व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?

हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?

हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?

तुम्ही बाप्तिस्मा झालेले ख्रिस्ती असाल तर देवावर प्रेम असल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण करण्याची निश्‍चितच तुम्हाला उत्कंठा असेल. शिवाय, खासकरून ख्रिस्ती सेवाकार्यास तुम्ही स्वतःला वाहून घेतले असेल. कारण येशू ख्रिस्ताने त्याच्या सर्व अनुयायांवर शिष्य बनवण्याचे कार्य सोपवले होते. (मत्तय २८:१९, २०) कदाचित सध्या तुम्ही उदरनिर्वाहाकरता काहीतरी व्यवसाय करत असाल. पण येशूचे अनुयायी आणि यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे तुम्ही सर्वप्रथम ख्रिस्ती सेवक आहात—एक असा सेवक जो राज्य प्रचाराच्या कार्याला जीवनात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्व देतो.—मत्तय २४:१४.

कदाचित तुम्ही अद्याप विशी गाठली नसेल, किंवा नुकतेच विशीत पदार्पण केले असेल. आता पुढे जीवनात काय करावे याविषयी कदाचित तुम्ही बराच विचार केला असेल. तुमच्यापुढे असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडताना त्यातून तुम्हाला खरे समाधान मिळेल की नाही याचा तुम्ही निश्‍चितच विचार कराल.

डेन्मार्कमध्ये राहणाऱ्‍या योअर्न याने निवडलेल्या पर्यायाविषयी तो काय म्हणतो ते पाहा: “हा जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे, यात जगातल्या सर्वात महत्त्वाच्या कामात एकाग्रतेने गढून जाणे शक्य होते.” ग्रीस येथे राहणारी ३१ वर्षांची ईव्हा म्हणते: “मी माझ्या मित्रमैत्रिणींशी माझ्या जीवनाची तुलना करते तेव्हा मी नेहमी याच निष्कर्षावर येते की माझे जीवन जास्त आनंददायक, अर्थपूर्ण आणि रोमांचकारी आहे.” इतके समाधान देऊ करणारे कोणते करियर असेल? तुम्हीही हा मार्ग निवडू शकता का?

देव मार्ग दाखवतो का?

करियर निवडणे ही सोपी बाब नाही. काहीजण तर म्हणतात की देवाची माझ्याविषयी काय इच्छा आहे हे त्यानेच मला दाखवावे.

मोशे मिद्यानात असताना यहोवाने त्याला ईजिप्तला परत जाऊन इस्राएली लोकांना गुलामगिरीतून सोडवण्यास सांगितले. (निर्गम ३:१-१०) गिदोनलाही देवदूताने दर्शन देऊन इस्राएलास जुलूमापासून मुक्‍त करण्यासाठी त्याला निवडण्यात आले असल्याचे सांगितले. (शास्ते ६:११-१४) दावीद मेंढरे चारत असताना देवाने शमुवेलास त्याला इस्राएलचा नवा राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यास सांगितले. (१ शमुवेल १६:१-१३) आज या मार्गांनी यहोवा आपले मार्गदर्शन करत नाही. उलट आपण स्वतः साधकबाधक विचार करून, त्याने आपल्याला दिलेल्या बुद्धीचा व कौशल्यांचा कसा वापर करावा ते ठरवले पाहिजे.

यहोवाने आज ख्रिस्ती तरुणांकरता ‘मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार उघडले आहे.’ (१ करिंथकर १६:९) कशाप्रकारे? मागील दहा वर्षांत राज्य प्रचारकांच्या संख्येत २१,२५,००० जणांची भर पडली असून सबंध पृथ्वीवर आता ६० लाखांपेक्षा अधिक प्रचारक झाले आहेत. या सर्वांच्या आध्यात्मिक पोषणाकरता आणि जगभरातील सुवार्ता प्रचाराच्या कार्यासाठी लागणारे कोट्यवधी बायबल, पुस्तके, माहितीपत्रके, नियतकालिके आणि पत्रिका पुरवण्यासाठी कोण सहयोग देतात? हा बहुमान जगभरातील बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना लाभला आहे.

