासून यहोवाचा उपासक, जाच सहन करणाऱ्‍या इब्री लोकांचा बंधू होता की, त्याला मूर्तिपूजक ईजिप्त राष्ट्राकडून मिळणाऱ्‍या गोष्टी जास्त पसंत होत्या?

महत्त्वपूर्ण निर्णय

मोशे ४० वर्षांचा झाला तेव्हा तो पक्का ईजिप्शियन बनू शकला असता, परंतु ‘तो आपल्या भाऊबंदांकडे त्यांचे काबाडकष्ट पाहायला गेला.’ नंतरच्या त्याच्या कार्यांवरून हे स्पष्ट झाले की, त्याला केवळ उत्सुकता नव्हती; तर त्याला खरोखर मदत करायची इच्छा होती. एक ईजिप्शियन व्यक्‍ती एका इब्री व्यक्‍तीला मारत असताना त्याने पाहिले तेव्हा तो तिथे गेला आणि त्याने जाच करणाऱ्‍या त्या ईजिप्शियन व्यक्‍तीला ठार मारले. या कृत्यावरून हे दिसून आले की, मोशे अंतःकरणातून आपल्या बंधूंसोबत होता. मरण पावलेला मनुष्य हा बहुतेक एक अधिकारी होता जो आपले कार्य करत असता मारला गेला. ईजिप्शियन लोकांच्या नजरेत, मोशेने फारोशी विश्‍वासू राहायला हवे होते. परंतु, मोशेला न्यायाचीसुद्धा आवड होती हे, दुसऱ्‍या दिवशी एक इब्री व्यक्‍ती त्याच्या सोबत्याला अन्यायीपणे मारत असताना त्याने त्याचा विरोध केला तेव्हा स्पष्ट दिसून आले. मोशेला इब्री लोकांना या कठीण गुलामीतून सोडवायची इच्छा होती, परंतु फारोला मोशेच्या बेइमानीची खबर लागली व त्याने त्याला ठार मारायचा प्रयत्न केला तेव्हा मोशेला मिद्यानात पळून जावे लागले.—निर्गम २:११-१५; प्रेषितांची कृत्ये ७:२३-२९. *

देवाच्या लोकांना मुक्‍त करण्यासंबंधी मोशेची वेळ यहोवाच्या वेळेशी जुळली नाही. तरीपण, त्याच्या कृत्यांमधून त्याचा विश्‍वास दिसून आला. इब्री लोकांस ११:२४-२६ म्हणते: “मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्‍वासाने नाकारले; पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्‍यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.” का? कारण “ख्रिस्ताप्रीत्यर्थ [“ख्रिस्ताची,” NW] विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ति आहे असे त्याने गणिले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” येथे असाधारणपणे वापरलेला ‘ख्रिस्त’ हा शब्द ज्याचा अर्थ “अभिषिक्‍त जण” असा होतो, मोशेसाठी एकदम योग्य आहे कारण त्याला नंतर थेट यहोवाकडून एक खास कामगिरी देण्यात आली.

विचार करा! मोशेला लहानपणापासून मिळालेले प्रशिक्षण ईजिप्तमधील केवळ एका उच्चभ्रू व्यक्‍तीला मिळत होते. त्याच्या पदामुळे त्याची उत्तम प्रगती झाली असती आणि त्याला हवा तो ऐषाराम मिळाला असता, पण त्याने ते सर्व झिडकारले. यहोवाबद्दल प्रेम आणि न्यायाची आवड असल्यामुळे जाच करणाऱ्‍या फारोच्या दरबारातल्या जीवनाशी त्याला समरूप होता आले नाही. आपले पूर्वज अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना देवाने दिलेल्या अभिवचनांची माहिती असल्यामुळे व त्यावर मनन केल्यामुळे त्याने देवाची पसंती मिळवणे अधिक पसंत केले. त्यामुळे, यहोवाने आपले उद्देश पार पाडण्यासाठी त्याचा असाधारण पद्धतीने उपयोग करून घेतला.

सर्वात महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टींची निवड करण्याची पाळी आपल्या सर्वांवर येते. मोशेप्रमाणे तुमच्यासमोरही एखादा कठीण निर्णय घेण्याची वेळ आली असेल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत विशिष्ट सवयी किंवा सोयी त्यागण्यासाठी तयार आहात का? तुमच्यासमोर ही निवड असल्यास, लक्षात ठेवा की, मोशेला ईजिप्तच्या धनसंचयापेक्षा यहोवासोबतची मैत्री अधिक महत्त्वाची वाटली आणि त्याचा त्याला कधीही पस्तावा झाला नाही.

[तळटीपा]

^ परि. 17 हे शिक्षण, बॅबिलोनमध्ये दानीएल आणि त्याच्या साथीदारांनी सरकारी पदांवर कार्य करावे म्हणून त्यांना देण्यात आलेल्या शिक्षणाप्रमाणेच असावे. (दानीएल १:३-७) पडताळा, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी), अध्याय ३.

^ परि. 20 मिद्यानात तो स्वतः आश्रित असताना, कळपांची राखण करणाऱ्‍या असहाय मुलींवर अन्याय झाला तेव्हा त्याने त्यांची मदत केली यावरूनही त्याला न्यायाची आवड होती हे दिसून येते.—निर्गम २:१६, १७.

[११ पानांवरील चौकट]

दूध पाजणाऱ्‍या दाई

सहसा माताच आपल्या मुलांना दूध पाजत होत्या. परंतु, बायबल साहित्याची पत्रिका (इंग्रजी) यात विद्वान ब्रेव्हर्ड चाइल्ड्‌स असे म्हणतात, “काही वेळा उच्चस्तरीय [जवळच्या पौर्वात्य देशांतील] कुटुंबांमध्ये बाळाला दूध पाजणारी दाई ठेवली जात असे. बाळाची आई कमजोर असल्यास किंवा आई कोण आहे हे माहीत नसल्यास देखील दाई ठेवली जात होती. त्या वेळी, त्या ठराविक काळापर्यंत बाळाचे संगोपन करणे आणि त्याला पाजणे हे दाईचे काम होते.” जवळच्या पौर्वात्य प्राचीन देशांत दाईंना कामावर ठेवण्याबाबतच्या करारांचे अनेक पपायरसचे दस्तऐवज आजपर्यंत टिकून राहिले आहेत. सुमेरियन काळापासून कित्येक वर्षांनंतरच्या ग्रीक काळापर्यंत ईजिप्तमध्ये ही प्रथा फार रूढ होती याला हे दस्तऐवज पुष्टी देतात. या दस्तऐवजांमध्ये सहसा पुढील माहिती असे: संबंधित व्यक्‍तींची जबानी, कराराचा कालावधी, कामाच्या अटी, पोषणासंबंधी विशिष्ट सूचना, करार न ठेवल्यास दंड, वेतन आणि वेतन दिले जाण्याची पद्धत. चाइल्ड्‌स म्हणतात, सहसा, “दाईचे काम दोन ते तीन वर्षांसाठी असायचे. दाई आपल्याच घरात बाळाला ठेवायची परंतु काही वेळा बाळाचे परीक्षण करण्यासाठी बाळाला मालकाकडे पाठवावे लागायचे.”

[९ पानांवरील चित्रे]

एका प्राचीन चित्रकलेत दाखवल्याप्रमाणे, ईजिप्तमध्ये विटा बनवण्याच्या पद्धतीत मोशेच्या काळापासून आतापर्यंत फारसा फरक पडलेला नाही

[चित्राचे श्रेय]

वर: Pictorial Archive (Near Eastern History) Est.; खाली: Erich Lessing/Art Resource, NY