एक आनंददायक जीवन

बेथेल म्हणजे “देवाचे घर.” बेथेल गृहे ही वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयात व शाखा दफ्तरांत सेवा करणाऱ्‍या ख्रिस्ती स्वयंसेवकांची निवासस्थाने आहेत. (उत्पत्ति २८:१९) बेथेल कुटुंबे, यहोवाबद्दलच्या प्रेमावर आधारित असलेली सुसंघटित व ‘सुज्ञानाच्या योगे बांधलेली घरे’ आहेत असे म्हणता येईल.—नीतिसूत्रे २४:३.

बेथेलच्या कुटुंबासमान वातावरणाविषयी काय म्हणता येईल? एस्टोनिया बेथेल कुटुंबातील एक २५ वर्षीय सदस्या असे म्हणते: “यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांच्या सहवासात आपण सतत आहोत ही जाणीव मला फार सुखावह वाटते. माझ्याकरता ही बेथेलची सर्वात अमूल्य देणगी आहे.”—स्तोत्र १५:१, २.

आज बेथेल सेवा करण्याची सुसंधी सबंध जगात जवळजवळ १९,५०० जणांना लाभली आहे. (स्तोत्र ११०:३) संयुक्‍त संस्थानांतील बेथेलमध्ये राहणाऱ्‍या एकूण सदस्यांपैकी ४६ टक्के १९-२६ या वयोगटातील आहेत. यशयाप्रमाणे त्यांनी देखील म्हटले आहे: “हा मी आहे! मला पाठीव.” (यशया ६:८) यशया आधीच यहोवाचा समर्पित सेवक होता पण सेवेची आणखी एक सुसंधी मिळवण्याकरता तो स्वेच्छेने पुढे आला. साहजिकच यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. बेथेल सेवा करणारे आपले घरदार, आईवडील, बहीणभाऊ व मित्रमैत्रिणींना सोडून येतात. हा त्याग ते “सुवार्तेकरिता” स्वेच्छेने करतात.—मार्क १०:२९, ३०.

पण मोबदल्यात त्यांना बेथेलमध्ये किती विलक्षण आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात! रशियातील बेथेल कुटुंबाची सदस्या असलेल्या एका तरुणीने या गोष्टीला दुजोरा दिला: “आत्मत्यागी वृत्ती बाळगल्यामुळे आपण असे बरेच काही शिकू शकतो ज्याचा उपयोग आपल्याला नव्या जगात होणार आहे. माझ्या बाबतीत तर मला वाटतं की मी केलेल्या त्यागापेक्षा यहोवाने मला दिलेले आशीर्वाद कितीतरी पटीने जास्त आहेत.”—मलाखी ३:१०.

बेथेलचे जीवन

बेथेलचे जीवन कसे असते? बेथेल कुटुंबाचे बहुतेक सदस्य सांगतात की त्यांचे जीवन अतिशय आरोग्यदायक, संतुष्टीदायक आणि रोमांचकारी आहे. ४३ वर्षांचे जेन्स यांना बेथेल जीवन अतिशय आवडते. का? ते सांगतात: “एक महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण करण्याच्या विश्‍वव्यापी प्रयत्नात आपलाही वाटा आहे या जाणिवेमुळे. यहोवाचे कार्य किती व्यापक प्रमाणात पार पाडले जात आहे याची मला बेथेलमध्ये राहून कल्पना येते.”

बेथेलमध्ये सोमवार ते शनिवार दिवसाची सुरवात सकाळच्या उपासनेने होते. यात बायबलवर आधारित चर्चा केली जाते. ही चर्चा एका अनुभवी वडिलांकडून चालवली जाते. सोमवारी संध्याकाळी एक तास टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या साहाय्याने बेथेल कुटंबाचा बायबल अभ्यास असतो. कधीकधी या अभ्यासानंतर खास बेथेल कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेले बायबलवर आधारित भाषण दिले जाते.

बेथेलमध्ये येणाऱ्‍या नवीन सदस्यांना कोणते प्रशिक्षण दिले जाते? नव्या सदस्यांना बेथेल जीवनाची सवय लावायला मदत करण्यासाठी त्यांना कुटुंबातील अनुभवी बांधवांकडून बेथेल जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी व्याख्याने दिली जातात. पहिल्या वर्षी नवीन सदस्याला काही आठवड्यांपर्यंत चालणाऱ्‍या एका खास प्रशालेला उपस्थित राहावे लागते. दर आठवडी होणाऱ्‍या या प्रशालेत नवीन सदस्याला बायबलचे ज्ञान वाढवण्यास मदत केली जाते. नवीन सदस्यांकरता बायबल वाचनाचा एक खास आराखडाही असतो. बेथेल सेवेच्या पहिल्या वर्षी कुटुंबातील नवीन सदस्य संपूर्ण बायबल वाचून काढतात.

या सर्व प्रशिक्षणाचा कसा फायदा होतो? हाँगकाँग बेथेल कुटुंबातील जोशुआ नावाच्या एका ३३ वर्षीय सदस्याने याचे उत्तर दिले: “बेथेलला आल्यामुळे यहोवा देवाबद्दलची माझी कृतज्ञता वाढत गेली आहे. यहोवा देवाच्या सेवेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्‍या कित्येक अनुभवी बांधवांचा सहवास मला इथे लाभला. शिवाय, सकाळची उपासना व बेथेल कुटुंबाचा टेहळणी बुरूज अभ्यास यांसारख्या बेथेलच्या आध्यात्मिक कार्यक्रमांचा मला खास लाभ झाला आहे. मला बेथेलची सुव्यवस्थित आणि साधीसुधी जीवनशैली आवडते. यामुळे अनावश्‍यक कटकटींपासून माणूस दूर राहतो. शिवाय कोणतीही गोष्ट ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभणाऱ्‍या पद्धतीने कशी करावी हे मला बेथेलमध्ये शिकायला मिळाले आहे आणि याचा मला नेहमीच फायदा झाला आहे.”

बेथेल कुटुंबातील सदस्यांचा बहुतेक वेळ आणि शक्‍ती, त्यांनी ज्यासाठी आपले जीवन स्वेच्छेने वाहिले आहे त्यातच खर्च होते. अर्थात, बेथेलमध्ये त्यांना नेमण्यात आलेल्या कामाला प्राधान्य देऊन त्यासाठी आपल्या शारीरिक व बौद्धिक क्षमतांचा उपयोग करणे. बेथेलमध्ये कामाला तोटा नाही. काहीजण छपाईयंत्र चालवतात, तर काही बाइंडिंग विभागात काम करतात; येथे पुस्तके तयार केली जातात, जी नंतर बऱ्‍याच मंडळ्यांना पाठवली जातात. काहीजण स्वयंपाकघर, भोजनगृह, आणि लॉन्ड्रीत काम करतात. याशिवाय, साफसफाई, बागबागिच्यांची कामे, बांधकाम आणि इतर बरीच कामे असतात. काहींना या वेगवेगळ्या विभागांतील यंत्रे सुस्थितीत ठेवण्याचे काम असते. काहीजण वैद्यकीय मदत देण्याचे काम करतात किंवा ऑफिसची कामे करतात. बेथेलमधील प्रत्येक काम आव्हानात्मक, पण त्याचवेळी अत्यंत आनंददायक आणि समाधानकारक आहे. याचे कारण, येथील कामामुळे देवाच्या राज्याच्या वाढीला हातभार लागतो आणि प्रत्येक काम देवाबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावनेने केले जाते.

बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना वेगवेगळ्या मंडळ्यांसोबत कार्य करण्यास नियुक्‍त केले जाते. यामुळे त्यांना बेथेलमध्ये केलेल्या कामाचे परिणाम प्रत्यक्ष पाहायला मिळतात. मंडळीसोबत सभांना उपस्थित राहण्यास व प्रचार कार्यात सहभाग घेण्यास त्यांना आनंद वाटतो. यामुळे बेथेल कुटुंबाच्या बऱ्‍याच सदस्यांचे स्थानीय मंडळीच्या बांधवांसोबत घनिष्ट संबंध जुळले आहेत.—मार्क १०:२९, ३०.

ब्रिटनच्या बेथेल कुटुंबातील रिटा नावाची एक सदस्या म्हणते: “मंडळीसोबत कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे! मी सभांना जाते किंवा प्रचार कार्यात जाते तेव्हा आपल्या बांधवांना, बहिणींना, लहान मुलांना आणि वृद्ध बंधूभगिनींना पाहून माझा विश्‍वास अधिक बळकट होतो! कितीही कठीण परिस्थिती आली तरी ते यहोवाच्या कार्यात तत्पर राहतात. त्यांच्याकडे पाहून मला माझ्या बेथेल सेवेत आणखी जीव ओतून कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळते.”

पण बेथेल जीवन म्हणजे फक्‍त काम, सभा, क्षेत्र सेवा आणि अभ्यास यापुरतेच सीमित नाही. विरंगुळा व करमणुकीसाठी वेळोवेळी बेथेल कुटुंबात “फॅमली नाईट” आयोजित केली जाते. हा कार्यक्रम मनोरंजक आणि आध्यात्मिकरित्या उभारणीकारक असतो. कुटुंबातील बांधवांकडे असलेली वेगवेगळी कलाकौशल्ये पाहण्याची या कार्यक्रमांतून संधी मिळते तसेच त्यांचे उभारणीकारक अनुभवही ऐकायला मिळतात. याशिवाय, कुटुंबातील सदस्य वेळोवेळी एकमेकांकडे जाऊन भेटी देतात आणि आनंददायक व उभारणीकारक सहवासाचा आस्वाद घेतात. काही करमणुकीची साधने व सुविधा देखील बेथेल कुटुंबीयांकरता पुरवल्या जातात, तसेच वाचनाकरता व संशोधनाकरता ग्रंथालयाचीही सोय उपलब्ध आहे. शिवाय दररोज जेवणाच्या टेबलवरही बांधव आनंदाने गप्पागोष्टी करतात.

एस्टोनिया येथील बेथेल कुटुंबाचे एक सदस्य टॉम म्हणतात: “बेथेलपासून थोडे अंतर चालून गेले की समुद्र लागतो आणि जवळच सुंदर जंगल आहे. माझ्या पत्नीला व मला तेथे फिरायला जायला फार आवडते. अधूनमधून मी मंडळीतल्या किंवा बेथेलमधल्याच मित्रांसोबत गॉल्फ, हॉकी व टेनिसही खेळतो. आणि हवामान चांगले असेल तर कधीकधी आम्ही मोटारसायकलींवर फिरायला जातो.”

बेथेलला येण्याकरता तुम्ही काय करावे?

अर्थात, बेथेल हे मुख्यतः एक असे ठिकाण आहे जेथे प्रौढ ख्रिस्ती यहोवाची उपासना करतात आणि सबंध जगभरातील त्यांच्या बांधवांकरता काम करतात. बेथेल कुटंबाचे सदस्य बनू इच्छिणाऱ्‍यांना काही पात्रता पूर्ण करणे आवश्‍यक आहे. बेथेल सेवा करण्याची तुमची इच्छा असल्यास काय करावे लागेल?

प्रेषित पौलासोबत सेवा करणाऱ्‍या तीमथ्याप्रमाणे ज्यांना बेथेल सेवेकरता घेतले जाते, त्यांचे मंडळीत चांगले नाव असणे महत्त्वाचे आहे. (१ तीमथ्य १:१) तीमथ्याला “लुस्त्रातले व इकुन्यातले बंधु नावाजीत होते.” (प्रेषितांची कृत्ये १६:२) तो वयाने लहान होता तरीसुद्धा त्याला शास्त्रवचनांचे चांगल्यापैकी ज्ञान होते आणि तो सत्याच्या मार्गात खंबीर होता. (२ तीमथ्य ३:१४, १५) त्याचप्रमाणे बेथेल सेवेकरता ज्यांना घेतले जाते त्यांना देखील बायबलचे ज्ञान असावे अशी अपेक्षा केली जाते.

बेथेल कुटुंबातील सदस्यांची आत्मत्यागी वृत्ती असली पाहिजे. तीमथ्याची आत्मत्यागी वृत्ती आणि राज्याच्या वाढीकरता स्वतःचे स्वार्थ मागे टाकण्याची त्याची तयारी त्याच्या वागण्याबोलण्यातून इतकी स्पष्ट दिसून यायची की पौलाने त्याच्याविषयी असे म्हटले: “तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही; कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात; पण त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करितो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.”—फिलिप्पैकर २:२०-२२.

बेथेल सेवेकरता आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्‍तींची गरज आहे. बेथेल कुटुंबांच्या सदस्यांकरता केल्या जाणाऱ्‍या तरतुदींमुळे त्यांना बायबल अभ्यास, नियमित सभांची उपस्थिती व क्षेत्र सेवा आणि प्रौढ व अनुभवी बांधवांचा सहवास यांद्वारे आध्यात्मिक विकास करण्याची संधी लाभते. त्याअर्थी बेथेलमध्ये राहणाऱ्‍यांना पौलाच्या या सल्ल्याचे पालन करण्यास मदत मिळते: “[ख्रिस्त येशूमध्ये] चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्‍वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.”—कलस्सैकर २:६, ७.

बेथेलच्या कामाच्या स्वरूपामुळे या खास सेवेसाठी ज्यांना स्वीकारले जाते ते शारीरिकरित्या सुदृढ आणि निरोगी असले पाहिजेत. वरती उल्लेख केलेल्या योग्यता तुमच्याकडे असतील, तुम्ही वयाची १९ वर्षे पूर्ण केलेली असतील आणि तुमचा बाप्तिस्मा होऊन निदान एक वर्ष पूर्ण झाले असेल तर आम्ही तुम्हाला बेथेल सेवेविषयी विचार करण्याचे प्रोत्साहन देऊ इच्छितो.

सर्वांचा वाटा आहे

ख्रिस्ती या नात्याने आपल्या जीवनात राज्याच्या कार्याला प्राधान्य देण्याची व यहोवाची तन, मन लावून सेवा करण्याची निश्‍चितच आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. (मत्तय ६:३३; कलस्सैकर ३:२३) तसेच, जे बेथेलमध्ये सेवा करत आहेत त्यांना तेथेच राहून पवित्र सेवा करत राहण्याचे आपण प्रोत्साहन देऊ शकतो. आणि खासकरून जे तरुण बांधव बेथेल सेवेकरता योग्य आहेत अशांना हा विलक्षण बहुमान मिळवण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे.

बेथेलचे जीवन हे आध्यात्मिक संतुष्टी देणारे जीवन आहे—तुमच्याकरता हे सर्वात उत्तम करियर ठरू शकते. वयाच्या २० व्या वर्षापासून बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या निकचे हेच मत आहे. दहा वर्षे बेथेलमध्ये सेवा केल्यानंतर ते म्हणतात: “माझ्या योग्यतेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात माझ्यावर कृपा दाखवल्याबद्दल मी कित्येकदा यहोवाचे आभार मानतो. बेथेलमध्ये, यहोवाच्या सेवेकरता आपले सर्वस्व देणारे विश्‍वासू बांधव सदोदीत माझ्या अवतीभवती असतात. मी यहोवाकडे आणखी काय मागू शकतो?”

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

मंडळीतील वडील व पालक यांनी काय करावे?

मंडळीतल्या वडिलांनी आणि प्रवासी पर्यवेक्षकांनी खासकरून तरुण बांधवांना बेथेल सेवेकरता प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे. अलीकडेच बेथेल कुटुंबातील काही बांधवांना सहज विचारण्यात आले तेव्हा असे आढळले, की ३४ टक्के बांधवांना खासकरून त्यांच्या विभागीय पर्यवेक्षकांनीच बेथेल सेवेकरता प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन दिले होते. काही बांधव बेथेलला गेल्यामुळे स्थानीय मंडळीला त्यांची कमी जाणवेल, हे कबूल आहे. पण आपण आठवणीत ठेवले पाहिजे, की तीमथ्य हा लुस्त्रा व इकुन्या येथील मंडळ्यांत इतर तरुणांकरता फार चांगले उदाहरण असला तरीसुद्धा तेथील वडिलांनी त्याला पौलासोबत सेवा करायला जाण्यापासून रोखले नाही. तीमथ्य प्रेषित पौलासोबत गेल्यामुळे त्यांच्या मंडळीला फार मोठे नुकसान होईल असा त्यांनी विचार केला नाही.—१ तीमथ्य ४:१४.

ख्रिस्ती आईवडिलांनी खासकरून या बाबतीत आपल्या मुलांना उत्तेजन दिले पाहिजे. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे बेथेल कुटुंबातील काही बांधवांना विचारण्यात आले असता, ४० टक्के बांधवांना त्यांच्या आईवडिलांनी बेथेल सेवा सुरू करण्याचे प्रोत्साहन दिले होते असे आढळते. काही वर्षांपासून बेथेल सेवा करत असलेल्या एका बहिणीने म्हटले: “माझ्या आईवडिलांनी ज्याप्रकारे जीवनभर यहोवाची सेवा केली त्यामुळे मला बेथेल सेवा सुरू करण्यासाठी फार मोठे प्रोत्साहन मिळाले. पूर्ण वेळेच्या सेवाकार्यातील त्यांचे उदाहरण माझ्यासमोर असल्यामुळे मला पूर्ण खात्री होती की हाच मार्ग सर्वात चांगला आणि सर्वात संतुष्टीदायक ठरेल.”

[२४ पानांवरील चौकट]

बेथेल सेवेचे मोल जाणणारे

“माझी बेथेल सेवा मी अमूल्य समजतो. मी सबंध दिवस यहोवाच्या सेवेत घालवला, आणि उद्या, परवा आणि पुढेही असेच करीन हा विचार केल्यावर मला खूप समाधान मिळतं. यामुळे मी शुद्ध विवेकानं यहोवाची सेवा करू शकतो आणि मला सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला मदत होते.”

“बेथेल असं ठिकाण आहे जिथं तुम्ही तुमचा सगळा वेळ आणि शक्‍ती कोणत्याही विकर्षणाशिवाय यहोवाच्या सेवेकरता वाहू शकता. यातून आंतरिक आनंद मिळतो. तसेच यहोवाच्या संघटनेकडे तुम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता. संघटनेच्या केंद्रस्थानी राहून कार्य करण्याचा अनुभव खरोखर फार रोमांचकारी आहे.”

“मी बेथेलला आले, ही माझ्या जीवनातली सर्वात चांगली गोष्ट आहे. इथं मला सतत नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि या शिकलेल्या गोष्टी माझ्या स्वतःसाठी नव्हेत तर यहोवासाठी आहेत. त्यामुळे इथं मी केलेलं काम कधीही व्यर्थ ठरणार नाही.”

“माझ्या कौशल्यांचा बेथेलच्या कार्यात उपयोग केल्यामुळे मला मोठं समाधान व मानसिक शांती मिळते कारण मी यहोवासाठी आणि बांधवांसाठी त्यांचा उपयोग करत आहे याची मला जाणीव आहे.”

“माझ्या पूर्वीच्या करियरमधून मला खरं समाधान व आनंद मिळू शकला नाही. माझ्या भाऊबहिणींसोबत आणि त्यांच्याकरता सेवा करण्याची मला बऱ्‍याच वर्षांपासून इच्छा होती. म्हणूनच मी बेथेलला आलो. इथं माझी सगळी मेहनत इतरांच्या आध्यात्मिक फायद्याकरता आहे आणि यामुळे यहोवाची स्तुती होते याचा विचार करून मला खरं समाधान मिळतं.”